सिद्धार्थ खांडेकर
siddharth.khandekar@expressindia.com
विख्यात बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटचा वयाच्या ४१व्या वर्षी हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेला मृत्यू जगभरातील क्रीडारसिकांना खंतावणारा ठरला. या दुर्घटनेत कोबीची १३ वर्षीय कन्या जियाना आणि दोन प्रशिक्षक दाम्पत्यांचाही अकाली मृत्यू झाला. नवीन सहस्रकातील मोजक्या असामान्य आणि जगन्मान्य क्रीडापटूंमध्ये कोबी ब्रायंटचा समावेश होतो. गेल्या दोन दशकांमध्ये कोबी ब्रायंट, रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स, लिओनेल मेसी यांना जे अढळपद मिळालं, ते इतरांना मिळालं नाही. उदा. रॉजर फेडरर हरल्यानंतर आजही व्यक्त होत असलेली जागतिक हळहळ कितीही निपुण असले तरी राफाएल नडाल आणि नोव्हाक जोकोविच यांच्या वाटय़ाला येत नाही. त्याचप्रमाणे, सेरेना विल्यम्सच्या ‘राजवटी’त (ती अजूनही संपली म्हणता येत नाही) अनेक जणी एखादी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकतच होत्या. पण सेरेनाप्रमाणे सातत्य त्यांच्यापैकी कुणालाच दाखवता आलेलं नाही. लिओनेल मेसीला त्याच्या देशासाठी- अर्जेटिनासाठी अजूनही एखादी ट्रॉफी जिंकून देता आली नाही. तरीही त्याची लोकप्रियता वाढतेच आहे. रोनाल्डो असला काय किंवा नेयमार आला काय, तीत खंड पडलेला नाही. कोबी ब्रायंट तब्बल २० वर्षे लॉस एंजलिस लेकर्सकडून खेळला. त्याच्याआधी आणि नंतरही एनबीएमध्ये अनेक उत्तमोत्तम बास्केटबॉलपटू खेळले आणि खेळतात. पण कोबीइतकं मिथक मायकेल ‘एअर’ जॉर्डन वगळता कोणाच्याही नावाला चिकटलं नाही.
नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन किंवा एनबीएकडून १९९६मध्ये वयाच्या १७व्या वर्षांपासून कोबी व्यावसायिक बास्केटबॉल खेळू लागला. हायस्कूल स्तरातून थेट व्यावसायिक बास्केटबॉलमध्ये समाविष्ट झालेल्या मोजक्यांपैकी तो एक. त्याच्याविषयीचा एक किस्सा असा सांगतात, की लेकर्समध्ये येण्यापूर्वी त्याची नियमांतर्गत ‘वन-ऑन-वन’ चाचणी घेण्यात आली. म्हणजे कोबी एकटाच बास्केटबॉल खेळवत, उडवत जाणार नि बास्केटमध्ये टाकणार. ही चाचणी घेणारा होता लेकर्सचाच माजी बास्केटबॉलपटू आणि नंतर सहायक प्रशिक्षक बनलेला मायकेल कूपर. निर्धारित वेळ संपण्यापूर्वीच मायकेलने चाचणी थांबवली. आपल्या संघातील सध्याच्या सर्व बास्केटबॉलपटूंपेक्षा हा भारी आहे, असा शेरा मायकेलनं त्या वेळी मारला. लेकर्स हे कोबीचं लक्ष्य नव्हतं. त्याला ‘वन-ऑन-वन’ करायचं होतं थेट मायकेल जॉर्डनशी! कोबी कृष्णवर्णीय होता, पण बास्केटबॉलव्यतिरिक्त कोणत्याही विषयावर त्याला भाष्य करायच नव्हतं किंवा भूमिका घ्यायची नव्हती. ‘डियर बास्केटबॉल’ या त्याच्याच लेखणीतून उतरलेल्या, ऑस्करविजेत्या पाच मिनिटांच्या चिमुकल्या अॅनिमेशनपटात सहाव्याच वर्षी आपल्याला बास्केटबॉलनं कसं झपाटून टाकलं हे कोबी सांगतो. त्याचे वडील जो ब्रायंट हेही एनबीएत खेळायचे. तिथं ‘म्हातारे’ झाल्यावर ते इटलीत काही काळ व्यावसायिक बास्केटबॉल खेळले. तिथं त्यांच्या मोज्यांपासून बनवलेला ‘बास्केटबॉल’ आणि कोपऱ्यातला कचऱ्याचा डबा भिंतीला लटकवून तयार झाली ‘बास्केट’. घडय़ाळ लावून ‘शूटिंग’चं कौशल्य तिथं पहिल्यांदा गिरवण्यात आलं. मग खुर्च्या आडव्यातिडव्या मांडून त्यांच्यामधून धावत जाऊन लहानग्या कोबीनं प्रतिस्पर्धी बचावपटूंना चकवण्याचं तंत्र घोटवून घेतलं. लहानपणीचे हे धडे एक बास्केटबॉलपटू म्हणून घडताना फारच उपयोगात आले. अर्थात हे झालं तंत्राविषयी. चांगला खेळाडू बनण्यापुरतं ते योग्यच होतं. दंतकथा बनण्यासाठी त्यापेक्षा मोठी झेप आवश्यक होती. कोबी पहिल्यांदा कोर्टवर उतरला, त्याच वेळी त्याच्यातील गुणवत्ता आणि त्याहीपेक्षा महत्त्वाकांक्षा लेकर्सच्या दृष्टीस पडली होती. मायकेल जॉर्डनप्रमाणे ‘महान’ होण्याची मनीषा त्याला लपवता आलेली नव्हती. एक ‘शूटिंग गार्ड’ म्हणून कोबी खेळू लागला होता. फुटबॉलमधला स्ट्रायकरच. महत्त्वाकांक्षेला अपार कष्टाची जोड कोबीनं दिली होती. तासन्तास तो शूटिंगचा म्हणजे बॉल बास्केटमध्ये टाकण्याचा सराव करायचा. झपाटल्यासारखा व्यायाम करायचा. आसक्ती आणि महत्त्वाकांक्षा यांचा तो अविस्मरणीय आविष्कार होता. एनबीएसारख्या क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण करणं सोपं नव्हतं. लेकर्सच्या संघात त्याच्या आधीपासून खेळायचा शाकिल ओनील. लेकर्सचा ‘पॉइंट गार्ड’. फुटबॉलच्या परिभाषेत बोलायचं झाल्यास प्लेमेकर. पारंपरिकदृष्टय़ा कोर्टवरील मोहरा. नवख्या आणि अल्पावधीत लोकप्रिय बनलेल्या कोबीकडे पाहण्याचा शाकिलचा दृष्टिकोन फार सकारात्मक असण्याचं काहीच कारण नव्हतं. तरीही या दोघा प्रतिभावानांच्या एकत्रित कामगिरीच्या बळावर लेकर्सनी १९९९ ते २००२ असे सलग तीन हंगाम एनबीए अजिंक्यपद पटकावलं. २००३मध्ये लैंगिक छळणुकीच्या प्रकरणात कोबी अडकला. २००४मध्ये लेकर्स एनबीए अंतिम फेरीत हरले. कोबीसाठी तो अत्यंत खडतर काळ होता. २००४ हंगामाअखेरीस शाकिलला लेकर्सनी निरोप दिल्यानंतर कोबीला स्वत:ची छाप पाडण्यासाठी अधिक मोकळीक मिळाली. २००३-०४ च्या हंगामात त्याची मायकेल जॉर्डनशी झालेली जुगलबंदी आजही बास्केटबॉल दर्दीना यूटय़ूबवर अनुभवता येईल. दोन वेळा निवृत्ती पत्करून पुनरागमन केलेला जॉर्डन त्या वर्षी वॉशिंग्टन विझार्ड्सकडून खेळत होता. सुरुवातीला त्याने चमक दाखवल्यामुळे विझार्ड्सनी आघाडी घेतली. कारकीर्दीच्या उतरणीला लागलेला जॉर्डनही अखेरीस ‘जॉर्डन’ होता. त्याच्यासमोर सुरुवातीला चाचपडणाऱ्या कोबीनं नंतर मात्र मुसंडी मारली आणि त्या सामन्यात ५०हून अधिक गुण एकटय़ानं वसूल केले. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये जॉर्डन फिका पडला. चौथ्या क्वार्टरमध्ये कोबीला खेळण्याची गरजच पडली नाही, इतका तो सामना तोवर विझार्ड्सच्या हाताबाहेर गेला होता. कोबी ब्रायंटचा उदय होऊन तो तळपू लागला होता, तर जॉर्डन खऱ्या अर्थानं अस्ताला गेला.
ब्रायंट खऱ्या अर्थानं ‘लिजंड’ होता आणि समाजमाध्यमाच्या युगात तर त्याला जवळपास देवपद बहाल झालं होतं. पाच एनबीए अजिंक्यपदं. २० वर्ष एकाच संघाकडून खेळलेला तो एकमेव बास्केटबॉलपटू. १८ वेळा ऑल-स्टार संघात समावेश. दोन ऑलिम्पिक सुवर्णपदकं. वर्षभरातील केवळ १८ दिवस तो कुटुंबासाठी द्यायचा. तरीही प्रेमळ पत्नी आणि त्यांच्या चार मुलींमध्ये रमणारा तो कुटुंबवत्सल कुटुंबप्रमुख होता. इटालियन, स्पॅनिश सफाईनं बोलायचा. अमेरिका म्हणजे स्पोर्ट्स मार्केटिंग क्षेत्रातली पंढरी. त्यामुळे त्याच्यासारख्या बास्केटबॉलपटूलाही मोठय़ा ब्रँडचा पुरस्कारमूर्ती होण्याची संधी अनेकदा मिळालीच. लैंगिक छळणूकप्रकरणी त्यानं पीडितेची जाहीर माफी मागितली होती आणि हे प्रकरण मागे घेण्यात आलं. त्या वेळी काही पुरस्कर्त्यां कंपन्यांनी बहिष्कारही टाकून झाला. त्या प्रकरणानंतर कोबी अधिक परिपक्व बनला. तोपर्यंत ८ क्रमांकाची जर्सी घालून खेळायचा. मग २४ क्रमांकाची जर्सी घालून खेळू लागला. जणू तिप्पट शहाणपण आणि ऊर्जा त्याच्यात संचारली होती. आफ्रिकन वंशियांसाठी त्यानं राजकीय भूमिका वगैरे घेतली नाही. पण इटलीत वाढताना आफ्रिकन असल्यामुळे काही आव्हानं आली आणि त्यांना तोंड देत आपण कणखर बनलो, असं त्यानं एकदा म्हटलं होतं. त्याच्यावर अनेकदा स्वार्थी असल्याचा शिक्का त्याच्या काही सहकाऱ्यांनीच मारला होता. पण जिंकण्याशिवाय दुसऱ्या कशाचीही तमा न बाळगता तो खेळायचा. त्याच्या या वृत्तीमुळेच लॉस एंजलिस लेकर्स एक मातब्बर संघ बनला हे नाकारता येत नाही. इतकं असूनही ज्या खेळानं त्याला इतके मानमरातब दिले, त्या खेळापासून दूर जाण्याचा निर्णयही त्यानं अतिशय शांतपणे घेतला आणि त्याचा त्याला कधीही पश्चात्ताप झाला नाही. ‘डियर बास्केटबॉल’मध्ये त्याचं वाक्य होतं.. ‘आम्ही एकमेकांपासून विभक्त होतोय, पण ठीक आहे. प्रेमाचा हा प्रवास कधी संपणार नाही.’ कोबीच्या अंतानंतरही तो सुरूच राहील!