डॉ. जयसिंगराव पवार 

येत्या ६ मे रोजी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्ताने या लोकोत्तर राजाच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख..

Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

राजेशाहीपेक्षा लोकशाही श्रेष्ठ असते, हे एव्हाना सर्वमान्य झाले आहे. राजेशाहीत राजाला महत्त्व असते, लोकशाहीत ते लोकांना असते. लोकशाहीचे भोक्ते असूनही आपण सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजर्षी शाहू छत्रपतींचा जयजयकार करतो, याचे कारण त्यांनी राजेशाहीला- म्हणजे स्वत:ला महत्त्व न देता जनतेला दिले. ‘राजा हा उपभोगशून्य स्वामी’ ही संकल्पना घोषित न करता त्यांनी प्रत्यक्षात अंमलात आणली. शाहू छत्रपतींच्या चरित्राकडे पाहिले असता त्यांनी आपली राजसत्ता व वैभव रयतेच्या उन्नतीसाठी खर्च घातले हे अनुभवास येते. द्रष्टे राजे आणि कर्ते सुधारक ही राजर्षी शाहू महाराजांची ओळख केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला झाली आहे. त्यांच्या अलौकिक कार्यातून पिढय़ान् पिढय़ांना स्फूर्ती मिळत राहिली ती यामुळेच.

छत्रपती राजाराम महाराजांचे मावसबंधू व कागलच्या थोरल्या पातीचे जहागीरदार जयसिंगराव घाटगे हे रीजंट म्हणून नेमले गेले. याच बाबासाहेब ऊर्फ जयसिंगराव घाटगे यांचे थोरले पुत्र यशवंतराव हे १७ मार्च १८८४ रोजी ‘शाहू छत्रपती महाराज’ म्हणून कोल्हापूरच्या गादीवर आले. २ एप्रिल १८९४ रोजी वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना कोल्हापूर संस्थानच्या कारभाराचे अधिकार प्राप्त झाले. त्यांना शिक्षण देणारे स्टुअर्ट फ्रेजर, रघुनाथराव सबनीस, गोखले आदी निष्णात शिक्षक व पंडित होते. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत झाला. इंग्रजी साहित्य, सामाजिक शास्त्रे, तत्त्वज्ञान अशा विषयांचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. ते अस्खलित इंग्रजी बोलत. पांढरपेशा मंडळींसमोर महाराज जाणूनबुजून हेंगाडी भाषा बोलत. याबाबत प्रबोधनकार ठाकरे आपल्या आठवणींत सांगतात की, ‘कितीतरी संदर्भग्रंथांची नावे महाराज धडाधड सुचवत होते. त्यातून त्यांच्या व्यापक ज्ञानसंग्रहाचा मला साक्षात्कार झाला. कित्येक पुस्तकांतले महत्त्वाचे इंग्लिश परिच्छेद त्यांनी मला पाठ म्हणून दाखवले. वरकरणी महाराज अडाणी, हेंगाडे वाटत असले तरी त्यांच्या परिपक्व ज्ञानाचा मागमूस इतरेजनांना सहसा लागत नसे.’ इतकेच काय, महात्मा गांधी कोल्हापूरला आल्यानंतर त्यांची महाराजांशी दीर्घ भेट होऊन चर्चा झाली. वर्ध्यास गेल्यानंतर गांधीजींनी त्यांचे निकटचे सहकारी तोफखाने यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे : ‘तुमच्यामुळे मी अशा एका राजास भेटू शकलो, की ज्याला दिलेला ‘महाराजा’ हा किताब सार्थ ठरला आहे. ते खरोखर एक महाराज आहेत. अगदी प्लेटोच्या ‘तत्त्वज्ञ राजा’ या कल्पनेत बसणारा!’ महात्मा गांधींना शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात आदर्श राजाचे रूप दिसावे यापरता एखाद्या राजाचा ज्ञानाच्या क्षेत्रात अन्य कोणता गौरव असू शकेल बरे?

राज्यारोहण प्रसंगीच्या जाहीरनाम्यातील महाराजांची प्रजेच्या सुखाची व कल्याणाची भाषा ही औपचारिक नव्हती. ती महाराजांच्या हृदयांतरीची भावना होती. तिचा प्रत्यय त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच सातत्याने येत गेला. रयतेचे कल्याण हेच आपल्या कारभाराचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे, ही शिवछत्रपतींची भावना त्यांचे वंशज असणाऱ्या शाहू महाराजांच्या ठिकाणी दृग्गोचर व्हावी ही इतिहासाची सुखद पुनरावृत्ती होती. आपणास मिळालेला राज्याधिकार हा राजवैभव व राजविलास यांचा उपभोग घेण्यासाठी नसून, तो रंजल्यागांजल्या प्रजाजनांच्या उद्धारासाठी आहे, ही राजाच्या ‘उपभोगशून्य स्वामित्वा’ची जाण महाराजांच्या ठायी होती. रयतेचे दारिद्रय़, दु:ख आणि अंधश्रद्धेवर उपाययोजना करावी असे त्यांना मनोमन वाटे. नरसिंहवाडी या तीर्थक्षेत्री कुष्ठरोग्यांची दयनीय अवस्था पाहून त्यांच्या मनाला अपार वेदना झाल्या. त्यातून त्यांनी ‘व्हिक्टोरिया लेपर येलाएलम’ ही सेवाभावी संस्था (आश्रम)स्थापन केली. ऊस गाळताना शेतकऱ्यांचे हात घाण्यात सापडून थोटे होत. त्यावर त्यांनी काही यांत्रिकी युक्ती शोधून काढल्यास बक्षीस देण्याची योजना जाहीर केली. दुष्काळ, प्लेगची साथ आदी संकटकाळात देशकार्यासाठी ते धावून जात.

ऑक्टोबर १८९४ मधील ‘वेदोक्त’ची ठिणगी त्यांची मानसिकता बदलण्यास कारणीभूत ठरली. महाराज कार्तिक मासात नेमाने पहाटे पंचगंगा नदीवर स्नानास जात असत. स्नानाच्या वेळी भटजी मंत्र म्हणत होता. महाराजांच्या सोबत असलेल्या राजारामशास्त्रींचे या मंत्रांकडे लक्ष गेले. भटजी स्नान न करताच वेदोक्त मंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्र उच्चारत होता. छत्रपती वेदोक्त मंत्रांचे अधिकारी असताना हा भटजी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे राजारामशास्त्रींनी महाराजांच्या निदर्शनास आणून दिले. महाराजांनी त्याबद्दल त्या भटजीस जाब विचारला असता त्याने ‘शूद्रास पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात,’ असे उत्तर दिले. भटजीच्या त्या वाणीने आकाशातून वज्राघात व्हावा त्याप्रमाणे महाराजांच्या अंगावर वीजच कोसळली. भटजीने आपल्याला शूद्र म्हणून हिणवणे हे सहन करण्यापलीकडचे होते. ती कल्पना नव्हती, तर कठोर वस्तुस्थिती होती. तिने त्यांना अंतर्मुख व चिंतनशील बनवले.. सामाजिक बंडखोरीस उद्युक्त केले. वेदोक्तासंबंधीच्या या स्वानुभवामुळे सर्व हिंदूंना वेदाधिकार देणाऱ्या आर्य समाजाकडे व ब्राह्मणांच्या मक्तेदारीविरुद्ध लढणाऱ्या सत्यशोधक समाजाकडे महाराज आकृष्ट झाले. 

वसतिगृह चळवळ

बहुजन समाजाने शिक्षणाकडे पाठ फिरवल्याने त्यांची दुर्दशा झाली होती. त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्याकरिता प्रथम महात्मा फुले यांनी आणि नंतर शाहू छत्रपतींनी भगीरथ प्रयत्न केले. कोल्हापुरात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम महाविद्यालयाला जोडून सर्व जातिधर्माच्या मुलांसाठी एक खुले वसतिगृह त्यांनी स्थापन केले. शिक्षणात मागासलेल्या खेडय़ापाडय़ांतील मुलांसाठी वसतिगृह काढण्याच्या कल्पनेविषयी शाहू महाराजांनी न्या. रानडे व नामदार गोखले या दोन उदारमतवादी नेत्यांशी विचारविनिमय केला. त्यानुसार १८ एप्रिल १९०१ रोजी ‘व्हिक्टोरिया मराठा बोर्डिग’ या कोल्हापुरातील पहिल्या वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. पुढे जैन, िलगायत, मुस्लीम, अस्पृश्य, सोनार, शिंपी, पांचाळ, गौड सारस्वत, इंडियन ख्रिश्चन, प्रभू वैश्य, ढोर चांभार, सुतार, मांग, नाभिक, सोमवंशी, आर्य क्षत्रिय, कोष्टी अशा विविध जातिधर्माची २० वसतिगृहे त्यांनी सुरू केली. त्यासाठी इमारती, खुल्या जागा, कायमस्वरूपी उत्पन्नाची साधने उपलब्ध करून देऊन गरीब विद्यार्थ्यांच्या योगक्षेमाची चोख व्यवस्था केली. वसतिगृह ही एक लोकचळवळ उदयास आली. इतकेच नव्हे तर सुमारे ९० वर्षे महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, कला आदी क्षेत्रांतील चळवळींचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती कोल्हापूरच्या या वसतिगृहांनी घडविल्या. मुंबई-पुण्याखालोखाल कोल्हापूर हे विद्याभासाचे केंद्र म्हणून पुढे आले. ब्राह्मणेतरांची उच्च शिक्षणाने विभूषित पहिली पिढी घडविण्यात या वसतिगृहांचा वाटा मोलाचा ठरला. याकामी कर्मवीर भाऊराव पाटलांची प्रेरणा उल्लेखनीय ठरली.

अस्पृश्यता निवारण

प्रारंभीच्या काळात कर्मठ संस्कारांत वाढलेल्या शाहू महाराजांनी पुढे अस्पृश्यता व जातिभेद या दोन अनिष्ट सामाजिक रूढींविरुद्ध मोठा संघर्ष केला. अस्पृश्यांच्या शिक्षणप्रसारासाठी खास प्रयत्न केले. त्यांच्यासाठी रात्रीची शाळा आणि अस्पृश्य समाजातील मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली. हुशार विद्यार्थ्यांना खास शिष्यवृत्त्या दिल्या जाऊ लागल्या. १८  सप्टेंबर १९१९ रोजी महाराजांनी संस्थानातील अस्पृश्यांच्या स्वतंत्र शाळा बंद करून सर्वानी इतरांच्या मुलांप्रमाणे सरकारी शाळांतून एकत्र शिक्षण घ्यावे असा आदेश काढला. महाराजांनी नाशिक, नागपूर येथील अस्पृश्यांच्या वसतिगृहांना उदारहस्ते अर्थसाह्य केले. अस्पृश्यांवर लादलेल्या अमानुष हजेरी पद्धतीचे त्यांनी निर्मूलन केले. भारतीय संसदेने १९५५ साली अस्पृश्यता निवारणाचा कायदा केला. जी गोष्ट घडण्यास देशाला स्वातंत्र्यानंतर काही वर्षे वाट पाहावी लागली, ते कार्य राजर्षी शाहू महाराजांनी स्वातंत्र्यापूर्वी ३०-३५ वर्षे आधीच आपल्या संस्थानात करून दाखवले होते. शाहूचरित्रात गंगाराम कांबळेची कथा प्रसिद्ध आहे. मराठय़ांच्या पाण्याच्या हौदाला स्पर्श केल्याबद्दल त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मार देण्यात आला. हे समजल्यावर मारहाण करणाऱ्यांची पाठ महाराजांनी फोडून काढली. गंगारामला हमरस्त्यावर ‘सत्यसुधारक हॉटेल’ काढण्यास प्रवृत्त केले. तिथे ब्राह्मण, मराठा आदी जातीच्या मंडळींना महाराज आग्रहाने चहा पाजत आणि खुद्द महाराजही तो आवडीने पीत असत. गंगाराम पुढे अस्पृश्य समाजाचे प्रतिष्ठित पुढारी होऊन अस्पृश्योद्धार कार्यात महाराजांचे कार्यकर्ते बनले. राजर्षी शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या उभयतांत स्नेह व सहकार्याचे संबंध राहिले. माणगाव येथे मार्च १९२० मध्ये झालेल्या परिषदेपासून दोघांत घनिष्ठ संबंध निर्माण झाले. या परिषदेत महाराजांनी ‘तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला याबद्दल तुमचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो. डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत अशी माझी मनोदेवता मला सांगते,’ असे केलेले भाकित पुढे खरे ठरले. नागपुरात अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेच्या निमित्ताने दोघांची ३० मे १९२० रोजी पुन्हा एकदा भेट घडून आली. शाहू महाराजांचा वाढदिवस अस्पृश्य समाजाने सणाप्रमाणे साजरा करावा असा ठराव बाबासाहेबांच्या प्रेरणेने माणगाव परिषदेने केला. नागपूर परिषदेतही असाच ठराव केला गेला. इंग्लंडमधील वास्तव्यात बाबासाहेब अधूनमधून महाराजांशी पत्रव्यवहार करत. त्यातून दोघांमधील जिव्हाळ्याचे आणि परस्परांविषयींच्या प्रेमादराचे दर्शन घडते. महाराजांनी त्यांना वेळोवेळी आर्थिक सहाय्य केले होते. दलितांप्रमाणेच त्यांनी भटक्या-विमुक्त जमातीचाही उद्धार केला.

 स्त्रीउद्धाराचे प्रणेते

आंतरजातीय विवाह जितक्या प्रमाणात होतील तितके हिंदी समाजातील जातिभेद नष्ट होतील आणि तेवढय़ा प्रमाणात देशाची प्रगती होईल असे सूत्र शाहू महाराजांनी आपल्या भाषणातून केवळ सांगितले नाही, तर त्याचा प्रत्यक्ष आचरणातही अवलंब केला. आपल्या जनक घराण्यातील चुलत भगिनी चंद्रप्रभाबाई यांचा विवाह इंदूरच्या तुकोजीराव होळकर यांचे पुत्र यशवंतराव यांच्याशी त्यांनी निश्चित केला. मराठा उच्चकुलीन घराण्याची धनगर समाजाशी वैवाहिक संबंध जोडण्याची मानसिक तयारी व्हावी म्हणून महाराजांनी करवीरच्या शंकराचार्याकडून मराठे व धनगर मुलगा एकच आहेत असा अनुकूल अभिप्राय मिळवला. त्यांच्या या प्रयत्नांस यश मिळताच कोल्हापूर व इंदूर या दोन संस्थानांदरम्यान शंभर मराठा-धनगर आंतरजातीय विवाह करण्याची योजना त्यांनी आखली. त्यानुसार २५ विवाह संपन्न झाले. याशिवाय महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदाही केला. पडदा पद्धतीबद्दल निषेध नोंदवला. महिलांना जुलमी वागणूक देण्याविरोधात शिक्षेची तरतूद, घटस्फोट झाल्यास पोटगी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, अनौरस संततीला वारसा हक्क आदी कायद्याने त्यांनी मिळवून दिले. ब्रिटिश सरकार असे कायदे करून परंपरावाद्यांचा रोष ओढवून घेण्यास राजी नव्हते; त्या काळात शाहू महाराजांनी हे क्रांतिकारी कायदे करून अमलात आणले, ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. कुटुंबात होणाऱ्या क्रूर छळातून असहाय स्त्रीची सुटका करण्यासाठी तसेच देवदासी प्रथेसारख्या अनिष्ट प्रथेपासून स्त्रीची मुक्तता करण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात बऱ्याच उशिरा चळवळी सुरू झाल्या. या पार्श्वभूमीवर ८०-९० वर्षांपूर्वी या राजाने स्त्रियांच्या उत्कर्षांचे मोठे कौतुकास्पद कार्य करून दाखवले. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा, प्राथमिक शिक्षण कायद्याची अंमलबजावणी, स्त्रीशिक्षणास प्रोत्साहन हे महाराजांच्या दूरगामी कार्याचे फलित होय.

११ जानेवारी १९११ रोजी श्री शाहू सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. पुढच्याच वर्षी मराठा पुरोहिताकडून कोल्हापुरातील पहिली श्रावणी त्यांनी घडवून आणली. कोल्हापुरात तीन वर्षांत साडेसातशेच्या वर सत्यशोधक लग्नविधी पार पडले. याशिवाय इतर धार्मिक विधींची संख्या वेगळीच. त्यांनी राजवाडय़ातील देवदेवता व पूर्वजांच्या समाधीच्या पूजा मराठा पुरोहिताकडून सुरू करण्याचा हुकूम दिला. त्याकरता त्यांनी शिवाजी छत्रिय वैदिक पाठशाळा (वैदिक स्कूल) अस्तित्वात आणली. मौनी महाराजांच्या पीठावर छात्र जगद्गुरूंची स्थापना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. महाराजांच्या सत्यशोधकी कार्याचा सर्वात मोठा गौरव खुद्द महात्मा गांधी यांनी केला आहे. त्यांनी एका मुलाखतीत ‘सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यता नष्ट केली. हा त्यांनी स्वराज्याचा खरा पाया घातला आहे,’ असे उद्गार काढले होते. शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर वृत्तपत्रांना दिलेले सक्रिय उत्तेजन हेही त्यांचे महत्त्वाचे योगदान होय.

कलापूरची दिगंत कीर्ती

शाहू महाराजांनी कला, क्रीडा, मल्लविद्या, संगीत, नाटय़, चित्रकला आदी सांस्कृतिक कार्याला आणि या क्षेत्रातील अनेकांना सदोदित मार्गदर्शन व अर्थसाह्य केले. शाहूपूर्वकाळात देशात कोल्हापूर हे श्री महालक्ष्मीच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध होते. कोल्हापूरची ‘कलापूर’ म्हणून चोहोकडे कीर्ती पसरली ती महाराजांच्या काळात! शेती, उद्योगधंदे, सहकार यांच्या पाठबळामुळे कोल्हापूरचा सर्वागीण विकास घडून आला. चहा, कॉफी, रबर, वेलदोडे यांसारखी इथे कधीच न घेतली गेलेली उत्पादने घेणे सुरू झाले. चहाच्या मळ्याचा प्रयोग अपेक्षेहून यशस्वी झाला.

उद्यमनगरी

शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा मैलाचा दगड म्हणजे राधानगरी धरण! कोल्हापूरसारख्या एका लहान संस्थानाने अशा धरणाच्या कामास हात घालणे हे एक प्रकारे शिवधनुष्य उचलणेच होते. त्या काळात ते हिंदूस्थानातील सर्वात मोठे धरण ठरणार होते.१९०९ साली  धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले. १९१२ साली कोल्हापुरात किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिटय़ूट ही संस्था स्थापन केली गेली. तिला जोडूनच कोल्हापुरात आधुनिक शेती-अवजारांचे संग्रहालय सुरू करण्यात आले. महाराजांनी शाहूपुरी, जयसिंगपूर इत्यादी बाजारपेठांची निर्मिती केली. कोल्हापूर संस्थानात सुगंधी औषधी तेल, मधुमक्षिकापालन उद्योग, सुती कापड उद्योग, शाहू छत्रपती मिल्स त्यांच्याच प्रेरणेने सुरू झाल्या. संस्थानात ऑइल मिल, सॉ मिल, फाउंड्री फॅक्टरी, इलेक्ट्रिक कंपनी, मोटार ट्रान्सपोर्ट कंपनी असे उद्योग सुरू झाले. या उद्योगांसाठी प्रशिक्षित कामगार तयार करण्याकरता त्यांनी राजाराम इंडस्ट्रियल स्कूल सुरू केले. संस्थानाबाहेरचे व प्रामुख्याने मुंबईचे सरदारगृहाचे मालक विश्वनाथ साळवेकर, लक्ष्मणराव किर्लोस्कर या उद्योजकांना त्यांच्या व्यवसायवाढीसाठी त्यांनी मदत केली. १९१२ साली सहकार तत्त्वास कायद्याचे स्वरूप दिले. पुढच्याच वर्षी ‘दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ ही पहिली सहकारी संस्था स्थापन झाली. संस्थानातील सहकारी चळवळींची संख्यात्मक नव्हे, तर गुणात्मक वाढ होत गेली. सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या विविध उद्योग-व्यवसायांमुळे कोल्हापूर जिल्हा हरितक्रांती व श्वेतक्रांतीमध्येही महाराष्ट्रात अग्रेसर राहण्याची बीजे रोवली गेली.

१९१९ साली अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय समाजाकडून कानपूरच्या परिषदेत महाराजांचा ‘राजर्षी’ पदवी बहाल करून मोठा गौरव केला गेला. छत्रपती असूनही जो ज्ञानी व विचारवंत असतो, आपल्या विचारांचा आदर्श समाजासमोर ठेवून त्याची दिशा बदलून टाकतो तो राजर्षी! देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे लढले ते राष्ट्रपुरुष खरेच. पण जे देशातील ९५ टक्के मागासलेल्या समाजाच्या उद्धारासाठी खपले, त्यांच्या सामाजिक समतेच्या व न्यायाच्या हक्कांसाठी लढले ते राष्ट्रपुरुष नव्हेत का? राष्ट्र केवळ राजकीय स्वातंत्र्याने घडत नाही. त्या राष्ट्रातील समाज सामाजिक समतेच्या पायावर उभा करावा लागतो. त्यासाठी सामाजिक ऐक्य व बंधुभाव यांची गरज असते. त्यासाठी अहर्निश लढा द्यावा लागतो. फुले-शाहू-आंबेडकर यांनी असा लढा दिला. शाहू महाराजांची ईश्वर व धर्मावर श्रद्धा होती. त्यांनी आर्य समाजाचे अनुयायित्व स्वीकारले असले तरी मूर्तिपूजेचा त्याग केला नव्हता. संस्थानातील देवदेवतांचे ते श्रद्धेने दर्शन घेत असत. हिंदूंच्या देवाप्रमाणे मुस्लिमांच्या दग्र्यालाही जात. संस्थानातील महालक्ष्मी, तुळजाभवानी, टेंबलाई, ज्योतिबा इत्यादी देवदेवतांचे उत्सव व यात्रा  शाही वैभवाने साजऱ्या केल्या जात. राजा म्हणून प्रजेप्रती आपले ते कर्तव्यच आहे अशी त्यामागची त्यांची भूमिका होती. असे असले तरी ‘धार्मिक कर्मकांडे म्हणजे धर्म’ अशी त्यांची भावना नव्हती. माणसाने माणसाशी मनुष्यत्वाच्या आणि बंधुत्वाच्या भावनेने वर्तन ठेवणे म्हणजे धर्म अशी त्यांची अंतरीची श्रद्धा होती. या श्रद्धेमुळेच त्यांनी अंधश्रद्धेला कधी थारा दिला नाही. समुद्रपर्यटन केले की धर्म बुडतो ही हास्यास्पद अंधश्रद्धा त्यांनी लाथाडून लावली होती. शाहू छत्रपती हा एक मुलखावेगळा राजा होता. म्हणूनच ते लोकाभिमुख प्रशासन राबवणारे ‘लोकराजा’ होऊ शकले. ६ मे २०२२ रोजी होणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षांत सांप्रतकाळच्या विविध क्षेत्रांतील धुरिणांनी त्यांच्या कार्याची आणि मानवतेची ज्योत सक्रियतेने आचरणात आणून त्यांचे कृतीशील कार्य पुढे नेले पाहिजे. आणि हेच खरे त्यांना अभिवादन ठरेल.