scorecardresearch

आदले । आत्ताचे: गावांच्या उद्ध्वस्तीकरणाची गोष्ट…

तरल काव्यासाठी ओळखले जाणारे आणि मातीचा गंध गीतांतून देणारे ना.धों.महानोर यांनी वेगळय़ा बाजाचे गद्यलेखनही केले.

आदले । आत्ताचे: गावांच्या उद्ध्वस्तीकरणाची गोष्ट…

बालाजी सुतार

तरल काव्यासाठी ओळखले जाणारे आणि मातीचा गंध गीतांतून देणारे ना.धों.महानोर यांनी वेगळय़ा बाजाचे गद्यलेखनही केले. ‘गांधारी’ या एका गावाच्या निमित्ताने स्वातंत्र्योत्तर खानदेश-मराठवाडय़ातल्या सगळय़ाच गावांचं अस्वस्थ करणारं चित्र उभारणारी त्यांची अलक्षित कादंबरी. निझामीतून बाहेर पडताना ज्या गांधारीत आसपासची दहा गावं जगवण्याची कुवत होती, त्या गावासह अनेक गावांच्या उद्ध्वस्तीकरणाची ही गोष्ट आहे..
गोष्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसमधून कुठून तरी सुरू होते. भारत स्वतंत्र होऊन काही महिने झाले आहेत असं आपण म्हणू शकतो, पण हे स्वातंत्र्य सगळय़ा भारताच्या पदरात आलेलं नाहीय अजून. उदाहरणार्थ, हैदराबादची निझामी अजून संपलेली नाही. दिवा विझण्याआधी भडकतो, तसलं काहीतरी चालू आहे अजून निझामीमध्ये.

लोक भेदरलेले आहेत गावोगावचे. कुठून कधी रझाकारी टोळय़ा येतील आणि गाव घरदार लुटून घेतील, बाप्यांना जिवे मारतील, बायांना बाटवतील याचा अजिबात नेम नाही. लोक धास्तावून राना-शेतातसुद्धा जाईनासे झाले आहेत. घरदार-पैसाअडका लुटला जात असेल, तरी एकापरीने कुणी सहन करील. पण तरण्याबांड बायांना उचलून नेतात. त्यांची अब्रू लुटतात. कुठल्याशा जुम्मा मशिदीसमोर कितीतरी लोकांना छळ करून खलास करतात. अहमद घाउस नावाचा कुणी ठाणेदार आहे अजिंठय़ाला, त्याने तिथे पळवून आणलेल्या बायकांचा जनानखानाच उघडलेला आहे. असलं काही काही कानांवर येत असेल तर माणसांनी धास्तावून जाऊ नये, तर काय व्हावं?

अजिंठय़ाच्या डोंगरातलं दोन अडीच हजार वस्तीचं एक चिमूटभर गाव आहे. म्हणजे फारतर शेचारशे घरांचं. पुरातन वहिवाटीप्रमाणे शेती कसून उदरनिर्वाह करणारं. गाव लहान असलं तरी गावाचं शिवार मोठं आणि कसदार आहे बरंच. सामान्यपणे खाऊनपिऊन सुखी म्हणता येईल, असं हे गाव आता घाबरून गेलेलं आहे. लोक रात्रभर गस्त घालून एकमेकांना ‘आलबे ऽऽऽल.’, ‘चारी कोपरे बराबर है.’ असे कुकारे देत रात्री ढकलतायत.
आणि एका भेसूर सकाळी गावाबाहेरच्या टेकाडावर रझाकार चमकू लागतात. सगळं गाव जिवाच्या आकांतानं पळत सुटतं. पुरुषमाणसं कशीही पळतील, लहान्या पोरांनी, गर्भार बायांनी कसं करायचं? बायांचे प्राण कंठाशी आलेले आहेत.

जयसिंह पहेलवान जरासा नशेतच रझाकारांना सापडला. डोळे तांबडेभडक होऊन नशेने ल्हास झालेल्या जयसिंहाने थेट निझाम सरकारची आयमाय काढून रझाकारांना आव्हान दिलं, तेव्हा चारसहा रझाकारांनी त्याला पक्कं धरलं. जंबिया उपसून खसकन त्याच्या मांडय़ांच्या मध्ये खुपसला. जयसिंहाच्या आरोळीसह तिथे रक्ताचे पाट उसळले. रझाकारांनी मग त्याचे दोन्ही हात छाटले. पाय छाटले. छातीवर गोळय़ा झाडल्या आणि हातापायाचे, शरीराचे रक्तमाखले तुकडे इतस्तत: भिरकावले.गावातला एक हजरत आणि नाकेदार या दोघांनी त्यांना गावभरातली नेमकी घरं दाखवली, ती साफ लुटून सोनंनाणं बैलगाडीत भरून घोडय़ांच्या टापा टपटपवाट रझाकार निघून गेले, तेव्हा सबंध गाव ओस पडलेला होता.

गोष्ट ‘गांधारी’ नावाच्या गावाची आहे. अजिंठय़ाच्या डोंगरातलं एक निव्वळ नखभर गाव. वर वर्णन केलं त्या प्रसंगानं ‘गांधारी’ या कादंबरीची सुरुवात होते. ‘गांधारी’ या एका गावाच्या निमित्ताने ना. धों. महानोरांची ही कादंबरी स्वातंत्र्योत्तर खानदेश-मराठवाडय़ातल्या सगळय़ाच गावांचं एक खूप अस्वस्थ करणारं चित्र रेखाटत पुढे पुढे सरकत जाते. तरल काव्यासाठी ओळखले जाणारे आणि मातीचा गंध गीतांतून देणारे महानोर यांनी वेगळय़ा बाजाचे गद्यलेखनही केले. ही कादंबरी त्यातलीच.

भारत सरकारच्या कारवाईनंतर निझामी संपली. सबंध हैदराबादची राजवटच संपली. आणि मग रझाकारांच्या त्या दंग्यातून गाव सोडून परागंदा झालेली माणसं हळूहळू चारदोन महिन्यांत परत गावात माघारी आली. आपली उद्ध्वस्तलेली घरं-शेत-शिवार पुन्हा वसवण्याच्या नादी लागली. देवळाच्या पारावर बसून एकमेकांना धीर देत ती एकमेकांना सांगायला लागली की,‘आता दगड मारता भीती न्हाई. जाळय़ातून पार मोकळे झालो आता. सवतंत्र झालो. आता पिकाला धनधान्याला करोडगिरीनाकं, आडवणूक, पैसा कापणं काही न्हाई. निजाम सरकारचा झेंडा उतरला. आता मुसलमानांचा धाक दडपशा न्हाई की कोन्ती भीती न्हाई. आता आपण सवता राजे. आता कोण डरतो? घ्या देवाचं नाव आन् लागा शेतीबाडीला..’

स्वातंत्र्याच्या गोड फळांची कल्पना करत लोक मन:पूर्वक शेतीवाडीला लागले आणि कथेतल्या या गावात ‘जगदेव’चा प्रवेश झाला.जगदेव हा खास पुढारी माणूस. निझामी असतानाही आपण हेच काम करायचो. आपली भल्याभल्यांशी ऊठबस आहे, असं तो सांगतो. गांधारी हे काही त्याचं मूळ गाव नाही, त्याची भाची गांधारीत राहते. तिची शेतीवाडी सांभाळायला जगदेव इथे आला. त्याची भाषासुद्धा निझामीतलीच आहे. तो निझामी हिंदूीत बोलतो. लोकांचे जमिनीचे वगैरे तंटे आपण सरकारदरबारी असलेलं आपलं वजन वापरून सोडवून घेऊ, असं सांगत दलाली गोळा करायला लागतो. ‘घाटापर हमने एक नही, दो नही, हजारो भानगडे किये है.’ असं स्वत:चं ‘क्वालिफिकेशन’ तो लोकांच्या मनीमानसी बिंबवत राहतो आणि फारच थोडय़ा अवधीत गावात स्वत:चा जम बसवून थेट गावाचा सरपंचच होऊन बसतो.

बिनदिक्कत वाट्टेल ते खोटं बोलणं, स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणं, आडमुठेपण, अडेलतट्टूपण, काही करून स्वत:चे खिसे भरण्यासाठी कसलाही विधिनिषेध न बाळगणं, ही खास स्वातंत्र्योत्तर भारतीय पुढाऱ्यांमध्ये विकसित झालेली व्यवच्छेदक लक्षणं जगदेवमध्ये अतिशय जन्मसिद्ध अंगभूतपणेच मुबलक प्रमाणावर आहेत. त्या अर्थाने जगदेव केवळ गांधारी या एका गावातला पुढारी उरत नाही. सबंध भारतामधल्या कुठल्याही गावातला तो सरपंच असू शकतो.फलाण्याची जमीन बिस्ताण्याला मिळवून देण्याचं आश्वासन देत, बिस्ताण्याच्या शेतात फलाण्याची औतं घुसवत, कुणाला कर्ज काढून द्यायचं कबूल करत, कुणाला काढलेलं कर्ज माफ करून द्यायचं कबूल करून जगदेव सगळं गाव स्वत:च्या कच्छपी लावून घेतो.

लोकांचं भलं करणं वगैरे गोष्टींना जगदेवच्या डोक्यात थारा नाही. त्याच्या साथीदारांत, त्यांच्या कारभारात पैशांचं, फायलींचं, सवलतीचं खूळ. जो कारभार हाती घेतला तो कागदोपत्री तरी साळसूद चांगला कसा दाखविता येईल, याच्यात अक्कलहुशारी लढविणे. शाळा करायची शाळेच्या बजेटच्या आत. गावची विहीर करायची पाचशे रुपयांत. कामगारांच्या सह्य घ्यायच्या हजार रुपयांवर. नाहीतर काम मिळत नाही. मजुरांना मजुरी कमी-जास्त पैशांवर का होईना केल्याशिवाय गती नाही. रस्त्यांच्या विकासाची कामं आपण सरपंच म्हणून आपल्या साथीदाराच्या नावावर गुत्ता घ्यावा. व्यवस्थित काटकसर करून बचत करावी. सगळी कामं नंतर अपुरी राहिली तरी खेदखंत नाही. ‘रिकव्हरी आली’ तरी वरचे पुढारी साखळीत घेऊन तेवढा दट्टया निभावून घेणं. अधिकारी जास्त गडबड करायला लागला तर खाणं पिणं, पान-फूल अगदी व्यवस्थित करून घ्यावं. सगळं निभतं.‘राजकारण’ नावाचं अस्सल देशी तत्त्वज्ञान! जगदेव या तत्त्वज्ञानाचा अतिशय बेशरम अर्क आहे. जगदेवला बधले नाहीत असे दोनचारच लोक आहेत गावात. एक, राघो पाटलाचा भागवत. दुसरा, भागवतचा दोस्त लालजी.

भागवत रीतसर शेतकी शाळेतून शेतीचं आधुनिक शिक्षण घेऊन आलेला आहे. आणि शेतीकडून दणकट असा लालजी सडाफटिंग आहे. भागवतची आणि लालजीची अतिशय दोस्ती आहे. यांच्या दोस्तीतूनच सहसा छोटय़ा गावात संभवणार नाही अशी लालजीची एक तरल प्रेमकथा घडते. तबला वाजवण्यात अतोनात उस्ताद असलेल्या लालजीने एका जलश्यातल्या नर्तकीसोबत प्रेमलग्न केलेलं आहे. हे लग्न करताना आणि केल्यावरही आपल्या सग्यासोयऱ्यांना आणि गावातल्याही सगळय़ा लोकांना अजिबात न जुमानण्याची हिंमत लालजीमध्ये आहे. स्वत:ची बायको, आणि रान या दोन गोष्टींशिवाय त्याच्या आयुष्यात फक्त भागवत आहे.

भागवत आणि भागवतमुळे लालजीही आपल्याला कवडीइतकीही किंमत देत नाही हे जगदेवला माहीत आहे. त्यामुळे जगदेव सदैव या दोघांवर डूख धरून वागायला लागतो. भागवतच्या शेतात काम करणारी जयवंता नावाची एक तरुण परित्यक्ता आहे. जयवंताच्या वैवाहिक आयुष्याची गोष्ट फारच दाहक आहे. ‘पुरुष नसलेला’ तिचा नवरा तिला सोडून पळून गेलेला आहे. आणि ती आपल्या म्हाताऱ्या आईकडे परत आलेली आहे. तिचं दुसरं लग्न लावून देणं तिच्या आईच्या खानदानीपणाच्या कल्पनेत बसणारं नाहीय. ऐन तारुण्यात असलेली जयवंता शरीरधर्म भागवण्यासाठी केळीच्या दाट बागेत जाऊन आत्मसुख घेत राहते. पुढे पुढे सगळय़ाच गोष्टी अस होऊन जयवंता विहीर जवळ करून मोकळी होते. तिच्या आणि भागवतच्या संदर्भाने गावात अफवा उडवून देणं, वगैरे प्रकार जगदेवच्या कंपूकडून होत राहतात.

गावात बाहेरून कुठूनसा आलेला एक आध्यात्मिक ‘महाराज’ आहे. या महाराजांना भागवत अतिशय मानतो. गावातल्या कटकटीतून किंवा स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यातल्या उलघालीतून जेव्हा जेव्हा नैराश्य येऊ लागतं, तेव्हा भागवतसारखा मुळातच शहाणा माणूससुद्धा महाराजांचा सल्ला घेत असतो. हौसा नावाची आणखी एक बाई गावात आहे. तीही एकटी आहे आणि बेबंद तारुण्याने मुसमुसलेली असली तरी ती स्वैर नाही. दर्शनासाठी आलेल्या हौसाला पाहून मोहाच्या एका निसरडय़ा क्षणी महाराजांचा तोल जातो आणि अक्षरश: हौसासमोर गयावया करून महाराज स्वत:च्या वासनेचं शमन करून घेतात. हौसा स्वत:ला महाराजाच्या स्वाधीन करून टाकते. त्या प्रसंगातून तिच्या पोटात बाळ रुजतं. त्या सगळय़ाच गुंतागुंतीतून तिच्या हातून एका गडय़ाचा खून होतो. त्याही प्रकरणात भागवतला गुंतवण्याचा प्रयत्न जगदेवकडून होतो.

आधुनिक प्रयोगशील शेती करण्याच्या भागवतच्या उमेदीला नख लावण्याचे प्रयत्न सातत्याने घडत राहतात. त्याने कृषी प्रदर्शनासाठीचे जोपलेले केळीचे, हायब्रीडचे प्लॉट कापून उद्ध्वस्त केले जातात. याच्याशी समांतर अशा खूप गोष्टी या कादंबरीत घडत राहतात.शासनाने ‘कल्याणकारी’ म्हणून जाहीर केलेल्या योजनामधली छिद्रे शोधून, किंबहुना ती छिद्रे तयार करून व्यवस्थेतले लोक सबंध योजना खाऊन टाकतात. अडीनडीला मदत व्हावी म्हणून स्थापन केलेल्या सेवा सहकारी सोसायटय़ा आणि बँकांकडून कर्ज घेताना, तिथल्या माणसांना, जगदेवासारख्या म्होरक्यांनी अख्खं गाव कर्जबाजारी करून टाकलेलं आहे आणि कर्जवसुलीसाठी सरकारी लोक गावात येतात तेव्हा सगळे कर्जदार पळून जाऊन सबंध गाव ओस पडतं. नुसत्या धोतरावर गावाबाहेर शौचाला गेलेली, एरवी अब्रूदार अशी माणसं तिकडच्या तिकडूनच बाहेरगावी गायब होतात. असल्या खूप गोष्टी. निझामीतून बाहेर पडताना ज्या गांधारीत आसपासची दहा गावं जगवण्याची कुवत होती, ते गाव असं भिकेला लागल्यागत होणं, हे आपल्या स्वातंत्र्योत्तर विदारक प्रगतीचंच निदर्शक मानावं लागतं.

वरवर या कथेमध्ये एक जगदेव आणि एक भागवत अशा दोन माणसांतले संघर्ष दिसत असले तरी ही काही त्याच दोघांची गोष्ट नाही. गोष्टीच्या जसजसे तळाकडे जाऊ, तसतसं लक्षात येत राहतं की ही त्या दोन-चार-सहा माणसांची गोष्ट नाही, ही ‘गांधारी’ नावाच्या एका सबंध गावाला कवेत घेत आहे.
एकेकाळच्या स्वयंपूर्ण गावांचं, तिथल्या माणसांचं क्रमश: बकालीच्या, विरूपाच्या दिशेनं होत गेलेलं अवस्थांतर, त्या अवस्थांतराचं अगदी आजही समकालीन भासणारं चित्र १९७३ साली ‘पॉप्युलर’ प्रकाशनाकडून प्रकाशित झालेल्या या कादंबरीत महानोरांनी अतिशय नेमकेपपणानं रेखाटलं आहे.
पृष्ठसंख्येच्या हिशेबानं अगदीच लहानशी म्हणजे फक्त एकशे सोळा पृष्ठांची ही कादंबरी आहे. आणि महानोरांच्या अतिशय चित्रदर्शी शब्दकळेमुळे ती विलक्षण पकड घेत जाते. या कादंबरीतली महानोरांची भाषा त्यांच्या कवितेसारखी रम्य नाही. कायम दुष्काळी रखरख माथ्यावर गोंदलेल्या या प्रदेशातली तशीच रखरखीत भाषा महानोरांनी यात जाणीवपूर्वक योजली आहे. या कादंबरीतल्या शिवारात ‘जोंधळय़ाला चांदणे’ लखडून वगैरे येत नाही, गांधारीची ही गोष्ट वाचकांना संथपणे जाळत जाळत तिच्या अटळ शेवटाकडे जाते. गांधारी ही एका ‘गांधारी’ची नव्हे तर गांधारीसारख्या लक्षावधी गावांच्या उद्ध्वस्तीकरणाची गोष्ट आहे.

आंबेजोगाई येथे कॉम्प्युटर इन्स्टिटय़ूट उघडून चरितार्थ आरंभणारे बालाजी सुतार हे गेल्या दीड दशकात काव्य आणि कथा दोन्ही प्रांतात चमकणारे नाव. गावागावांतील काव्यवाचन आणि कथाकथन कार्यक्रमांत सक्रिय.‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथासंग्रहाला ‘बी. रघुनाथ’ हा मानाचा पुरस्कार. नियतकालिके तसेच समाजमाध्यमांवरील सर्वच लिखाण लोकप्रिय.
majhegaane@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 01:41 IST