सुरेश चव्हाण
माहितीपट बनविण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी निवृत्तीतून मिळालेली रक्कम ओतणाऱ्या दिग्दर्शकाची ही गोष्ट. त्याच्या हौसेतून केलेल्या गंभीर कामाची दखल जगभरातील महत्त्वाच्या महोत्सवांना घ्यावी लागली. या माध्यमाची ताकद किती आहे, याचा नवा मासला…

कॉलेजला असताना १९७८ साली मी ‘प्रभात चित्र मंडळ’ या संस्थेचा सभासद झालो. तेव्हापासून देश-विदेशातील अनेक चित्रपट तसेच लघुपट व माहितीपटही पाहत होतो. तेव्हा मनात असा विचार यायचा, आपल्यालाही कधीतरी एखादा छोटासा माहितीपट किंवा लघुपट करता येईल का…? दादरला ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या एका खोलीत ‘प्रभात चित्र मंडळ’ आणि ‘ग्रंथाली’चेही कार्यालय होते. प्रभातच्या कार्यकारिणीत मी सदस्य असल्यामुळेच या दोन्ही संस्थांशी माझा संबंध येत होता. यादरम्यान १९८२ साली ग्रंथाली वाचक चळवळीची महाराष्ट्राच्या १८ जिल्ह्यांत ग्रंथयात्रा निघणार होती. त्या यात्रेसाठी मला ग्रंथालीचे दिनकर गांगल यांनी, ‘‘तू या यात्रेत सामील होणार का?’’ असे विचारले. मी बँकेत नोकरीला असल्याने संपूर्ण यात्रेत जाणं शक्यच होणार नाही, पण चार-पाच दिवस मी येऊ शकेन, असं त्यांना सांगितलं आणि कोल्हापूर, निपाणी, गडहिंग्लज भागात ग्रंथालीचा एक कार्यकर्ता म्हणून सहभागी झालो. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक लेखक, कलावंतांनी भाग घेतला होता.

Pasquino statue rome
बोलके पुतळे
book review, Yethe Bahutanche Hit, Milind Bokil, book review of Milind Bokil s Yethe Bahutanche, lokrang article, book reading,
बौद्धिक चर्चेच्या पलीकडे…
father and daughter connection shown in indian films
उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना…
article about stars players of football greatest football Players of all time
यंदाचे निर्णायक नायक
documentary maker
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : जातवास्तवाचा शोध…
chaturang article, children first bike, children desire for bike in age of 16, Valuable Lesson in Gratitude, electric scooter, new generation, Changing Dynamics of Childhood Desires,
सांदीत सापडलेले.. ! वाढदिवस
toxins, spices , news,
विषद्रव्यांचा हिमनग..
सांधा बदलताना: वैष्णव जन…

जेव्हा निपाणी येथे ग्रंथयात्रा पोहोचली, तेव्हा निपाणीतील तंबाखूच्या वखारीत काम करणाऱ्या स्त्रियांचं आयुष्य येथील एका कार्यकर्त्यामुळे मला जवळून पाहता आलं. तेथील तंबाखूचा उग्र दर्प आणि त्यामुळे सतत लागणारा ठसका, जिथे आपण एक मिनिटसुद्धा उभं राहू शकत नाही, अशा ठिकाणी इथे काम करणाऱ्या स्त्रिया दंडुक्याने तंबाखू कुटताना तसेच गाणी म्हणताना दिसल्या. खेड्यापाड्यांतून येणाऱ्या या गरीब स्त्रिया पोटासाठी तिथे आठ-दहा तास राबत होत्या. त्यावेळेस त्यांना दिवसाला केवळ पाच रुपये मजुरी मिळत होती, हे मला त्या कार्यकर्त्याकडून कळलं. एवढंच नव्हे तर वखारीत काम करणाऱ्यांपैकी जवळपास ४० टक्के स्त्रिया या देवदासी होत्या. कारण या भागात त्यावेळी एवढ्या मुली यल्लम्मा देवीला सोडल्या जात होत्या की, देवीच्या नावाने जोगवा मागून त्यांचं पोट भरणं शक्य नव्हतं. हे सगळं पाहून, ऐकून माझ्या मनात विचार आला की, हा विषय माहितीपटासाठी उत्तम आहे.

हेही वाचा: ‘युवराज’ ते धीरोदात्त नेता!

ग्रंथयात्रेहून परतल्यावरही माझ्या मनात हा विषय सारखा घोळत होता. या विषयावर माहितीपट बनवता आला नाही तरी त्यावर आपल्याला काहीतरी लिहिता येईल, असा विचार करून काही महिन्यांनी मी परत निपाणीला गेलो. तिथे तंबाखू-विडी कामगार संघटना स्थापन करून त्यांना न्याय, हक्क मिळवून देणारे प्राध्यापक सुभाष जोशी यांना भेटलो. त्यांच्याकडून बरीच माहिती मिळाली. तंबाखू वखारीच्या मालकांनी या गरीब स्त्री कामगारांना मूलभूत गरजाही उपलब्ध करून दिल्या नव्हत्या. कामाचे तास ठरलेले नव्हते. वखारींच्या मालकांकडून आर्थिक शोषण सुरू होते. प्राध्यापक सुभाष जोशी यांच्या आंदोलनामुळे तसेच त्यांनी उभारलेल्या लढ्यामुळे या सगळ्या गैरप्रकाराला आळा बसला. कामगार कायद्यानुसार त्यांना सोयी-सवलती मिळू लागल्या. तरीही तंबाखू वखारीत काम करणं हे किती भयानक आहे, याची कल्पना आपण करू शकत नाही. तंबाखूमुळे अनेक आजार या कष्टकरी स्त्रियांना जडतात. आजही नाईलाज म्हणून खेड्यापाड्यांतील गरीब, वयस्कर स्त्रिया अशा वखारींतून काम करताना दिसतात.

या प्रवासात मला एक वेगळंच जग पाहता आणि अनुभवता आलं. त्यातूनच पुढे देवदासींच्या प्रश्नांची माहिती झाली. त्यासाठी मी गडहिंग्लजला गेलो. तिथे देवदासी निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक विठ्ठल बन्ने यांना भेटलो. ते बरीच वर्षे देवदासींच्या प्रश्नांवर काम करत होते. बन्ने सरांनी देवदासींच्या अनेक प्रश्नांवर आंदोलने आणि मोर्चे काढले होते. देवदासींची आजची स्थिती आणि पूर्वी कशा प्रकारे त्यांना देवीला सोडलं जायचं, याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती मला त्यांच्याकडून मिळाली. पुढे मी अनेक देवदासी तसेच जोगत्यांना भेटलो. देवदासी प्रथेविषयी, त्यांच्या आयुष्याविषयी मी वर्तमानपत्रे, मासिकांतून लेख लिहिले. त्याद्वारे त्यांची अतिशय भयाण स्थिती समोर आली. लहान असतानाच या मुलींना व मुलांना देवी यल्लम्माला सोडलं जात होतं. त्या वयात त्यांना आपल्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं आहे, याची कल्पना नसायची. एकदा देवीला सोडलं की, त्यांना लग्न करता येत नाही. सर्वसामान्यांसारखं जगता येत नाही. मग देवीच्या नावाने जोगवा (भिक्षा) मागून खायचं एवढंच त्यांच्या नशिबी येतं. यातील जोगत्याची अवस्था तर फारच वाईट असते. एकेकांच्या कहाण्या मन विषण्ण करणाऱ्या होत्या. हे केवळ लिहून भागणार नाही तर याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन व्हायला हवं, असं मला वाटलं.

हेही वाचा: सेनानी साने गुरुजी

कायद्यात देवीला मुलं सोडू नये, असं असलं तरी खेड्यापाड्यांतून लपूनछपून मुलगा किंवा मुलीला सोडलं जात होतं. मुख्यत्वेकरून गरिबी आणि अंधश्रद्धा यामुळे हे घडत होतं. या विषयावर अनेक मित्रांशी मी बोललो, काहींना तिथे घेऊनही गेलो. पण प्रयत्न करूनही त्यातून पुढे काही निष्पन्न झालं नाही. यामध्ये बरीच वर्षं गेली. माझी नोकरी आणि इतर लिखाण सुरू होतं. पण हा विषय काही डोक्यातून जात नव्हता. २००३ साली रिझर्व्ह बँकेत स्वेच्छानिवृत्ती आली. या संधीचा फायदा घेऊन माझी जवळपास दहा वर्षे नोकरी शिल्लक असतानाच मी नोकरीतून निवृत्त झालो. निवृत्तीनंतर जे पैसे मला मिळाले, त्यातील काही भाग माझ्या बरीच वर्षं डोक्यात असलेल्या माहितीपटांसाठी खर्च करण्याचं ठरवलं.

निपाणीला जाऊन प्राध्यापक सुभाष जोशी आणि गडहिंग्लजचे प्राध्यापक विठ्ठल बन्ने यांना माझी संकल्पना सांगितली. त्यांनीही मला यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. त्याच वेळी आम्ही ठरवलं, यल्लम्मा देवीची यात्रा कर्नाटकातील सौंदत्तीच्या डोंगरावर पौष पौर्णिमेला भरते. त्यावेळेस चित्रीकरण करायचं, असं ठरवून मुंबईला परतलो. चित्रपट व्यवसायात छोटी-मोठी कामं करणारा देवेंद्र जाधव हा तरुण माझ्या परिचयाचा होता. त्याला ही संकल्पना सांगितली. काही दिवसांवर सौंदत्तीची यात्रा होती. आम्ही दिवस निश्चित केला. मुंबईहून मी, देवेंद्र व त्याचा कॅमेरामन मित्र सोनू सिंग गडहिंग्लजला गेलो. तिथे बन्ने सर, एक जोगता, एक जोगतीण असे आम्ही सहा जण गाडीने सौंदत्तीकडे जायला निघालो. रस्त्यातून जाताना बैलगाड्यांतून खेडेगावातील अनेकजण डोंगरावर यात्रेला जात होते (ही यात्रा पंधरा दिवस चालते.) जाता-जाता गाडीतून उतरून या बैलगाड्यांचं आणि आजूबाजूच्या परिसराचं चित्रीकरण करत आम्ही पुढे जात होतो. मी ठरवलं होतं, यासाठी स्क्रिप्ट लिहायचं नाही. मी एक आराखडा तयार केला आणि काही नोट्स काढल्या होत्या. कारण आपण जे ठरवतो ते आपल्याला मिळेलच असं नाही तर काही वेळा अनपेक्षितपणे आपल्याला काही मिळून जातं, याचा अनुभव मला दोन माहितीपट करताना आला.

सौंदत्तीच्या डोंगरावर पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. आम्ही लगेच कामाला लागलो. देऊळ दिव्यांनी प्रकाशमान झालं होतं. उपलब्ध प्रकाशात आम्ही चित्रीकरणाला सुरुवात केली. आजूबाजूला बरीचशी दुकानं तसेच रस्त्यावर देवीच्या पूजेचं सामान विकणारी मंडळी आणि गर्दी हे सगळं मला चित्रित करायचं होतं तसं मी कॅमेरामनला सांगितलं. देवळातही इतकी गर्दी होती की, धडपणे आम्हाला चित्रीकरण करता येत नव्हतं. पण त्यातूनही आम्ही आम्हाला हवे असलेलं चित्रीकरण केलं. रात्री तिथे राहायची आणि खायची सोय नव्हती. कारण हॉटेल हा प्रकारच नव्हता. खेड्यापाड्यांतून येणारी मंडळी आपला शिधा बरोबर आणून, तिथेच चूल मांडून जेवण करताना दिसत होती. आमच्याबरोबर आलेला बळीराम कांबळे या जोगत्याच्या ओळखीच्या एका जोगत्यानं आमच्यासाठी भाकऱ्या, पालेभाजी आणि आंबील (हा देवीचा नैवेद्या) आम्हाला खायला देऊन आमची भूक भागवली. आता रात्र कशी काढायची, हा प्रश्न होता. कारण तिथे एकच विश्रामधाम होते आणि ते पूर्ण भरलेले होते. त्यामुळे कुठे राहायचं, हा प्रश्न होता. तिथे ताडपत्री लावलेल्या एका दुकानदाराला विचारलं. त्याने दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या जागेत गोणपाट अंथरून आम्हाला झोपायला जागा दिली. कशीबशी रात्र काढून सकाळी परत सौंदत्तीची यात्रा, तिथे आलेल्या भाविकांच्या प्रतिक्रिया, जोगतीणी आणि जोगते यांच्या मुलाखती तसेच त्यांची पारंपरिक गाणी, वाद्या वादन, त्यावर ते करीत असलेली नृत्य यांचे दोन दिवसांत चित्रीकरण पूर्ण करून मुंबईला परतलो.

हेही वाचा: आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले  : सत्य शोधण्याचे साधन…

मला निपाणीतील तंबाखूच्या वखारीत काम करणाऱ्या स्त्रियांवरही माहितीपट करायचा होता. म्हणून मग आम्ही काही दिवसांनी परत निपाणीला गेलो. प्राध्यापक सुभाष जोशी यांच्या सहकार्यामुळे एका वखारीच्या मालकाने आम्हाला चित्रीकरण करण्यासाठी परवानगी दिली. पण तिथे आम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. खेड्यापाड्यांतून येणाऱ्या या अशिक्षित स्त्रिया प्रथमच कॅमेऱ्याला सामोऱ्या जात होत्या. त्यामुळे त्या बोलायलाच तयार नव्हत्या. मग त्यांच्या मालकानेच त्यांना सांगितलं की, ‘‘तुम्ही घाबरू नका, बिनधास्त बोला!’’ तेव्हा कुठे काही जणी तयार झाल्या.

‘तंबाखू विडी कामगार स्त्रिया’ हे नाव असलेल्या या माहितीपटात तंबाखू बनवणाऱ्या स्त्रिया, विड्या वळणाऱ्या स्त्रिया तसेच वळलेल्या विड्या व्यवस्थित पॅकिंग करणे आणि बाजारात जाण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आम्ही मांडली आहे. २००९ साली हे दोन्ही माहितीपट तयार झाले. त्यातील ‘यल्लम्माच्या दासी’ हा माहितीपट प्रभात चित्र मंडळातर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रथम दाखवण्यात आला. त्यानंतर मुंबई, पुणे, निपाणी, गडहिंग्लज आणि महाराष्ट्रातील इतर भागांत हे दोन्ही माहितीपट दाखवले गेले.

यानंतर कोसबाड येथील पद्माभूषण ताराबाई मोडक आणि पद्माश्री अनुताई वाघ यांच्या ‘ग्राम बाल शिक्षा केंद्र’ या संस्थेत मी कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करत असताना ताराबाई आणि अनुताईंच्या बाल शिक्षणाविषयीच्या कार्यावर माहितीपट करावा, असा विचार मनात आला. कारण अनुताई व ताराबाईंचं बाल शिक्षणातील कार्य आजच्या पिढीला फारसं माहीत नाही. बाल शिक्षणाच्या प्रणेत्या म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. ‘अंगणवाडी’, ‘बालवाडी’ हे त्यांनी निर्माण केलेले शब्द भारतात सर्वत्र प्रचलित आहेत. संस्थेच्या सहकार्याने मी ‘कोसबाडच्या टेकडीवरून…’ हा त्यांच्या जीवनकार्यावर माहितीपट तयार केला. अनुताईंच्या बरोबर काम केलेल्या सिंधुताई अंबिके, जयंतराव पाटील आणि इतर कार्यकर्ते, कर्मचारी यांच्या मुलाखती, त्याचबरोबर आदिवासींचे जीवन, त्यांचे पारंपरिक तारपा नृत्य आणि वारली चित्रकला, आदिवासी पाड्यांवरच्या अंगणवाड्या, बालवाड्या कशा चालतात, त्यांना येणाऱ्या अडचणी या सगळ्या गोष्टींचा ऊहापोह या माहितीपटात केला आहे.

हेही वाचा: निवडणूक निकालाच्या बोधकथा…!

हा माहितीपट अनेक ठिकाणी दाखवला गेला, तसेच संस्थेलाही त्याचा उपयोग झाला. रांची येथे २०२१ साली भारतात प्रथमच आदिवासी लघुपट आणि माहितीपटांच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ या माहितीपटाची निवड पहिल्या तीन माहितीपटांत झाली आणि त्याला पुरस्कार मिळाला. तिथल्या स्त्री प्रेक्षकांना ताराबाई आणि अनुताईंचं कार्य खूपच भावलं. ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त अनेकदा हजेरी लावणारा माझा मित्र जी. के. देसाई २०२२ मध्ये मला म्हणाला, ‘‘तुमचा देवदासींवरचा माहितीपट मी पाहिला आहे. तो जर आपण कान चित्रपट महोत्सवासाठी पाठवला तर कदाचित तुमचा हा विषय त्यांना आवडेल.’’ त्यांनी माझा हा माहितीपट तिथे पाठवला आणि २०२२ साली कान महोत्सवासाठी मला आमंत्रण आलं. तिथे जायची संधी मला मिळाली. तसंच २०२३ ला मी ‘बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’लाही गेलो, हे केवळ या माहितीपटामुळेच! माहितीपट हे माध्यम अतिशय प्रभावी आहे. वास्तवाचं चित्रण माहितीपटात केलं जातं. पण याचा व्हावा तसा उपयोग आपल्याकडे आजवर झालेला नाही. पुढील काळात दृश्यमाध्यमाची आवड असलेले अधिकाधिक लोक माहितीपटांच्या निर्मितीत उतरले, तर त्यांना विषयांची कमतरता नाही, असे हे क्षेत्र आहे.

sureshkchavan@gmail.com