अमेरिकेत जन्मलेल्या आणि भारतात  जडणघडण झालेल्या उच्चविद्याविभूषित मौक्तिक कुलकर्णी या तरुणाने ‘स्व’च्या शोधात प्रथम दक्षिण अमेरिकेतील तीन देशांमध्ये मोटरसायकलवरून तब्बल आठ हजार मैलांची सफर एकटय़ाने केली. तेवढंच करून तो थांबला नाही, तर त्यानंतर जगातील ३६ देशांची भ्रमंती त्याने जग जाणून घेण्याच्या ध्यासातून केली. तिथले लोक, त्यांची जीवनशैली आणि तिथली संस्कृती स्वानुभवातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. येत्या आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने खुद्द त्याच्याच शब्दांत या भ्रमंतीवरील त्याचं हे अनुभवकथन..
मी अमेरिकेत जन्मलो. महाराष्ट्रातील जळगावमध्ये लहानाचा मोठा झालो. शैक्षणिक यश हीच आयुष्याची इतिकर्तव्यता मानणाऱ्या मराठमोळ्या कुटुंबात वाढताना आपली भाषा, संस्कृती, प्रथा-परंपरा, चालीरीती, खाद्यसंस्कृतीशी निकटचा परिचय झाला. शालेय शिक्षण संपल्यावर पुण्यात इलेक्ट्रिकल इंजिनीयर झालो. नंतर न्यूरोसायन्समधील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलो. या काळात अमेरिकन संस्कृती, तिथली जीवनशैली जवळून पाहायला, अनुभवायला मिळाली. जॉन हॉफकिन्स, स्टॅन्फर्डसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिकत असताना अमेरिकन संस्कृतीशी मानसिक द्वंद्व सुरू झालं. माझ्यातला ‘मी’ शोधण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देईना.
तशात एकदा फुटबॉल खेळताना पायाला झालेली जखम शस्त्रक्रियेच्या टेबलापर्यंत घेऊन गेली. शस्त्रक्रियेत दिल्या जाणाऱ्या साध्या भूलीतही मृत्यू ओढवण्याची एक ते दोन टक्के शक्यता असते, हे डॉक्टरांचे वाक्य कानावर पडले मात्र.. आणि आयुष्याची क्षणभंगुरता तत्क्षणी खाड्कन लक्षात आली. मी कोण? माझ्या जगण्याचे नेमके ईप्सित काय? ते कसे साध्य करता येईल?.. यांसारखे अनेक प्रश्न मेंदू कुरतडू लागले. न्यूरोसायन्स शिकता शिकता या प्रश्नांचीही उत्तरे हळूहळू शोधू लागलो. या अस्वस्थतेतून जगाचा नव्याने परिचय होऊ लागला. आणि निर्णय पक्का झाला : दक्षिण अमेरिकेच्या सफरीवर जाण्याचा! सफर विमानाने नाही, तर मोटरबाइकवरून! अर्जेटिनात जन्मलेला आणि १९५० च्या दशकात दक्षिण अमेरिकेची भटकंती करणारा चे गव्हेरा हा माझा आदर्श! त्याच्याप्रमाणेच एक बॅगपॅक घेऊन कोणतेही पूर्वनियोजन न करता दक्षिण अमेरिकेतील पेरू, चिली आणि अर्जेटिना या तीन देशांच्या भ्रमंतीवर निघालो. ‘दी मोटरसाकल डायरीज्’ या चित्रपटातून स्फूर्ती मिळाली होतीच. मोटरसायकल भाडय़ाने घेतली आणि सहा आठवडय़ांत तब्बल आठ हजार मैल अंतर पार केलं. ही भटकंती मला खूप काही शिकवून गेली.. नवी उमेद देऊन गेली. मनासारखं कसं जगावं, याचे धडे देऊन गेली. जीवन किती सुंदर आहे, हे पटवून गेली. तद्वत आजवर आपल्याला न मिळालेल्या अनेक गोष्टींबद्दलचं वैषम्यही दूर करती झाली.

या नव्या अनुभूतीतूनच ‘अ घोस्ट ऑफ चे- ए मोटरसायकल राइड थ्रू स्पेस, टाइम, लाइफ अ‍ॅन्ड लव्ह’ हे पुस्तक आकारास आलं. माझा हा संपूर्ण ट्रॅव्हॅलॉग http://www.mindswand.wordpress.com  या संकेतस्थळावर आहे. त्याला मिळालेल्या उदंड प्रतिसादावरून मी पुढचं धाडस करायचं ठरवलं.. विश्वभ्रमंतीचं! आणि गेल्या वर्षी एप्रिल २०१२ मध्ये निघालो विश्वभ्रमंतीवर! वर्षभरात ३६ देश पालथे घालून गेल्या मे महिन्यात अमेरिकेला आणि आता भारतात आलोय. या विश्वभ्रमंतीतून मी काय साध्य केलं, असं कुणी विचारलं तर मी त्याचं उत्तर एका अनुबोधपटाद्वारे द्यायचं ठरवलंय. मी पाहिलेलं जग आणि माझा भारत यांच्यात कोणता समान धर्म आहे, कोणता विरोधाभास आहे, हे मला या अनुबोधपटातून दाखवायचं आहे. निर्माते सी. ब्रह्मानंद यांच्या सहकार्याने मी माझ्या या भ्रमंतीवरील ‘रायडिंग ऑन ए सनबीम’ ही डॉक्युमेन्टरी लवकरच घेऊन येतो आहे.
भ्रमंतीवरील पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली, असं कुणी विचारलं तर त्याची बरीच कारणं देता येतील. माझ्या शैक्षणिक प्रवासात काही पाठय़पुस्तके आणि सायन्स जर्नल्स याव्यतिरिक्त माझं फारसं अवांतर वाचन झालेलं नव्हतं. मोजक्याच गूढकथा, आत्मचरित्रे, ट्रॅव्हललॉग्ज आणि थोडीबहुत इतिहासाची पुस्तकं एवढाच माझा वाचनाचा परीघ होता. त्यात ना शेक्सपीयर होता, ना मार्क ट्वेन. ना जेन ऑस्टिन, ना अ‍ॅरिस्टॉटल. ना प्लॅटो, ना चोमस्कीसारखे नावाजलेले कथा-कादंबरीकार वा शास्त्रज्ञ होते. उच्च शिक्षणासाठी मोठय़ा शहरात, अमेरिकेत झालेलं प्रस्थान, स्वावलंबी बनण्याची जिद्द, एखादं लक्ष्य ठरवून ते गाठण्याची चिकाटी आणि स्वतंत्र जगण्याची उमेद या गोष्टींतून माझ्यातील लेखक जागा झाला आणि लिहिण्याची प्रेरणा देऊन गेला. माझ्या जिद्दी स्वभावामुळेच मोटरसायकलवरून तीन देशांच्या भ्रमंतीला होणारा घरच्यांचा विरोध, त्याविषयीची त्यांच्याकडून घातली जाणारी भीती, जीवनातील स्थैर्याचा मोह असे सगळे अडथळे मी झुगारले आणि नवे जग अनुभवण्याची संधी मिळताच कुठलंही अनमान न करता ती साधली. ही संधी मिळेतो मी अमेरिकेतील लुइव्हिले या छोटय़ा शहरात नोकरी करत होतो. अमेरिकेतच जन्मल्याने आयते मिळालेले नागरिकत्व आणि ग्रीनकार्ड या जोरावर पीएच. डी. करून सुस्थित आयुष्य व्यतीत करणं मला सहज शक्य होतं. पण आंतरिक अस्वस्थतेतून भ्रमंतीचा कीडा मला आव्हान देत होता. मनमुक्त भटकंती करणाऱ्या चे गव्हेराचा वारसदार होण्याची संधी मला मिळेल का, हा विचार मनात कायम घर करून होता. आणि त्यानेच मला माझी ओळख पटवली. आणि झालं! अंतर्मुख होऊन एकदाचा निर्णय पक्का केला आणि तडक निघालो.. सहा आठवडय़ांच्या या भ्रमंतीत अनेकविध अनुभव आणि आव्हानांचं घबाडच हाती लागलं. चिली या टिकलीएवढय़ा देशात मोटरबाइक मेकॅनिकबरोबर झालेलं भांडण, अर्जेटिनातील एका कलाकाराची धडपड, ब्राझीलमधील मोकळढाकळं वातावरण, पेरुसारख्या पिटुकल्या देशातील लोकांच्या मनाचा मोठेपणा.. मी याचि देही याचि डोळा अनुभवला आणि जीवनाचं एक नवकोरं, खरंखुरं वास्तव चरचरीतपणे जाणवलं. प्रेम आणि अनुकंपा मानवजातीला कशी बांधून ठेवते याची नवी जाण आली. अर्थात त्याबदल्यात मला काही तडजोडीही कराव्या लागल्या. अमेरिकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडावी लागली. लग्नाचे वय असताना त्याचा गांभीर्याने विचार न केल्यामुळे कुटुंबीयांचा रोष पत्करावा लागला. पण माझी जिद्द पाहून त्यांचा विरोध लवकरच गळून पडला. नंतर माझ्या या धाडसी प्रवासाला त्यांच्याकडून मन:पूर्वक साथ मिळाली आणि माझी मोटरसायकल भ्रमंती यशस्वी झाली.

दक्षिण अमेरिकेतील या तीन देशांच्या सफरीनंतर मला वेध लागले ते विश्वभ्रमंतीचे! माझ्या या भ्रमंतीची सुरुवात आणि सांगता काही दुर्दैवी घटनांनी झाली असली तरी तो निव्वळ योगायोग म्हणायला हवा. मे २०१२ मध्ये माझी ही भ्रमंती सुरू झाली ती इजिप्तमधून. भ्रमंतीच्या पहिल्याच दिवशी कैरो शहरातील तहरीर चौकात उग्र जनआंदोलनात दहा ते पंधरा निदर्शकांचा मृत्यू पाहण्याचं दुर्भाग्य माझ्या वाटय़ाला आलं. तर यंदा १३ एप्रिलला भ्रमंतीहून अमेरिकेत परतलो तेव्हा बोस्टन शहरात मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान झालेल्या बॉम्बस्फोटात तीन निष्पाप अ‍ॅथलीटस् बळी गेलेले मी पाहिले. या दुर्दैवी घटना कायम माझ्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. विसरू म्हणता त्या विसरता येत नाहीत.
या विश्वभ्रमंतीचे महत्त्वाचे सहा टप्पे होते. फ्रॅंकफर्ट (जर्मनी), जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका), बीजिंग (चीन), बॅंकॉक ( थायलंड), सिडनी (ऑस्ट्रेलिया), ब्युनॉस आयर्स (अर्जेटिना)! या भ्रमंतीदरम्यान मी झेललेले धोके, काही भन्नाट अनुभव आणि जीवावर बेतलेली काही संकटं मला आयुष्यभर पुरेल इतका रोकडा अनुभव देऊन गेली. या भटकंतीत चित्तचक्षूचमत्कारिक असे निरनिराळे अनुभव पदरी पडले. त्या सर्वातून मी आज आणखीन कणखर बनलो आहे. हे अनुभव अर्थातच सर्वार्थानं समृद्ध करणारे होते.. विचारांना प्रगल्भ करणारे होते. माणूस म्हणून माझं क्षितीज विस्तारणारे होते..
नॉर्वेत ओस्लो ते ट्रोमसो या विमानप्रवासात विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे विमान अवघ्या दहा मिनिटांत हजारो फूट खाली झेपावलं. त्यावेळी आयुष्याचा शेवट जवळ आल्याचा थरारक अनुभव मी घेतला. कुणी बायबल, कुणी कुराण, कुणी गीता हातात धरून प्रार्थना करत होतं. देवाची करुणा भाकत होतं. त्या क्षणांतली ती नि:शब्द, भयाण शांतता, प्रवाशांचे प्राणभयानं व्याकुळलेले चेहरे सर्व काही संपल्याची जाणीव करून देत होते. वैमानिकाचे मात्र हे संकट टाळण्याकरता शर्थीचे प्रयत्न जारी होते. त्याने ज्या कुशलतेने विमान सावरले आणि सुखरूपरीत्या मार्गस्थ केले तेव्हा आम्ही सर्वानी शब्दश: सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यावेळचा सहप्रवाशांचा पुनर्जन्माचा आनंद शब्दांत वर्णन करता येणं अवघड आहे.
टांझानियात १९ हजार फूट उंचीच्या किलीमांजोरा शिखरावर चढाई करत असताना अचानक माझ्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्या अवस्थेतही कसाबसा मी १६ हजार फूट शिखर चढून गेलो. परंतु नंतर मात्र असह्य़ वेदनांनी मला माघारी फिरावे लागले. इतक्या नजीक पोहोचूनही शिखर पादाक्रांत करता आलं नाही याचं खूप दु:ख झालं. पण नाइलाज होता.
या भ्रमंतीत काही अनपेक्षित गोष्टी अकस्मात सामोऱ्या आल्यावर थक्कही व्हायला झालं. व्हेनिसमध्ये दोन इटालियन विद्यार्थी हिंदी भाषेचा अभ्यास करताना दिसले तेव्हा माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही. त्याचबरोबर बर्लिनमधील दुसऱ्या महायुद्धाच्या निर्घृण खुणा पाहताना नाझी राजवटीचा क्रूर इतिहास डोळ्यांपुढे उभा राहिला. पोलंडमधील क्रॅकाव्ह शहरातील जगप्रसिद्ध ऑस्तविझ संग्रहालयामधील लाखो ज्यूंच्या कत्तलींचे पुरावे बघून जितका सुन्न झालो, तितकाच बैरूट या ‘पॅरिस ऑफ दि मिडल-ईस्ट’ हे बिरूद मिरवणाऱ्या शहरातील पॅलेस्टिनी निर्वासितांच्या छावण्यांतील विदारक परिस्थिती पाहून संताप तर आलाच; शिवाय प्रचंड अस्वस्थही वाटलं.
विमानतळावरील संशयित नजरेची अंगझडती व कसून तपासणी नेमकी कशी असते, हे इस्रायलमध्ये प्रत्यक्ष अनुभवलं. कुटुंबप्रधान संस्कृती आणि जीवनाबद्दलची आसक्ती मला स्पेनमध्ये अनुभवायला मिळाली. तिथं मला भारताचं, भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब आढळलं.
लोकक्षोभामुळे धुमसणाऱ्या इजिप्तमधील तहरीर चौकात शरीरात सात-आठ गोळ्या घुसलेला एक लेखक मला भेटला. तहरीर चौकात नेमकं काय घडलं, याचा प्रत्यक्षदर्शी साद्यंत वृत्तान्त त्याच्याकडून मला प्रथम कळला. लेबनॉनमधील पॅलेस्टिनींच्या कथा-व्यथांनी हृदय पिळवटून निघालं. तरुण, सुशिक्षित मुलामुलींच्या बोलण्यातून जाणवलेल्या त्यांच्या अंध:कारमय भवितव्याचा वेध घेताना मन विषण्ण झालं. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या क्रूर इतिहास आणि वर्तमानाशी परिचित होत असतानाच मी ऑस्तावित्झच्या छळछावण्यांनाही भेट दिली. ही भेट म्हणजे अक्षरश: शरीर व मन गोठवून टाकणारा अनुभव होता.
रेडियो सिलोनवरून कोणे एकेकाळी झांझीबार हे नाव मी ऐकलं होतं. याच झांझीबारमधील निर्मनुष्य समुद्रकिनाऱ्यावर फरिद अत्तार या कवीची ‘दि कॉन्फरन्स ऑफ दि बर्डस्’ ही कविता वाचतान मला सात्विक समाधान मिळालं. तर चीनमधील झितान या शहराकडे जाणारा रस्ता चुकल्यावर माझी जी काही भंबेरी उडाली होती, तिला तोड नाही. हातवारे आणि इशाऱ्यांच्या भाषेतून चिनी लोकांना टेराकोटा वॉरियर्सविषयी समजावून सांगताना केलेली धडपड अखेरीस सार्थकी लागली तेव्हा एवढा आनंद झाला म्हणून सांगू!
चित्रविचित्र आवाजांनी भारलेलं.. अगणित पक्षी-प्राण्यांच्या वसाहती असलेलं अ‍ॅमेझॉनचं जंगल! तिथलं नीरव, गहन-गूढ वातावरण.. व्वॉव! अमेझिंग! वर्णन करण्यासाठी शब्द सापडत नाहीत. अ‍ॅमेझॉनचा प्रत्यक्षानुभवच घ्यायला हवा. पण त्यासाठी शरीर आणि मन दोहोंचीही तंदुरुस्ती हवी. प्रचंड उष्णता आणि तेवढीच आद्र्रता. तहानेनं अक्षरश: जीव व्याकुळ होतो. पण प्यायला पिण्यायोग्य पाणी मात्र या जंगलात कुठंच नाही. आमच्या गाइडने जंगलातलं एक तळं दाखवलं. त्यावर शेवाळाचे थरच्या थर चढलेले. हे पाणी प्यायचं? बाप रे! कल्पनेनेच जीवाचा थरकाप उडाला. तशात सफरीवर निघताना हेपिटायटिस ए आणि बीची लस टोचून न घेतल्याने आधीच घाबरगुंडी उडालेली. सोबत तुटपुंजं मिनरल वॉटर. खाताना वापरलेली डिश धुण्याचा प्रश्नच नव्हता. हे कमी की काय म्हणून जंगलात डासांचाही हैदोस. प्रचंड उष्णता आणि आद्र्रतेमुळे घामानं निथळणारं शरीर पाहून मला एक जुनी आठवण झाली. तेव्हा मी बॅडमिंटन खेळायला जायचो. बरोबर तीन-तीन टी-शर्टस् असायचे. त्यातले दोन खेळताना आलेल्या घामाने चिंब भिजायचे. म्हणून मग तिसरा घरी परत येताना घालायचा.

सध्या मी भारतभ्रमंतीवर एक अनुबोधपट बनवतो आहे. माझा आणि माझ्यासोबत अमेरिकेतून प्रथमच भारतात आलेल्या एका अमेरिकन तरुणीचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, भारतातील सामाजिक परिस्थितीबद्दलचे आमचे निष्कर्ष, भारताचा आर्थिक विकास कितपत झालेला आहे, भारतीयांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना किती रुजली आहे, इत्यादी विषयांना अनुसरून ही सुमारे दीड तासाची ‘क्रॉस-कल्चर’ डॉक्युमेंटरी असेल. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचं आनंदवन, नैसर्गिक स्त्रोतांनी समृद्ध असूनही अत्यंत मागासलेला भारताचा किशनगंज हा भाग, पूर्वाचलातील ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखली जाणारी राज्ये, तेथील मातृसत्ताक पद्धती, भारतात सर्वप्रथम पर्यावरणविषयक चळवळ उदयास आली तो खेजारीचा भाग, राजस्थानमधील वाळवंटात जगण्यासाठी तेथील बिष्णोई समाजाने ठरवलेली २९ सूत्रे काय आहेत याविषयीची माहिती, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा दुसरा चेहरा तसेच अयोध्येत जाऊन धर्म आणि त्याचा जीवनावरील प्रभाव यावर तिथल्या लोकांशी चर्चा करून आलेले अनुभव या डॉक्युमेंटरीत असतील.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

तर काय सांगत होतो.. एक डास जरी कानाभोवती गुणगुणला तरी रात्रभर न झोपणारा मी! पण इथं अ‍ॅमेझॉनच्या या घनदाट जंगलात हजारो डास शरीरावर घुटमळत असताना कशीबशी वाटचाल करीत होतो. अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील दिवसभराच्या भटकंतीनंतर सूर्य मावळतीला आला होता. गर्द वृक्षांच्या किंचितशा फटींमधून होणाऱ्या सूर्यकिरणांतून सूर्यास्त होत असल्याचं जाणवलं. इतक्यात गाइडची घोषणा ऐकू आली- ‘आज रात्रीचा मुक्काम ट्री-हाऊसमध्ये.’ हे ट्री-हाऊस काय असतं, ते बघण्याची उत्सुकता लागून राहिली. तोवर त्या ठिकाणी आम्ही येऊन पोचलो. पाहतो तो काय? आम्ही चक्क ४५ मीटर उंचीच्या एका झाडाखाली उभे होतो. आमचा गाइड दोरखंडाच्या साहाय्याने भरभर त्या झाडावर चढून गेला आणि आम्हाला वर बोलावू लागला. आमची प्रचंड घाबरगुंडी उडाली होती. पण ती चेहऱ्यावर न दाखवता झाडावर चढण्याचं आव्हान स्वीकारलं. कसातरी एकदाचा झाडावर चढलो. शेंडय़ापर्यंत गेलो तर तिथे ‘ट्री-हाऊस’ वगैरे काहीही नव्हतं. झाडाच्या शेंडय़ावर ५ मीटर x ५ मीटर चौरस आकाराचा बांबूचा प्लॅटफॉर्म तयार केला होता. या ‘ट्री-हाऊस’मध्ये रात्र काढायची म्हणजे कठीणच होतं. त्यात आणखी सभोवती हजारो डासांची निरंतर भुणभुण! डास हा प्राणी माझा जिवंत शत्रू आहे. माझ्या अंगावर, कपडय़ांवर थर चढला होता. डासांनी चावून चावून माझी पाठ चांगलीच लालबुंद केली होती. ती पाहून एका सहप्रवाशाने माझ्या लालबुंद पाठीचा फोटो काढला होता.
कशीबशी ती रात्र सरली. पहाटेच्या पहिल्या प्रहरी जंगलात पक्ष्यांचे चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागले आणि आम्ही सुटकेचा श्वास सोडला. त्या दिवशी लाखो कीटकांच्या किरकिरीत मावळत्या सूर्याच्या साक्षीने चिखलभरलं जंगल तुडवीत, ओढे-नदी पार करत अखेरीस ही जंगलसफारी पूर्ण केली.

मध्य-पूर्वेतला अनुभव यापेक्षा पूर्णपणे भिन्न! ‘पॅरिस ऑफ दि मिड्ल-ईस्ट’ या उपाधीला बैरूट हे शहर खऱ्या अर्थानं जागलं आहे. कैरोवरून बैरूटला जाताना विमान चुकते की काय अशी आणीबाणीची स्थिती निर्माण झाली. त्याला कारण होतं- विमानतळावरील कडक सुरक्षाव्यवस्था. माझ्या ई-तिकिटावरील एका टॅगिंगमुळे विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना मी संशयित प्रवासी वाटलो. तिकिटाच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करण्यासाठी त्यांनी माझ्याकडे क्रेडिट कार्डची विचारणा केली. पण मी ते अमेरिकेतच सोडले होते. क्रेडिट कार्डचे शेवटचे चार अंक मला कसेबसे आठवले. आधीचे मी साफ विसरून गेलो होतो. त्यामुळे त्यांच्या संशयात आणखीनच भर पडली. त्यांनी अमेरिकेतील माझा बँकेचा खाते क्रमांक विचारला. त्यात माझा सेलफोन बंद होता. शेजारी उभ्या असलेल्या एका बार्सिलोनाच्या नागरिकाचा फोन घेऊन मी माझ्या बँकेशी संपर्क साधला. परंतु अनोळखी नंबरवरून आलेल्या फोनवर तपशील देण्यास बँकेने स्वच्छ नकार दिला. माझ्या सुदैवाने त्याचवेळी विमानतळावरील बंद पडलेली ‘हॉटस्पॉट’ कॉन्टॅक्ट लाइन सुरू झाली आणि मला हवा तो तपशील मिळवता आला. विमानोड्डाणाला अवघा पंधरा मिनिटांचा अवधी होता. माझ्या नावाची वारंवार उद्घोषणा होत होती. इमिग्रेशनची औपचारिकता घाईघाईने आटोपून मी विमानाकडे धावलो तेव्हा मी अखेरचाच प्रवासी चढायचा बाकी होतो.
ऑस्तविज्झच्या छळछावण्या.. हिटलरने उभारलेल्या या छळछावण्या, तिथली विषारी वायू बनवण्याची उपकरणे, इथे मारल्या गेलेल्या निष्पाप ज्यूंचे बूट, केस, कपडे, सुटकेसेस.. सगळंच भीषण.. अंगावर शहारे आणणारं होतं. ते पाहत असताना मधेच गाइडचे शब्द कानावर पडत- ‘वॉच युवर स्टेप्स प्लीज.’ या छावण्यांमधील प्रत्येक खोलीनं स्वत:मध्ये सामावलेलं एक असह्य़ असं दु:ख आहे. इथे जीवे मारल्या गेलेल्या ज्यूंच्या रोजच्या वापरातल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि ते पाहणारे पर्यटक यांच्यादरम्यान एक रेष ओढलेली होती. परंतु ती काहीशी अस्पष्ट झालेली होती. त्या लक्ष्मणरेषेवर पाय ठेवून आपण थोडं जरी पुढे गेलो तर तिथे बळी पडलेल्या निरपराध आत्म्यांचा अवमान होईल, या विचारातूनच गाइड सतत ते सांगत होता आणि आम्हाला सावध करत होता. या संग्रहालयातील वस्तू पाहताना हिटलरची क्रूर, मुर्दाड मूर्ती डोळ्यांपुढे उभी राहिली.
या विश्वभ्रमंतीनं मला काय न दाखवलं? मानवी संस्कृतींचे विविधांगी नमुने.. जिवावर बेतलेले प्रसंग.. वैश्विकतेचं महन्मंगल रूप.. क्रौर्य, संशयग्रस्तता, दिलदारी, आपलेपणा.. अन् फसवणूकही! आज त्या सगळ्याकडे काहीसं अलिप्तपणे पाहताना मनात एक तृप्ती भरून राहिलीय.. मानवतेची!
शब्दांकन : अमृता करकरे
amruta.karkare@expressindia.com

Story img Loader