डॉ. गिरीश रांगणेकर

नव्वदीच्या दशकामध्ये आपल्याकडे उपग्रह वाहिन्या आल्यानंतर जाहिरात विश्वात अमूलाग्र बदल झाले. सिनेमासारखीच तीन मिनिटांत गोष्ट सांगणाऱ्या ‘म्युझिक व्हिडिओ’सारख्या संस्कृतीला तातडीने अबालवृद्धांनी स्वीकारले. लोक हळूहळू दृश्यसाक्षर होण्याचे ते दशक होते. या काळात जाहिरातींमध्ये एक ते दीड मिनिटांत किंवा तीन मिनिटांत उत्पादन विकण्यासाठी सांगितलेली गोष्ट ही नवकल्पनांनी भरलेली होती. पुढल्या दहाएक वर्षांत अनेक सिनेमाकर्ते, जाहिरात दिग्दर्शक, डॉक्युमेण्ट्री मेकर्स कलात्मक आणि व्यावसायिक सीमारेषेंवर फिरत माहितीपटाच्या शैलीत जाहिरात आणि जाहिरातीच्या शैलीत माहितीपट बनवू लागले. त्यापुढे मोबाइलद्वारे उच्च प्रतीचे कॅमेरे आल्यानंतर तर समाजमाध्यमांत चालणाऱ्या काही रिलरूपी व्हिडिओज्मधून देखील माहितीपटाची क्षमता दिसू लागली. ‘आयफोन’वर संपूर्ण सिनेमा चित्रित करण्याचेही प्रयोग झाले. तळहातावर मावणाऱ्या नवमध्यामांच्या अतिरेकातही वाचनाची भूक दिवसागणिक वाढते आहे. तसेच काहीसे डॉक्युमेण्ट्री फिल्म या माध्यमाबद्दल म्हणता येईल. आवडत्या विषयावरची एखादी नवी डॉक्युमेण्ट्री फिल्म पाहण्याचा आनंद हा आवडत्या लेखकाचे एखादे नवे पुस्तक हाती पडल्यावर होणाऱ्या आनंदाशी करता येतो, अशी आता परिस्थिती झाली आहे. ओटीटी फलाटानंतर रिल्ससारख्या उभ्या (व्हर्टिकल) व्हिडिओज्नी करमणुकीच्या स्वरूपातच फूट पाडली. भल्या भल्यांची भंबेरी उडवणारे करमणूक आणि तंत्रज्ञानातले बदल डॉक्युमेण्ट्रीसाठी पोषक ठरले आहेत.

कदाचित पुढल्या काळातल्या डॉक्युमेण्ट्रीज् फिल्म्स रील्सच्या प्रकारातसुद्धा असू शकतील. सृजनाचे बाजारमूल्य कमी-अधिक करून करमणूक हवी, अशा विचित्र तिठ्यावर सध्या डॉक्युमेण्ट्री आहे. यूट्यूब अथवा डिस्कव्हरी चॅनेलवरील डॉक्युमेण्ट्री फिल्मसची खादाडी कमी झालेली आहे असे एकगठ्ठा मत देता येणार नाही, इतके नवनवे व्लॉगर्स तयार झाले आहेत. वर ते आपला मोठा प्रेक्षकवर्ग करून त्याद्वारे आपला उद्देश डॉक्युमेण्ट्रीसारखाच पूर्ण करीत आहेत. सिनेमाची आवड आणि नाटकांमधला सहभाग यांमुळे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि पुरुषोत्तम करंडक यांतील नाटकांमध्ये माझा सहभाग होता. डॉक्युमेण्ट्री बनविण्यासाठीचे पारंपरिक शिक्षण घेतले नसले तरी तिथे माझ्या ‘अस्तित्व’ या लघुपटाची मानसिक आखणी झाली. पुढे व्यावसायिक आणि कलात्मक अशा दोन्ही प्रकारच्या डॉक्युमेण्ट्रीज् करताना खरे तिथल्या शिक्षणाचा मला उपयोग झाला. नाटक आणि रेडिओतील कामाच्या अनुभवानंतर मी वृत्तपत्रांच्या विपणन विभागात काही काळ काम केेले. झी टेलिफिल्म आणि स्टार माझा वाहिनीवर ‘कण्टेट’ निर्मितीबाबतच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर एका मल्याळी फिल्ममेकर मित्राच्या सान्निध्यात माझे उपयोजित सिनेशिक्षण झाले. त्याच्या प्रकल्पांवर आधी कॉन्सेप्ट, अॅक्टिंग, व्हॉइसओव्हर असे जमेल ते काम मी केले. एडिटिंगचे तंत्र स्टुडिओमध्ये अवगत केले. स्वत: संपूर्ण खर्च करून केलेल्या पहिल्या लघुपटानंतर मला कमीत कमी आकारात माहितीपट बनविण्याचा ध्यास लागला. ‘लाईफ बिटवीन कमर्शिअल ब्रेक्स’ या चेतन जोशी यांच्या कथेचा विषय होता टीव्हीवरील कार्यक्रमांचा मुलांवर होणारा परिणाम. मला ती कथा फार आवडली असल्याने जास्तीत जास्त दृश्यात्मक पद्धतीने विषय मांडण्यासाठी मी त्यात बदल केले. मग या प्रकल्पासाठी निर्माता मिळविला. ही डॉक्युमेण्ट्री काही महोत्सवांत दाखविली गेली, तिला पारितोषिकही मिळाले. त्यानंतर माहितीपटांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांत मी सहभागी झालो.

हेही वाचा : पडसाद : मातृभाषा दैनंदिन जीवनातील भाषावापरातून टिकते

राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या एका डॉक्युमेण्ट्रीचा विषय माझ्याकडे आपसूक आला. कायद्यातील तज्ज्ञ असलेल्या जयराज विजापुरे यांना एका अभ्यासाअंती असे उमगले होते की रस्त्यावर झेंडा विकणे, विकत घेणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि त्याच्याबद्दल कुणालाच काहीही अवगत नाही. तसेच त्याविषयी समाजमाध्यमांवर देखील काहीच माहिती उपलब्ध नाही. लोकांना ही गोष्ट पटवून देण्यासाठी अगदी छोट्या आकाराची, पण संदेश प्रभावी पोहोचवू शकणारी डॉक्युमेण्ट्री बनवता कशी येईल, याबाबत चर्चा केल्यानंतर माझ्या ‘नॅशनल फ्लॅग’ या डॉक्युमेण्ट्रीचा जन्म झाला. विजापुरे यांनी तिच्या निर्मितीची जबाबदारी पार पाडली.

मग फक्त स्क्रिप्ट, व्हॉइस ओव्हर आणि झेंडा एवढंच फिल्ममध्ये असेल की रस्ता, ट्रॅफिक, झेंडा विकणारा मुलगा हे सगळे दाखवायचे? संवाद असावेत का? जर असतील तर आणखी कोणती माणसे/ पात्रे तेव्हा दाखवावी? त्यांची वये काय असतील, कपडे कोणते, रंग? ती माणसे/ पात्रे गाडीवर असतील की चालत असतील? यावर माझा अभ्यास सुरू झाला. हे सगळे शूट करताना चौकातली अफाट गर्दी, वाहनांचे आवाज वगैरेंसह संवाद कसे रेकॉर्ड करायचे? असे अनेक प्रश्न होतेच. त्यातूनच क्रोमा शूट हा पर्याय समोर आला. म्हणजे संवादाचा सगळा भाग हा ग्रीन स्क्रीनसमोर (क्रोमा) करायचा आणि एडिटिंग करताना मागच्या ग्रीन स्क्रीनवर स्वतंत्रपणे शूट केलेले ट्रॅफिक दाखवत राहायचे. ठरले!

आता आम्हाला हवा होता क्रोमा स्टुडिओ, एक ट्रॅफिक सिग्नल, सिग्नलला उभी असलेली वाहने आणि झेंडा विकणारा मुलगा. पण आशय नेमका व्यक्त होणार कसा? किती पात्रांमधून तो व्यक्त होणार? काही मिनिटांत सगळे बसवायचे म्हणजे तेवढ्या वेळेचाच ट्रॅफिक सिग्नल शोधणे आले. शूटिंगसाठी परवानगी काढणे आले. मग तीन मिनिटांत स्क्रिप्ट बसवण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : लोकदानातून सिनेधनुष्य..

झेंडा विकणारा मुलगा, दुचाकीवरील महिला आणि तिच्या मागे बसलेला मुलगा- जो झेंडा विकत घेण्यासाठी आईच्या मागे लकडा लावतो, त्याशेजारी दुचाकीवरील वकील महिला आणि तिच्या मागे बसलेली लहान मुलगी, तिच्या शेजारील दुचाकीवर इन्स्पेक्टर आणि त्यांच्यातले संवाद असे दृश्य ठरले. हे सगळे संवाद एका मोठा हॉल भाड्याने घेऊन तिथे चित्रित करण्यात आले. चित्रीकरणाच्या दिवशी त्या हॉलमध्ये मोठा हिरवा पडदा लावला. त्यासमोर ज्या तीन गाड्या प्रामुख्याने फिल्ममध्ये दिसणार होत्या त्या आणून ठेवल्या. त्यांना मॅट पॉलिशचे फवारे मारले- जेणेकरून शूटिंगचे लाईट्स गाड्यांच्या मेटल पार्ट्समधून परावर्तित होणार नाहीत. याचे शूटिंग सुविहितपणाने पूर्ण झाले. त्याआधी ज्या चौकात हा प्रसंग घडलेला भासवायचे होते त्या चौकातले ट्रॅफिकचे दृश्य विविध कोनांतून चित्रित केले गेले. त्या बरहुकूम प्रत्येक कलाकार संवाद म्हणत असताना तसे तसे कॅमेरा अॅन्गल ठेवले. एडिटिंग करताना तसे तसे ट्रॅफिकचे दृश्य पाठीमागच्या पडद्यावर होत राहिले आणि आमचे काम साध्य झाले.

या फिल्मला यूट्यूबवर पहिल्याच दिवशी एक लाखापेक्षा अधिक दर्शक लाभले, आणि समाज माध्यमांवर ती जोरकसपणे फिरवली गेली. पण हा प्रतिसाद तेवढ्यापुरताच राहिला नाही. यातील सामाजिक भूमिकेची दूरदर्शनने दखल घेतली. ती फिल्म १४ ऑगस्ट आणि २५ जानेवारी रोजी दाखविली गेली. अनेक शासकीय कार्यक्रमांत तसेच शाळा – महाविद्यालयांमध्ये प्रबोधनाचा भाग म्हणून ही फिल्म अजूनही दाखविली जाते. आता ‘अपघात’ या विषयावर याचप्रकारे डॉक्युमेण्ट्री दृष्टिपथात आहे. फिल्म दिग्दर्शित करणे म्हणजे अगणित निर्णय घेण्याची मालिकाच. दिग्दर्शकाला सतत निर्णय घ्यावे लागतात. फिल्मसाठी टीम निवडणे, चित्रीकरणाची जागा, दिवस, वेळा, कॅमेरा फॉरमॅट्स, रेझोल्यूशन, आस्पेक्ट रेशो असे सगळे ठरवणे. आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीबाबत आपण जितके अधिक अचूक निर्णय घेतो, तितके आपल्याला यश मिळते. तसेच काहीसे चित्रपट, माहितीपट आणि व्यावसायिक माहितीपटांबाबत घडत राहते.

चित्रपट महोत्सवात जाऊन अनेक फिल्म्स सलग पाहण्याची माझ्याकडे ताकद नाही. एक फिल्म पाहिल्यानंतर लगेच दुसरी मग तिसरी. उद्याही तसेच परवाही तसेच. पण एक दिग्दर्शक म्हणून मात्र माझे मन सतत नवनवीन आशय-विषयाच्या शोधात असते. मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकदृष्ट्या माहितीपटांचे मी काम केले असले तरी त्यात वैविध्य आणि कलात्मकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. तीन मिनिटांपासून दीड तासांच्या माहितीपटांत कल्पना आणि तिचे विलक्षण सादरीकरण ही महत्त्वाची बाब आहे. सामाजिक प्रश्न, भौगौलिक वैशिष्ट्य, राजकीय भूमिका, छंद, व्यक्तिचित्र, लोकविलक्षण घटना, गुन्हेगारी, निसर्ग, वन्य-पशू-पक्षी आदी कोणतेही विषय डॉक्युमेण्ट्रीसाठी चित्रकर्त्यांना कायम साद घालणारे असतात. त्याबाबत आर्थिक जुळणी आणि बराच काळ चालणारा अभ्यास हा डॉक्युमेण्ट्रीचा वकुब ठरवते. आगामी काळात रिल्सचा पूर वैयक्तिक माहितीपटांमध्ये भर घालणारा असेल. व्यावसायिकदृष्ट्या कल्पकतेसह लवचीक चित्रकर्त्यांनाच तग धरून राहता येऊ शकेल, इतकी स्पर्धा या माध्यमात सुरू आहे. पण हे माध्यम नक्कीच सर्वार्थाने प्रयोगांची शाळा आहे.

हेही वाचा : मत-मतांचा तवंग..

फिल्म बनवताना तिच्या प्रक्रियने मी पुरता ‘इस्टमन कलर’ झालेला असतो. जे मनात आहे ते कागदावर उतरलेले असताना सगळे फिल्ममध्ये उतरेल ना? की विसंवादासारखे काही होईल? निवडलेला सिनेमाटोग्राफर आणि कलाकार माझ्या कल्पनांना न्याय देतील ना? या आणि अनेक प्रश्नांची उत्तरे सापडून फिल्म संकलनासाठी पोहोचेपर्यंतचा प्रवास हा अतिअवघड असतो. मला वाटते की, अवघड वाटेतून सुलाखून गेल्यामुळेच डॉक्युमेण्ट्रीच्या प्रेक्षकांसमोर सर्वाधिक चांगले समोर येत राहते.

ओटीटी फलाटानंतर रिल्ससारख्या उभ्या (व्हर्टिकल) व्हिडिओज्नी करमणुकीच्या स्वरूपातच फूट पाडली. तंत्रज्ञानातले बदल डॉक्युमेण्ट्रीसाठी पोषक ठरले. त्यामुळेच कदाचित पुढल्या काळातल्या डॉक्युमेण्ट्रीज फिल्म्स रील्सच्या प्रकारातसुद्धा असू शकतील. सध्या खासगी वैयक्तिक माहितीपटांमध्ये प्रचंड भर पडत असली, तरी हे माध्यम प्रयोग करणाऱ्यांना कार्यरत ठेवत राहील, यात शंका नाही.

सिनेमा आवड म्हणून डॉक्युमेण्ट्री निर्मिती. सिम्बायोसिस स्कील अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये माध्यम विभागाचे प्रमुख म्हणून काही वर्षे काम. सामाजिक विषयांवरील माहितीपट आणि कॉर्पोरेट डॉक्युमेण्ट्रीजचा अनुभव. दोन संस्थांमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून सध्या जबाबदारी. शेती पर्यटनविषयक डॉक्युमेण्ट्रीची बरीच चर्चा.

girishrangnekar@gmail.com