डॉ. भाऊसाहेब नन्नवरे – bmnannawaretwt@gmail.com

‘पाणकळा’, ‘सराई’, ‘पड रे पाण्या’, ‘आई आहे शेतात’ अशा एकापेक्षा एक सरस कादंबऱ्यांमधून कोकणातील जीवन, शेतकरी व आदिवासींची दु:खं, त्यांच्या व्यथा-वेदना वेशीवर टांगणारे ज्येष्ठ साहित्यिक र. वा. तथा रघुनाथ वामन दिघे यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष. त्यानिमित्ताने त्यांच्या लेखनाचा घेतलेला वेध..

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

विसाव्या शतकात नाथमाधव, ग. त्र्यं. माडखोलकर, पु. भा. भावे, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर आदींनी ‘कादंबरी युग’ निर्माण केले. त्यातले एक अग्रगण्य नाव म्हणजे ज्येष्ठ कथा-कादंबरीकार र. वा. दिघे. कोकणात खंडाळा घाटाच्या पायथ्याशी शेतकरी, आदिवासींमध्ये प्रत्यक्ष वावरून त्यांच्या जगण्यातली वास्तवता पहिल्यांदा र. वा. दिघे यांनी प्रभावीपणे मांडली. दिघे स्वत: खोपोलीचे. स्वाभाविकपणेच त्यांच्या कादंबऱ्या ग्रामीण पाश्र्वभूमीचे चित्रण करणाऱ्या. त्यांच्या कादंबऱ्यांतील नायक हा बहुधा वारकरी वा शेतकरीच असे. हा नायक वारकरी संप्रदायाची मूल्यं कशी जपतो आणि निसर्गाच्या आपत्तींशी कसा मुकाबला करतो याची वर्णनं त्यांच्या कादंबऱ्यांमधून अनुभवायला मिळतात.

१९४० साली लिहिलेली ‘पाणकळा’ ही त्यांची पहिली कादंबरी. पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथावेदना त्यांनी तीत मांडलेल्या आहेत. सजलपूर गावातील गावकऱ्यांची आणि तिथल्या डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या भिल्लांची ही कथा आहे. या वेगळ्या ग्रामीण कथानकामुळे कोणीही प्रकाशक ही कादंबरी प्रकाशित करण्यास तयार होईना. शेवटी दिघे यांनी स्वत:च पदरमोड करून या कादंबरीच्या हजार प्रती काढल्या. आज ‘पाणकळा’ प्रकाशित होऊन पंच्याहत्तर र्वष लोटली आहेत. नुकतीच या कादंबरीची अकरावी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. १९४० साली जमखिंडी येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात उत्कृष्ट कादंबरीचा ‘ना. सी. फडके पुरस्कार’ विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण’ आणि र. वां.च्या ‘पाणकळा’ या दोन कादंबऱ्यांना विभागून देण्यात आला होता. माधुरी तळवलकर यांनी ‘पाणकळा’ ची संक्षिप्त आवृत्ती (जोत्स्ना प्रकाशन) प्रसिद्ध केली आहे.

‘सराई’, ‘पड रे पाण्या’, ‘सोनकी’, ‘हिरवा सण’ या कादंबऱ्यांमधून कोकणातील शेतकरी व आदिवासींची दु:खं त्यांनी समाजासमोर मांडली. र. वा. दिघे यांनी बी. ए.- एलएल. बी. झाल्यावर पुणे व पनवेलमध्ये सोळा वर्षे वकिली केली. परंतु एका घरगुती प्रसंगाने दु:खी झालेले दिघे वकिली सोडून कायमस्वरूपी खोपोलीला आले आणि लेखनाकडे वळले. ते स्वत: हाडाचे शेतकरी असल्याने कोकणात न पिकणारा गहू आपल्या शेतात पिकवून दाखवल्याबद्दल १९५४-५५ साली खालापूर तालुका विकास संघाने ‘प्रगतशील शेतकरी’ म्हणून त्यांचा गौरव केला. ७०-८० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे कळीचे प्रश्न त्यांनी आपल्या लेखनातून मांडले. आज शेतकरी आत्महत्या करताहेत; परंतु हा इशारा र. वां.नी त्याकाळीच दिला होता. नुसत्या शेतीवर अवलंबून उपयोगी नाही, काहीतरी जोडधंदा करा.. ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ हा विचार त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून त्याकाळीच मांडला होता.

‘आई आहे शेतात’ या कादंबरीत शेतकऱ्यांचं खडतर जीवन त्यांनी चितारलं आहे. ‘‘शेती ही फुकाची नाही. इथं कौशल्य लागतं. त्यात भातशेती म्हणजे कशिदा. गप्पा मारून वा शिरा ताणून भागायचं नाही. इथं नुसतं जमीनवाटप करून वा कायदे करून हा प्रश्न सुटायचा नाही. शेतीचे ज्ञान असणाऱ्यांच्या हातात जमीन गेली पाहिजे किंवा ज्यांच्या हातात ती आहे, त्यांनी अद्ययावत शेतकरी बनलं पाहिजे. नाहीतर ही काळी आई आपली बाळं खाऊन टाकील..’’ शेतकीच्या यशाचं हे गमक त्यांनी कृषीतज्ज्ञाच्या अधिकारवाणीने शेतकऱ्यांना सांगितलं.

त्यांनी अनेक सामाजिक विषयही आपल्या लेखणीतून हाताळले. त्यांची ‘कार्तिकी’ ही कादंबरी अस्पृश्यता निवारण या विषयावर आहे. त्यावर पुढे ‘कार्तिकी’ नावाचा चित्रपटही निघाला. लेखनासाठी त्यांनी खूप भटकंती केली. ‘सोनकी’ ही कादंबरी लिहिण्याआधी गोंडवनात जाऊन त्यांनी तिथलं आदिवासी जीवन व तो परिसर जवळून न्याहाळला. या कादंबरीत खेडय़ाचं सुंदर वर्णन आहे. यानंतर त्यांच्या ‘निसर्गकन्या रानजाई’ व ‘गानलुब्धा मृगनयना’ या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. ‘पड रे पाण्या’ या कादंबरीत त्यांनी पावसाची केलेली आळवणी उद्बोधक आहे..

‘पड रं पाण्या, पड रं पाण्या

कर पाणी पाणी

शेत माझं लय तान्हलं चातकावाणी

बघ नांगरलं कुळवून वज त्याची केली

सुगरणबाई पाभळली शेतावर नेली

तापली धरणी,

पोळले चरणी मी अनवाणी

पड रं पाण्या, पड रं पाण्या,

कर पाणी पाणी..’

‘गानलुब्धा मृगनयना’ या कादंबरीत त्यांनी ग्वाल्हेर संस्थानचा तोमरवंशीय राजा मानसिंह व त्याची प्रेयसी मृगनयना यांची प्रेमकथा रंगवली आहे. या कादंबरीचं वैशिष्टय़ म्हणजे तीत ठिकठिकाणी पद्यं पेरली आहेत. यावरून त्यांना संगीत रागदारीचं किती ज्ञान होतं हे दिसून येतं. त्यांची अपूर्ण राहिलेली ‘हिरवा सण’ ही कादंबरी त्यांचे मित्र ग. ल. ठोकळ यांनी नंतर लिहून पूर्ण केली.

दिघे यांनी बरंच कथालेखनही केलं. त्यांची ‘लज्जा’ ही पहिली कथा ‘मनोहर’ मासिकात प्रसिद्ध झाली. पुढे ‘किर्लोस्कर’मध्ये त्यांच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या. त्यांचे ‘रम्य रात्री’, ’पूर्तता’, ‘आसरा’ आणि ‘ताजमहाल’ हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. ‘माझा सबूद’, ‘सिस्टर तारा’ ही मराठी व ‘ळँी ऊ१ींे ळँं३ श्ंल्ल्र२ँी’ि हे इंग्रजी नाटक त्यांनी लिहिलं.. जे अप्रकाशित आहे. गांधीजींच्या जन्मशताब्दीनिमित्त अमेरिकेतील इलिनॉइस विद्यापीठाने नाटय़संहितेची जागतिक स्पर्धा आयोजित केली होती. १८७ देशांतील लेखकांनी त्यात सहभाग घेतला होता. त्यात ‘द ड्रीम दॅट व्हॅनिश्ड्’ या र. वां.च्या नाटकाचा सहावा क्रमांक आला. ‘गातात व नाचतात धरतीची लेकरे’ हा त्यांचा लोकगीतसंग्रहही प्रसिद्ध झालेला आहे. काव्याबद्दलही त्यांना विशेष रूची असल्याने काही कविताही त्यांनी लिहिल्या; परंतु त्या अप्रकाशित आहेत. आपली पहिली कविता ‘रानपाखरे’ ही वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी सोलापूरला असताना त्यांनी लिहिली होती.

लोकसंस्कृती, लोकजीवन, निसर्ग, माणसं, त्यांच्या समजुती, चालीरीती, बोलीभाषा, दैवतं यांचा समूहनिष्ठ कलात्मक आविष्कार दिघे यांच्या लेखनातून व्यक्त होतो. ग्रामीण जीवनाच्या प्रत्यक्षानुभवांतून व निसर्गाच्या सहवासातून त्यांचे लेखन स्फुरलेले आहे. ‘बाबांनी कुठलंही लेखन चार भिंतीच्या आत बसून न करता निसर्गाच्या सान्निध्यातच ते केलं. कधी घराच्या परसात असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली, कधी शेताच्या बांधावर, तर कधी विहारी नदीवर बांधलेल्या पुलाच्या खांबाला टेकून ते लेखन करीत असत..’ अशी आठवण र. वां.चे चिरंजीव वामनराव दिघे सांगतात.

र. वां.च्या ‘पाणकळा’ कादंबरीवर ‘मदहोश’ आणि ‘सराई’वर ‘बनवासी’ हे हिंदी चित्रपट निघाले. ‘पड रे पाण्या’वर ‘धरतीची लेकरं’ हा चित्रपट आला. डॉ. सदानंद मोरे, डॉ. आनंद यादव आणि डॉ. माधव पोतदार यांनी त्यांच्या लेखनावर अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत. र. वां.चा ‘अस्सल मराठी मातीतला शेतकरी कादंबरीकार’ म्हणून गौरव करून त्यांच्या कादंबऱ्या आणि वारकरी संप्रदाय असा अभ्यास व्हायला हवा, असे मत डॉ. मोरे यांनी त्यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात व्यक्त केले होते. त्यांच्या साहित्यावर संशोधन करून ‘कादंबरीकार र. वा. दिघे’ हा समीक्षाग्रंथ डॉ. रवींद्र ठाकूर यांनी लिहिला आहे. १९६० साली ठाणे येथील साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. असे असले तरी कोकणातील हा साहित्यिक काहीसा उपेक्षितच राहिला असे म्हणावे लागेल. मराठी समीक्षेने त्यांच्या लेखनाची म्हणावी तशी दखल घेतली नाही. त्यांचं लेखन वास्तवदर्शी असूनही त्यांना जाणीवपूर्वक ‘लोकप्रिय लेखक’ म्हणून समीक्षकांनी डावललं. दिघे निगर्वी होते. आपण मोठे कादंबरीकार आहोत हा अहंभाव त्यांच्यात अजिबातच नव्हता.

४ जुलै १९८० ला र. वा. दिघे यांचं निधन झालं. खोपोलीतील विहारीत त्यांचं वास्तव्य होतं. खोपोली नगरपरिषदेने त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ र. वा. दिघे स्मारक व वाचनालय उभारलं आहे. र. वां.चे पुत्र वामनराव दिघे यांनी संस्कृती प्रकाशनातर्फे त्यांची ग्रंथसंपदा पुन:प्रकाशित केली आहे. त्यांच्या लेखणीतून चितारला गेलेला निसर्ग व कृषीजीवनाचा कलात्मक अनुभव, त्यांची चिंतनशीलता, आधुनिक विचार व कार्याचा नव्याने शोध घेणं हेच र. वा. दिघे यांना विनम्र अभिवादन ठरेल.