श्याम मनोहर
तारीख : तीन.
चार वाजायला आलेत.
एक तारखेपर्यंत पेट्रोल पंपाची वेळ सकाळी दहा ते दुपारी चार. प्रत्येकाला रोज दोन लिटर पेट्रोल मिळणार. रेशनिंग, रस्त्यावरची वाहने कमी झाली पाहिजेत. प्रदूषण कंट्रोल करायचेय. पंतप्रधानांनी जनतेला आवाहन केलेय : प्रदूषण या समस्येला आपण थेट भिडायचेय. नागरिकांना स्वच्छ, शुद्ध हवा मिळायला हवीय. कळ काढा. सर्व चांगले होणाराय.
पेट्रोल पंपावरच्या कामगारांत खल झालाय : पगार पण कापला जाणार?
उत्तर मिळाले नाहीय.
चारला ती रस्त्याला लागली. ती तिचे विचार स्पष्ट करू पाहातेय..
एक तारखेला पगार आईला दिलाय. आईने मला खर्चाला महिन्यासाठी पन्नास रुपये दिलेत. दहा कट् चहा होतील. काल एक कट् चहा, परवा एक तारखेला नाही, पाच खर्च झालेत. रोज चहा.. नाही. हिशोब ठेवून चहा घ्यायचाय. मरू दे हिशोब. आज शेवटचा झाड हॉटेलात कट् प्यायचा. पुन्हा झाड हॉटेलात येणं होईल, न होईल. पेट्रोल पंप बंद. नोकरी बंद. पक्के. पेट्रोल पंपाची नोकरी.. बाय् .. बाय् कसलं? पेट्रोल पंपाच्या नोकरी बाय् हा छान शब्द नाही वापरायचा. मरू दे हिशोब. नोकरी सोडली. तीन दिवसांचा पगार बुडणार. मरू दे हिशोब. बुडू दे. डोकं बुडू द्यायचं नाही. कृष्णाप्रमाणे पानावर तरंगायचं. तिला हसू आलं.
ती झाड हॉटेलपाशी पोचली.
आठवडाभरात.. एखाद्या वेळेस उद्यासुद्धा दुसरी नोकरी मिळेल. फाल्तू नोकऱ्या लाखो, कोटी, अनंत आहेत. मरू दे हिशोब.
तिला झाड हॉटेल हा स्पॉट खूप आवडतो. मोठं झाड. वृक्ष. खोड कवेत मावणार नाही. झाडाचा वरचा पसारा मोठाच्या मोठा. मोठा डोम. झाडाखाली छोटं टेबल, शेगडी चहा-साखर डबे. दूध. एका फांदीवर पाटी : इंजिनीअरचे झाड हॉटेल. या, आपले स्वागत आहे. चहा प्या, तरतरीत व्हा.
असं माझं हॉटेल असायला हवं. न मिळू दे पैसा. स्पॉट तरी मिळेल.. छान जाईल आयुष्य.
मरू दे हिशोब.
गेले तीनेक महिने खूप एन्जॉय केलेय मधून मधून.. हा स्पॉट.. चहा..
मालकाने तिला कट् चहा दिला. तिने पाचचं नाणं मालकापुढे केलं. मालक म्हणाला, ‘‘राहू दे. आज तू माझी गेस्ट.’’
‘‘हॉटेलचं दिवाळं काढायचंय का?’’
‘‘ले माझं मी बघेन. दिवाळय़ाला मी सवयीचं करतोय. ठेव पैसे पर्समध्ये. उद्यापास्नं घीन.. दिवाळं थांबविन.’’
झाड हॉटेलात बसायची टेबलं, बाक नव्हतं. उभ्यानं चहा प्यायचा. निघून जायचं. गर्दी नाही. शेजारचं दुकान बंद असतं. गिऱ्हाईकं बंद दुकानाच्या पायरीवर बसून चहा प्यायची. पायरीवर तीन गिऱ्हाईकं चहा पीत होती : ती गेली. तिला जागा झाली. पंपाशी उभं राहून पाय कंटाळलेत. तरी ती थोडं लांब होऊन संध्याकाळ, स्पॉट बघत, एन्जॉय करत उभ्याने सावकाश घुटके घेत राली. पुन्हा येणे होईल, न होईल. मधनं मधनं एक, कधी दोन एकत्र.. गिऱ्हाईकं येत, चहा पिऊन जात होती. काही वेळ गिऱ्हाईक नाहीच. हे तिला आवडलं.
तिनं खाली कप वेस्ट बास्केटमध्ये टाकला, मालकाकडे गेली, म्हणाली, ‘‘थँक्स.’’ ‘‘वेलकम्’’ ‘‘एक विचारू?’’
‘‘हं’’
‘‘तू इंजिनीअर.. म्हणजे डिप्लोमा का डिग्री?’’
‘‘बीई’’
‘‘मग बोर्डावर बीई लिही की.’’
‘‘हां, उद्याच दुरुस्ती करतो.’’
‘‘तुझा हा स्पॉट मला आवडतो. तुझा चहा आवडतो.’’
‘‘थँक्स.. तू काय करतीस? तुला सांगायचं नसलं तर नको सांगूस’’
‘‘तू बीई, झाड हॉटेलवाला. मी बीए मानववंशशास्त्र.. मी पेट्रोल पंपावर नोकरी.. गाडय़ात पेट्रोल भरणं.. आज आत्ताच नोकरी सोडलीय’’.. तू कश्यात बीई?’’
‘‘इलेक्ट्रॉनिक्स..’’
दोन गिऱ्हाईकं आली. कट् चहा घेऊन दूर उभी राली.
‘‘इलेक्ट्रॉनिक्स.. महत्त्वाचा विषय.. त्यातली नोकरी.. का नाही.. झाड हॉटेलचं कसं सुचलं, स्पॉट कसा मिळाला.. मनात येतंय, विचारायचं.. बेकारांच्या जगण्याची काय चौकशी करायचीय? बायोडेटा निरर्थक.. चोंबडचौकशांचा वीट आलाय. मला पण तसलं विचारू नकोस’’
‘‘आतनं हिंस्र वाटतं, असहाय वाटतं.’’
‘‘जगण्याला आकार नाही, देता येत नाहीय. हजारो किरकोळ नोकऱ्या आहेत. नियम नाहीत. पेट्रोल पंप निम्म्या दिवस चालू.. पगारात कपात. सोडलं काम. बेकार बेकार..’’
‘‘पेट्रोल नाही. मध्यमवर्गाची बोंब.. श्रीमंतांना मिळणार हवं तेव्हढं पेट्रोल.’’
‘‘मध्यम वर्ग, श्रीमंत वर्ग.. असलं सुचवायची वेळ आलीय.’’
‘‘ट्र. मध्यम वर्ग न् श्रीमंत वर्ग.. आपला काय संबंध? माझी गिऱ्हाईकं गरीबच.’’
गिऱ्हाईक आले. कट् चहा घेऊन दूर उभे राले.
‘‘माझं हॉटेल म्हणजे कट्कट् हॉटेल.’’
‘‘एक बॅड ज्योक.. ज्योकच.. सांगत्ये किंवा फिलासॉफिकल मुद्दा..’’
‘‘हं.’’
‘‘बेआकार तारुण्यात प्रेमात पडायचा काय रोल असतो?’’
‘‘मला घरचं मोठं कर्ज फेडायचंय लग्न.. लांब.. नाहीच. मन तकलुपी झालंय. प्रेमरोग.. नाहीच.. तुझं! प्रेमात पडली असलीस, तर मागे हटू नकोस.. नोकरी नाही म्हणून.. धीर धर.’’
‘‘मन तकलुपी : छानय शब्द.. धड धीट नाही, धड भित्रा नाही, धड आशा नाही, धड निराशा नाही, धड शक्ती नाही, धड अशक्त नाही.. मी प्रेमात होते असं नाही, उंबरठय़ावर होते.. तो.. ही नोकरी कर, सोड ती कर.. सोड नाहीतर काढून टाकलं.. मी तशीच.. कट् चहा पीत.. तिसरंच.. कुणाचं तरी काहीतरी बोलायचं.. आय लव्ह यूपण नाही सुचत. गेल्या आठवडय़ात प्रेम मोडून टाकलं.. बेकारांनी बेकारपण एकटय़ांनी जगावं.. बेकारांनी एकमेकांशी बोलावं.. चालावं.. प्रेमाचा आवपण आणू नै.’’
‘‘घाण आहेय सगळं.’’
‘‘हजारो बेकार आहेत.’’ ती विचित्र हसत म्हणाली, ‘‘कुणी बेकार विरक्त होऊन संत कसा काय होत नाहीय?’’
‘‘तू एकदम वेगळंच बोललीस.. वेगळंच.. तू वेगळीच आहेस.. आय अॅम ग्लॅड टू मीट यू.’’
‘‘तुझ्या संगतीत सुचलं.. आय अॅम ग्लॅड टू मीट यू.. एंड.. निघते.’’
‘‘उद्या ये.. अशीच.. याच वेळी.’’
‘‘बिल घ्यायचंस.’’
‘‘लिहून ठेवीन. नोकरी लागल्यावर द्यायचं.’’
‘‘चलत्ये.’’
‘‘थांब.’’
‘‘हं.’’
‘‘तुझा फोन नंबर दे.’’
‘‘कश्याला? उद्या मी येणार आहेच की! नोकरी लागेपर्यंत रोज येणाराय.’’
‘‘रोज ये.. दुपारी साडेबारानंतर गिऱ्हाईक नसतं. निवांत बोलता येईल.’’
‘‘प्रेमात नाही पडायचं.’’
‘‘अजिबात नाही. बिनप्रेमात मजा!’’
‘‘बिनप्रेमात मजा. हे मला आवडलं.’’
‘‘फोन नंबर दे.. फोन नंबर घ्यायचा, पण फोन करायचा नाही.. ओके? ’’
‘‘हेही मला आवडलं. फोन नंबर घ्यायचा आणि फोन करायचा नाही.’’
दोघांनी मोबाइल नंबर नोंदवले.
तो म्हणाला, ‘‘तुला चांगल्या नोकरीसाठी बेस्ट ऑफ लक.’’
‘‘मला चांगली नोकरी नकोच. बाय.’’
‘‘बाय.’’
‘‘लगेच चहा नको. आधी ऐक- बहुतेक सात संत होते. मी मोजले नाहीत. कुठे वगैरे कळत नव्हतं. साती संतांचे मोठे चेहरे भस्म, लाल टिळे, हातात उभारलेले त्रिशूळ, भाविकांची खूप गर्दी. मी मुख्य संताच्या चरणावर डोकं ठेवलं. मुख्य संत म्हणाले, ‘सनातन धर्म हाच सर्व श्रेष्ठ धर्म. हिंदू राष्ट्र निर्माण करायचंय. प्रत्येक हिंदूने हाती शस्त्र घ्यावं. विरोध करणाऱ्याचा वध करावा. समर्थ हिंदू राष्ट्र विश्वगुरू आहोत आपण.’ मी माझं डोकं उचललं, कुठं बघत होते कुणास ठाऊक. मी म्हणाले, ‘अहंकाराचा, मीपणाचा पूर्ण लय झाल्याशिवाय कुणी संत होत नाही.’ मुख्य संतानी त्रिशुळाने मला भोसकले. मी मरून पडले.
ती झाड हॉटेलवर आली तेव्हा त्याने हातातलं घडय़ाळ पालं होतं. अगदी वेळेवर ती आली तेव्हा त्याचा चेहरा प्रफुल्लित झाला होता.
‘‘स्वप्न.. विचित्र, भयंकर.’’ तो चाचरत म्हणाला.
त्याने दोन युज न् थ्रो कप चहाने फुल भरले. एक तिला दिला, दुसरा स्वत:ला. त्याने भर्रकन् दोन घोट घेतले. आवाज जमेल तेवढा नॉर्मल करायचा प्रयत्न करत तो म्हणाला, ‘‘टीव्हीवर सनातन धर्माचं न् संतांचं बऱ्याचदा असतं.. एका अश्याच संतानं दुसऱ्या संतावर त्याचा दंड उगारला, असं होतं. आठवतंय मला ते काही खरे संत नाहीतच. अहंकार, मीपणा यांचा पूर्ण लय झाल्याशिवाय कुणी संत होत नाहीत हे खरंय. संतांनी तुला भोसकले, तू मेलीस.. मी दरीत पडतोय, असं स्वप्न मला वरचेवर पडतं, तेवढय़ापुरतं घाबरायला होतं, तू घाबरली असशील झोपमोड होते, लवकर झोप लागत नाही विसरायची असली स्वप्ने. मी दरीत पडल्याचे. मला सवयीचं झाले. आधी मी स्वप्नाचा अर्थ लावायचा प्रयत्न केला.. माझे जगणे.. माझी ट्रेजेडी होणार.. वाटायचे.. मला असुरक्षितपणा आहे, ते दरीत पडण्याचं स्वप्नात येतेय.. स्वप्नाचा फार अर्थ लावत बसण्यात अर्थ नाही. ते फ्राईड वगैरे नको आपल्याला. कामात राहायचं.. स्वप्न काय पडायचेय ते पडू दे. सकाळी विसरायचे.. कामात राहायचे.. नोकरी शोध फर्गेट.’’
‘‘मला स्वप्न दुरुस्त करायचेय.’’ ती म्हणाली.
तो किंचित हसला. म्हणाला, ‘‘स्वप्न दुरुस्त? दुरुस्त? यंत्रं दुरुस्त करता येतात. यंत्र काँक्रीट असतात. काँक्रीट असतं, ते दुरुस्त करता येतं. स्वप्नं अॅबस्ट्रॅक. अॅबस्ट्रॅक काय दुरुस्त करणार?’’
‘‘अॅबस्ट्रॅक पेंटिंग असते. फायनल अॅबस्ट्रॅक पेंटिंग व्हायच्या आधी चित्रकार अॅबस्ट्रॅक दुरुस्त करतो. अनेक स्केचेस काढतो.’’
‘‘मी फ्राईड बोललो, तू अॅबस्ट्रॅक पेंटिंगचे बोललीस.. आपल्याला काही ना काही नॉलेज आहे न् तरी आपण बेकार.’’
‘‘मला स्वप्न दुरुस्त करायचेय.’’
‘‘कुणाचा खून झाला की खून झालेल्यांचे आई-बाप, नातेवाईक म्हणतात, ‘खुन्याला पकडा, त्याला फाशी द्या. न्याय पाहिजे.’ बलात्कर बलात्कारिक स्त्रीचे नातेवाईक म्हणतात.. ‘बलात्काऱ्याला पकडा, त्याला फाशी द्या. स्त्रीला न्याय मिळाला पाहिजे.’ तुला भोसकले, तू मेलीस त्या संताला पकडायचं, कोर्टात खेचायचं, फाशी.. तुला न्याय पाहिजे अशी दुरुस्ती?
‘‘संताला अटक होणारच नाही. अटक झाली तरी केस उभी राहणार नाही. केस उभी राली तरी साक्षीदारच नाहीत. संत निर्दोष. केस सिद्धच होणार नाही.’’
‘‘तू वास्तवातलं कश्याला बोलतेयस?’’
‘‘मला स्वप्न दुरुस्त करायचेय.’’
‘‘नक्की काय हवंय? आणिक तू एव्हढी स्वप्नाच्या मागे का लागलीयस? आणिक स्वप्न काय पुन्हा पडणाराय? पडलं म्हणा.. मला दरीचं पडतं.. त्यात एनर्जी वेस्ट घालवायची नाही. विसरायचं. काम शोध. माझ्या झाड हॉटेलचं काही खरं नाहीय. नाही तर मी तुला माझ्या हॉटेलात भागीदारी दिली असती. पुन्हा चहा घ्यायचा?’’
‘‘नको निघते मी.’’
‘‘विसरून जा. काम शोध उद्या.’’
ती रस्त्याला लागली.
नोकरी शोधायचीय. मानववंशशास्त्र मी कशासाठी घेतलं? आवडलं म्हणून. कसलं आवडलं न् फावडलं! अर्थशास्त्र घ्यायला हवं होतं. बँकेत नोकरी मिळाली असती. तसं काही नाही. एकीला बीएसस्सी केमिस्ट्री तरी बँकेत लागली. को-ऑपरेटिव्ह बँकेत. को-ऑपरेटिव्ह तर को-ऑपरेटिव्ह. परवा पेपरात आलं होतं. पोलीस भरती होती. दोन जणं बीएएमएस होते दोन जणं एमए होते. मराठी, इंग्रजी. बीएस्सी अॅग्रीकल्चरही होते. बीएला कुठला विषय.. महत्त्वाचे नसते. शिका, मोठे व्हा असे नसते. स्वयंरोजगार. झाड हॉटेल. भाजी विकायची. रिक्षा.
तीही शहराच्या मुख्य रस्त्याने चालत होती. डेंटिस्ट नको, बाटा नको, फर्निचर नको, सेल्सगर्ल नको. कोणती नोकरी? तीन नोकऱ्या झाल्यात. आता चौथी कसलीही नोकरी करायला हरकत नाही. सोडायची आहेच नंतर. मी वडलांवर गेलेय. वडील एक धड नोकरी करत नाहीत. धर न् सोड. तीस-चाळीस नोकऱ्या झाल्या असतील. आत्ता माशाच्या दुकानात नोकरी करतात. घरी रोज माशांचं कालवण.. पौष्टिक.. वडील शांत आहेत. कधी चिडचिड नाही, संताप नाही. खायला द्याल ते खातात. शांत झोपतात. दारू नाही, तंबाखू नाही. आईच्या जिवावर संसार. ती दहा ठिकाणी सैपाकाची कामे करते. तिचा सैपाक त्यांना आवडतो. तिला ते सोडत नाहीत. आईला तिचा नवरा आवडतो. आणखी काय पाहिजे संसारात?.. मी.. मी ग्रॅज्युएट.. आई ग्रॅज्युएट शब्द वापरते. आईला ग्रॅज्युएट शब्द म्हणताना खूप आनंद होतो. मी एकुलती हुशार. आईने हौसेने मला शिकू दिले. लाड केले. तिला वाटते, मला मोठी नोकरी मिळेल. बेकरी नको. चष्म्याचे दुकान नको. स्त्रियांचे अंडरवेअर्स नको.. वडलांना वाटतं, मला आज ना उद्या मिळेल मोठी परमनंट नोकरी. आईला वाटतं, लग्नाचा विचार केला पाहिजे. आईला काळजी वाटते. वडील शांत. नातेवाईक म्हणतात, वडील संत आहेत. नॉन्सेंस. मला वडील आवडायचे. आत्ता राग येतोय. मला स्वप्न दुरुस्त करायचंय. मोठी नोकरी मिळेपर्यंत बारक्या नोकऱ्या करायच्या. बारक्या नोकऱ्या सोडायच्या. मला स्वप्न दुरुस्त करायचंय. टीव्हीचं दुकान नको. गारमेंटचा सेल : पन्नास टक्के सूट. जुना माल संपवायचाय. शर्ट.. दोन घेतल्यास तिसरा फ्री. नको उत्तम स्थळं. परदेशीही.. पर्यटन.. पर्यटनात नोकरी.. हरकत नाही.. पेट्रोल पंपावरची तशी चांगलीय नोकरी. तिथंच जावं.. मॅनेजर ओरडणार.. न सांगता दोन दिवस गैरहजर.. असं चालणार नाही.. दोन दिवसांचा पगार कापणार. लाग कामाला.. जा.. छोटंसं चहाचं दुकान. कट् चहा नव्हता. तिने फुल चहा घेतला. संध्याकाळचा सैपाक मी करायचाय. खूप अवकाश आहे. ती प्लास्टिकच्या खुर्चीत बसली. सावकाशपणे चहाचे दोन घोट घेतले. एकटा संत सापडला पाहिजे.
एकटय़ा संताने तिला ध्यान शिकवलं. बसायचं कसं, डोळे मिटायचे. खोल पोटातून ओम काढायचे तिने केले. संत म्हणाला, ‘‘छान जमतेय तुला. रोज करायचे. वेगळीच ऊर्जा शरीरात, मनात निर्माण होते. सामर्थ्यांचा अनुभव येतो. सनातन धर्म सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आपण सगळय़ांनी समर्थ व्हायचं. हिंदू राष्ट्र निर्माण करायचं. जगात सर्व क्षेत्रांत आपण अव्वल विश्वगुरू व्हायचं.’’
ती म्हणाली, ‘‘अहंकाराचा, मीपणाचा पूर्ण लय झाल्याशिवाय कुणी संत होत नाही.’’ संताने तिला त्रिशुळाने भोसकलं. ती मेली.
तिने चहाचा शेवटचा मोठा घोट घेऊन चहा संपवला. युज झालेला कप तिने वेस्ट बास्केटमध्ये थ्रो केला. तिच्या मोबाइलची रिंग. आन्सर दाबले.‘‘हे बघ डार्लिग, तू आपलं प्रेम मोडायचं म्हणतेस. आपलं प्रेम पोलादाप्रमाणे कणखर आहे.’’ तिने मोबाइल बंद केला. पुन्हा रिंग. रिजेक्ट. पुन्हा रिंग. रिजेक्ट. मेसेजची रिंग वाजली. तिने मेसेज उघडला नाही. रस्त्याला लागली. फिजिओथेरपी नको. सेंट.. चालेल.. घाण्याचे तेल.. चालेल.. आम्हाला संत व्हायचं नाहीय. आम्हाला जगायच्या सोयी हव्यात. थोडी थोडी तरी सुखं हवीत. कधी ना कधी चैन हवी. आम्हाला संत हवाय. संत कोण? ते आम्हाला नीट माहीत आहेच. आम्हाला अस्सल कलावंत, अस्सल शास्त्रज्ञ, अस्सल तत्त्वज्ञ हवेत. शास्त्रे, कला, तत्त्वज्ञाने, अध्यात्म याची मुळे, तत्त्वे आम्हाला माहीत व्हायला हवीत. त्यासाठी पुस्तकं हवीत. आकर्षक वाचनालयं हवीत. वाचनाला वेळ भेटेल अशा नोकऱ्या हव्यात. कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या चालतील. नियम असलेल्या नोकऱ्या हव्यात.
रात्री आठ वाजता तिचं प्रेत पोलिसांना सापडलं.
आई ओक्साबोक्सी रडत छातीवर मारून घेत म्हणत होती, ‘‘माझ्या मुलीचा घात झालाय. खुन्याला शोधा, पकडा. फाशी द्या. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे.’’
तिचे वडील आईला सांभाळत होते.
ती कशी वारली? यमाला माहीत नाही की लेखकाला माहीत नाही.
पोलीस म्हणत होते : मृत्यूचा आम्ही पूर्ण छडा लावू.
एके दिवशी :
संतांनी पत्रक काढले. राजांनी राज्य केले. लोकशाहीत राजकारणी राज्य करतात. इतके दिवस, इतका काळ राजांनी, राजकारण्यांनी आम्हा संतांना वापरले. आता इतिहास बदलायचाय. यापुढे जगभर संतच राज्य करतील.
पत्रक म्हणजे मोठे पुस्तक होते. सदुसष्ट कोटी संतांच्या स्वाक्षऱ्या होत्या.
‘‘अहंकार, मीपणा याचा पूर्ण लय झाल्याशिवाय कुणी संत होत नाही,’’ ती म्हणाली.
संत जल्लोष करत होते. संतांचे तिच्याकडे लक्ष नव्हते. स्वप्नात तिला कळत होते, ती पूर्ण वाचलीय. तिची झोपमोड झाली नाही.
संतांच्यात एकशे सोळा गट पडले. ऐंशी कोटी राजकारणी एकशे सोळा गटात चिकटले. सदतीस कोटी राजकारणी तटस्थ राह्यले.
संतांचे एकशे सोळा गट एकमेकांच्या चुका काढत होते, दोष दाखवत होते, एकमेकांवर कर्कश आरोप करत होते. त्रिशूळ नाचवत होते. राजकारणी बेफाम झाले होते. प्रत्येक नागरिक दुभंगला होता.
काहीही होऊ शकते?
सेव्हन पॉइंट थ्रीचे भूकंप होतात. महावादळे घोंगावतात. महापूर येतात. डोंगर खचतात. बर्फाचे थर वितळतात. अशुद्ध हवा.
वासना भडकतात. हिंस्रपणा उभाळतो. विकार अक्राळ होतात. वाहनांना आगी लागतात.
भाषा नसते.
तिय्यम दर्जाचे कलावंत, तिय्यम दर्जाचे शास्त्रज्ञ, तिय्यम दर्जाचे तत्त्वज्ञ माजवतात.
जेव्हढी बुद्धी असेल तेवढी सरळ आणि जागी ठेवायची. अस्सल कलावंत, अस्सल शास्त्रज्ञ, अस्सल संत, कलांची, शास्त्रांची, तत्त्वज्ञानांची संतत्वाची मूळ तत्त्वे : यांची इच्छा सतत जिवंत ठेवायची.
ती स्वत:ला म्हणाली, ‘मी माझं स्वप्न दुरुस्त केलेय.’
तिची झोपमोड झाली नाही.
lokrang@expressindia.com