प्रा. विजय तापस

‘सोनाबाई चिमाजी केरकर’ ही व्यक्ती तुम्हाला माहीत असण्याची जवळपास सुतराम शक्यता नाही. तुम्हालाच काय, पण कोणालाच ही व्यक्ती माहीत नसावी. या अज्ञानात कोणाचीच काही चूक नाही. ही सोनाबाई म्हणजे, जिने १८९६ मध्ये नाटककार आत्माराम पाठारे यांच्या छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेल्या आणि त्याकाळी गाजलेल्या नाटकावरून प्रेरणा घेऊन ‘संगीत छत्रपती संभाजी’ हे नाटक लिहिले, ती! कुणी तिला मराठीतली पहिली स्त्री-नाटककार मानतात तर कुणी नाही. ती तशी पहिली स्त्री-नाटककार असेल वा नसेल, पण ती मराठीतली पहिली अल्पवयीन नाटककार होती यात संशय नाही. ती कदाचित एकमेव उत्तम नाटक लिहून अजरामर झालेली एकमेव नाटककार असावी. अत्यंत अल्पायुषी असलेल्या सोनाबाईने वयाच्या चौदाव्या वर्षी ‘संगीत छत्रपती संभाजी’ हे नाटक लिहिले आणि त्यानंतर अवघ्या वर्षभराने, म्हणजे १७ जुलै १८९५ मध्ये तिला मृत्यूने गाठले. तिचा अंत झाला. केरी या गोव्यातल्या छोटय़ाशा गावाशी जीवाभावाचा संबंध असलेल्या एका कलावंतीणीच्या पोटी सोनाबाई केरकर कुटुंबात ६ नोव्हेंबर १८८० मध्ये मुंबईत जन्माला आली. तेव्हाच एका ज्योतीषबुवांनी ‘या मुलीच्या कुंडलीत वयाच्या चौदाव्या वर्षांपावेतो चार वेळा अपमृत्यूचा धोका संभवतो आणि त्या धोक्यांमधून ती पसार झाली, तर बाई वयाची ऐंशी पार करण्यांस प्रत्यवाय संभवत नाही,’ असं भाकीत तिच्या आईबापांच्या कानी घातलं होतं असं म्हणतात. हे ज्योतीषबुवा अस्सल असावेत, कारण सोनाबाईने जीवावरचे तीन धोके जरी टाळले, तरी तिला चौथा धोका टाळता आला नाही. प्रत्यक्ष मरण येण्यापूर्वी ही चौदा-पंधराची कोवळी मुलगी आपल्या आईशी जे बोलली ते वाचले की अंगावर काटाच उभा राहतो. तिच्या जीवनाच्या अखेरच्या वीसेक मिनिटांत ती दर चारदोन मिनिटांनी बेशुद्धीतून शुद्धीत येऊन ‘‘आई, आता मी जाते, हे पहा मला न्यावयांस आलेत, पांच पांच मिनिटांकरिता तुम्ही मला कशांस मागे आणता? मी आता जाते.’’ असे म्हणत होती. हे वाचले की १८९५ मधली ती कोणी चिमा नावाची तिची आई कोणाच्याही डोळय़ांपुढे उभी राहील. मुलीचे हे ‘निरोपाचे शब्द’ त्या माउलीने कसे ऐकले असतील असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही. मला तरी ही सोनाबाई एक अपूर्व स्त्री वाटते. जन्माला आल्यापासून तिचा मृत्यूशी लपंडाव सतत चालू असतानाच ती अगदी बालवयातच जणू जाणती होऊन गेली.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Chaitra Navratri Maha Ashtami Rare Yog Siddhi & Ravi To Make These 5 Rashi Extremely Rich
आज महाअष्‍टमीपासून वर्षभर ‘या’ ५ राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी; सिद्धी व रवी योग तुमच्या राशीला काय देणार?
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
Personality Traits According to Zodiac Signs in Marathi
Personality Traits : प्रेमात पडण्यापूर्वी ‘या’ राशींचे लोक खूप वेळ घेतात; सहज प्रेमात पडत नाही

तिला नानाविध कलांची आवड तर होतीच, पण तिला शिक्षणातही विलक्षण गती होती. तिला बॉम्बे युनिव्हर्सिटीतून पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा जरी होती, तरी प्रकृतीच्या कारणांमुळे तिला ते करता आले नाही. असो. याच सोनाबाईला लेखन-वाचनाची कला अवगत होती. तिने वेळोवेळी बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. ज्या तिच्या मृत्यूनंतरच प्रकाशात आणल्या त्या बाळकृष्ण लक्ष्मण पाठक या गृहस्थांनी. सोनाबाईची ‘संसार सुख’, ‘मीराबाईचे पद्यात्मक चरित्र’, ‘चांदबीबी सुलताना’, ‘राणी दुर्गावती’ आणि ‘राणी भवानी’ ही इतर पुस्तकेही याच बाळकृष्ण पाठकांनी तेव्हाच्या मुंबईतल्या विख्यात ‘जगदीश्वर छापखान्या’त छापवून महाराष्ट्रापुढे आणली. मात्र या सोनाबाईची आयुष्यातली पहिली कलाकृती म्हणजे ‘संगीत छत्रपती संभाजी’ हे नाटक. या नाटकात तिने छत्रपती संभाजी राजांच्या संदर्भात कोणती भूमिका घेतली आहे याचा इथे आपण विचार केला नाही तरी चालेल. आपण या नाटकाच्या काही वैशिष्टय़ांचा अर्थात आशय आणि रचनेशी संबंधित विशेषांचा वेध घेतला तरी पुरेसे आहे.

सोनाबाईच्या नाटकाकडे जाण्यापूर्वी इथे मला एका आश्चर्याचा उल्लेख करावासा वाटतो. सोनाबाईने वयाच्या चौदाव्या वर्षांपर्यंत किती नाटकं पाहिली होती, किती नाटकं वाचली असतील यांचा तपशील तिच्या छोटेखानी चरित्रात कुठेही उपलब्ध नाही. जरी आपण या गोष्टींशी तिचा संबंध आला होता असं गृहीत धरलं, तरी त्यातून तिला स्वत:ला सफाईदार नाटक रचण्याची शक्ती आणि कौशल्य कसं लाभलं असेल ते उमजत नाही. शेक्सपियरने प्रत्यक्ष नाटक रचण्यापूर्वी नाटय़कलेचा पुरेसा अनुभव घेतला होता किंवा अण्णासाहेब किर्लोस्करांनी ‘शाकुंतल’ हे त्यांचं पहिलं नाटक रचण्यापूर्वी पारशी रंगमंचावरील नाटकांचा, महाराष्ट्र-कर्नाटकातल्या लोकरंगभूमीचा रग्गड अनुभव गाठीशी बांधला होता हे विसरता येत नाही. ही बाब लक्षात घेतली की, असा कोणताही अनुभव स्वत:पाशी नसताना एक सफाईदार नाटक लिहिण्याइतकी क्षमता, कौशल्य सोनाबाईच्या ठायी कुठून प्राप्त झालं असेल हा प्रश्न पडतो. तिनं आयुष्यात लिहिलेलं पहिलं नाटक हे महाराष्ट्रातल्या राजकीय दैवतांत ज्यांचा समावेश आहे, अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर असावं आणि त्या नाटकात त्यांची प्रतिमा ही उदात्त नायकाची नसून खलनायकाची असावी याचं अतिशय आश्चर्य वाटतं. स्त्रियांच्या संदर्भात संभाजी राजे यांचं वर्तन हे अक्षम्य स्वरूपाचं, छत्रपती शिवरायांना मानसिक-सामाजिक क्लेश देणारं होतं एवढंच सांगून सोनाबाई थांबत नाहीत, तर राजांच्या अशा कृती त्या नाटकातील विविध प्रसंगांची रचना करून त्या प्रत्यक्ष रंगमंचावर दाखवतातही. सोनाबाईंच्या उदाहरणावरून एकेकाला नाटय़कलेची उपजत जाण असते, त्यांना नाटय़लेखनाच्या पूर्वानुभवाची वा प्रशिक्षणाची गरजच नसते असं म्हणता येईल का असा प्रश्न पडतो. सोनाबाईच्या नाटकातल्या संभाजीराजांच्या प्रतिमेशी पूर्णपणे असहमत असूनही मला या बाईंच्या नाटय़रचना तंत्राचं खरोखरच आश्चर्य वाटतं. नाटकाचे पंचप्राण म्हणजे त्याचं कथानक, त्यातल्या पात्रांचे स्वभाव रेखाटन, पात्रांचा परस्परांशी असलेला संबंध, नाटकातील संवाद आणि संवादांची भाषाशैली, नाटकातील घटना-प्रसंगांची वीण आणि अंतिमत: या सर्वातून निर्माण होणारा विशिष्ट परिणाम! या पंचप्राणांची जवळपास प्रत्येक अट, त्यातलं प्रत्येक आव्हान चौदा-पंधरा वर्षांची नाटककार ज्या निष्णातपणे पाळते आणि स्वीकारते त्याला तोड नाही.

‘क्राफ्ट ऑफ अ प्ले’ हा यशस्वी नाटकाचा एक मोलाचा निकष असेल, तर सोनाबाई केरकरचं ‘संगीत छत्रपती संभाजी’ हे एक ‘वेल क्राफ्टेड’नाटक आहे असं म्हणता येईल. नाटक पाच अंकी आहे. या पाच अंकांतील घटनापटाचे स्थलावकाश परस्परांहून भिन्न आहेत. पहिल्या अंकातील छत्रपती शिवाजी राजांचा दिवाणखाना, अंधारकोठडी, किल्ले रायगड आणि अरण्य हे स्थलविशेष त्यातील अंतर्गत भिन्नतेमुळे वैशिष्टय़पूर्ण ठरतात. दुसरा अंक अरण्य, पुणे दरबार आणि किल्ले रायगड इथे आकाराला येतो. तिसऱ्या अंकातल्या घटना मारुतीचं देऊळ, किल्ले रायगड आणि संभाजीराजांचा दिवाणखाना यात बंदिस्त असल्या तरी संभाजीराजांच्या दिवाणखान्यात घडणाऱ्या घटना आणि शिवाजी राजांच्या दिवाणखान्यात घडलेल्या घटना यातील भेद इतका मोठा आहे की, या भेदालाच एक नाटकीय अर्थ प्राप्त होतो. चौथ्या अंकातील घटना रायगड, पन्हाळगडावर घडतात आणि पाचव्या अंकातील जवळपास सर्वच घटनापट संगमेश्वर आणि तुळापूर इथे आकाराला येतो. नाटकाच्या सुरुवातीलाच संभाजी महाराजांच्या आक्षेपार्ह वर्तनाने व्यथित झालेले छत्रपती शिवाजीराजे आपल्याला दिसतात, तर पाचव्या अंकाच्या अखेरच्या प्रसंगात संभाजीराजांचा वध होताना उठणाऱ्या आरोळय़ांनी रंगावकाश व्यापून गेलेला आपल्याला अनुभवता येतो. या दोन बिंदूंमध्ये संभाजी महाराजांच्या जीवनातली उलथापालथ नाटककार जशी दाखवते, त्याचप्रमाणे राजांनी इतरांच्या आयुष्यात घडवलेली मोडतोड, उलथापालथही अत्यंत तीव्रपणे ती दाखवून देते.

अगदी असाच प्रकार आपल्याला नाटकातील पद्यभागातही दिसून येतो. आजच्या नव्हे, तर अगदी १२६ वर्षांपूर्वीच्या एका वय वर्षे पंधराच्या मुलीकडे पद्यातील इतकी बहुश्रुतता कुठून आली असेल असा प्रश्न पडतो. पाच अंकी नाटकात मंगलाचरणापासून अखेरच्या ईश्वरस्तवनापर्यंत एकूण १२६ रचनांचा समावेश आहे. पहिल्या अंकात श्लोक, साकी, दिंडी, अंजनीगीत यासकट २९ पदे, दुसऱ्या अंकात आठ साकी, एक ओवी, सहा घनाक्षरी, चार अंजनीगीते, तीन श्लोक याशिवाय अठरा पदे म्हणजे ४३ रचना, तिसऱ्या अंकात अकरा रचना, चौथ्या अंकात पुन्हा साकी, दिंडी, अंजनीगीत, श्लोक, लावणी यांच्यासहित ३१ रचना आणि चौथ्या-पाचव्या अंकात मिळून ५१ पद्यरचना आहेत. यात संस्कृत, फार्सी, हिंदूी रचना तर आहेतच, पण प्रौढ, व्यासंगयुक्त मराठी भाषेतील रचनाही विपुल आहेत. हे पाच अंकी नाटक एकूण २५ प्रवेशांमध्ये विभागले गेले असून अंकानुसारी त्यांची विभागणी ४, ७, ४, ४ आणि ६ अशी झाली आहे.

मला या केरकरबाईचं आश्चर्य हे वाटतं की, तिच्या नाटकातल्या पात्रांच्या एंट्री-एक्झिट्सची संख्या आणि रचना पाहिली की, चित्रपटातील शॉट डिव्हिजन तंत्राचीच आठवण येते. तिच्या नाटकात एकाच वेळेला ती समांतरपणे घडणारे, घडत असलेले, भिन्न स्थळी घडणारे तीन-तीन प्रसंग दाखवते. दिवाणखान्यात बसून शिवाजी राजे आपल्या पत्नीशी बोलत असतानाच स्वत:च्या दिवाणखान्यात बसून आपल्या सवंगडय़ांसह शिकारीचे बेत आखणारे संभाजीराजेही आपल्याला दिसत असतात. सोनाबाईच्या काळात फिरता रंगमंच तर नव्हताच, मग तिने एकसमयावच्छेदे घडणाऱ्या प्रसंगांची मांडणी कोणत्या प्रेरणेने केली असेल, असा प्रश्न पडतो. असाच प्रकार तिच्या संवादलेखनाचा आहे. तिच्या संवादात तिचं वय कुठेही न जाणवता त्यात भारदस्त भाषेचं चपखल सातत्य आपल्याला अनुभवायला येतं. या संवादांमधून संस्कृत साहित्य, रामायण-महाभारतातील संदर्भ अतिशय प्रभावीपणे वापरलेले अनुभवायला येतात. सोनाबाई केरकर हिला मराठी रंगभूमीवरची पहिली स्त्री-नाटककार म्हटले जाते, मानलेही जाते. आपल्या पहिल्या स्त्री-नाटककार असलेल्या बाईच्या ठायी एवढी प्रायोगिकता जर होती ( जी तिच्या काळातल्या आणि नंतरच्याही असंख्य पुरुष नाटककारांत लेशमात्र नव्हती ) तर पुढे या प्रायोगिकतेला ग्रहण लागले तरी केव्हा आणि का, हा मोठाच संशोधनाचा विषय ठरतो.

प्रिय वाचक हो, आजच्या या लेखासह तुमच्या निरोपाचा क्षणही समोर अवतरला आहे. गेले वर्षभर अफाट पसरलेल्या महाराष्ट्रातून ‘कस्तुरीगंध’ला जो अत्यंत चकित करणारा, उत्साह वाढवणारा, जाणता असा प्रतिसाद तुम्ही दिलात त्याबद्दल तुम्हा प्रत्येकाचे मनापासून आभार मानतो. या मालेचा भाग झालेली सर्व दुर्मीळ नाटके विविध ठिकाणांहून मला मिळवावी लागली. ती मिळवण्यासाठी पुण्यातील माझ्या स्नेही आणि पर्शियन-उर्दू साहित्यविशारद स्वाती आपटे-गाडगीळ यांची प्रचंड मदत झाली. त्यांचे शतश: आभार! या शोधात मला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे ‘जयकर ग्रंथालय’, (तेथील डॉ. नागेश लोंढे आणि डॉ. अपर्णा राजेंद्र ), मराठी ग्रंथसंग्रहालय, पुणे, महर्षी कर्वे वाचनालय, मुरुड, तालुका दापोली आणि तिथले ग्रंथपाल शैलेश फडके आणि सहायक विनायक बाळ, तसेच रामनारायण रुईया महाविद्यालयातील ग्रंथपाल वीणा ठाकरे, विजया जाधव आणि सीमा यांचे आभार. ठाणे ग्रंथसंग्रहालय यांनी अत्यंत उत्साहाने साह्य केलं. या सर्वाचे आभार मानावे तेवढे कमीच. मित्रांनो, नाटकावर प्रेम करत राहा आणि दुर्मीळ पुस्तके प्राणपणाने जपत राहा इतकीच विनवणी!
vijaytapas@gmail.com
(समाप्त)