मध्यम परिस्थिती असलेल्या माणसाला साधारणत: वयाच्या २३-२४ व्या वर्षी योग्यतेच्या दृष्टीने आजपर्यंत त्याने गोळा केलेल्या शिदोरीवर आपल्या भावी आयुष्याची बरीचशी कल्पना आलेली असते. कारण एकदा नोकरी लागली की त्यात कोणतीही भर पडण्याची शक्यता कमीच असते. म्हणून मग तो सुखस्वप्ने पाहणे सोडून संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान। तुका म्हणे घालू तयावरी भार। वाहूं हा भार संसार दैवापायी।’ याला मीसुद्धा अपवाद राहण्याची शक्यता नव्हती. त्याकाळी स्टेनोग्राफर हा स्टेनोग्राफर म्हणूनच निवृत्त होत असल्यामुळे बढतीची आशा नव्हतीच. मुंबईबाहेर बदलीची शक्यता तर अजिबातच नव्हती. त्यामुळे मुंबईत याच पदावर १० ७ १० किंवा जास्तीत जास्त १२ ७ १२ च्या दोन बीएचकेमध्ये उर्वरित आयुष्य काढावे लागणार, हे निश्चित होते. म्हणून मी मुंबईच्या वातावरणाशी, परिस्थितीशी आणि इथल्या माणसांच्या वृत्ती-प्रवृत्तीशी समरस होण्याचा प्रयत्न सुरू केला. दिनचर्या ठरावीक चाकोरीतून सुरू होती.

आणि.. १९५८ सप्टेंबरचा दुसरा आठवडा.. वेळ साडेअकरा वाजण्याची असावी. मी वर्तमानपत्र वाचत असताना कानावर आवाज आला, ‘खांडेकरसाहेब कोण आहेत?’ पाहतो तो एक चपराशी. चपराशाने नाव घेऊन पुकारा केला की कोणाचा तरी टेलिफोन आला असावा किंवा भेटायला कोणीतरी आले असावे असे समजले जायचे. पण तो म्हणाला, ‘साहेब बोलावत आहेत.’ त्या खोलीत इंग्रजी स्टेनोग्राफर-टायपिस्ट असल्यामुळे तो त्यांच्या परिचयाचा होता. पण मी कधी त्याला पाहिले नव्हते. म्हणून विचारले की, ‘कोणते साहेब?’ उत्तर आले, ‘संचालक साहेब.’ खात्रीसाठी पुन्हा विचारले, ‘मलाच ना!’ उत्तर- ‘हो.’ सर्वाचे चेहरे आश्चर्यचकित तर झालेच; पण त्यावर चिंतेची छटाही दिसत होती. माझ्या हातून असे काय घडले, की संचालकांनी मला बोलवावे! सर्वाना शंभर टक्के खात्री होती, की माझ्या हातून विपरीत काही होण्याची शक्यता नक्कीच नव्हती. तरीसुद्धा का बोलवावे?

मी बाथरूममध्ये जाऊन दोन मिनिटात चेहरा पाण्याने धुतला आणि संचालकांच्या खोलीकडे निघालो. माझ्यासोबत मुंबईत माझे पालकत्व स्वीकारलेले त्रिपाठीसुद्धा आले. त्यांचे आणि संचालकांचे संबंध चांगले होते. ते खोलीबाहेर उभे राहिले आणि मी ‘आत येऊ का?’ ही औपचारिकता पूर्ण करून त्यांच्या कक्षात गेलो. संचालकांसमोर ३५-४० वयाचे एक गृहस्थ बसले होते. मला पाहताच दोघांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. दोन-तीन मिनिटे ते तसेच माझ्याकडे पाहत राहिले. ते असे का बघत आहेत, हे न कळल्यामुळे मी सदरा आणि पायजम्याच्या बटणांकडे पाहिले. सर्व व्यवस्थित होते. नंतर संचालकांनी समोर बसलेल्या गृहस्थांचा परिचय करून दिला. ‘हे प्रभाकर. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव.’ मी नमस्कार केल्यानंतर त्यांनी लग्नाळू मुलीला विचारतात तसे चार-पाच प्रश्न विचारले. इथपर्यंत ठीक होते. नंतरचा प्रश्न मात्र पायाखालची वाळू सरकावी इतका आश्चर्यचकित करणारा तर होताच, पण तितकाच धक्कादायकही होता. त्यांनी विचारले, ‘तुम्ही मुख्यमंत्र्यांचे स्टेनोग्राफर (मराठी) म्हणून याल का?’ या प्रश्नाने माझ्या चेहऱ्यावरच्या भावांचे चित्रण करण्यास कवीही समर्थ नसता. पहिलीच शंका माझ्या मनात आली ती ही, की कोणतीही शिफारस नसताना माझी या पोस्टसाठी निवड का झाली? दुसरी- मी हिंदी स्टेनोग्राफर आहे हे माहीत असताना मराठी स्टेनोग्राफरचे काम कसे करीन, हा विचार त्यांनी कसा केला नाही? वाचकांच्या माहितीसाठी या ठिकाणी एक गोपनीय गोष्ट सांगावीशी वाटते की- हिंदी स्टेनोग्राफरची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मी मराठी स्टेनोग्राफरचे शिक्षण घेण्यास जात होतो आणि त्यात बरीच प्रगतीही केली होती. पण ही गोष्ट फक्त मला आणि मलाच माहीत होती. नाहीतर महाराष्ट्र सरकारने पेन्शनवाली पोस्ट मला दिली नसती. परंतु मी आजपर्यंत कोणाचे मराठी डिक्टेशन घेतले नव्हते. तिसरी गोष्ट- मी नागपूरचा. माझ्या कामाची आणि माझी पाश्र्वभूमी वगैरे जी माहिती मुख्यमंत्र्यांचे काम करण्यापूर्वी घेणे आवश्यक असते, अशी कुठलीच माहिती गोळा केली गेली नव्हती. जेमतेम विहिरीत पोहोणाऱ्याला समुद्राच्या काठावर आणून समुद्रात पोहोशील का, विचारले तर त्याची जी अवस्था होईल त्यापेक्षा भयंकर अवस्था माझी  झाली होती. बराच घामही फुटला होता. मला काय बुद्धी झाली कोण जाणे! एकदम नकार देण्यापेक्षा तोंडातून निघाले, ‘सर, आपल्या येथील जागा सीनियर क्लार्क कम् स्टेनोग्राफरची आहे; आणि मी स्टेनोग्राफर आहे. स्टेनोग्राफर म्हणून नियुक्ती होत असेल तर मी येईन.’ खरं तर माझा चेहरा पाहून त्यांना काय वाटले कोण जाणे, ते म्हणाले, ‘विचार करून सांगा. दुसरे- तुम्ही आल्यानंतर जागा निर्माण करू.’ दहा मिनिटांची ही मुलाखत संपून मी बाहेर आलो. त्रिपाठी माझी वाटच पाहत होते. पुन्हा मी बाथरूममध्ये जाऊन तोंड धुतले. त्रिपाठींना सर्व काही सांगितले. त्यांना हायसे वाटले. पण ते काहीच बोलले नाहीत. रूममध्ये परतल्यानंतर मला का बोलावले होते, हे सांगितल्यावर सर्वानी तोवर अडवून ठेवलेला श्वास सोडला. त्रिपाठींनाही माझ्या मनातील विचार पटल्याचे त्यांनी तीन-चार दिवसांनी सांगितले. मराठी टायपिंग वगैरेचे काम अडू नये म्हणून एक मराठी टायपिस्ट मात्र तिथे गेला; जो नागपूरचाच होता. आठ-दहा दिवस झाले, पण याबाबत काहीच हालचाल होताना दिसत नव्हती. म्हणजे हा प्रश्न निकाली निघाला असणार असे वाटू लागले. खरे सांगायचे झाले तर हे आव्हान स्वीकारण्याचे धाडस माझ्यामध्ये नव्हते. तशी इच्छाही नव्हती. कारण यात हात दाखवून अवलक्षण होण्याची भीतीच फार होती.

जी व्यक्ती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात टायपिस्ट म्हणून गेली होती ती अधूनमधून मला भेटत असे. तो सांगत असलेले तिथल्या कामाचे वर्णन ऐकून मला धडकी भरत होती. नंतर मात्र तो अतिशयोक्ती करत असल्याचे ध्यानी आले, कारण मी तिथे जाऊ नये अशी त्याची इच्छा दिसली. ९ किंवा १० ऑक्टोबर असेल; ‘साहेब बोलावत आहेत..’ हे सांगण्यासाठी परत तो चपराशी आला. यावेळी घाबरण्यासारखे काही नव्हते. मनात विचारसुद्धा निश्चित झालेला होता. पुन्हा तोच प्रवेश : ‘मला स्टेनोग्राफरचे पद देत असाल तर येतो.’ याला उत्तर तेच.. ‘तुम्ही या, मग ते पद निर्माण करू.’ फक्त यावेळी संचालक म्हणाले, ‘इस बच्चे के पीछे मत पडो.’ (ते गुजराती होते म्हणून हिंदीत बोलले.) मी त्यांना समजावून सांगितले, की सव्‍‌र्हिस बुकमध्ये लोअर पोस्टची नोंद झाली तर पुढे-मागे बढतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. तरीही खासगी सचिव म्हणाले, ‘विचार करून सांगा.’ कक्षात परत आल्यानंतर त्रिपाठींना घडलेले सारे सांगितले.

दुसऱ्या दिवशी त्रिपाठी मला कॅन्टीनमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी सुचवले की, ‘‘राम, तुम वहाँ जाओ. कुछ दिन के बाद आपको यहाँ अंग्रेजी या मराठी स्टेनोग्राफरी सिखने के लिए जबरदस्ती करेंगे, या परेशान करेंगे. महत्त्वपूर्ण बात यह है, कि तुम्हारी योग्यता, काम और विचार करने के तरीके आपको आगे ले जाएंगे. सबसे बडी बात यह है, कि समझ लो काम नहीं कर सकें और वापस आओगे तो कोई बात नहीं. तुम खुद तो नहीं गए थे, बुलाया गया था.’’ मी म्हटलं, ‘‘महाराष्ट्र में मंत्रालय में इतने मराठी स्टेनोग्राफर होते हुए भी मुझे ही क्यों चुना गया?’’ मीसुद्धा त्यावर नंतर विचार केला, की गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर खाऊन टाकली. दुसऱ्या दिवशी मी प्रभाकर यांच्याकडे जाऊन परवापासून मी रुजू होत असल्याचे सांगितले. त्यांना आनंद वाटला.

१३ ऑक्टोबर १९५८. घटस्थापनेचा शुभदिवस. सकाळीच महालक्ष्मीचे दर्शन घेऊन मी दहा वाजता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचलो. सर्वत्र शुकशुकाट होता. १०.२० च्या सुमारास एका चपराशाने ऑफिसचे दार उघडले. त्याच्यासोबतच आत गेलो. सहज त्याला विचारले, ‘मुख्यमंत्र्यांचे ऑफिस हेच आहे ना? की दुसरी खोली आहे?’ तो म्हणाला, ‘हेच आहे. शेजारी खासगी चिटणीसांची खोली आहे.’ द्विभाषिक मुंबई राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे हे कार्यालय आहे यावर माझा विश्वास बसेना. मी नागपुरातील मुख्यमंत्र्यांचे आलिशान ऑफिस पाहिले होते. १५ ७ २५ च्या खोलीत ११ कर्मचाऱ्यांच्या टेबल-खुर्च्या, सात-आठ अलमाऱ्या आणि एका कोपऱ्यात चपराशांच्या कामासाठी छोटी जागा. त्याच्या तुलनेत डिपार्टमेंटच्या एखाद्या सेक्शनसारखे हे कार्यालय होते. सर्वाच्या केनच्या खुर्च्या. टेबलावर कागदांचा ढीग. थोडय़ा वेळाने खासगी सचिव प्रभाकर आले. त्यांना भेटल्यावर त्यांनी मराठीचे काम पाहणाऱ्या पीएशी माझी ओळख करून दिली. तिथे काम करीत असलेल्या व्यक्तीकडून कामाचे स्वरूप समजावून घेतले आणि त्याची रवानगी केली. नंतर पीएने पाळावयाची काही महत्त्वाची पथ्ये सांगितली. कामाचे स्वरूप पाहिल्यानंतर लक्षात आले की, इथे डिक्टेशनपेक्षा कारकुनी कामच जास्त आहे. पण ही तर सुरुवात होती. कारण महत्त्वाच्या दोन सत्त्वपरीक्षांना अजून मला सामोरे जायचे होते. पहिली होती- मुख्यमंत्र्यांची निवड आणि दुसरी होती- त्यांचे डिक्टेशन. यशवंतराव चव्हाणांसारख्या कडक शिस्तीच्या, उत्कृष्ट वक्ता असलेल्या साहित्यिकाचे, कुशल प्रशासकाचे डिक्टेशन हीच परीक्षा सर्वात महत्त्वाची आणि पुढील आयुष्याची पायाभरणी मजबूत करणारी ठरणार होती. विधानसभेचे अधिवेशन चालू असल्यामुळे तीन-चार दिवसांनी प्रभाकर यांनी मला विधानभवनातील ऑफिसमध्ये बोलावून मुख्यमंत्र्यांसमोर उभे केले. न बोलता काही क्षण ते नुसते माझ्याकडे पाहत राहिले. त्यावेळी माझे वय होते २४.  चेहऱ्यावर व कपडय़ांमध्ये नागपुरी साधेपणा होता. त्यांच्या मनात नक्कीच शंका आली असेल, की हा मुलगा कसे काम करणार? त्यांनी तीन-चार प्रश्न विचारल्यावर मी परत आलो. त्या दिवशी काहीच निरोप न आल्यामुळे पसंती नक्की हे मी गृहीत धरले.

– राम खांडेकर

ram.k.khandekar@gmail.com