किरण घाडगे
वन्यप्राणी आणि जीवन यांच्यावर माहितीपट बनवताना त्यात अचूक आणि रंजक गोष्ट सांगण्यासाठी संरक्षक, शास्त्रज्ञ आणि परिसरातील लोकांसोबत एकत्र कामं करणं खूप महत्त्वाचं असतं. उत्तम कथा या दर्शकांच्या भावनांशी जोडण्याचा आणि त्यांना पर्यावरणाची काळजी घेण्यास प्रोत्साहित करण्याचा मुख्य मार्ग आहे. या माध्यमात स्वत:ला झोकून दिलं तर दर दिवस एक रोमांचक कथा घडत राहते…

थरथरत्या हातांनी आणि धडधडणाऱ्या हृदयाने मी माझा राजीनामा टाइप करून एका अनोख्या प्रवासाला सुरुवात करत होतो. मी एका माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्तम नोकरीला निरोप देत आणि वन्यजीव चित्रपट निर्मितीच्या मनमोहक क्षेत्रात प्रथमच उडी घेत होतो. हा एक धाडसी बदल होता आणि माझ्याबरोबर माझ्या संपूर्ण परिवाराच्या आयुष्यावर परिणाम करणारा निर्णय होता. एकीकडे दरमहा सहाआकडी पगार, तर दुसरीकडे शून्य पगार हा फरक निर्विवाद होता. आज तेरा वर्षांनंतर मागे वळून पाहताना या पैशांच्या तुलनेत मिळालेले अनुभव, पाहिलेली नवनवीन ठिकाणे, अनुभवी व्यक्तींशी साधलेला संवाद आणि प्रेरणादायी व्यक्तींशी झालेली नवी मैत्री कित्येक पटीने आनंद देणारी आहे.

structural audit of bridges and dangerous buildings
धोकादायक इमारतींसह पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण – आपत्ती प्राधिकरण यंत्रणेची सूचना
article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : मुख्य परीक्षा: इतिहास
Loksatta kutuhal Cyber Crime and Artificial Intelligence
कुतूहल: सायबर गुन्हे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
Is your morning bread an enemy of gut health? Here’s why you should junk all ultra-processed foods
रोज सकाळी ब्रेड खाणे आतड्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक?अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ खाणे का टाळावे?
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण
Chandrapur, MIDC,
चंद्रपूर : एमआयडीसीतील बंद कारखाने बनले असामाजिक तत्त्वांचा अड्डा
Anti-Rape Wears To Avoid Rape Cases:
Anti Rape Underwear काय काम करतात बघा; श्रीमंतीच्या वेडात उत्पादकांनी महिलांच्या ‘या’ प्रश्नांची उडवली खिल्ली
Nagpur, Smartphones, parents,
‘पाल्यांच्या कोवळ्या मनातील सुप्त प्रश्नांची उत्तरे पालकांनीच शोधावी’

वन्यजीव चित्रपटनिर्मिती हे एक असे विशिष्ट क्षेत्र आहे, जे परंपरागत आणि इतर माहितीपट, चित्रपट निर्मितीपेक्षा वेगळे आहे. निसर्गातल्या घटकांवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थता आणि प्राण्यांचे आकस्मिक वर्तन, हे या व्यवसायाला आव्हानात्मक आणि अत्यंत समाधानकारक बनवते. वर्षानुवर्षे माझ्या लेन्सने अनेक प्रजाती माझ्या कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. वाघ आणि मायावी बिबट्यापासून ते जंगली कुत्रे, अस्वल, गरुड, गिधाडे, निशाचर प्राणी, कीटक आणि फुलपाखरांचा कॅलिडोस्कोप… प्रत्येक प्रकल्पासाठी काळजीपूर्वक तयारी, विस्तृत अभ्यास आणि सखोल संशोधन आवश्यक आहे.

उदाहरणार्थ, नेपाळमधील १४ हजार फूट उंच हिमालयीन प्रदेशात माझी अलीकडील मोहीम. उद्देश हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमधल्या दाढीवाल्या गिधाडांवर हवामान बदलाचा होणारा प्रभाव लोकांसमोर आणणे. या आव्हानात्मक भूप्रदेशात प्रवास करताना, भूस्खलन, मुसळधार पाऊस, वाहन बिघाड, अतिधोकादायक वळणे आणि रस्त, वारंवार उड्डाणाला होणारा निराशाजनक विलंब यामुळे आमचं काम खूप कठीण आणि धोकादायक झालं होतं.

हेही वाचा : लहानग्यांसाठी कार्व्हरची पुन्हा ओळख

आम्हाला दाढीवाल्या गिधाडांच्या प्रजननावर आणि घरटे बांधण्याच्या वर्तनावर हवामान बदलाचा होणारा परिणाम याचे दस्तावेजीकरण करायचे होते. वाढत्या तापमानामुळे हे भव्य पक्षी हळूहळू आणखी उंचावर सरकत आहेत. अत्यंत उंच आणि प्रतिकूल हवामानामुळे हे काम एक मोठे आव्हान ठरत होते. या प्रवासात अनेक महिन्यांचे बारकाईने केलेले नियोजन, उच्च शिखरांशी अनुकूलता, स्थानिक मार्गदर्शक आणि तज्ज्ञांशी संबंध निर्माण करणे यांचा समावेश होता. ‘हाइड’ किंवा लपणगृह हे आम्ही वापरलेलं एक अमूल्य तंत्र होते, ज्यामुळे आम्हाला गिधाडांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात अडथळा न आणता त्यांचे निरीक्षण करता येणार होते. अनेक दिवस त्या लपणगृहात आवाज आणि हालचाल न करता संयम आणि चिकाटीने बसून राहणे हे एक मोठे आव्हान होते. ही गिधाडे सहसा अतिदुर्गम ठिकाणी घरटी बांधतात. आम्ही कित्येक तास ट्रेक करीत आणि बर्फाळ थंड हिमनदी ओलांडून अशाच एका घरट्याजवळ पोहचलो, पण हाती निराशाच लागली. तिकडे अजून त्या गिधाडांचे घरटे तयार करायचे काम सुरू झाले नव्हते.

१५ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही शेवटी एका दुर्गम आणि बर्फाळ ठिकाणी गिधाडाचे घरटे शोधून काढले. वन्यजीव चित्रपट निर्मितीमध्ये एकत्र काम करणे खूप महत्त्वाचे असते. हे केवळ कॅमेरा हाताळणे आणि चित्रीकरण करणे नाही; हे फक्त सुंदर चित्र दाखवण्यापेक्षा अधिक आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांच्या प्रमुख गाभाक्षेत्रामध्ये बराच वेळ घालवण्याचे भाग्य मला लाभले. येथे मी वाघ आणि बिबट्या जवळून पाहिले. वाघ सामान्यत: शांत असतात आणि त्यांना दुरून पाहण्यात हरकत नसते, परंतु बिबट्या शोधणे कठीण असते आणि तो अत्यंत लाजाळू असतो. एकदा मी नागझिरा जंगलात काम करत असताना, मला अस्वलांचे एक कुटुंब दिसले- दोन पिल्ले आणि त्यांची आई. स्लॉथ बेअर किंवा अस्वल इतर अस्वलांपेक्षा थोडे वेगळे असतात. ते पहिले सहा ते नऊ महिने आपली पिल्ले पाठीवर घेऊन फिरतात. वाळवी-कसरांसाठी मोठा खड्डा खोदत असताना किंवा वाघांशी लढतानादेखील पिल्लू त्यांच्या आईच्या पाठीला घट्ट धरून राहू शकतात. अस्वलाला वासाची जाणीव चांगली असते; परंतु त्यांना फार तीक्ष्ण दृष्टी नसते. काही वेळा जेव्हा ते खाण्यात व्यस्त असतात किंवा अन्न शोधत असतात तेव्हा त्यांना इतर प्राणी लक्षात येत नाहीत. जेव्हा त्यांना चाहूल लागते तेव्हा ते सावध होतात. बहुतेक वेळा ते पळून जातात्र, पण जर त्यांना काही धोका वाटत असेल तर ते हल्लासुद्धा करतात.

हेही वाचा : देश बदल रहा है…

जेव्हा मी हे अस्वल कुटुंब पाहिलं तेव्हा आई पिल्लांना पाठीवर घेऊन वाळवी-कसरे मिळविण्यासाठी खड्डा खोदत होती. हे अनोखे दृश्य पाहून मला भुरळ पडली. आम्ही सुरक्षित अंतरावर असूनही जेव्हा तिची आमच्यावर नजर पडली तेव्हा ती अचानक दचकली. कदाचित तिला तिच्या पिल्लांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटून आणि आम्हाला धोका समजून ती आमच्याकडे वेगाने धावली. मी खुल्या जीपमध्ये होतो- एकदम सोपे लक्ष्य. अवघ्या काही सेकंदात ती आमच्या खूप जवळ आली. मला वाटले, ती माझ्यावर हल्ला केल्याशिवाय थांबणार नाही, पण अचानक ती काही मीटर अंतरावर थांबली. तिच्या पाठीवर अजूनही पिल्लू होते. हा क्षण खरंच खूप भितीदायक होता. आम्हाला वाटले, आता आम्ही सुरक्षित आहोत आणि ती तिथून निघून जाईल. पण अनपेक्षितपणे ती पुन्हा जोरात ओरडत डरकाळ्या मारत आमच्या दिशेने धावू लागली. पिल्लांनी त्यांच्या आईच्या पाठीवरून उडी मारली आणि आता मला वाटले की अस्वल थांबणार नाही आणि ते आपल्यावर हल्ला करणार. ती इतकी जवळ आली की आमच्या जीपमध्ये सहज उडी मारू शकली असती. माझा मृत्यू आता अटळ आहे असेच मला वाटले, पण मी काही करण्याआधीच अस्वल थांबले, मागे वळले आणि तिच्या पिल्लांसह पळून गेले. जरी मी हा संपूर्ण थरारक अनुभव कॅमेऱ्यात पकडू शकलो नाही तरी माझ्याकडे असलेल्या या अस्वलाचा फोटो मला त्या प्रसंगाची आठवण करून देतो.

केनियातील माझ्या एका प्रकल्पात असाच अनुभव आला. केनियन रिफ्ट व्हॅलीच्या मध्यभागी नैवाशा सरोवराजवळील आफ्रिकन फिश ईगलच्या कथेवर काम करण्याची संधी मिळाली. हे शक्तिशाली गरुड त्यांच्या अविश्वसनीय हुशारीने आपल्या बदलत्या भवतालाशी जुळवून घेत सध्या तलावाच्या आजूबाजूच्या जंगलात त्यांचं प्रजनन उत्तम होत आहे. परंतु सरोवरातच अति मासेमारी, पाण्यातील प्रदूषण, मोठे मोठे पूल-उद्याोग आणि त्यांची पाण्याची गरज, नवीन प्रकारचे परदेशी प्रजातीचे मासे यांसारख्या समस्यांना या पक्ष्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे सरोवरातील जीवसृष्टीला धक्का बसत आहे. आम्ही बनवलेला माहितीपट केनियाच्या टीव्हीवर अनेकदा दाखवला गेला आहे. यामुळे लोकांना नैवाशा तलावाभोवती काय घडत आहे याची प्रभावीपणे जाणीव करून देण्यास मदत झाली.

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : प्रयोगांची शाळा

वन्यजीव माहितीपट क्षेत्रातील या आव्हानांव्यतिरिक्त एका नवीन मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. समाजमाध्यमे सतत बदलत आहेत. लोकांना मनोरंजक गोष्टी पाहायला हव्या आहेत; परंतु ते खूप कमी वेळात असावेत असे त्यांना वाटते. यामुळे वन्यजीव चित्रपट निर्मात्यांना निसर्गाच्या संरक्षणाबद्दल संदेश देणे कठीण होत चालले आहे. लोकांचा लक्ष देण्याचा कालावधी खूप कमी झाला आहे. वन्यजीव आणि निसर्ग या विषयांवर माहितीपट करणाऱ्यांना याविषयी माहितीपट दाखवून पर्यावरणाची काळजी घेणे किंवा समस्यांबाबतची जनजागृती करणे किती गरजेचे आहे हे दाखवावे लागते. एक डॉक्युमेण्टरी निर्माता म्हणून लोकांना कंटाळा येऊ नये म्हणून हे संदेश जलद आणि मजेदार मार्गाने पोहोचवणे महत्त्वाचे आहे. मला वाटते की, या प्रकारच्या सामग्रीसाठी योग्य शब्द ‘इन्फोटेनमेंट’ आहे- इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजक आहे; परंतु आपल्याला उपयुक्त माहितीदेखील देत आहे.

या माहितीपट निर्मितीच्या कामाचा विचार करताना मी इतर काही चित्रपट निर्माते आणि त्यांच्या चित्रपटांकडे प्रेरणा म्हणून पाहतो. नेटफ्लिक्सवरील ‘माय ऑक्टोपस टीचर’ हा मला खरोखर आवडलेला एक छान माहितीपट आहे- ज्याने जगभरात अनेक पुरस्कार जिंकले आहेत. आपण संवर्धनाबद्दल एक शक्तिशाली संदेश पोहोचविण्यासाठी मनोरंजक कथांसह शास्त्रीय माहिती कशी मिसळू शकता ते महत्त्वाचे. इतर काही माहितीपट जे मला पाहायला आवडले आणि ते त्यांच्या कथा चांगल्या प्रकारे सांगतात ते म्हणजे ‘ऑल दॅट ब्रीदस’, ‘टायगर डायनेस्टी’, ‘द आयव्हरी गेम’ आणि सर डेव्हिड अॅटनबरो यांचे सर्व माहितीपट. हे माहितीपट केवळ पुरस्कार जिंकण्यासाठी नव्हे तर संदेश देण्यासाठी बनवलेले असले, तरी ते चित्रपट महोत्सवांचा भाग असल्याने अधिक लोकांना ते पाहण्यास आणि शिकण्यास मदत होते. या महोत्सवांमध्ये मला माझे काही माहितीपट दाखवण्याची संधी मिळाली आहे.

वन्यजीव चित्रपटनिर्मिती बदलत असताना मी या रोमांचक क्षेत्रात आव्हाने आणि संधी या दोन्हींचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहे. तंत्रज्ञान अधिक अद्यायावत होत आहे, हे माहितीपट निर्मात्यांना नैसर्गिक जग दर्शविण्याचे नवीन मार्ग दाखवत आहे- जे पूर्वी कधीही नव्हते. ड्रोन, चांगले कॅमेरे आणि छान संपादन तंत्रे वापरून आपण वन्यजीवांबद्दलच्या कथा कशा सांगू शकतो, हेदेखील बदलत आहे.

विविध प्राणी आणि वनस्पती परिसंस्थेमध्ये एकत्र कसे काम करतात याची माहिती वन्यजीव चित्रपट करताना स्पष्ट होत जाते. मधमाश्या फुले वाढण्यास कशी मदत करतात, किंवा भक्षक आणि शिकार एकमेकांची संख्या संतुलित कसे ठेवतात हे आपण दाखवू शकतो.
निसर्ग सुंदर असला तरी आपल्याला समस्यांना सामोरे जावे लागते. जंगलतोड, हवामान बदल आणि शिकार या सर्व गोष्टींमुळे पर्यावरणातील समतोल राखणे कठीण होत आहे. वन्यजीव चित्रपट निर्माता म्हणून मला वाटते की, या समस्यांबद्दल बोलणे आणि माझ्या चित्रपटांद्वारे लोकांना त्याबद्दल शिकवणे हे माझे काम आणि जबाबदारी आहे.

हेही वाचा : आठवणींचा सराफा : ‘उफ! क्या आदमी था।

अलीकडच्या वर्षांत, इको-टूरिझम अधिक लोकप्रिय झाले आहे, ज्याच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू आहेत. निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी ते पैसे आणू शकते, परंतु बरेच पर्यटक प्राण्यांना त्रास देऊ शकतात. त्यामुळे यामध्ये संतुलन शोधणे महत्त्वाचे आहे. याचा अर्थ काळजीपूर्वक विचार करणे आणि स्थानिक समुदाय आणि अधिकाऱ्यांसह एकत्र काम करणे. जेव्हा तुम्ही वन्यजीवांवर चित्रपट बनवता तेव्हा तुम्ही खरोखरच प्राणी आणि त्यांच्या अधिवासात सहभागी होता. हे केवळ चित्र काढण्यापुरतेच नाही. ही खटपट निसर्ग समजून घेण्याबद्दल आणि लोकांना ते समजू शकतील अशा प्रकारे दाखवण्याबद्दल आहे. त्यासाठी कथा खूप प्रभावी माध्यम आहे.

मी सुरू करत असलेल्या दोन नवीन प्रकल्पांबद्दल खूप उत्सुक आहे. एक महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांबद्दल आहे आणि दुसरा एका दुसऱ्या राज्यात बिबट्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल आहे. प्रत्येक नवीन प्रकल्प ही समस्या जाणून घेण्याची आणि सोडवण्याची संधीच असते, असे मी समजतो.

kghadge@gmail.com