|| मुकुंद संगोराम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राशिद खान : आजच्या आणि कालच्याही पिढीतलं भारतीय अभिजात संगीतातलं तळपतं नाव. ‘लोकसत्ता गप्पा’च्या जाहीर मंचावर त्यांनी व्यक्त केलेली सांगीतिक ‘सोच’.. अन् दुसऱ्या दिवशी खासगी संवाद मैफलीत पूर्णत्वास गेलेलं तेच नादब्रह्म!

गाण्यात दर्द हवा..

भारतीय संगीत खूप कारणांसाठी नशीबवान. ते इतकी शतकं टिकून राहिलं, पुढे पुढे जात राहिलं, याचं कारण या अभिजात संगीतात काळाच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक प्रतिभावंतांनी आपली सर्जनशीलता व्यक्त करून त्यात प्राण फुंकले. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात हे संगीत इतक्या उंचीवर पोहोचलं होतं, की सगळेच कलावंत नावीन्याच्या शोधात आपली सारी प्रतिभा पणाला लावत होते. संगीतात ज्याला ‘घराणं’ म्हणतात, त्या घराण्यांची- म्हणजे एका पूर्णपणे स्वतंत्र शैलीची स्थापना त्या काळात होत राहिली. त्यापूर्वीच्या घराण्यांच्या शैलीपासून वेगळे होत आणखी नवे काही शोधण्याचा हा प्रयत्न अपूर्व म्हणावा असाच होता. या प्रयत्नांना रसिकांकडून मिळत जाणारी दाद खूपच आश्वासक होती आणि त्यामुळे सतत काहीतरी वेगळं आणि अभिजात घडवण्यासाठीची ही गुणात्मक स्पर्धा भारतीय संगीताला आणखी काही काळ पुढे नेण्यासाठी उपयोगी पडली. अनेक ज्येष्ठ, थोर कलावंतांच्या त्या असामान्यत्वाला लवून मुजरा करणारे तेव्हाचे रसिकही ‘आता यानंतर काय?’ असा प्रश्न मनातल्या मनात विचारतच होते. हे संगीत पुन्हा टिकून राहण्याची धडपड करत असतानाच्या नेमक्या काळात उस्ताद अमीर खाँ, पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व यांच्यासारखे अतिशय प्रज्ञावान कलावंत पुढे आले आणि संगीताला पुन्हा एकदा नवसंजीवनी प्राप्त झाली. नंतरच्या काळात पंडिता किशोरी आमोणकरांसारख्या कलावतीनेही भारतीय अभिजात संगीतात आपलं वेगळेपण सिद्ध केलं.

एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी संगीताच्या भविष्याची जी हुरहुर सगळ्याच रसिकांमध्ये भरून राहिली, त्याचं उत्तर त्याआधीपासूनच दिसायला लागलं. ‘राशिद खान’ हे ते उत्तर. स्वातंत्र्यानंतर दोन दशकांनी जन्मलेल्या राशिद खान यांच्या रूपाने भारतीय संगीत आणखी काही काळ टिकून राहण्याची शक्यता निर्माण झाली, याचे कारण त्यांनी अतिशय विचारपूर्वक तयार केलेली गायकी. ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित केलेल्या गप्पांच्या कार्यक्रमात उस्ताद राशिद खान यांनी नेमक्या याच विषयावर आपलं चिंतन व्यक्त केलं.

‘सगळेजण घराणं, घराणं म्हणतात.. घराणं तर असतंच, पण तुमची म्हणून एक स्वतंत्र गायकीही असते. मला ज्या ज्या कलावंतांच्या गाण्यात काही सुंदर दिसलं, ते मी माझ्या गायकीत आणण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तुमची स्वत:ची म्हणून एक ‘सोच’ असावी लागते..’ उस्तादजी सांगत होते. ते जे सांगत होते, तेच नेमकं पन्नासच्या दशकात भीमसेनजी करत होते. किराणा घराण्याची तालेवार तालीम मिळाल्यानंतरही त्यांनी त्या काळातल्या स्वरांच्या परिघात आपल्या असामान्य कर्तृत्वाने तळपत असलेल्या अनेक ज्येष्ठांच्या कलेतील सौंदर्यकण टिपून घेतले आणि त्यांची आपल्या गायकीत अतिशय सौंदर्यपूर्ण मिसळण केली. हे करताना किराणा घराण्याच्या शैलीशी त्यांनी राखलेलं ‘इमान’ अतिशय महत्त्वाचं होतं. कारण एक दागिना बनवायचा असेल तर त्यामध्ये आकृतीपासून ते रंगांपर्यंत प्रत्येक बारीक गोष्टीत कमालीची सौंदर्यपूर्णता असावी लागते. भीमसेनजींनी नेमकं हेच केलं. त्यामुळे त्या काळात चिंताक्रांत असलेल्या संगीतरसिकांना एक प्रचंड मोठं आश्वासन मिळालं.

भीमसेनजी जेव्हा अगदी ऐन तारुण्यात होते तेव्हा त्यांनी जालंधरला होणाऱ्या ‘हरवल्लभ मेळा’ या दीर्घ परंपरा असलेल्या संगीत महोत्सवात सादर केलेल्या ‘मुलतानी’ या रागाचं ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे. ते ऐकताना त्यांची ताकद, स्वरांकडे पाहण्याची दृष्टी आणि परंपरेतूनच येणारा नावीन्याचा शोध याचा अप्रतिम संगम त्यात सामावलेला आढळतो. तयारी आणि कलात्मकता यांचा तो अनोखा संगम आहे. राशिद खान यांच्याही तारुण्यातल्या ‘दरबारी कानडा’ या रागाचे ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे. ते ऐकताना नेमका हाच आणि असाच अनुभव येतो. ऐन विशीत असतानाच त्यांना भारतीय अभिजात संगीतातील एक आश्वासक कलावंत म्हणून ओळख मिळाली आणि ती त्यांनी आजवर टिकवून ठेवली आहे. ते सांगत होते, की कलावंताची तब्येत कमी-जास्त असली तरी रसिकांना चांगलंच गाणं ऐकायचं असतं. सूर जेव्हा चहूबाजूंनी गुंजतात तेव्हा तब्येत विसरली जाते आणि समोरून दाद मिळायला लागली की आणखी नवं नवं सुचत जातं. दिल, दिमाग आणि शरीर यांनीच संगीत व्यक्त होतं. शरीरभर संगीत भिनल्याशिवाय ते व्यक्त होत नाही. त्याच्या जोडीला तुमची ‘सोच’ आणि त्यात तुमचं हृदयही दिसायला लागलं की एका अतिशय वेगळ्या वातावरणात तुम्ही पोहोचता. संगीताकडे कलावंत म्हणून तुम्ही कसं पाहता, हे तुमच्या आविष्कारातूनच समजत जातं. त्यासाठी तुमच्याकडे ‘उपज’ असावी लागते. आजकाल नेमकी तीच हरवलेली दिसते..’

भारतीय अभिजात संगीत आणि जगातील अन्य संगीत यांमध्ये असलेला हा नेमका फरक उस्तादजींनी स्पष्ट केला. कालच्या मैफिलीत अतिशय तयारीने गायलेला ‘भूप’ आज पुन्हा सादर करताना कालच्यासारखाच जसाच्या तस्सा परत गायला गेला तर या कलावंताकडे उपज दिसत नाही, अशी टीकाच होणार. म्हणजे कल्पना करा.. आजवरच्या शेकडो वर्षांत हा एकच भूप राग कितीतरी कलावंतांनी काही लाख वेळा तरी गायला असेल. आणि  तरीही या भूप रागात अजूनही काही उरतेच आहे, जे पुन्हा नव्याने मांडण्यासाठी कलावंत आपली प्रतिभा पणाला लावत असतात. राग तोच, त्याचे आरोह-अवरोह तेच, त्याची संगतीही तीच; पण तरीही प्रत्येकाचा म्हणून एक वेगळा ‘भूप’ असतोच. हे वेगळेपण जसे घराण्याच्या सादरीकरणाच्या शैलीतून येतं, तसंच त्या- त्या कलावंताच्या कल्पनाशक्तीतूनही व्यक्त होतं. भारतीय संगीतात संगीत लिहिलं जात नाही; ते व्यक्त होतं. म्हणजे रागाची मूळ चौकट जरी पक्की असली, तरीही त्या चौकटीच्या आत कलावंताला मुक्त स्वातंत्र्य असतं. पंडित कुमार गंधर्व यांनी भूप, मल्हार, कल्याण, भैरव या रागांवर आधारित स्वतंत्र कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये या रागांमधील वेगवेगळ्या बंदिशींमधून त्यांची उलगड किती वेगवेगळ्या प्रकारे सुंदरपणे होते याचं मनोज्ञ दर्शन घडतं. त्यामुळे उस्ताद राशिद खान जे सांगत होते, ते हेच होतं, की मैफिलीत गाताना तुम्हाला तिथल्या तिथं सर्जनाचे नवे धुमारे किती फुटतात, हे तुमच्याकडे असलेल्या उपजेवर अवलंबून असतं.

केवळ व्याकरण म्हणजे संगीत नव्हे, असं सांगताना राशिद खान म्हणत होते की- तुमच्या गाण्यात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडायलाच हवं. कलेच्या आराधनेत तुमचे कष्ट, तुम्हाला झालेल्या वेदना यांना फार महत्त्व असतं. तुमच्या संगीतात त्यांची ओळख आपोआप होते. आजकालच्या मुलांना दु:ख म्हणजे काय, हेच माहीत नाही. मग त्यांच्या संगीतात हा ‘दर्द’ कुठून येणार? शास्त्रकाटय़ाच्या कसोटीवर तुमचं संगीत बिनचूक असेलही; पण त्यात तुम्ही कुठे दिसता, हा प्रश्न कळीचा असतो. संगीतातील हे भावतत्त्व उस्तादजींकडे भीमसेनजींच्या गायकीतून आलं. कारुण्य तुम्हाला नेहमीच उदात्ततेकडे नेतं. पण त्या करुणेला सौंदर्याची जोड देताना त्यातील तुमची अलिप्तता कलेला अधिक वरच्या पायरीवर नेऊन सोडते. उस्ताद अमीर खाँ यांच्या गायकीतील हे तत्त्वही राशिद खान यांनी अलगदपणे आपल्या गाण्यात समाविष्ट केलं. ते सांगत होते, ‘कोलकात्यात भीमसेनजींचं गाणं होतं.. पहिल्या ‘सा’मध्येच अशी काही ताकद होती, की मी मनात म्हणालो, असं मला कधी गाता येईल?’ मी भाग्यवान, की मला त्यांचं गाणंच नव्हे, तर त्यांचं खूप प्रेमही मिळालं. मी संगीत रीसर्च अ‍ॅकॅडमीत माझे गुरू निसार हुसेन खाँ यांच्याकडे गाणं शिकत असताना मला काही कारणासाठी ‘सस्पेंड’ केलं गेलं होतं. भीमसेनजींचं तिथं गाणं होतं. त्यांच्या गाण्याला मागे बसायला त्यांनी सांगितलं तेव्हा मी माझी अडचण सांगितली. त्यावेळचे संस्थेचे संचालक विजय किचलू यांच्याकडे भीमसेनजींनी शब्द टाकला आणि मी तिथं पोहोचू शकलो. त्यांच्याच एका मैफिलीत मला सभागृहातून बाहेर पाठवण्यात आलं होतं. मी मनात म्हणालो, ‘एक दिन वो लाऊंगा.. कि तुमही मेरे पीछे भागोगे.’ ही जिद्द मला गाण्यात सतत साथ देत आली. भीमसेनजींसारख्या महान कलावंताचे आशीर्वाद म्हणूनच माझ्यासाठी हृदयातली ठेव आहे.’

भीमसेनजी आणि राशिद खान यांच्या गायकीतील साम्यस्थळांमध्ये स्वरांची आवाहकता हे फार महत्त्वाचं ठिकाण. स्वरांची पुकार हे प्रत्येकाच्या कलेतील महत्त्वाचं साधन असतं. राशिद खान यांच्या गळ्यात असलेली ही पुकार सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आणि त्यांची कला अधिक समृद्ध करते.

या दोन्ही कलावंतांनी अभिजात संगीताच्या बरोबरीने संगीतातील अन्य प्रकारही मनापासून गायले आहेत. सुरुवातीला केवळ ख्याल गाणारे राशिद खान नंतर चित्रपट संगीतात आपली मुद्रा उमटवून गेले, जे भीमसेनजींनी त्यांच्या ऐन तारुण्यातच करून दाखवलं होतं. ठुमरी, तराणा यासारख्या प्रकारांवर उस्तादजींनी मिळवलेलं प्रावीण्य म्हणूनच त्यांच्या कलेला पूर्णता देणारं ठरतं. ‘चित्रपट संगीत काय वेगळं असतं? तिथंही स्वरच असतात, भावनाच असतात. आणि मुख्य म्हणजे तेही संगीतच असतं,’ हे राशिद खान यांचं म्हणणं. आजच्या तरुण कलावंतांनी कष्ट उपसायलाच हवेत; परंतु त्याबरोबरच संगीताबद्दल विचारही करायला हवा. किती तास रियाज केला, याला महत्त्व देण्यापेक्षा तुम्हाला संगीतात काय नवं दिसतं, याचा विचार महत्त्वाचा असतो. फक्त संगीतातच डुंबत राहणं हे त्यासाठी सर्वात श्रेयस्कर, असं त्यांचं सांगणं असतं.

वयाच्या अकराव्या वर्षी मैफल गाजवणाऱ्या उस्ताद राशिद खान यांनी आज ऐन पन्नाशीतच भारतीय अभिजात संगीताचं भविष्य सुखकारक असल्याचं आश्वासन दिलं असलं, तरी ते अधिक समृद्ध करण्यासाठी ते विविध उपक्रम सुरू करताहेत. ‘मैफिली गवई’ म्हणून संगीताकडे पाहण्याची त्यांची नजर आणि त्यांच्याकडे असलेली सर्जनशीलता यामुळे आजच्या काळातील आघाडीचे कलावंत म्हणून रसिक त्यांच्याकडे पाहतात. काळाच्या आजच्या टप्प्यावर पुढील पिढीकडून आणखीन काही भरीव कामगिरी घडण्यासाठी त्यांचे हे उपक्रम उपयोगी ठरावेत अशी कामना करणे, एवढेच आपल्या हातात आहे.

mukund.sangoram@expressindia.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashid khan loksatta gappa mpg
First published on: 28-07-2019 at 00:16 IST