|| भूषण कोरगांवकर

‘‘काय तू, मेन प्रोग्राम चुकवलास ना!’’ शकुबाईंनी नेहमीप्रमाणे रागाच्या सुरात माझं स्वागत केलं.

mumbai, Sea Coast Road,
मुंबई : सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू जोडणीच्या कामाला वेग, अखेर तुळई वरळीत दाखल
portfolio Demat accounts New investors stock market
बाजार रंग : पोर्टफोलिओचा डाव मांडताना….
virar Sand Mafia, Sand Mafia active
वसई विरार : खाडी किनारी वाळू माफिया सक्रिय, भरारी पथकाची कारवाई, ४ बोटी केल्या नष्ट
tiger unexpectedly came out of bushes jumped on cow
जंगल सफारीचा आनंद घेत होते पर्यटक, अचानक झुडपातून बाहेर आला वाघ, उडी मारून….पुढे काय घडले ते व्हिडीओमध्ये बघा

संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या अव्वल दर्जाच्या लावणीसम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर म्हणजेच आमच्या शकुबाई. ‘संगीतबारी’ कार्यक्रम पाहिलेले लोक त्यांना ‘लावणीची जितीजागती युनिव्हर्सिटी’, ‘अदाकारीचा अमिताभ बच्चन’, ‘लावणीतलं सोनं’ अशी अनेक विशेषणं बहाल करतात. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या नातवाचं अगदी धूमधडाक्यात लग्न झालं. नातू म्हणजे भाचीचा मुलगा. ही भाची त्यांची फार लाडकी, गुणी आणि जवळची. मला हे लग्न माझ्या मीटिंग्समुळे चुकलं होतं. त्यामुळे त्याच्या जागरण-गोंधळाला तरी नक्कीच जायचं हे ठरवून मी अहमदनगरपासून १२ कि. मी. अंतरावरच्या त्यांच्या मूळ गावी पोचलो.

उशीर व्हायचं कारण म्हणजे भटकता भटकता हुंगत हुडकलेल्या ‘नगर’मधल्या खास स्वस्त आणि मस्त गोष्टी! रस्त्यावरच्या गाड्यांवर ताकाचे वेगवेगळे प्रकार छान मिळतात. नगर स्पेशल ‘कढी-वडा’ही उत्तम. मोठ्या भुकेसाठी मात्र माळी वाड्यातलं तिवारी भोजनालय मस्ट आहे. तिथे मराठमोळ्या पद्धतीची अतिशय चविष्ट घरगुती शाकाहारी थाळी मिळते. पण आयसिंग ऑन द केक म्हणजे अभिनेत्री किरण खोजेने शिफारस केलेला दुर्गासिंग लस्सीवाला. इथे जितकी सुंदर ‘लस्सी विथ आइसक्रीम’ मिळते तशी जगात कुठेच मिळत नाही.

‘‘अख्खा गाव हिंडून आला असणार.’’ शकुबाईंनी बरोबर ओळखलं. ‘‘बघ, तुझ्या स्वागतासाठी स्पेशल ट्रॉफ्या ठेवल्यात.’’ मी पाहिलं तर दोन बोकड आणि एक मेंढा यांची काळीभोर मुंडकी देवीसमोर पूजेला लावलेली होती. बळीचा कार्यक्रम हुकल्यामुळे मी चुकचुकलो की मला हायसं वाटलं, हे सांगता यायचं नाही. पण हे वाटणं फार वेळ टिकलं नाही. कारण एक जीवघेणा सुगंध मला कधीपासून बेचैन करत होता. एका अवाढव्य टोपात मटण शिजत होतं. मी आत डोकावून त्याची तर्री पाहिली. मावळतीच्या उन्हात तिचा तपकिरी-काळा रंग लाल-सोनेरी छटांनी चमचमत होता. त्यावर थिरकणारी हिरवीगार कोथिंबीर एकदा ढवळताच आत जाऊन काळसर बनली आणि लुप्त झाली.

‘‘हा मेंढाय बरं का…’’ श्रद्धा- शकुबाईंची मुलगी म्हणाली.

बोकड अजून शिजायचे होते. सुगरण सूनबाई योगिता आणि काजल पुढे आल्या. पांढरं, पिवळं, हिरवं आणि तपकिरी अशी सुंदर, रंगीत वाटणं करून ठेवलेली भांडी घेऊन दोघी सज्ज होत्या. ‘‘या हिरव्या वाटणात कोथिंबीर, आलं, लसूण असतं. पांढऱ्यात तीळ आणि खसखस. पिवळ्यात परतलेली हरभरा डाळ आणि तांदूळ. आणि जरा डार्क दिसतंय त्यात भाजलेलं सुकं खोबरं आणि कांदा.’’ योगिता म्हणाली. दुसऱ्या चुलीवर अजून एक अवाढव्य टोप ठेवलेला होता. त्यातलं तेल तापल्यावर त्यांनी त्यात शंभरएक तमालपत्रं आणि बारीक चिरलेल्या कांद्याचा ढीग ओतला. एकच धूर झाला. डोळे चुरचुरायला लागले.

‘‘ते त्यांचं सुरू राहील. तोपर्यंत तुला घर, गाव सगळं दाखवते, चल.’’ शकुबाई म्हणाल्या आणि आम्ही निघालो.

शकुबाई आणि त्यांच्या बहिणींनी मिळून मूळ घराच्या जागी हे नवीन टुमदार घर बांधलंय. सभोवार फळझाडं, एका बाजूला शेत आणि दुसऱ्या अंगाला खंडोबाचं मंदिर. लहान-मोठ्या घरांच्या रांगेत काही दुमजली बंगलेही डोकावत होते. ही सगळी भातु कोल्हाटी समाजाची वस्ती. पिढ्यान् पिढ्या नाचगाणं करणारा हा स्त्रीप्रधान समाज. मूळचा भटका, पण गेल्या कित्येक वर्षांपासून जळगाव, नगर, पुणे, सोलापूर आणि संपूर्ण मराठवाड्यात स्थायिक झालेला. पक्की घरं, शेती, गुरं बाळगून असलेला. पूर्वी यांच्यातले पुरुष काहीच काम करत नसत. गेल्या दोन-तीन पिढ्यांपासून मात्र शिक्षण, नोकरी किंवा विविध व्यवसाय यांत सगळे पुढे गेलेत. मी ज्यांना भेटलो ती सगळीच मुलं, पुरुष मंडळी एकदम स्मार्ट आणि लहानपणापासून ‘उद्योजक’ मनोवृत्तीची. सेंद्रिय शेती, फळ-भाज्या विक्री, कपड्यांची दुकानं, शेअर मार्केट अशा विविध व्यवसायांत मग्न.

या तरुण मुलांशी गप्पा, देवदर्शन, शोभाच्या घरी चहापान हे सगळं करून घरी परतलो तेव्हा दोन प्रकारच्या मटणांचा (त्यांच्या भाषेत ‘मटणाच्या भाज्या’) सुवास दरवळत होता.

‘‘यावेळी फस्र्ट टाइम बायकांनी भाजी केलीय बरं का!’’ श्रद्धा म्हणाली. जागरणाच्या दिवशी बायका कुठल्याच कामाला हात लावत नाहीत. तसंही नाचणाऱ्या बायका-मुली या ‘कर्ता’ असतात. त्या घरी आल्या की फक्त आराम करतात. घरकामाशी त्यांचा संबंध येत नाही. नोकरीधंदा न करणाऱ्या सुना-भावजया यांची ती जबाबदारी असते. पण आजच्या दिवशी तर त्यांनाही आराम. मांडव बांधणं, मटण कापून ते शिजवणं, जेवण वाढणं, नंतरची झाकपाक, अंगण झाडणं सगळी कामं पुरुषांची.

‘‘पण आमच्या सुना लई हौशी. पुरुषांना जमतं, मग आम्हाला का नाही? हटून बसल्या. म्हटलं, करा मग!’’ शकुबाई म्हणाल्या, ‘‘चल तू, आपण गच्चीवर जाऊ या.’’

गच्चीवर एका गुपचूप बैठकीची तयारी झालेली होती. निव्वळ हिरव्या वाटणात हळद-मिठात वाफेवर शिजलेल्या मटणाच्या अलवार फोडी. ‘‘हाच आजचा चखना.’’ अहाहा! गार हवा, गारेगार बीअर, गरमागरम मटण आणि गॉसिपी गप्पा… बेत एकदम भारी होता.

‘‘गोंधळी आले… पंगती वाढायला घ्या.’’ खालून बायकांचा गलका सुरू झाला. गोंधळ-जागरणाच्या दिवशी पहिली पंगत लहान मुलांची असते. दुसरी बायकांची आणि शेवटची पुरुषांची.

भाकरी, मटण, कांदा आणि लिंबू. सगळ्या सेन्सेसना विलक्षण सुखावणारं सुटसुटीत ताट.

‘‘हे मटण आहे की बर्फी? किती मस्त शिजलंय. आणि भाजीची चव तर एक नंबर.’’ मी भाकरी रश्शात चुरून त्यांच्या पद्धतीने तिचा काला करत म्हटलं.

‘‘आता थोडी आमच्या पुरुष मंडळींच्या हाताची टेस्ट बघ…’’ असं म्हणत श्रद्धाने मला मेंढ्याचा रस्सा वाढला.

गरम, जहाल, पण अतिशय चविष्ट. मसाल्याचा एकेक कण मांसात पूर्ण भिनला होता.

‘‘कुठली भाजी जास्त आवडली? बायकांची की पुरुषांची?’’

दोन्हींची चव इतकी वेगळी आणि सुंदर होती, की एकीची निवड करणं खूपच अवघड होतं. मी पेचात पडलो.

‘‘आमच्या जवानीत मांडे म्हणून एक प्रकार करायची जुनी लोकं…’’ शकुबाईंनी माझी सुटका केली. मांडे म्हणजे गोडाचे नव्हे; नुसत्या कणकेचे. ही कणीक एका विशिष्ट जातीच्या गव्हाची असते. भरपूर तेल घालून ती सैलसर मळतात. त्यानंतर तिच्या तलम पोळ्या लाटून त्या भाजायच्या. अतिशय पातळ आणि लुसलुशीत.

‘‘हे मांडे आणि मटण… बस्स! मग दुसरं काहीच नको.’’

‘‘नको कसं? सुस्ता विसरलीस?’’ पवनने- त्यांच्या मुलाने आठवण करून दिली.

‘‘ते काय असतं?’’

‘‘काही नाही. पोटातली पिशवी साफ करून घ्यायची. त्यात चरबीचे तुकडे, मीठ आणि काळा मसाला भरून ती बंद करायची आणि शिजणाऱ्या भाजीत सोडायची. शिजून, फुलून आली की तिचे अळुवड्यांसारखे तुकडे कापून खायचे. दोन खाल्ले की माणूस सुस्तावून जातो म्हणून याचं नाव- सुस्ता.’’

‘‘तेपण बंद झालं का?’’

‘‘नाही, नाही. ते जत्रेला करतात. आणि आज बनवलं तर जागरण कसं जमणार?’’

‘‘हो ना!’’ मी चॉप चावत म्हणालो. बोकड आणि मेंढा- दोन्हीच्या रश्शाइतकीच त्यांच्या मांसालाही अतिशय सुरेख चव होती.

‘‘त्या चवीचं एक सीक्रेट आहे.’’ पवन हळूच म्हणाला.

मटणाचे तुकडे न धुता वापरणे हेच ते गुपित.

‘‘बाजारातून आणलेलं मटण चार-चारदा धुऊन घेणं आवश्यक असतं. पण हे तर आपण आपल्या हाताने कापलेलं असतं. त्यामुळे ते तसंच वापरायचं. म्हणजे त्यातलं रक्त, सत्त्व, सगळं भाजीत उतरतं आणि त्यातच खरी चव असते.’’

‘‘भवानीआई आणि खंडोबाच्या कृपेनं जागरण-गोंधळ सुरू होतोय…’’ घोषणा झाली आणि सुपारी चघळत आम्ही शेकोटीजवळ अंगणात जाऊन बसलो. गोंधळ्यांचे खडे आवाज घुमू लागले. त्यांच्या रांगड्या विनोदांवर हास्याची कारंजी फुटू लागली. ज्यांच्यामुळे मला हा अनुभव लाभत होता त्या शकुबाईंना आणि समस्त काळे-नगरकर परिवाराला मी मनोमन शुभेच्छा दिल्या आणि वाद्यांच्या कडकडाटात रंगलेला मुरळ्यांचा बेधुंद नाच पाहू लागलो.

(छायाचित्रे- कुणाल विजयकर)

bhushank23@gmail.com