‘लोकरंग’(१२ सप्टेंबर) पुरवणीतील  गिरीश कुबेर यांचा ‘दोन दशकांनंतरचे धडे’ हा लेख  अत्यंत समर्पक आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात जाहीर होणाऱ्या गोष्टी हिमनगाच्या पृष्ठभागावरील टोकाप्रमाणे असतात. पडद्यामागचे राजकारण हे नेहमीच जास्त महत्त्वाचे असते व ते बऱ्याच कालावधीनंतर ज्ञात होते. ११ सप्टेंबर २००१ रोजी ट्विन टॉवर्सवर हल्ला होण्याआधी अमेरिकन सरकार व तालिबान यांच्यात वाटाघाटी झाल्या होत्या, हे खरोखरच विस्मयकारक आहे. महासत्तांच्या राजनैतिक व संरक्षण धोरणांमध्ये तिसऱ्या जगातील देश हे फक्त प्यादी असतात आणि तेच भरडले जातात. अमेरिकेने तेलात स्वयंपूर्णता प्राप्त केली हे नक्कीच कौतुकास्पद आहे. कारण सरकारे आणि राष्ट्राध्यक्ष बदलूनही क्रूड तेलविषयक धोरणातील अमेरिकेचे सातत्य हे राष्ट्रहित व पक्षनिरपेक्ष होय. अमेरिकेची तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्णतेची अंमलबजावणी २०००च्या आसपास सुरू झाली असली तरी त्याची आवश्यकता १९७३-७४च्या सुमारासच त्यांनी लक्षात घेतली होती. विशेषत: डढएउ ची स्थापना  झाल्यानंतर! सुलतानी वा एकछत्री अंमल असलेल्या पश्चिम आशियातील देशांवर कमीत कमी अवलंबून राहणे श्रेयस्कर, ही जाणीव त्यांना झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– आल्हाद (चंदू) धनेश्वर

अचूक विश्लेषण

गिरीश कुबेर यांचा ‘दोन दशकांनंतरचे धडे’ हा लेख वाचला. तो अचूक विश्लेषण करणारा आहे. सध्या आपल्याला देण्यात येणारे दोन धडे.. ‘सत्योत्तर सत्यमेव जयते’ आणि ‘नवसामान्या’त समाधान!

– डॉ. राजीव बागवे

ट्विन टॉवर्सची वैशिष्टय़पूर्ण रचना

२००१ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात सुमारे तीन हजार लोक मृत्युमुखी पडले. तथापि यासंबंधात एक वक्तव्य ९/११ च्या हल्ल्यानंतर वर्ल्ड ट्रेड सेंटरचे आरेखन ज्यांनी केले, त्या मिश्रा नावाच्या अभियंत्यांनी (जे आयआयटी, खरगपूरचे विद्यार्थी होते.) वाहिन्यांवरील आपल्या मुलाखतीत केले होते. त्यांनी म्हटले होते की, या गगनचुंबी इमारती काही कारणांनी कोसळल्याच तर त्या आडव्या नाही, तर सरळ जागेवरच कोसळतील असे त्यांचे आरेखन आणि रचना केली गेली होती आणि त्याप्रमाणेच त्या कोसळल्या. अर्थात त्याआधी १९९३ च्या या इमारतींवरील दहशतवादी हल्ल्यानंतर अतिरेक्यांनी त्यांचा अभ्यास करून त्या आडव्या पडाव्यात म्हणून वेगळे प्रयत्न केले, पण त्यांना जे हवे ते घडले नाही. योगायोग म्हणजे मी आयआयटी, खरगपूरला ज्या बी. सी. रॉय हॉस्टेलमध्ये राहत होतो तिथेच मिश्राही राहत होते. आणि जेव्हा हे टॉवर पडले तेव्हा हॉस्टेलमधील टीव्हीवर आम्ही सगळे विद्यार्थी कान देऊन मिश्रा यांची मुलाखत ऐकत होतो. दहशतवादी युद्धाचे स्वरूपच बदलल्याची तीव्र जाणीव या घटनेने मनात कोरली गेली ती कायमचीच.

– सुखदेव काळे, दापोली, रत्नागिरी</strong>

नितांतसुंदर वस्तुपाठ 

‘दोन दशकांनंतरचे धडे’ हा कुबेर यांचा लेख वाचला. कोणत्याही दहशतवादी हल्ल्यानंतर परस्परांना दोष देत, एकमेकांवर चिखलफेक करत कुरघोडी करण्याची संधी साधणाऱ्या आपल्याकडील राजकीय पक्षांच्या धुरीणांच्या सिलॅबसमध्ये समाविष्ट करण्याच्या योग्यतेचे हे धडे आहेत. कडेकोट सुरक्षाव्यवस्था, अत्याधुनिक तंत्रज्ञान, बंदुका, तोफा इत्यादी सामग्री कितीही मोठय़ा प्रमाणावर हाताशी असली तरीही कोणाला तरी मारण्यासाठी आनंदाने मरायला तयार असणारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत १०० टक्के सुरक्षेची हमी देताच येत नाही, हे ज्या दिवशी इथल्या नेत्यांना पटेल तेव्हाच दहशतवादी हल्ल्यांवरचा दुसरा धडा त्यांच्या पचनी पडेल. दहशतवादी हल्ल्यानंतर आपण फक्त आपल्या गुप्तचर यंत्रणेचे व पर्यायाने तत्कालीन सरकारचे ते कसे अपयश आहे हे कंठशोष करून सिद्ध करण्यातच आपली सारी शक्ती वाया घालवतो. त्याऐवजी अशा हल्ल्यांची मस्ती कुठून येते याचा शोध घेतला तरच या हल्ल्यांना मुळासकट उपटून काढण्यात आपण  यशस्वी होऊ. नाहीतर केवळ आत्मनिर्भर होण्याच्या पोकळ घोषणांवरच जनतेला समाधान मानावे लागेल .

– अ‍ॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी, मुंबई</strong>

धर्मवादाचा अतिरेक भयावहच!     

‘दोन दशकांनंतरचे धडे’ या गिरीश कुबेर यांच्या लेखातून भारताने काही धडे घेतले तर हा देश कुबेराचा होऊ शकतो. अन्यथा धर्मवादाचा अतिरेक सुरू ठेवल्यास भारताची नौका कुठे भरकटेल हे सांगणे अवघड आहे. जोपर्यंत धर्म वगैरे गोष्टींसाठी माणूस मरायला तयार आहे तोपर्यंत दहशतवाद ‘खतम’ होणार नाही, हे वास्तव आहे. तसेच धर्मवादाचा अतिरेक हा राष्ट्रीय विकासाला मारक ठरतो, हेही तितकेच खरे आहे. राजकीय सोयीसाठी सरकारबा तसेच धार्मिक संघटनांना जवळ करणे अंगाशी येते, हा जागतिक पातळीवरील धडा भारतालाही लागू पडतो. संकटातून धडा घेणे हा जसा जपान-जर्मनीसारख्या देशांचा इतिहास आहे, तसाच तो अमेरिकेचाही असल्याचे लेखातून उलगडले. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे अध्यक्ष होऊनही अमेरिकेत धोरणबदल झाला नाही, हे भारताच्या दृष्टीने डोळ्यात अंजन घालणारे आहे. आपल्याकडे हे राजकीय चित्र दिसत नाही. सत्तेच्या सारीपाटासाठी, स्व-मतलबासाठी देशाला टांगणीला लावणे घातक आहे. देश आर्थिकदृष्टय़ा रसातळाला गेला असताना शेखी मिरवणे, देव/धर्माचे मुद्दे उपस्थित करून जनतेचे लक्ष विचलित करणे, हा ‘देशाभिमान’ ठरू शकत नाही. दहशतवादाच्या दोन दशकातच अमेरिका इंधनासाठी स्वयंसिद्ध झाला आणि निर्यातक्षमदेखील! भारत सरकारने यातून धडे घेणे गरजेचे आहे.

– गुलाब पाटील, जालना</strong>

यातून आपण बोध घेणार का?

गिरीश कुबेर यांचा ‘दोन दशकांनंतरचे धडे’ हा अभ्यासपूर्ण आढावा र्सवकष वाटतो. त्यातून आपल्या नेतृत्वाने बरेच काही शिकण्यासारखे आहे. १९९३ सालचा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला फारच थोडय़ांच्या लक्षात असेल. त्यावरही प्रकाश टाकला हे बरे झाले. युसुफ रामझीने आपण दहशतवादी असल्याचे मान्य करताना जपानवर बॉम्ब टाकणारी, विरोधी देशांवर निर्बंध घालणारी अमेरिकाही दहशतवादीच आहे हे सत्य ठासून सांगितले. तथापि या हल्ल्यानंतर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा उड्डाण करण्याची अमेरिकन मानसिकता मानावीच लागेल. खनिज तेलाच्या मुद्दय़ावर इस्लामी देशांवर अवलंबून राहावे लागू नये म्हणून १४-१५ वर्षांत अमेरिकेने केलेली कामगिरी अतुलनीय आहे. विशेष म्हणजे याची सुरुवात ‘टेक्सासचा तेलपुरुष’ असलेल्या बुश यांनी केली, याचेही कौतुक करायला हवे. आपल्याकडील किती नेते स्वार्थापलीकडे विचार करू शकतात? विशेष म्हणजे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक दोन्ही पक्षांनी राष्ट्रहित जपत ही धोरणे राबवली. कुठल्याही गोष्टीचा नाहक गवगवा नाही की राणा भीमदेवी गर्जना नाही. आपले ईप्सित साध्य करण्यासाठी मेहनत करावी आणि करत असलेल्या विकासकामांसंदर्भात जनतेसमोर शेखी मिरवणारी भाषणे ठोकणे बंद करावे, ही बाब लेखात अप्रत्यक्ष रीतीने खुबीने दाखवून दिली आहे. त्यातून कोणी काही शिकेल का, हा मुद्दा बाजूला ठेवला तरी या लेखाने वैचारिक मंथनाला चालना मिळाली, हे नक्की.

– नितीन गांगल, रसायनी

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reactions lokrang third world countries ssh
First published on: 19-09-2021 at 00:17 IST