scorecardresearch

Premium

ऊर्जेचे प्रश्नोपनिषद

‘जेव्हा मालवतो दिवा’ हा गिरीश कुबेर यांचा ऊर्जेचे जागतिक चित्र स्पष्ट करणारा लेख वाचला. राजकीय इच्छाशक्ती असली की काय घडू शकते, हे त्यांनी उत्तम तऱ्हेने मांडले आहे. हा लेख वाचल्यानंतर माझ्या..

ऊर्जेचे प्रश्नोपनिषद

‘जेव्हा मालवतो दिवा’ हा गिरीश कुबेर यांचा ऊर्जेचे जागतिक चित्र स्पष्ट करणारा लेख वाचला. राजकीय इच्छाशक्ती असली की काय घडू शकते, हे त्यांनी उत्तम तऱ्हेने मांडले आहे. हा लेख वाचल्यानंतर माझ्या मनात काही शंका उभ्या राहिल्या. त्या अशा- १) इस्रायल हे पक्के व्यापारी राष्ट्र आहे. त्यामुळे ते ऊर्जा नुसतीच साठवून ठेवत असेल हे संभवत नाही. कदाचित त्यांच्याकडच्या जादा ऊर्जेची विक्री देशाबाहेरही होत असेल. २) अमेरिका तेलाच्या बाबतीत संपूर्ण स्वावलंबी झाल्यावर आशियाई देशांतील तिचे स्वारस्य संपल्याने तिचा युद्धसज्जतेवर होणारा खर्च वा त्यासाठीचे अंदाजपत्रक कमी होईल का? ही शंका यायचे कारण म्हणजे मागे एकदा ‘लोकसत्ता’त वाचलेल्या लेखानुसार अमेरिकेत शस्त्रास्त्र उत्पादकांची लॉबी अतिशय प्रभावी आहे व ती राजकारण्यांना भरपूर पसा पुरवते. अशा परिस्थितीत ही लॉबी कोणती भूमिका घेईल? ३) प्रसारमाध्यमे केवळ राजकारण्यांनाच दोष देणार की परिस्थिती बदलावी म्हणून पाठपुरावाही करणार? (माध्यमांना हे मुळीच अशक्य नाही.) निदान महाराष्ट्रात तरी. कारण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा स्वछ आहे व ते याबाबत काहीतरी करतील अशी आशा वाटते. ‘भारत ही प्रगत देशांसाठी एक बाजारपेठ आहे’ हे विधान धाडसी, पण सत्य आहे. ‘जेव्हा ससा वाघ व्हायचं ठरवतो..’ हा लेख अन्यायाविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांना स्फूर्तिदायक आहे.   
– अभय दातार, मुंबई
 
.. तर आपणही स्वयंपूर्ण होऊ!
‘जेव्हा मालवतो दिवा’ हा लेख वाचला. परदेशी कंपन्या आपल्या राजकारण्यांना मोठा ‘कट’ देत असल्याने आपण पाश्चिमात्य देशांची केवळ बाजारपेठच नाही, तर डिम्पग ग्राऊंडसुद्धा आहोत, हे सर्वज्ञात आहे. इतर देशांना नकोशी झालेली औषधे व अन्य उत्पादने त्यांच्या घातक तंत्रज्ञानासह भारतात विकली जाताहेत हे कटू वास्तव आहे. पण परदेशातले सर्व काही अत्याधुनिक, प्रगत व जीवनावश्यक मानण्याची सवय आपण लावून घेतल्याने परदेशी कंपन्या व त्यांच्या उत्पादनांचा भारतप्रवेश आपल्याला स्वागतार्ह वाटतो. अब्जावधी रुपयांचे परकीय चलन पेट्रोल-डिझेलवर खर्च करण्याची आपल्याला खरे तर गरज नाही. गायी-म्हशींच्या मूत्र व शेणाचा वापर करूनही ऊर्जानिर्मिती होते. त्यासाठी लागणारा खर्चही नगण्य आहे. त्यावर अधिक संशोधन करून ऊर्जेबाबतीत आपण स्वयंपूर्ण होऊ शकतो. परमसंगणक, उपग्रह वगरे अत्याधुनिक तंत्रज्ञान जर आपण स्वबळावर विकसित करू शकतो, तर इंधन व ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे काय अवघड आहे? की त्यासाठीही परदेशातले तेल संपण्याची वा त्यांनी तेल नाकारण्याची वाट बघायची?  
– केदार  केळकर, दहिसर (प.)

असंवेदनशील सरकार
‘जेव्हा मालवतो दिवा’ या लेखात ऊर्जाक्षेत्रात भारत नेमका कुठे आहे, याचे वास्तववादी चित्रण आहे. भारत ऊर्जेतील स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्नशील नाही याची खंत वाटते. आपण इस्रायलचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवायला हवे. आपल्या देशाला निसर्गाने दिलेला प्रचंड मोठा समुद्रकिनारा आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा उपयोग करून वीजनिर्मिती करता येईल. परंतु त्याऐवजी जैतापूर, एन्रॉनसारखे वीजप्रकल्प राबवले जातात. कारण त्यात प्रचंड गुंतवणूक असल्याने राजकीय नेत्यांचेही खिसे भरतात. म्हणूनच छोटय़ा गुंतवणुकीच्या प्रकल्पांत त्यांना रस नाही. भारतात कोळसा मुबलक आहे. कोळशापासून मिथेनॉल तयार करून त्याचा वापर आपण इंधनात करू शकतो. परंतु मिथेनॉल हे घातक असल्याने त्याचा वापर आपण कितपत करू शकतो याचा खुलासा होणेही आवश्यक आहे. इंधनाचे वाढणारे प्रचंड दर आपण रोखू शकतो; परंतु सरकारने पेट्रोलमध्ये पाच टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय रद्द केला आहे व बायोडिझेलकडेही सरकारचे लक्ष नाही. हे आपल्या देशाचे दुर्भाग्य होय. विकास व संशोधनाच्या बाबतीत असंवेदनशील असलेल्या सरकारला जनतेचे भले कशात आहे, हे कधी कळणार?
– उज्ज्वला मालाडकर, पवई.

s.s. swaminathanProfessor M S Swaminathan, Farmer , Farmer Scientist ,revolution in agriculture
एम. एस. स्वामिनाथन.. शेतकऱ्यांचे शास्त्रज्ञ
the other eden
बुकरायण: ‘चित्रदर्शी’ विस्थापन कहाणी..
Manmohan singh birthday
वित्तरंजन : धोरणकर्ते डॉ. मनमोहन सिंग
srikanth kulkarni article on his teacher sadashiv martand garge
मला घडवणारा शिक्षक : ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे गर्गे सर

बाळासाहेबांची वेगळी रूपे
१७ नोव्हेंबरच्या ‘लोकरंग’मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अपरिचित अशी अनेक रूपे जयदेव ठाकरे आणि पंढरीनाथ सावंत यांच्या लेखांमधून समोर आली. नारायण कुलकर्णी कवठेकरांच्या लेखातील मीरा ताटे यांचे मनोगत वाचून लक्षात आले की, माझ्या अवतीभवती समाजात अशा अनेक मीरा ताटे आहेत- ज्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी अजून कुणी विश्वासार्ह नारायण भेटला नसावा. अतुल देऊळगावकर यांच्या ‘विश्वाचे अंगण..’ या लेखात आत्ममग्न जीवनशैलीला चटावलेल्या, अविवेकी व बेमूर्वतखोर समाजाकडून पर्यावरणाचा नाश व निसर्गसंपदेची लूट कशी होत आहे याचे विदारक चित्र समोर आले. पृथ्वीचा अंतकाळ जवळ आणायचा की तिला पुनश्च सुजलाम् सुफलाम् करायचे, हे मानवाच्याच हातात आहे. या अभ्यासपूर्ण लेखात लेखकाने ज्या उपाययोजना सुचवल्या आहेत त्यांचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. डॉ. राजीव शारंगपाणी यांचा ‘ध्यास घ्या’ हा सल्ला खूप मोलाचा वाटला. आपल्या देशात गेल्या कित्येक शतकांत नवीन शोध लागलेले नाहीत. पाश्चात्त्यांनी लावलेल्या शोधांची फळे आम्ही चाखत आहोत. आणि त्याची आम्हाला जराही खंत वाटत नाही. आज चिनी वस्तूंनी आमच्या देवघरापर्यंत धडक मारल्याने देशी कुटिरोद्योग देशोधडीला लागले आहेत व आपली अनमोल संपत्ती देशाबाहेर जात आहे. माझ्या घरात, कार्यालयात असलेल्या किती वस्तू माझ्या देशात तयार झालेल्या आहेत, याचा आढावा घेतला तर फार भयावह चित्र समोर येईल. कशाच्या जोरावर आम्ही महासत्ता होणार आहोत? आमच्यावर कुणीतरी देखरेख करणारे असल्याशिवाय आम्ही काम करत नाही, नियम पाळत नाही. चौकातील सिग्नल व्यवस्था बंद आणि वाहतूक नियंत्रकही गायब असताना जे चित्र दिसते, तशी अवस्था आज आमच्या देशाची झाली आहे. अशा परिस्थितीत नवनिर्मिती कशी होणार? शोध कसे लागणार? नोबेल पुरस्कार तर फार दूरची गोष्ट झाली. आत्मविश्वास, ध्यास, चिकित्सा आणि धीर हे गुण अंगी असणाऱ्याला जगात अशक्य असे काहीच नाही. दुर्दैवाने आम्हा भारतीयांकडे या गुणांचा समुच्चयाने अभाव आहे. आमची समाजव्यवस्था, शिक्षणप्रणाली आणि राज्यव्यवस्था अशा गुणांना प्रोत्साहित करण्याऐवजी नाउमेदच करते, हे त्याचे मूळ कारण आहे.
अविनाश हा आमच्या शेजारच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा. चित्रकलेचा ब्रश हातात घेऊन जन्माला आलेला. कुणाचेही, कशाचेही हुबेहूब चित्र तो काढायचा. अबोल, आज्ञाधारक आणि आपल्याच विश्वात रमणारा. त्याला व्हायचे होते चित्रकार. तर वडील त्याला बनवू पाहत होते डॉक्टर. वडिलांच्या हट्टापायी तो शास्त्र शाखेकडे गेला. बारावीनंतर त्याला मेडिकलला प्रवेश मिळाला नाही. तो म्हणाला, मी प्रगत कला महाविद्यालयात प्रवेश घेतो व चित्रकार होतो. वडील म्हणाले, भिकेचे डोहाळे सोड आणि गुमान फार्मसीला प्रवेश घे. अविनाश एम. फार्म. झाला. पीएच.डी. झाला आणि औषध कंपनीत मोठ्ठय़ा पगाराच्या नोकरीवर लागला. परंतु त्याच्यातला चित्रकार मात्र कायमचा संपला. ‘बालमफल’मधील अनंत गुरव यांच्या गोष्टीत लोभी बोकडाच्या जागी आजचा समाज, चतुर माकडाच्या जागी जाहिराती आणि खड्डय़ातील पाण्यात जाहिरातीतील वस्तू आढळल्या.
– सोमनाथ देशमाने, अहमदनगर.

ध्यासहीनतेची परिणती
‘ध्यास घ्या.. आयुष्य मजेत जाईल’ हा डॉ. शारंगपाणी यांचा लेख विचार करण्यासारखा आहे. नुसता विचारच नाही, तर तो आचरणात आणण्याविषयी त्यांनी तळमळीने लिहिले आहे. ध्यास- मग तो कसलाही घ्या.. कलेचा, अभ्यासाचा, कोणत्याही कृतीचा.. त्यात अगदी झपाटून जा आणि तो ध्यास पूर्णत्वाला न्यायचा मनापासून प्रयत्न करा, असे लेखक सांगतात. चंचल विचार, धरसोड वृत्ती अशाने ध्यास पूर्ण होत नाही. चिवटपणे त्याचा पाठपुरावा करून तो आचरणात आणण्याचे प्रयत्न करा. नुसताच निश्चय व ध्यास मनी बाळगून उपयोग नाही, तर त्यासाठी ठोस कृती हवी. ध्यासाच्या प्रयत्नांत ऊर्जा हवी. त्याकरता खोलात जाऊन अभ्यास व प्रयत्न तर हवेतच. मोठे शोध आपल्या देशात लागले नाहीत म्हणजे आपण ध्यासाचा पिच्छाच केला नाही. त्यासाठीच्या प्रयत्नांत आपण कमी पडलो असे लेखक म्हणतात ते सत्यच आहे. स्वत:ला ध्यासाची पूर्तता जमली नाही तर ध्यासाने झपाटलेल्यांना मदत तरी करावी; जेणेकरून त्यांना तरी आवश्यक ते बळ मिळेल.
उषा खैराटकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reader response to an article

First published on: 15-12-2013 at 01:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×