सुनंदा भोसेकर

आधुनिक मराठी कवितेमध्ये स्त्रियांच्या कवितेची आणि स्त्रीकेंद्री कवितेची सशक्त परंपरा आहे. स्त्रीकेंद्री जाणिवा व्यक्त करणारा कविता म्हेत्रेंचा नवा कवितासंग्रह नुकताच आला आहे.. ‘अस्वस्थ दिवसांची सुगी’! ‘सुगी’ या शब्दाचा अर्थ भरघोस पीक. तर अस्वस्थ दिवसांचे भरघोस पीक येण्याच्या काळाबद्दलच्या या कविता आहेत. माणदेश म्हणजे सततचा दुष्काळ आणि या दुष्काळाला आव्हान देणारी माणदेशी स्त्री. तिला त्या ‘ढालगज मर्दानी’ म्हणतात. ‘ढालगज’ म्हणजे निशाणाची हत्तीण- जी लढाईत आघाडीवर असते. कविता म्हेत्रेंच्या म्हणण्यानुसार, स्वत: पुढे होऊन दुष्काळाला तोंड देणाऱ्या माणदेशी बायका कष्टाळू, जिद्दी, बंडखोर, जबाबदारी घेणाऱ्या आणि आनंदी स्वभावाच्या आहेत. 

हेही वाचा >>> संयुक्त महाराष्ट्र लढय़ाचा धगधगता इतिहास

माणगंगा नदीच्या उगमाविषयी त्यांनी एक वेधक लोककथा सांगितली आहे. गरोदर सीतेला लक्ष्मणाने डोंगरात एकटं सोडलं. जाग आल्यावर तिला प्यायला पाणी तरी मिळावं म्हणून तिच्या उशापायथ्याशी त्याने पाण्याचे दोन द्रोण भरून ठेवले. पण सीतेला जाग आल्यावर दोन्ही द्रोणांना धक्का लागल्यामुळे ते सांडून गेले. हे बाणगंगा आणि माणगंगा नदीचे उगम. पावसाळा सोडला तर माणगंगा आटलेलीच असते. इथल्या स्त्रिया नदीचं कोरडं असणं सीतेच्या आणि पर्यायाने बाईच्या दु:खाशी जोडतात. पहिलीच कविता ‘माणगंगे माय’ या शीर्षकाची आहे आणि कवयित्रीने तिला साकडे घातले आहे की..

‘शेणामातीच्या घरात येऊ दे

आता दूधदुभत्याचा वास

शहरगावाला शिकणाऱ्या पोराच्या

डब्यात जाऊ दे तूप-पोळीचा घास’

दुष्काळी प्रदेशात स्थलांतर ही नित्याची बाब. या संग्रहात दुष्काळाचे संदर्भ अनेकवार येतात. घागरभर पाण्यासाठी भटकणाऱ्या नव्या नवरीच्या मनात ‘कुण्या बापानं का दिली लेक दुष्काळावर?’ या प्रश्नाचा खोल चरा उमटतो. इथली माती कपाळाला लावून दुष्काळात माणसं घरदार, लेकरं या सगळ्यांना घेऊन परागंदा होण्याच्या मार्गावर निघतात.

हेही वाचा >>> भारत-बांगलादेश राजकीय-सांस्कृतिक बंधांचा आलेख

‘अस्वस्थ दिवसांची सुगी’ या संग्रहाचे ‘सलणारे दिवस’, ‘निरगाठीचे दिवस’, ‘सलगीचे दिवस’ आणि ‘अगतिक दिवस’ असे भाग पाडलेले आहेत. या चार भागांचे मिळून अस्वस्थ दिवसांचे पीक आले आहे. या अस्वस्थपणाचे मुख्य कारण म्हणजे व्यवस्थेच्या विरुद्ध जाणाऱ्या बाईच्या पाठीवर पडणारे जातीधर्माचे, पुरुषी सत्तेचे आणि तिच्या बाई असण्याचेही फटके. व्यवस्था एकीकडे बाईपणाचा उदोउदो करत असताना तिला फक्त वंशावळीचा भागीदार म्हणून वागवते आणि हे त्या बाईलाही कळत नाही. माणूस असण्याची मूळ कथा ती विसरून गेली आहे. पुरुषाला उद्देशून लिहिलेल्या एका कवितेत त्या म्हणतात-

‘की तुझं पुरुष असणं आणि माझं बाई असणं

एवढा जैविक अपघात सोडला तर

आपण एकाच मनुष्यीय उंचीवर आहोत

वासना, इच्छांच्या डोहांच्या तळाशी

तुडुंब बुडणारे,

त्याच कातडीचे, त्याच जातीचे..

पण ही समज यायचं तुझं वय झालंच नाही.’

स्वत:च्या पुरुषपणाच्या बंधनातून मुक्त झाल्यावर त्याचा मनुष्योत्तम चेहरा दिसेल अशी आशा या कवितेच्या ठायी आहे. ती आपल्या लेकीला कुठलेही धर्मग्रंथ वाचायला देत नाही, कारण ते सरसकट पुरुषांनी, पुरुषांचे, पुरुषांच्या सोयीसाठी बनवलेले असतात. ‘पोरीचा बाप’ या कवितेत परंपरेच्या विपरीत मुलीच्या हातात पुस्तक देणाऱ्या बापाच्या जिवाला भोवतालचा समाज घोर लावतो आणि पोरीही फाटक्या बापाचं फाटकं स्वप्न शिवत राहतात.  

 ‘सलगीचे दिवस’मध्ये हजारो मैल दूर असलेल्या प्रियकराला उद्देशून लिहिलेल्या विरहाच्या, त्याच्याविषयी वाटणाऱ्या ओढीच्या कविता आहेत. ‘अगतिक दिवस’ या विभागातल्या कविता जरा वरच्या पट्टीतल्या आहेत. सध्याच्या आर्थिक कुंठेच्या आणि धार्मिक उन्मादाच्या दिवसांविषयीच्या कवयित्रीच्या प्रतिक्रिया या कवितांमधून उमटतात. ‘गोळ्या घालून माणसं मरतात, विचार मरत नाहीत’ हा विचार जोंबाळत बसल्यामुळे ‘विवेकाचे हजारो सूर्य’ घेऊन चाललेल्यांना धर्माध संस्कृतीचे पाईक गोळ्या घालत आहेत. त्यांच्या दहशतीला त्यांच्याच मार्गाने प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. फास लावून घेण्याऐवजी त्याच दोराच्या गोफणी करून एरवी सोशीक असणारा कष्टकरी आता व्यवस्थेवर दगड भिरकावतो आहे असेही एका कवितेत त्यांनी म्हटले आहे. या प्रतिक्रिया ढोबळ व सोपी उत्तरे शोधणाऱ्या वाटू शकतील, पण त्यामागची तळमळ आपल्यापर्यंत पोहोचते. 

हेही वाचा >>> शाहूमहाराज राज्यारोहण सोहळाकाव्य

या कवितांमध्ये येणारे विषयही वेगळे आहेत. देवळात ज्या चिमुरडीवर अनेकवार बलात्कार झाला ती असिफा, मंत्रालयाच्या दारात ज्यांनी जाळून घेतले ते धर्मा पाटील, गोऱ्या पोलिसाच्या बुटाखाली गुदमरून मेलेला कृष्णवर्णीय जॉर्ज प्लॉईड यांच्याविषयीच्या कविताही यात आहेत. अखलाख, वेमूला, मोहसीन, नितीन आगे, भोतमांगे अशा दलित, शोषित माणसांचे संदर्भ कवितेत येतात. कवयित्री सभोवतालचे पर्यावरण व वर्तमानकाळाबद्दलही सजग आहे.  

या कवितांमध्ये ‘शब्दस्पर्शी आसक्ती’, ‘शब्दमोही प्रकाश’ अशा संदिग्ध शब्दांचा प्रयोग, प्रतिमांचा सोस अशा नवखेपणाच्या खुणाही आहेत. आशय ठासून सांगण्याच्या नादात कवितेच्या रचनेकडे दुर्लक्ष होते. मात्र काही प्रतिमा लक्षात राहतात. माणदेशापासून सुरू होणारी ही कविता दलित, वंचितांविषयी सहानुभूती व्यक्त करता करता अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या वेदनेपर्यंत जाऊन पोहोचते.. 

अस्वस्थ दिवसांची सुगी’- कविता म्हेत्रे, लोकवाङ्मय गृह, पाने- १२०,

किंमत- २०० रुपये.

sunandabhosekar@gmail.com