संगीत व नाटय़क्षेत्रात कमालीचे कर्तृत्व व लोकप्रियता संपादन केलेल्या कलावंत ज्योत्स्ना भोळे यांच्यावर त्यांची कन्या वंदना खांडेकर यांनी जो लेख लिहिला आहे, त्यात त्यांनी ज्योत्स्नाताईंच्या कर्तृत्वाचे घडवलेले दर्शन पूर्णत: वस्तुस्थितीनिदर्शक आहे. तथापि, त्यात ज्योत्स्नाताईंच्या स्वभावात प्रकर्षांने प्रत्ययास येणाऱ्या एका महत्त्वाच्या गुणाचा उल्लेख राहून गेला आहे असे वाटते. तो गुण म्हणजे त्यांच्या स्वभावातील आत्यंतिक साधेपणा! प्रचंड लोकप्रियता लाभूनही त्यांच्या स्वभावात आढय़तेचा लवलेशही नव्हता.
बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट. मी त्यावेळी नागपुरात वास्तव्यास असताना ज्योत्स्नाताई आपला नाटय़संच घेऊन तिथे आल्या होत्या व त्यांनी आपली लोकप्रिय नाटके तिथे सादर केली होती. माझी पत्नी प्रतिभा व मला नाटकांची व संगीताची आवड असल्याने आम्ही त्यांची नाटके आवर्जून पाहिली. ज्योत्स्नाताईंच्या अविस्मरणीय अभिनयाचा आणि संगीतकौशल्याचा मनसोक्त आनंद घतला. त्यामुळे आम्ही भारावून गेलो होतो. त्यांचे स्टेजवरील सहजतेने वावरणेदेखील अतिशय भावले.
ज्योत्स्नाताईंच्या नाटकात अभिनेत्री कुसुम देशपांडे यांचाही समावेश होता. त्या आणि माझी पत्नी या बालपणीच्या मैत्रिणी असल्याने त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी माझी पत्नी गेली होती. तिला पाहताच कुसुमताईंना खूप आनंद झाला. त्यांनी माझ्या पत्नीची ज्योत्स्नाताईंशी ओळख करून देत दोघींच्या लहानपणाच्या बाहुला-बाहुलीच्या लग्नाची गंमतीदार हकीकत त्यांना सांगितली. मग ज्योत्स्नाताईंनीही आपल्या लहानपणच्या काही आठवणी दिलखुलासपणे सांगितल्या.
– व. वा. इनामदार, वांद्रे पूर्व, मुंबई.

कृतज्ञतेचा संस्कार
डॉ. राजीव शारंगपाणी यांचे सदर मी मनापासून वाचते. त्यांचा ‘जेवणाचा आनंद’ हा मनाला तृप्ती देणारा लेख वाचला आणि दाद दिल्याशिवाय राहवलं नाही. अन्न परब्रह्माचं अतिशय सुंदर विवेचन त्यात त्यांनी केलंय. तसंही आपल्या संस्कृतीत जेवायला सुरुवात करताना ‘वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ हा श्लोक म्हणण्याची प्रथा आहेच. त्याची सांगता ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ अशी आपण करतो. त्यामुळे खरं तर आपलं जेवण आनंदमय व्हायला हवं. काळाच्या ओघात हा सुंदर संस्कार काहीसा बाजूला पडला आहे, हे आज खेदाने कबूल करावं लागतं. या ठिकाणी मला माझ्या आईची आठवण सांगावीशी वाटते. जेवण झाल्यावर फक्त अन्नदात्याविषयी कृतज्ञता व्यक्त न करता तिने आम्हाला खालील ओळी म्हणण्याची सवय लावली होती आणि ते म्हणण्याचा प्रघात आजही आमच्याकडून आपोआप पाळला जातोय..
अन्नदाता तथा भोक्ता, पाककर्ता सुखी भव।
अन्नदात्याचे कल्याण होवो, आजच्यासारखे उद्या मिळो. जेवणाच्या आधीची प्रार्थना, जेवणाचा आनंद व नंतरची ही कृतज्ञता.. किती सुंदर सोहळा आहे हा आपलं आरोग्य निरामय करणारा! नाही का?
– साधना ताम्हणे, मुंबई.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पलीकडे आहे उदंड ओलावा!
‘उद्धारपर्व’मध्ये तुकाराम जाधव यांनी लालफितीच्या पलीकडे डोकावणाऱ्या तडफदार प्रशासकीय अधिकाऱ्यांविषयी सुरेख लेख लिहिला आहे. अशा तरुण, सजग तसेच जनतेच्या समस्यांची जाण असणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक होणे आवश्यक आहे. कारण आपल्या देशातील ढोंगी, टग्या, मतलबी आणि गोचिडासारखे खुर्चीला चिकटून राहणाऱ्या राजकारण्यांनी स्वार्थापायी देशाची जी बकाल, केविलवाणी स्थिती करून ठेवली आहे, त्यात हे अधिकारी म्हणजे आशेचा किरण आहेत. व्यक्तिगत प्रामाणिकपणाने तसेच निष्ठेने काम करून समाजात सकारात्मक बदल घडविणारे अधिकारीच सामान्य जनतेला जिव्हाळ्याचे वाटतात. लेखात ज्या अधिकाऱ्यांचा उल्लेख आला आहे त्यापैकी एक आमच्या बकाल अकोला शहराला लाभलेले जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी होत. त्यांच्या एक-दोन ठळक कार्याचा उल्लेख करतो. त्यापैकी एक नरनाळा महोत्सव आणि दुसरा शहरातील १०० सजग, निसर्गप्रेमी नागरिकांना आपल्या निवासस्थानी बोलावून वृक्षलागवड मोहीम राबविण्याचा उपक्रम! अकोल्यापासून ७० कि. मी.वर असलेल्या नरनाळा किल्ल्याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी तत्कालीन अकोट वन्यजीव विभागाचे उप-वनसंरक्षक रेड्डी यांच्या सहकार्याने हा महोत्सव सुरू केला. तीन दिवस चालणारा हा नरनाळा महोत्सव अकोलेकरांना एक आगळी पर्वणी होती. महोत्सवाच्या आयोजनासाठी ते जिल्हाधिकारी असूनही सकाळ, दुपार, रात्री, मध्यरात्री किल्ल्यावर फेरफटका मारायचे आणि सर्व व्यवस्था चोख आहे ना, याची खात्री करायचे. श्रीकर परदेशी यांच्या कार्यशैलीकडे पाहिल्यावर एक अष्टावधानी अधिकारी असेच त्यांचे वर्णन करावे लागेल.
दीपक जोशी, अकोला