अशोक नायगावकर – ashoknaigaonkar@gmail.com

माणूस घरी वेळ जात नाही त्यामुळे नोकरीला लागतो. ऑफिसात जातो. आणि तिथेदेखील एकदा लंच टाइम आटपला की ३ नंतर घडय़ाळात बघत बसतो. उगाचच ‘शिर्के, तुमच्या घडय़ाळात किती वाजलेत?’ किंवा ‘तिकडे युरोपात आत्ता किती वाजले असतील?’ अशा चर्चा करत बसतो. अरे, घडय़ाळाचा शोध लागला नसता तर लोकांनी वेळ कसा घालवला असता असेही कधी कधी वाटते.

प्रिय तातूस,

बऱ्याच दिवसांपासून तुझी आठवण काढावी असे वाटत होते. आणि आता तर काय, सगळीकडेच ठप्प झाल्यामुळे नुसत्या आठवणी काढायचेच दिवस आलेत. अरे, आपण आयुष्यभर ‘सर्वानी एकत्र यायला पाहिजे’ असे शिकत आणि शिकवत आलो; आणि तातू.. आता तर ‘सर्वानी दूर राहा, अंतर ठेवा. वेगळे व्हा.. जवळ येऊ नका..’ सांगायची पाळी आली. अरे, आपल्यावर एकत्र कुटुंबपद्धतीचे संस्कार झालेले! आता मुले तर लग्न होऊन वेगळी राहतातच; पण तीदेखील वेगळी होतायत. आणि आता करोनाचे कोलीत हातात आले म्हटल्यावर कोण वेगळे होईल सांगता येत नाही. अरे, परवा नानाकडे पूजा होती, तर गुरुजींनी ‘हाताला हात लावा,’ म्हणून सांगताना ‘फक्त शास्त्र करा,’ सांगितले!

हल्ली मी फारसा कोठे जात नाही. अर्थात कुणी बोलवत नाही, हेही खरेच आहे म्हणा! पण जसा करोनाचा उद्रेक झाला ना, तसे दोन आठवडय़ांपासून मी सगळे सामान भरायला सुरुवात केली. अरे, रोज सकाळ-संध्याकाळ दोन-दोन पिशव्या भरून मी घेऊन यायचो तर सगळेजण मला हसायचे. पण आज आमच्याकडे सगळ्या डाळी, तांदळापासून गव्हाच्या पिठापर्यंत सर्व भरून ठेवलेय. एखादा द्रष्टा पुरुष असतो- त्याला कशी पुढची जाणीव होते, तसे माझ्याबाबतीत काही वेळा होते. माझ्या पत्रिकेतच हा योग असल्याचे मागे एका ज्योतिषाने सांगितले होते. अर्थात हे मी कुणाला सांगत नाही. नाही तर ‘एवढा द्रष्टा पुरुष क्लार्क म्हणून कसा रिटायर्ड झाला?’ असे काहींनी म्हटले असते.

सगळी हॉटेले बंद झाल्याने नानाला काय उकळ्या फुटल्यात! अरे, याची मुले, नातू, सुना शुक्रवारपासून जे बाहेर जेवायला जायचे ते रविवार संध्याकाळपर्यंत बाहेरच जेवायचे. नानाला काय.. मुगाची खिचडी आणि ताक असले की खूश! अर्थात त्याला पथ्यही आहे म्हणा. अरे, सगळ्या सोसायटीत आता स्वयंपाकाची सवय लागल्याने काय काय खमंग वास दरवळायला लागलेत म्हणून सांगू!

अरे, परवा तर स्वयंपाक करणे ही अत्यावश्यक सेवा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवर जाहीर केले. त्यामुळे घरातील पुरुषावर कामाचा बोजा दुप्पट वाढलाय. एक तर हेडफोन लावून लॅपटॉपसमोरही बसायचे; आणि समोर ताटात ठेवलेली गवारी, मेथी पण निवडून द्यायची. अरे, ही घरून काम करायची पद्धत इतकी विचित्र आहे की सोसायटीतले बरेच जण एकमेकांकडे जाऊन काम करतायत. आता शेजारच्या भावोजींना कोण कोथिंबीर निवडा असे सांगणाराय?

कंपन्या पण या वर्षी फायद्यात येणार म्हणताहेत. अरे, सबसिडाइज्ड  कॅन्टीनचा खर्च वाचला. वेगवेगळे अलाऊन्स पण द्यायची गरज नाही. तुम्ही घरीच बसणार म्हटल्यावर कन्व्हेअन्सचा प्रश्नच मिटला. एसीपासून ते पंखे, लाइट हा खर्च तर एकदम शून्यावरच आलाय. अरे, काहींनी तर आपल्या कंपनीची जागा भाडय़ाने देण्याची जाहिरातपण दिलीय म्हणे.

तुला खोटे वाटेल, पण आमचा इस्त्रीवाला भय्या डोळ्यांत पाणी आणून म्हणाला, ‘‘साब, सब धंदा बंद हो गया.’’आता घरातूनच काम करायचे म्हटल्यावर कोण इस्त्रीचे कपडे घालणार?

‘आपली धुळीची सवय निघून गेली की त्याचाही त्रास होणार..’ असे परवा चॅनेलवर एक डॉक्टर म्हणत होते. आता हे घरून काम करण्याचे लोण शेतीपर्यंत जाणार म्हणतात. अरे, आपले शिंदेकाका व्यापारउदीमाच्या निमित्ताने युरोप-अमेरिकेत जातात. त्यांचे म्हणणे : इतकी वर्षे ते परदेशात जातायत, पण त्यांना आपल्या इथल्यासारखे शेतात राबणारे लोकच दिसत नाहीत. हळूहळू सगळ्या गोष्टी घरूनच होणार म्हणतात. अरे, विज्ञान-तंत्रज्ञान इतके पुढे गेलेय की आपला विश्वासपण बसणार नाही. अरे तातू, तुला आठवतेय- आपल्या लहानपणी माईंनी पुण्याहून दाण्याचे कूट करायचे यंत्र आणले होते, ते बघायला चाळीतले सगळे लोक एकत्र आले होते. तो लोखंडी खल आणि बत्ता आता बघायला पण मिळत नाही. सगळी मुले, विद्यार्थी लॅपटॉपवरून घरबसल्या शिकायला लागली तर एवढे शिक्षक आणि इमारती तरी कशाला हव्यात? मला खरं तर इतक्या विषयांतले कळते! त्यामुळे अण्णा नेहमी म्हणतात, ‘अनंतराव, तुम्ही टीव्हीवर चर्चेला का नाही जाऊन बसत?’ आता माझा स्वभाव संकोची असल्याने स्वत: होऊन कुठे जावे अथवा पुढे पुढे करावे असे मला वाटत नाही. अरे, तुला आठवत असेल.. लग्नाच्या वेळीही मी मुली बघायला गेलो नाही. हिला दाखवायला सासरेबुवा स्वत: आले. मग मी पण विचार केला : इतक्या लांबून आलेत बिचारे.. तर आपण नाही तरी कसे म्हणणार? असो.

ते जुने दिवस आठवले की अक्षरश: सगळे विसरायला होते. अरे, काय स्वस्ताई होती आपल्या वेळी! शेजारच्या माई तर म्हणायच्या, ‘अगदी छोटय़ा पातेल्यातसुद्धा दोन-तीन शेर दूध त्या काळात मावायचे.’

अरे, लॉकडॉऊनमुळे बघ- पानबिडी, सिगरेट सगळे बंद झाले. अरे, सकाळी उठल्या उठल्या काय कोकिळेचा आवाज येतो! एकतर चैत्र मास.. त्यामुळे पालवीने पिंपळ नुसता बहरलाय. अरे तातू, तुला सांगतो- मी जर कवी असतो तर काय कविता लिहिल्या असत्या! आमच्या वरच्या मजल्यावरचे बुद्धे यांचा जयंता काय कविता करतो. अरे, त्याची तर गीताईदेखील मुखोद्गत आहे. त्याने परवा एक नवा अध्यायच लिहायला घेतला. असो. तो करोनाग्रस्त विषादे वाक्य बोलला. प्रतिभावान माणसाला कसे काय सुचते, काही कळत नाही. मला तर अजून बाजारात फिरताना एखादी भाजी घ्यावी हेदेखील सुचत नाही. तर जयंता जे. जे. स्कूलचा. मध्यंतरी त्याला एका डासांवरच्या जाहिरातीसाठी स्लोगन बनवायची होती. त्याने तात्काळ ‘मलेरिया.. आगे बढो! हम तुम्हारे साथ है!!’ अशी स्लोगन बनवली. त्याला उत्तेजनार्थ पुरस्कार पण मिळाला म्हणे.

खरे तर तूही घरी आहेस, मी पण घरीच आहे. शूटिंग झालेले जुने एपिसोड दाखवतायत. निदान बातम्या तरी रोजच्या दाखवतायत, हे बरे! जुने शपथविधी वगैरे दाखवत नाहीयेत, हे आपलं नशीबच.

सध्या वर्तमानपत्रे बरीचशी बंद आहेत. त्यामुळे मी जुना गठ्ठा उपसून वाचत बसतो. नशीब- लॉकडाऊनच्या आधी मी रद्दी घातली नाही. वेळ कसा घालवायचा, हा खरे तर आपल्यासारख्यांचा मोठाच प्रॉब्लेम आहे. अरे, मी परवा एक पुस्तक वाचले. अर्थात तत्त्वज्ञानावरचे होते. त्यात म्हटले होते की, माणूस घरी वेळ जात नाही त्यामुळे नोकरीला लागतो. ऑफिसात जातो. आणि तिथेदेखील एकदा लंच टाइम आटपला की ३ नंतर घडय़ाळात बघत बसतो. उगाचच ‘शिर्के, तुमच्या घडय़ाळात किती वाजलेत?’ किंवा ‘तिकडे युरोपात आत्ता किती वाजले असतील?’ अशा चर्चा करत बसतो. अरे, घडय़ाळाचा शोध लागला नसता तर लोकांनी वेळ कसा घालवला असता असेही कधी कधी वाटते.

अरे, मध्यंतरी ५० टक्के स्टाफने एक दिवसाआड कामाला यायचे अशी ऑर्डर आली ना, तर वसंताच्या युनियनने सगळ्या स्टाफची मीटिंग घेऊन ‘फक्त ५० टक्केच काम करायचे..’ सक्र्युलर काढले होते. आता युनियनचेही बरोबरच आहे म्हणा. जर ५० टक्के स्टाफ सगळे काम करतोय म्हटल्यावर नवीन नोकरभरतीच होणार नाही. आणि असलेलेही बेकार होतील. वसंताने तर मला या समस्येवर विस्तृत लेख लिहायला सांगितलाय. पण सध्या माझ्यावर घरच्या किती जबाबदाऱ्या आहेत, हे तू बघतोयस. अरे, ही कसोटीची वेळ आहे. पण यातून आपण इतके सहज बाहेर पडू की आपलाच विश्वास बसणार नाही.

अरे तातू, दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवा असे कुणीही सांगितले तरी मी मात्र तुला कधीही अंतर देणार नाही याची खात्री बाळग.

जाता जाता : पुण्याच्या कमिशनरनी ‘चुंबन घेतानाही स्ट्रॉ वापराव्यात..’ असे आवाहन केल्याचे कळले, ते खरे आहे का?

तुझा-

अनंत अपराधी