यशवंतरावांनी आपल्या आईचे अपार कष्ट, मुलांना वर आणण्यासाठी खाल्लेल्या खस्ता पाहिलेल्या असल्यामुळे तिला ते दैवतच मानत. यशवंतराव नेहमी सांगत, की मी माझ्या आईच्या अवतीभोवती वाढलो. ‘साक्षात् प्रेम’ असे जिच्याकडे पाहून म्हणावे अशी माझी आई होती. तिच्या दांडग्या कर्तृत्वामुळे ते तिला ‘सुमाता’ म्हणत.
यशवंतराव चव्हाण मुंबईत असेपर्यंत काँग्रेसश्रेष्ठींकडून, नेतृत्वाकडून त्यांच्या योग्यतेला, गुणांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत गेला. परंतु दिल्लीत गेल्यानंतर मात्र साहित्यिक पिंड असलेला हा नेता उपेक्षित राहिला. कदाचित त्यांच्या गुणांची, योग्यतेची पारख करणारे रत्नपारखी दिल्लीत नसावेत. याला राजकीय कारणेसुद्धा असू शकतात. एक मात्र खरे, की दिल्लीत ते ‘शापित चाणक्य’ ठरले. ‘बॉस’कडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने पृथ्वीतलावरील सुखात त्यांना कमतरता जाणवत असे, हे मात्र खरे. येथे योग्यतेचा प्रश्न निघालाच आहे म्हणून नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतरच्या काळातील दोन घटनांचा विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो.
राव पंतप्रधान झाल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन सुरू असताना त्यांना भेटण्यासाठी तीन-चार खासदार एका संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आले. दरवर्षीप्रमाणे त्या वर्षीही या संस्थेमार्फत काही क्षेत्रांत उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार होता. या समारंभाचे निमंत्रण पंतप्रधानांनी स्वीकारावे असा त्या मंडळींचा आग्रह होता. ‘नवी विटी, नवे राज्य’ असल्याने खासदारांना नाराज करू नये म्हणून पंतप्रधानांनी ते निमंत्रण स्वीकारले. मात्र, ही संस्था केवळ स्वत:च्या प्रसिद्धीसाठी असे कार्यक्रम करते हे लक्षात आल्यानंतर सदर कार्यक्रमाला आपण येऊ शकत नसल्याचे योग्य ते कारण देऊन आयोजकांना कळवण्यात आले. मग आयोजकांनी सत्कार सोडून बाकी कार्यक्रम उरकून घेतला. दिल्लीकरांची विचारशक्ती (याबाबत पुढे सविस्तर लिहीनच.) अचाट आहे! पंतप्रधानांनी रात्रीच्या भोजनाचे निमंत्रण स्वीकारले होते. त्यामुळे या भोजनाचे औचित्य साधून आयोजकांनी जेवणापूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते हा सत्कार समारंभ पार पाडला. सत्कारमूर्तीमध्ये माजी उपराष्ट्रपतीसुद्धा होते. कार्यक्रम संपवून निघाल्यावर गाडीत नरसिंह राव म्हणाले, ‘‘उपराष्ट्रपतींची योग्यता समजून घेण्यासाठी त्यांच्यापेक्षा जास्त योग्यतेच्या परीक्षकांची गरज असते. ही संस्था त्यांच्या योग्यतेची काय पारख करणार? आश्चर्य म्हणजे उपराष्ट्रपतीसुद्धा हा सत्कार कसे स्वीकारतात?’’
दुसरी घटना आहे पंडित भीमसेन जोशी यांना पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमाची. नरसिंह रावांनी आपल्या भाषणात संगीताविषयी अशा काही गोष्टी सांगितल्या, की त्यांना संगीताचे इतके ज्ञान आहे हे पाहून उपस्थितच नव्हे, तर खुद्द भीमसेन जोशीही आश्चर्यचकित झाले. भाषणात राव म्हणाले की, ‘‘भीमसेन आता श्रेष्ठत्वाच्या अशा जागेवर पोहोचले आहेत, की पुरस्कारासाठी त्यांच्या योग्यतेबाबतचा विचार करणे चुकीचे ठरते. ती योग्यता आपली नाही. भीमसेनजींमुळे तुमच्या पुरस्काराचा मान वाढतो.’’
याच संदर्भात माझ्याबाबतीत घडलेल्या एका घटनेचा इथे उल्लेख करावासा वाटतो. १९९३ साली महाराष्ट्रात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. जन्मशताब्दीच्या निमित्ताने पुण्यातील एका संस्थेने ‘यशवंतराव साहित्य-संस्कृती पुरस्कारा’साठी माझी निवड करून पुरस्कार वितरण समारंभास मला बोलावले. आपली योग्यायोग्यता ओळखणाऱ्या संस्थेची मला काहीच माहिती नसल्यामुळे कोणाच्याही हस्ते पुरस्कार घेण्याच्या मताचा मी नव्हतो म्हणून त्यास मी नकार दिला. परंतु दोनच दिवसांनी याच पुरस्कारासाठी निवड झालेल्या पुण्याच्या एका व्यक्तीने फोन करून ‘ही संस्था फार मोठी आहे, तुम्ही यायला हवे,’ असा आग्रह केला. फोन करणारी व्यक्ती यशवंतरावांच्या अगदी जिव्हाळ्याची आणि माझ्यासाठी आदरणीय अशीच होती. ६००-७०० लोकांच्या उपस्थितीत त्या संस्थेने माझा व माझ्या पत्नीचा (ती माझी पत्नी म्हणून नव्हे, तर एक कर्मयोगी म्हणून) सत्कार केला. ती संस्था होती- शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध असलेली ‘एमआयटी’! अशा संस्थेतर्फे पुरस्कार स्वीकारताना झालेला आनंद अवर्णनीय होता.
यशवंतरावांची जडणघडण कशी झाली, ते इतक्या उच्च पदावर कसे पोहोचले, हे पाहण्यासाठी त्यांच्या बालपणापासूनचे अंतरंग उलगडावे लागेल. यशवंतरावांचे लहानपण अतिशय खडतर, गरीब परिस्थितीत गेले. आईचे माहेर शेतकरी कुटुंबातले. वयाच्या नवव्या वर्षी २० वर्षांच्या बळवंतरावांशी- म्हणजेच यशवंतरावांच्या वडिलांशी त्यांचे लग्न झाले. त्याकाळी मुलींची लग्ने लहानपणीच करण्याची प्रथा असल्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्नच नव्हता. वडील बेलिफ आणि थोडीफार शेती असलेले होते. पण तो काळ एकत्र कुटुंब पद्धतीचा होता. तसेच वडीलधाऱ्यांचा ‘अष्टपुत्र सौभाग्यवती हो’ हा आशीर्वाद पूर्ण केला नाही तर त्यांना मोक्ष लाभणार नाही असेच सर्वाना वाटत असे. अंथरूण पाहून पाय पसरण्याची विचारशक्ती नसल्यामुळे तुटपुंज्या उत्पन्नात अनेकांची पोटे भरण्याचा यक्षप्रश्न बहुतेकांसमोर उभा ठाके. दुर्दैवाने यशवंतराव चार वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी यशवंतरावांच्या आई विठाबाई यांच्यावर येऊन पडली.
विठाबाईंसमोर भविष्याचे मोठचे संकट उभे असताना नेहमीप्रमाणे हितचिंतक (?) नातेवाईक पुढे सरसावले आणि त्यांनी सल्ला दिला की, मुलांना घेऊन कराड सोडून खेडय़ात जाऊन त्यांचा सांभाळ करा. पूर्वीच्या स्त्रिया अशिक्षित होत्या, पण अज्ञानी नक्कीच नव्हत्या. मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलणे योग्य होणार नाही, हा विचार करून नातेवाईकांची नाराजी पत्करून त्या कराडलाच राहिल्या. दिवसभर शेतात जे मिळेल ते कष्टाचे काम करू लागल्या. त्याकाळी चक्की नसल्यामुळे पहाटेच पीठ दळून तीन मुले आणि एक मुलगी आणि स्वत:साठी भाकऱ्या तयार करून त्या कामाला जात. भाकरीबरोबर कालवण मिळेलच अशी शाश्वती नसे. अशा विवंचनेत जवळपास १७-१८ वर्षे या कुटुंबास काढावी लागली. मुले मोठी होऊन नोकरीला लागल्यावर मात्र त्यांनी आईला कामावर जाण्यास बंदी केली.
चिमणी आकाशात उडत असली तरी तिचे लक्ष पिल्लांकडे असते, तसेच विठाबाईंचे होते. दिवसभर घराबाहेर राहूनही त्यांचे आपल्या मुलांकडे बारीक लक्ष असे. मुलांनी सर्वगुणसंपन्न, मोठे व्हावे हीच त्यांची इच्छा होती. सर्व मुलांमध्ये यशवंतराव हे त्यांचे लाडके अपत्य. त्यांचा उल्लेख करताना त्या नेहमी ‘माझा बाबा’ असे संबोधत. अतिशय गरिबी असली तरी नादार होऊन शिकायचे नाही असा यशवंतरावांचा अट्टहास होता. त्यामुळे विठाबाईंनी त्यांना आश्वस्त केले, की काही झाले तरी मी तुझी फी भरीन. दुसऱ्या मुलांची पुस्तके आणून यशवंतरावांनी अभ्यास केला. फार कष्टांत त्यांचे शिक्षण झाले. कधी कधी तर फुटाणे खाऊनही त्यांनी दिवस काढले. शालेय जीवनात त्यांच्या अनेक सुप्त गुणांना चालना मिळत गेली. वाचन आणि त्यामुळे वक्तृत्व, धीटपणा वगैरे गुणांमुळे ते शिक्षकांत प्रिय होते. एकदा स्नेहसंमेलनात वर्षभरातील अनेक स्पर्धात मिळालेली बक्षिसे देताना मुख्य पाहुणे म्हणाले, ‘हे सर्व नेण्यासाठी टांगा आणला आहेस का?’ विद्यार्थीदशेतच मित्रांचा संचय, माणुसकी, गरीबांबद्दलची तळमळ, मोठय़ा भावांचे छत्र गेल्यामुळे त्यांच्या मुलांची जबाबदारी पार पाडताना सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची प्रबळ इच्छाशक्ती वगैरे गुण तरुण वयातच यशवंतरावांत जोपासले गेले. गरिबीत दिवस काढल्यामुळे ‘अन्न हे पूर्णब्रह्म’, ‘अन्नदाता सुखी भव’ याची प्रचीती यशवंतरावांच्या पुढील आयुष्यात पाहण्यास मिळाली. पानात अन्न टाकलेले त्यांना अजिबात आवडत नसे. ते स्वत:ही तसेच वागत. त्यांच्या दाराशी आलेला कुणीही उपाशी परतत नसे. त्यांच्याकडे काम करणारा कोणीही असो, तो बंगल्यातच जेवत असे. इतकेच नव्हे तर यशवंतरावांचा एक कटाक्ष होता, की आपण जे खातो तेच अन्न सर्वाना द्यायचे. त्यांच्या या माणुसकीचे दर्शन, अनुभव मी स्वत: घेतले आहेत. हे सारं जवळून बघितल्यामुळे हिमालयासाठी धावून जाणारा हा सह्य़ाद्री मनाने इतका कोमल कसा, हा विचार मनात आल्याशिवाय राहत नसे. ग. दि. माडगूळकरांचे एक भावगीत आठवतं..
‘आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही,
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकतो अ आ ई..’
यशवंतरावांनी आपल्या आईचे अपार कष्ट, मुलांना वर आणण्यासाठी खाल्लेल्या खस्ता पाहिलेल्या असल्यामुळे तिला ते दैवतच मानत. यशवंतराव नेहमी सांगत, की मी माझ्या आईच्या अवतीभोवती वाढलो. ‘साक्षात् प्रेम’ असे जिच्याकडे पाहून म्हणावे अशी माझी आई होती. तिच्या दांडग्या कर्तृत्वामुळे ते तिला ‘सुमाता’ म्हणत. दुसऱ्यांच्या आईतही यशवंतराव आपल्या आईचे प्रतिबिंब बघत आणि त्यांचा आदर करीत. कुंतीने एकदा धर्मराजाला सांगितले होते, ‘मन थोडे मोठे कर.’ तसेच विठाबाईंनीही मुलांना शिकवले. त्यामुळे मुलांची मने नेहमीच मोठी राहिली. परिस्थितीने गांगरून जायचे नाही, तर आत्मविश्वासाने तिला सामोरे जायचे, हा पहिला धडा आईनेच त्यांना शिकवला. आपल्या मुलांचा कुणी पाठीराखा नाही म्हणून आईने मुलांना परावलंबी होऊ दिले नाही. यशवंतरावांनी शेवटपर्यंत तिची सेवा केली. आजारी असताना त्या सह्य़ाद्री बंगल्यावर होत्या. यशवंतराव ऑफिसला जाण्यापूर्वी आणि परत आल्यावर झोपताना तिला नमस्कार करीत. एवढेच नव्हे तर तिला परावलंबी वाटू नये म्हणून तिच्या उशाखाली चार-आठ आण्यांची नाणी तिच्या नकळत हळूच ठेवत. यशवंतराव दौऱ्यावर असले की हे काम वेणूताई न विसरता करीत. कोणी भेटावयास.. विशेषकरून रोज येणारे डॉक्टर आले की त्यांच्या हातावर त्या एक नाणे ठेवत व म्हणत, ‘बाबा रे, इथे तुला कोणी चहासुद्धा विचारणार नाही. हे पैसे घे आणि बाहेर जाऊन चहा पी.’ त्या डॉक्टरांनी ही सर्व नाणी आठवण म्हणून जपून ठेवली होती.
ram.k.khandekar@gmail.com