scorecardresearch

चैतन्याचा झरा

साताऱ्यापासून दहा कि. मी. अंतरावर असलेल्या सज्जनगडाच्या पायथ्याशी एक नवा प्रकल्प नुकताच आकारास आला आहे.. समर्थदर्शन! संत रामदासांच्या जीवनपटाचा शोध घेणाऱ्या या संग्रहालयाची सफर.. रामदास नवमीच्या (१३ फेब्रुवारी) निमित्ताने..

 

साताऱ्यापासून दहा कि. मी. अंतरावर असलेल्या सज्जनगडाच्या पायथ्याशी एक नवा प्रकल्प नुकताच आकारास आला आहे.. समर्थदर्शन! संत रामदासांच्या जीवनपटाचा शोध घेणाऱ्या या संग्रहालयाची सफर.. रामदास नवमीच्या (१३ फेब्रुवारी) निमित्ताने..

सहय़गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगापरी।
नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तीरी।।
साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी।
तेथे जागृत रामदास विलसे, जो हय़ा जना उद्धरी।।
समर्थाच्या सज्जनगडाचे कवी अनंत यांनी केलेले हे वर्णन! सहय़ाद्रीच्या मुख्य धारेच्या एका शिरेवर, उर्वशी ऊर्फ उरमोडी नदीच्या काठाशी हा गड! साताऱ्याजवळच्या अजिंक्यताऱ्याहून पश्चिम दिशेला नजर टाकली तर डोंगरदऱ्यांच्या खेळात तो बुद्धिबळातील एखाद्या सोंगटीप्रमाणे उठून दिसतो. पावसाळय़ात तर हे सारे खोरेच हिरवेगार होते. समोर हिरवाईत बुडालेला तो सज्जनगड एखाद्या शिलेदाराप्रमाणे पुढे येतो. साताऱ्यापासून दहा किलोमीटरवर, पायथ्याच्या परळी गावच्या डोक्यावर, तीन हजार फूट उंची आणि किलोमीटरभर घेर घेतलेला हा गड! अशा या सज्जनगडाची वाट चढू लागलो, की इतिहासापेक्षाही सर्वप्रथम समर्थाच्या विचारात बुडायला होते. या विचारांनाच अधिक सजग, जिंवत करण्याच्या हेतूने गडाच्या पायथ्याशी एक नवा प्रकल्प नुकताच आकारास आला आहे, – समर्थदर्शन!
परळी गावाच्या पुढे सज्जनगडाची घाटवळणे घेत असतानाच ही आधुनिक समर्थ गुहा आपली वाट अडवते. अंगणातील तो २७ फुटांचा भव्य मारुती त्याच्या शिष्याचे अलौकिक कार्य समजावून घेण्यासाठी भेटीचे निमंत्रण देतो. त्याचा स्वीकार करत आत शिरावे तो समर्थ -विचारांच्या डोहात बुडायला होते.
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदास अशी किती नावे घ्यावीत. या प्रत्येकाने हे मानवी जीवन समृद्ध केले आहे. आमच्या अस्तित्वाला मूल्ये बहाल केली आहेत. जगण्याला बळ पुरविले आहे. यामुळेच तर आज एकविसाव्या शतकातही बेचैन, अस्वस्थ झालेला आधुनिक मानवी जीव कधीतरी या संतपरंपरेचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. या धडपडीतूनच मग तो देहू, आळंदी, पैठण नाहीतर सज्जनगड अशा तीर्थस्थळांची यात्रा करू लागतो. पण या तीर्थाटनातूनही त्या-त्या संतांचा जीवनपट, कार्य उमगतेच असे नाही. या पाश्र्वभूमीवर संतांच्या भूमीतच देवदर्शनाबरोबर त्यांच्या विचारांचेही दर्शन घडावे, जीवनपट-कार्य समजावे या हेतूने ‘समर्थदर्शन’या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक अरुण गोडबोले यांची ही कल्पना. त्यांच्या या कल्पनेला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मारुतीबुवा रामदासी, मोहनबुवा रामदासी, चंद्रमोहन कुलकर्णी, संजय दाबके यांनी दिशादर्शन केले तर शिक्षण संस्थाचालक भाई वांगडे, उद्योजक मनीष साबडे यांनी आर्थिक पाठबळ पुरवले आणि यातूनही ही संकल्पना आकारास आली.
दीड एकर परिसरात वसलेला हा प्रकल्प. जांभ्या दगडातील त्याचे स्थापत्य दुरूनच लक्ष वेधून घेते. आत शिरताच पुढय़ात चाफळच्या मंदिराची छोटेखानी प्रतिकृती उभी राहते. समर्थाच्या कार्याचा श्रीगणेशा जिथे घडला, त्या श्रीरामाला वंदन करायचे आणि ही समर्थ भूमी पाहू लागायचे.
lr20समर्थाचा जीवनपट, कार्य आणि विचारांवर आधारित हे संग्रहालय किंवा ‘थीम पार्क’. यासाठी स्थापत्य, देखाव्यांची दालने, प्रदर्शने, दृक-श्राव्य माध्यम, प्रेक्षागृह, माहितीकेंद्र आदींचा वापर केलेला आहे. या साऱ्यांची रचना करताना इथे बागा, पायवाटा, अभ्यागत केंद्र, भेटवस्तू दालन, उपाहारगृह, प्रेक्षागृह, समर्थ स्थापित मारुती प्रदर्शन मंडप, समर्थ संबंधित मंदिरे आणि या साऱ्यांच्या बरोबर मधोमध ‘समर्थ दर्शन’ या संग्रहालयाची मांडणी केलेली आहे. धर्म, इतिहास, परंपरेसारख्या या विषयांची आधुनिकतेशी उत्तम सांगड घालत ही रचना केलेली आहे.
यातील ‘समर्थ दर्शन’ नावाची गुहा या साऱ्यांतील मध्यवर्ती आकर्षण. काळाने भारलेल्या या गुहेत पाऊल टाकताच सुरुवातीला सर्वत्र केवळ काळोखच दिसतो. या अंधारात चाचपडत असतानाच कानी ‘जय जय रघुवीर समर्थ’, ‘श्रीराम जय राम जयजय राम’ असे मंत्रोच्चार येऊ लागतात आणि मग त्या गूढ गुहेतील जगही हळूहळू किलकिले होत दिसू लागते.
बाहेरील आणि आतील जगात काळाचे गणित तब्बल चारशे वर्षे मागे गेलेले असते. घरेदारे, समाज, माणसे, वेशभूषा, चालीरिती- एकूणच सारा भवतालच या काळावर स्वार होत पाठीमागे सरकलेला असतो. त्यातूनच मग समर्थाचे युग शोधत आपला प्रवास सुरू होतो.
समर्थाच्या जीवनावरील ही एकूण १५ दालने. त्यांच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतचा प्रवास मांडणारी. डोंगर, दरी, गुहा, पाणी, झरे, गाव, घरे, मंदिरे या साऱ्यांतून प्रगट होणारी. प्रत्येक दालनातील विषय-प्रसंग पुन्हा आवश्यक ती वातावरण निर्मिती, स्थापत्य, कटआउट्स, पुतळे, चित्र-छायाचित्रांचा योग्य वापर करून साकारलेले. सोबतीला माहिती देण्यासाठी पुन्हा जागोजागी आधुनिक दृक-श्राव्य यंत्रणा. या साऱ्यांमुळे आत पाऊल टाकताच एका वेगळय़ा जगात दाखल व्हायला होते.
अगदी पहिल्याच दालनातून आपण जातो थेट मराठवाडय़ातील जालना जिल्ह्य़ातील जांब गावी. सूर्याजीपंत आणि राणूबाई ठोसर दाम्पत्याचे हे घर. धर्मकार्यात मग्न असलेल्या या घराची मांडणीदेखील अशीच. देवघर, पूजा-अर्चा, भगव्या वस्त्रात गुंडाळलेले ग्रंथ, ..आणि या साऱ्यांत मधोमध मंद तेवणारी समई!
एका सत्शील, विचारी, धार्मिक वृत्तीचा वास असलेल्या घरी पोहोचल्याची जाणीव होते. आवश्यक ती पाश्र्वभूमी समजते आणि मग पुढच्याच दालनात समर्थाच्या जन्माची गोष्ट अवतरते.
चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी. ठोसर दाम्पत्याच्या पोटी समर्थाचा जन्म झाला. श्रीराम आणि त्यांचे दास असलेल्या या शिष्याचा जन्मदिन एकच यावा हाही एक योगायोग. नारायणाच्या बारशाचा तो उत्सव आपल्याला ही सारी हकिकत सांगत असतो. नारायणाचे बालपणही इथे रंगवले आहे. डोहाभोवती जमा झालेले सवंगडी आणि पाण्यात सूर मारणारा नारायण आपल्यातीलही बालपण जागवतो. ध्यानधारणेची, ईश्वर चिंतनाची बैठकही इथे दिसते. पण या साऱ्यांत लक्ष वेधून घेतो, तो लग्नसोहळय़ाचा प्रसंग. समर्थाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण ठरलेला हा प्रसंग इथे खूपच जिवंतपणे साकारलेला आहे. सारे वऱ्हाडी त्या मुहूर्तात गुंतले आहेत. पण हा लहानगा नारायण मात्र गुरुजींच्या त्या ‘सावधानऽऽ’वर सावध होत मुंडावळीसह हळूच पलायन करत आहे.. सारे दृश्य खरेतर स्थिर पण त्यांच्या चेहऱ्यावरील केवळ भावांमधून त्याला गतिमानता बहाल झाली आहे.
या संग्रहालयातील बहुतेक कटआउट्स हे प्रत्यक्ष कलाकारांचे छायाचित्रण करत तयार केलेले असल्यामुळे या साऱ्यांचेच भाव जिवंत झालेले आहेत. प्रत्येक प्रसंगाचे स्थापत्य ठरवतानाही काळाचा अभ्यास केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या साऱ्यांवर नेमक्या प्रकाशयोजनेचा वापर केल्याने सारीच दृश्ये परिणामकारक झालेली आहेत. या साऱ्यांमुळेच आपण अंधारातून पुढे-पुढे सरकत असताना हे देखावे मात्र सजीव होत भोवतीने वावरत असल्याचे भासते. सजीव-निर्जीवतेतील हा फरक नाहीसा होणे इथेच या कलाकारांचे यश वाटते.
संग्रहालयातील आपला प्रवासही समर्थाच्या जीवनप्रवासाबरोबर सुरू असतो. मग या वाटेतच नाशिकचे काळाराम मंदिर, टाकळी येथील गोदाकाठची तपश्चर्या, बद्रिनाथापासून सुरू केलेले देशाटन असे एकेक प्रसंग पुढय़ात येत राहतात. या प्रत्येक प्रसंगातून नवनवी माहिती, विचार मिळत राहतो.
देशाटन करून समर्थ महाराष्ट्रात परतात. त्या वेळी इथे ‘सुलतानी’ने कहर केलेला असतो. घरे, दारे, मंदिरे सारे काही उद्ध्वस्त झालेले. हा बेचिराख प्रदेश आणि पिचलेली जनता पाहून समर्थ उद्विग्न, अस्वस्थ होतात आणि स्वदेश, स्वराज्य आणि स्वधर्माच्या तत्त्वांमधून नवसमाज बांधायला घेतात. ..हा उद्ध्वस्त समाज आणि दुसरीकडे स्वराज्याचा अरुणोदय या दोन्ही गोष्टी इथे दृक-श्राव्य माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत.
पुढचे दालन चाफळची गोष्ट घेऊन येते. समर्थाच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा. मांड नदीच्या काठावर चाफळ क्षेत्री समर्थ आपल्या कार्याचे केंद्र आरंभतात. श्रीरामाच्या मंदिराची उभारणी, रामनवमी उत्सव, परिसरात गावोगावी मारुतीची स्थापना, बलोपासनेला दिलेले प्रोत्साहन, गावोगावी सुरू झालेली सूर्य नमस्काराची आवर्तने हे सारे-सारे इथे विविध प्रसंगांतून साकारले आहे.
समर्थानी त्यांच्या ‘मनाचे श्लोक’ला इथेच आकार दिला. हा प्रसंगही इथे दाखवला आहे, तो पाहतानाच,
‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमू शारदा मूळ चत्वार वाचा
गमू पंथ आनंत या राघवाचा’
हे श्लोक कानी पडू लागतात. कुठलाही प्रसंग केवळ उपलब्ध साधनांनी मांडून चालत नाही तर त्याला अशा कल्पकतेने जिवंत करावे लागते. ‘समर्थ दर्शन’मधील प्रत्येक दालनापुढून जाताना हाच अनुभव येत असतो. मग अकरा ‘मारुतीं’ची स्थापना त्यांचे जनजागरणाचे कार्य दाखवते, ‘शिवथरघळ’चे दालन दासबोधाची गोष्ट सांगते.
इथेच एका कुटीत समर्थाच्या हस्ताक्षरातील काही पत्रे लावली आहेत. यात समर्थाचे गद्य रूपातील एकमेव पत्र पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे चाफळ देवस्थानविषयीचे आज्ञापत्र, समर्थाचे शिष्य कल्याणस्वामींचे पत्र, समर्थानी बालवयात टाकळी इथे लिहिलेल्या वाल्मीकी रामायणातील काही पृष्ठे, त्यात रेखाटलेली चित्रे, समर्थाचे, कल्याणस्वामींचे अस्सल चित्र हा साराच ऐवज पाहणाऱ्याला ‘सज्जनगडा’ची खरीखुरी भेट घडवतो.
या समर्थ दर्शनात तत्कालीन समाजाचेही दर्शन घडते. त्या वेळेची घरे, सारवलेले अंगण, त्यावर आकार घेणाऱ्या रांगोळय़ा, वृंदावन, भिंतीवर थापलेल्या गोवऱ्या, घरातील वस्तू; लोकपरंपरा, चालीरिती, वेशभूषा, कला-संस्कृती, मुलांचे खेळ; शेती-वाडी, वैरण, शेतातली अवजारे अशा असंख्य गोष्टींचे दर्शन हे संग्रहालय पाहता-पाहता घडते. एखादे संग्रहालय केवळ ते व्यक्तिमत्त्व किंवा तो विचारच सांगत नसते तर ते पाहता-पाहता तत्कालीन इतिहास, भूगोल, समाजाचेही नकळतपणे दर्शन घडवते.
‘समर्थ दर्शन’मध्ये संत रामदासांचा जीवनपट आहे. यात मारुतीरायाचे अस्तित्व आहे. श्रीरामाचा तर इथे अखंड श्वास भरून राहिलेला आहे. हे मंदिर आहे, पण ते विचारांचे. इथे कुठला देव नाही; पूजाअर्चा, आरती, प्रसाद, घंटानाद नाही. पण तरीही काही सश्रद्ध मने या दालनात शिरताना पादत्राणे बाहेर काढून आत शिरतात. हे सारे पाहता-पाहता एखाद्या मंदिरात लागणार नाही अशी समाधी लावतात आणि जाताना परमेश्वराचा खराखुरा स्पर्श अनुभवून जातात. आज इतरत्र आढळणारी बजबजपुरी, गर्दी, कोंडलेला श्वास आणि मंदिरातील हरवलेला देव यापेक्षा इथे मिळणारा अनुभव नक्कीच निराळा असतो. एखाद्या संत व्यक्तीचा, त्याच्या विचारांचा या पेक्षा मोठा गौरव नाही.
समर्थ युगाचा शोध घेत सुरू झालेली आपली ही यात्रा एका कालखंडाचे, त्यातील बदलांचे, चळवळींचे, प्रबोधनाचे, सामर्थ्यांचे दर्शन घडवत एका गुहेपाशी येऊन थांबते. इथेही सारा भवताल अंधाराने भरलेला असतो फक्त मधोमध सामथ्र्य, ज्ञान आणि विवेकाचा प्रकाश झिरपत असतो. एका प्रसन्न, संजीवन समाधीतून! या प्रकाशाचे काही कवडसे आपल्यावरही पडतात आणि आपल्याही जीवनात चैतन्याचे झरे वाहू लागतात..    

मराठीतील सर्व लेख ( Lekha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samarth darshan at sajjangad

ताज्या बातम्या