|| सुभाष अवचट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींन्द्र मिस्त्रींचं प्रेमाचं नाव ‘दादा’ होतं. ते पुण्यात ‘स्त्री’ मासिकाकरिता दिवाळी अंकासाठी पोट्र्रेट  करण्यासाठी येत असत. स्वारगेटजवळच्या नटराज हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असे. हा त्यांचा शिरस्ता होता. त्यावेळी संपादक मुकुंदराव किर्लोस्करांनी त्यांची व माझी ओळख करून दिली.  दादा आमच्या मित्रांसोबत फेरफटका मारत असत. का कुणास ठाऊक, पण दादांनी मला कोल्हापूरला घरी यायचं निमंत्रण दिलं आणि त्यांच्या खरी कॉर्नर, मंगळवार पेठ या घरी मी मुक्कामाला गेलो.

दादा देखणे दिसायचे. अत्यंत मृदु आणि कमी बोलायचे. मी म्हणायचो, ‘‘दादा, तुम्ही थोडे उंच असता तर येशू ख्रिस्तासारखे दिसला असता.’’ त्यावर ते म्हणायचे, ‘‘येस! तोही कार्पेंटर आणि मीही सुतार!’’

दादांचे वडील म्हणजे बाबूराव पेंटर. त्यांचा हा देखणा स्टुडिओ आणि घर. मोठ्या दरवाजातून आत आले की एक मोठा चौक लागतो. तेथेच  भलेमोठे पुतळे बनवण्याचं काम चाले. कोपऱ्यात मळलेल्या मऊ क्लेचा डोंगर रचलेला असे. इतरत्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कॉप्या, मोल्डस् ठेवलेले असायचे. त्यात बहुधा नेते, ऐतिहासिक प्रसिद्ध व्यक्ती, छत्रपती शिवाजी महाराज, संत यांच्या फुल फिगर्स, बस्टस् असायचे. उंच छोटी-मोठी स्टुले, शिड्या, लोंबकळणारे दिवे, घमेली, काथ्यांची पोती इतरत्र असायची. सारं वातावरण अगदी थंडगार असायचं. डाव्या बाजूच्या दारातून आत गेलं की दादांचं घर सुरू व्हायचं. तेही नीटनेटकं. लाकडी जिना चढून गेलं की लागतो देखणा स्टुडिओ. त्याला नॉर्थ साईडला वरपर्यंत काचेची तावदानं आहेत. त्यातून येणारा अखंड सौम्य प्रकाश स्टुडिओभर पसरलेला असतो. जगभरातले सारे चित्रकार अशाच प्रकाशात काम करत असतात. असा स्टुडिओ मी परदेशातही पाहिला नाही… तेथेच बसून काम करण्याची स्फूर्ती देणारा!

बाबूराव पेंटर यांचं तंत्रज्ञानातलं कसब प्रसिद्धच आहे. त्यांनी चक्क मूव्ही कॅमेरा बनवला होता. या स्टुडिओमध्ये ही झलक होती. मोठं पेंटिंग करायचं झालं की मग पेंटिगचा वरचा भाग स्टुलावर उभा राहून फिनिश करायला त्रास होतो. आवश्यक तितक्या एकाग्रतेनं काम करायला फार अडचण होते. त्यांनी यावर एक नामी उपाय शोधला होता. स्टुडिओच्या जमिनीलगत त्यांनी खाच बनवली होती. तेथे एक पुली बनवली. पुली ओढली की पेंटिंग खाचेतून चक्क खालच्या मजल्यावर जात असे. मग जमिनीवर बसून आय लेव्हलने पेंटिंगचा वरचा भाग आरामात फिनिश करणं सोपं होत असे. त्यांनी स्वत: डिझाईन केलेल्या छोट्या-मोठ्या ईझल्स, स्टुले, कॅनव्हास, रंगांचे डबे ठेवण्यासाठी केलेली शेल्फस्, दोन-चार वेताच्या खुर्च्या… भेटीगाठी, चर्चा या तिथंच होत असत. स्टुडिओला लागून लाकडी बाल्कनी होती. बाल्कनीत उभं राहिलं की खालच्या चौकात चालणारं पुतळ्यांचं काम सहजतेने पाहता येत असे. स्टुडिओला लागूनच दादांची बेडरूम होती. त्यांचं ‘राजा’ नावाचं हरीण त्याच बेडरूममध्ये झोपायला यायचं. गंमत म्हणजे त्यांनी माझी राहायची सोय स्टुडिओमध्येच केली होती.

मला कोल्हापूर अंगवळणी पडायला खूप काळ लोटणार होता. दादांचे मित्र, त्यांचं रुटीन, भाषा, सवयी यामुळे मला कल्चरल शॉकमधून जावं लागणार होतं. सकाळच्या नाश्त्याला खाली उतरलो की सोफ्याच्या कोपऱ्यात दादांचा भाऊ अरविंद भलीमोठी बासरी वाजवीत बसलेला असे. त्यात त्याने मास्टरी मिळवली होती. तो सतारही वाजवायचा. शकुंतला-दुष्यंतच्या चित्रात दिसतं तसं शिंगवालं हरीण राजा दादांच्या बहिणीबरोबर मागेपुढे फिरताना दिसे. संग्राम नावाचा कुत्रा आणि काळं मांजरही एकत्र असत. सहा बहिणी, एक भाऊ, हरीण, कुत्रा, मांजर, भरपूर चित्रं- पेंटिंग्ज, पुतळे असं दादांच्या घराचं पोट्र्रेट म्हणावं लागेल.

पहिला कल्चरल शॉक म्हणजे अरविंद बासरी वाजवत असल्यामुळे, राजा, संग्राम, काळं मांजर ही सारी मुकी असल्यामुळे, बहिणीही कामात असल्याने कोणताही संवाद नसायचा. सारं शांत शांत. नंतर आम्ही चौकात कामाला यायचो. असिस्टंट सुतारानं मातीकाम चाललेल्या लाइफ साइज पुतळ्यावरची ओली फडकी उतरवलेली असायची. खुंटीवर शर्ट टांगून दादा स्कॅर्फोंल्डगवर चढून पुतळ्याच्या हेडवर बारकाईने कामाला सुरुवात करायचे. मीही छोटा पुतळा बनविण्याच्या नादात असे.

जसे बारा वाजायला येत तशी दुसऱ्या नाश्त्याची सुरुवात होत असे. दिंडी दरवाजाबाहेर जीप्स, रिक्षा थांबत असत. त्यातून निरनिराळ्या स्टाईलच्या मिशा राखलेले दादांचे मित्र शांत चालत एकामागून एक येत बाकड्यावर बसत असत. कोणतंही संभाषण नसे. हे खरे दादांचे लंगोटी यार असत. बहुतेक आयुष्यात त्यांचं इतकं परस्परांशी बोलून झालं आहे की आता बोलायला काही उरलं नसावं. नंतर हळूहळू एकेक उठून शांतपणे निघून जात असत. हे इथे कशाला आले होते? कशाला येत राहतात? बारा वाजण्याच्या सुमारास दादा काम थांबवत. मातीचे हात धुऊन शर्ट चढवत. बरोबर त्याक्षणी दरवाजाबाहेर रिक्षा येऊन उभी राही. दादा धीमी पावलं टाकत रिक्षात बसत. मला वाटायचं की, दादा भरभर का चालत नाहीत? मी रिक्षात बसलो की रिक्षा वळणं घेत निघे. आता कुठं जायचं? असे प्रश्न इथे विचारायचे नसतात. एका पानाच्या गादीपाशी रिक्षा थांबे. दादा आपला हात बाहेर काढीत, तसं कोणीतरी येऊन त्यांच्या हातावर सिगरेटचे पाकीट ठेवी. नंतर दगडी भिंत तोडून तयार केलेल्या एका वाईन शॉपपाशी रिक्षा थांबे. दादांच्या हातात वर्तमानपत्रात गुंडाळलेली बाटली कोणीतरी ठेवत असे. मग मात्र रिक्षा इकडून तिकडे करीत उद्यमनगरातील गोल्डन गेट रेस्टॉरंटपाशी येऊन थांबे. आतमध्ये तेच मित्र मोठ्या टेबलापाशी शांत बसलेले असत. तिथे ही मंडळी सोडली तर आजूबाजूला कोणतीही गिऱ्हाईकं नसत. एकच म्हातारा वेटर मद्य सव्र्ह करत असे. सर्वांच्या समोर भरलेले ग्लास असत. आणि मी अस्वस्थ होऊ लागे. कोणीही ग्लासाला हात लावत नसत. त्याकाळी मोबाइल्सही नव्हते, नाही तर त्यावर कार्टून पाहत बसलो असतो. म्हटलं तर हे सारे मित्र सुखवस्तू जमीनदार, थिएटर मालक, व्यावसायिक होते. तरीही दादांना दररोज भेटणं, एकमेकांबरोबर असणं हे थोडं जगावेगळं होतं. त्याबद्दल कधीतरी दादांना विचारायला हवं. ती वेळ म्हणजे रात्रीची होती. तासाभरात गोल्डन गेटच्या दारात रिक्षा परत उभी राहायची. दारूचे भरलेले ग्लास, बाटल्या तशाच टेबलावर ठेवून ही अबोल मंडळी आपापल्या घरी जेवायला जायची. दादांच्या आयुष्यातून हरवून गेलेल्या अनेक गोष्टी त्यांना ठाऊक होत्या आणि म्हणून त्यांची ही मूक साथ होती. मद्य हा एक बहाणा होता. हे सारं पूर्वीच्या ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट मूकपटासारखं वाटायचं. रिक्षात बसताना वाटायचं- साला, मूकपटात अधूनमधून डायलॉगच्या फ्रेम्स तरी असायच्या; इथं तेही नाही.

शनिवारी दादांच्या स्टुडिओमध्ये स्थानिक तरुण चित्रकार आपापली पेंटिंग्ज घेऊन यायचे. त्यावर चर्चा व्हायची. आकाशात काटाकाटी करणारे पतंग हा चित्रांचा विषय नेहमी असायचा. एकदा सिगरेट ओढत दादा मला म्हणाले, ‘‘आज संध्याकाळी आपल्याला जेवायला जायचे आहे!’’ मी घाबरून म्हणालो, ‘‘नको! तुम्ही जा!’’ ‘‘अरे, तांबडा-पांढरा नाही, शाकाहारी सांगितलं आहे.’’ कोल्हापूरच्या त्या दिवसांमध्ये दादांच्या साऱ्या मित्रांचे व माझे प्रेमाचे संबंध निर्माण झाले होते. ते मला ‘बछडा’ म्हणायचे. अनेकदा त्यांच्या घरात प्रेमाखातर दुपारच्या जेवणाचं निमंत्रण यायचं. हे सारं प्रेम त्या तांबड्या-पांढऱ्या मटण रश्श्यात तिखट, लवंगा, मसाल्याने इतके जबरी उतरे की माझे तोंड जळे. मी जेवायलाही कां-कू करायला लागलो की शेजारी मांडी घालून बसलेला पैलवान मला धपाटा मारी. या अघोरी प्रेमाचा परिणाम म्हणजे मला रक्ती हगवण लागली. एका पहाटे दादा झोपले असताना मी एस. टी.ने पुण्याला पळून आलो. तेव्हापासून तांबडा-पांढरा या प्रकरणापासून मी कायमचा दूर झालो. एवढंच नाही, तर कोल्हापूरला हायवेवरची आईच्या हातचे, चुलीवरचे, घरगुती अशी होर्डिंग्ज जरी पाहिली तरी मला पुण्याला परत फिरावंसं वाटतं.

तरीही त्या संध्याकाळी कुणा प्रोफेसर दाम्पत्याकडे आम्ही जेवायला गेलो. साधं जेवण होतं. घरी आम्ही चालत येताना मी दादांच्यापाशी विषय काढला. तो असा- ‘‘दादा, तुम्ही स्वत:ची चित्रं का काढीत नाही? स्वत:च्या कल्पनेतल्या विषयांवर पुतळे का करीत नाही? आपण त्याचे प्रदर्शन भरवू या.’’ दादांनी विषयाला बगल देताना जे. कृष्णमूर्तींची फिलॉसॉफी सुरू केली. नंतर कळले की रात्री नऊनंतर दादा फक्त कृष्णमूर्तींवर बोलतात. त्यांनी अनेकदा सांगितले, की मी शिल्पकार, चित्रकार वगैरे नाही. मी पोटापाण्यासाठी हे करतो. हे सांगताना ते त्यांच्या मुद्द्यांवर पक्के होते. त्यात निराशा नव्हती.

जे. जे. स्कूलमधून पास आऊट झालेले दादा भारतातील एक नामांकित चित्रकार, शिल्पकार होणारच अशी त्यांचे सहकारी, टीचर्स, मार्गदर्शक यांची खात्री होती. शिवाय प्रख्यात वडील बाबूराव पेंटर यांचं वलयही पाठीशी होतं. पण नियतीने वेगळेच खेळ दादांसमोर सारीपाटावर मांडले होते. कोठल्या तरी प्रोजेक्टमध्ये बाबूराव पेंटर यांना घाटा झाला आणि ते कर्जबाजारी झाले. कोणत्या तरी पुतळ्यावर राजकारण होऊन ते बुडाले होते. मग दादांच्या अंगावर कुटुंबाची जबाबदारी त्या तरुण वयातच येऊन पडली. ती निभावण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे व्यावसायिक काम करणे. ते त्यांनी ठरवून स्वीकारले. ते कलानिकेतनमध्ये शिकवू लागले. वारशाने मिळालेला पुतळ्यांचा व्यवसाय त्यांनी पुढे नेला. त्यांनी पोट्र्रेट्स केली. भालजी पेंढारकरांच्या फिल्म्सचे कला-दिग्दर्शन केलं. ‘जिथे गवताला भाले फुटतात’ या वसंत कानेटकरांच्या नाटकाचं नेपथ्य केलं. दादांनी केलेली पोट्र्रेट्स पाहिली की दिसतं की ते त्या व्यक्तीचं हुबेहुब व्यक्तिचित्र रंगविण्यापेक्षा आतून व्यक्तीचा शोध घेत आहेत. दिसणं आणि भावणं याचेच त्यांनी प्रयोग केले.

पण या संघर्षात त्यांची वैयक्तिक क्रिएटिव्हिटी मात्र हळूहळू दूर गेली. आणि हे त्यांना ठाऊक होतं. त्यांनी हा समझोता जगण्यासाठी स्वीकारला होता. तो त्यांनी पूर्ण केला. कदाचित त्यांनी जे. कृष्णमूर्तींच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेतला असावा. त्यांनी केलेले महाराणी ताराबाई, पन्हाळ्यातला बाजीप्रभूंचा पुतळा बघितल्यावर जाणवतं की एखाद्या पेंटिंगमध्ये रंगांच्या फटकाऱ्यांतून इफेक्टस् आणावेत इतक्या सहजतेनं दादांची ती किमया बाजीप्रभूंच्या ब्राँझमधील पुतळ्यामध्ये दिसते. त्यातील लय, चेहऱ्यावरचे हावभाव सारं शिल्पाच्या एवढ्या अवघड मीडियममध्ये त्यांनी पकडले आहेत. अगदी लिरिकली!

परिस्थितीशी झगडताना अनेक कलावंतांना आपल्या मूळ नेणिवांना मुरड घालावी लागते. जगात अशी अनेक उदाहरणं आहेत. कितीतरी मोठ्या कलाकारांची आयुष्यात प्रदर्शनेही होऊ शकली नाहीत. पण दादांची रसिकता यत्किंचितही कमी झाली नाही, किंवा कटुता अंगाला चिकटली नाही.

दादांनी मला खूप प्रेम दिलंय. आमचे स्वभाव, वय यांत खूप अंतर होतं. तरी मला काय आवडतं हे त्यांना ठाऊक असे. पहिलं म्हणजे पाऊस! दुसरं म्हणजे पन्हाळ्यावरची हवा आणि वाहतं धुकं. एका पावसाळ्यात मी त्यांच्याकडे असताना सकाळी दहा-अकराच्या सुमारास दरवाजापाशी जीप्स थांबल्या. नेहमीप्रमाणे आत त्यांचे ते सारे अबोल मित्र होते. जीप्स निघाल्या. आता कुठे? असं विचारायचं नसतं, हे अंगवळणी पडलं होतं. बाहेर पाऊस ऐन भरात होता आणि आम्ही आंबेघाटात पोहचलो. एका वळणावर गाड्या थांबल्या. एका गाडीतून रमची बाटली आणि ग्लासेस बाहेर आले. गाडीच्या टपावर ग्लासेस ओळीत ठेवून पेग भरले गेले. हातात घेऊन सारे वळणाकडे चढू लागले. मी दादांना विचारलं, ‘‘दादा पाणी कुठाय?’’ तसे कधी नव्हे ते सारे मिशांत हसले. सारं मनोहर होतं. वळण संपलं तसे माझे डोळे विस्फारले. उजव्या बाजूच्या डोंगरातून जोरानं आलेला धबधबा रस्त्यावरून पलीकडच्या दरीत कोसळत होता. त्याची कमान झाली होती. वळणावरील मोरीच्या कट्ट्यावर आम्ही बसलो. ग्लास वर करून पाणी भरलं आणि म्हणालो, ‘‘चीअर्स! बछडा खूश झाला!’’ दादांनी दाखवलेला अंबा घाटातला हा नजारा, ती वेळ ही दादांच्या रसिकतेचा एक नमुना होती.

एका रात्री साऱ्या गाड्या पन्हाळ्याकडे निघाल्या. मधेच निळूभाऊ फुले, अरुण सरनाईक सामील झाले. कुठल्या तरी बंगल्यावर आम्ही उतरलो. दादांबरोबर चालत पुढे गेलो. एका तिरक्या उतरत्या बाजूला बैठकीची व्यवस्था होती. खालून वर आलेला पौर्णिमेचा भलामोठा चंद्र होता. हवेत गारठा होता. निळूभाऊ म्हणाले, ‘‘काय रे मुला, मजा आली ना?’’ भाकऱ्या, पिठलं, मटण, सुकं मटण अशा किरकोळ व्यवस्था कोल्हापुरात आपोआप होत असतात. मग अचानक पेटी आली आणि चांदण्यात अपरात्रीपर्यंत अरुण सरनाईक भजनं गात राहिला. सारा पन्हाळा चंद्रप्रकाशात, पहाटेच्या गारव्यात लपेटलेला होता. त्यांचे स्वर खालच्या गावांत पोहोचले असावेत. मी पाहिलं, गावकरी रिंगण करून भजनात तल्लीन झाले होते. अरुण फार सुंदर गायचा हे मी चंद्राच्या साक्षीनं सांगतो.

राधानगरीच्या गेस्ट हाऊसमध्ये मी आणि शंकर पाटील बसलो होतो. माझे मित्र प्रकाशक श्याम कोपर्डेकर गाडी दुरुस्त करायला कोल्हापुरास गेले होते. शंकर पाटील माझे शेजारी तर होतेच, आणि त्यांच्या अनेक पुस्तकांची कव्हर्स मी डिझाईन केली होती. दादांचेही ते जुने मित्र होते. समोर झळाळतं संथ तळं पसरलेलं होतं. त्यावर निळंभोर आकाश टेकलेलं होतं. त्यातील आयलंडवर ‘बेनज़ीर’ बंगला होता. ‘बेनज़ीर’ शब्द अनेक अर्थानं वापरता येतो. या वास्तूला हे उर्दू नाव कसं ठेवलं गेलं असावं? मला त्याचा ‘युनिक’ (एकमेवाद्वितीय) हा अर्थ आवडला. तो त्या सुंदर तळ्यातील वास्तूला चपखल बसला होता. अर्थात त्याचा अर्थ इतका सुंदर होता की इतिहास खोदून काढायची गरज नव्हती. मी इतका शांत बसलेला पाहून शंकरराव म्हणाले, ‘‘कोणत्या विचारात पडला आहेस?’’ मी म्हणालो, ‘‘मी पॅरिसमध्ये एका मित्राकडे राहत होतो. एका सकाळी मी दार उघडून त्याच्या नक्षीदार बाल्कनीत आलो आणि समोर पाहिलं तर त्याच्या घरासमोरच्या बागेत रोदँची सारी शिल्पं तिथे होती. रोदँ हा जगप्रसिद्ध शिल्पकार. त्याचा ‘थिंकर’ आणि इतर शिल्पं समोरच्या अंगणात होती. मी मित्राला म्हणालो, ‘अरे, तू खरा श्रीमंत! हा तुझा पॅरिसमधला सर्वात महागडा फ्लॅट आहे! केवढा अमोल खजिना तुझ्या अंगणासमोर ठेवलाय!’ मी दररोज त्या रोदँच्या पुतळ्यांच्या बागेत सकाळी फिरायला जात असे. गर्दी नाही. आणि मला वाटायचं, माझ्याच खासगी मालकीची ही जागा आहे. तिथेही रोदँकडे पैसे नसल्याने ब्राँझमध्ये त्याला पुतळे ओतता आले नाहीत. त्याचे असे मोल्ड्सही तिथे जपून ठेवले होते. ती जागाही बेनज़ीर होती.’’ शंकररावही हे ऐकून खूश झाले.

शाहू महाराजांचं हे कोल्हापूर असंच बेनज़ीर आहे. त्यांनी प्रोत्साहन देऊन क्रीडा, कला, शेती, उद्योग, राखलेली जंगलं आणि सामाजिक समानतेचं जोपासलेलं हे चपखल शहर आहे. दादाही असेच बेनज़ीर होते. शंकररावांना मी म्हणालो, ‘‘ या समोर बेनज़ीरमध्ये दादांची पेंटिंग्ज, पुतळे, त्यांचे अर्धवट राहिलेले मोल्डस् ठेवले तर बेनज़ीरला आणखी नवीन झळाळी तर येईलच, पण या शहराला एक म्युझियमही मिळेल.’’

असं हे अनेक वैशिष्ट्यांचं एक गाव! तिथे उद्योगनगरी आहे. फिल्म डिरेक्टर्स आहेत. फिल्म स्टुडओज् आहेत. शेतकरी आहेत. लाल-पांढरा रस्सा आणि मिसळीच्या खमंग तर्रीचा दरवळ आहे. देवळं आहेत. दूध देणाऱ्या म्हशी तर आहेतच, आणि दूध पिणारे पैलवानही आहेत. रांगडी भाषा आणि माणसं आहेत. अनेक महत्त्वाचे चित्रकार आहेत. शिल्पकार आहेत.

सारं कसं ‘बेनज़ीर’आहे.

Subhash.awchat @ gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rough sketch akp
First published on: 21-03-2021 at 00:06 IST