हाताला बांधलेला टवटवीत मोगऱ्याचा गजरा.. तसाच मस्त स्वभाव.. अभिजातता आणि माधुर्य, कारागिरी आणि सहजता असा विलक्षण मिलाफ असलेलं सांगीतिक सृजन म्हणजे स्वर-वसंत.. वसंत देसाई! वसंतरावांच्या ‘तेरे सूर और मेरे गीत’वर डोलला नाही आणि ‘दिल का खिलौना हाय टूट गया’ ऐकताना गलबलला नाही असा रसिक सापडणार नाही. शास्त्रीय संगीताचा धाक वाटू न देता सामान्य श्रोत्यांना ते गुणगुणायला लावणाऱ्या नौशादजींबरोबरच अत्यंत आदरानं घ्यायचं नाव म्हणजे वसंत देसाई. त्या अज्ञात, सर्वशक्तिमान, सर्वसाक्षी परमेश्वराची करुणा भाकायला ‘ए मालिक तेरे बंदे हम’सारखी दैवी सुरावट ज्यांना सुचू शकली, ते वसंत देसाई.
माझ्या पिढीच्या लहानपणापासून ‘हम को मन की शक्ति देना’ या गाण्याशी शालेय आठवणी घट्ट जोडल्या गेल्या आहेत. विशेषत: त्या वयात, की जेव्हा या गाण्याचे संगीतकार वसंत देसाई आहेत, हेही माहीत नव्हतं. पण त्या गाण्याची वातावरणनिर्मितीची क्षमता इतकी मोठी, की आजही हे गाणं त्या काळात घेऊन जातं आणि शाळेचं स्नेहसंमेलन डोळ्यापुढे येतं. वसंतरावांचं संगीत सतत सात्त्विक, राजस वाटत आलंय, याचं रहस्य कदाचित त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच दडलेलं असावं. शास्त्रीय संगीताचा भक्कम आधार असला की स्वत:चं सृजन कमी असतं किंवा नसतंच, असा काहीजणांचा (गर)समज आहे. तसं असतं तर प्रत्येक संगीत विशारद व्यक्ती ‘संगीतकार’ होऊ शकली असती. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या रागरागिण्या, त्यांच्या स्वराकृती आपल्याला अनुवंशाने मिळाल्या आहेत हे खरं; पण त्याची अचूक योजना करण्यासाठी, त्या रागाच्या सर्व शक्यता आजमावण्यासाठी संगीतकाराकडे स्वत:चं सृजन नक्कीच असावं लागतं.. चित्रपटाच्या माध्यमावर, गाण्याच्या दृश्यात्मक स्वरूपावर विलक्षण पकड असावी लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शब्दांचा भाव ओळखून रागांच्या स्वराकृती त्याप्रमाणे वळवणं, ही किमया आत्मसात असावी लागते. (याचं उदाहरण आपण ऐकणार आहोत.) या सगळ्याचा प्रत्यय वसंतरावांच्या संगीतयोजनेत येतो. असा संगीतकार मग चित्रपटांच्या गाण्यांपुरताच मर्यादित राहत नाही, तर त्याची झेप पाश्र्वसंगीतापासून संगीत नाटक, वृंदगान, नृत्यनाटिका (बॅले) या सर्वाना कवेत घेऊ शकते. (आपण या सदरात वसंतरावांच्या िहदी चित्रपटगीतांचा प्रामुख्याने आस्वाद घेणार आहोत.)
मेलडीला पुढे नेता नेता माधुर्य सांभाळूनही आव्हानात्मकता कायम ठेवणारं संगीत देणं कठीण असतं. कारण गाणं नुसतं ‘गोड गोड’ असून चालत नाही. त्यात कुठेतरी चमत्कृती, excitement असावी लागते. आणि अशी एखादी Phrase गाण्याला त्या ‘रागा’पासून, त्या चौकटीतून वेगळे काढते. मग त्या गाण्यात ‘राग’ उरत नाही, तर ती एक स्वतंत्र रचनाच बनते. वसंत देसाईंचं वैशिष्टय़ हे, की रागाची चौकट न मोडता त्यातला गोडवा चालींमध्ये कसा पुरेपूर उतरेल, हे त्यांनी पाहिले. मग तो ‘बिहाग’ असो, ‘मिया मल्हार’ किंवा ‘भरवी’ असो. आता- ‘तेरे सूर..’ हा राग ‘बिहाग’ आहे; पण उठून येते ती एक स्वतंत्र मेलडी. वसंतरावांनी गाणी दिली, ती अशी. कित्येक वेळा मूळ बंदिशीचा ताल बदलून त्या बंदिशीला सोपेपणाकडे वळवण्यात त्यांची कुशल योजना दिसली (‘बोले रे पपिहरा’), तर लोकसंगीताचा ग्रामीण बाज चित्रपटगीतासाठी नेमकेपणाने वापरताना त्याचं एका ‘परिष्कृत’ गाण्यात परिवर्तन ते करू शकले.. (सया झूठों का बडा..)
वसंतरावांच्या गाण्यांचा विचार रागांशिवाय आपल्याला करताच येत नाही. ‘मालगुंजी’ (‘नन सो नन’), ‘केदार’ (‘हम को मन की शक्ति’), ‘भरवी’ (‘जो तुम तोडो पिया’, ‘दिल का खिलौना’, ‘मेरे ए दिल बता’), ‘अडाणा’ (‘झनक झनक पायल बाजे’), ‘मिया मल्हार’ (‘बोले रे पपिहरा’).. ही काही निवडक उदाहरणं. पण ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’साठी चिनी संगीताशी जवळीक साधणाऱ्या ‘भूप’ रागाची योजना करण्याचे श्रेय वसंतरावांनाच द्यावं लागतं. ‘झनक झनक पायल बाजे’ हे गाणं ‘दरबारी’तून ‘अडाण्या’त ते ‘फिरवू’ शकले, कारण दोन्ही रागांचे स्वर सारखेच; पण ‘अडाणा’ उत्तरांगप्रधान असल्यामुळे शांतारामबापूंना हवा असलेला ‘ब्राइटनेस’ मिळाला आणि गाणं उठावदार झालं.
सोनावडे या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातल्या गावी ९ जून १९१२ रोजी जन्मलेल्या वसंत कृष्णाजी देसाईंनी खरं म्हणजे अभिनय करण्याच्या हौसेपोटी व्ही. शांतारामांना गाठलं होतं. लांब केस आणि किरकोळ देहयष्टी असलेल्या वसंतरावांना व्ही. शांतारामांनी आपादमस्तक न्याहाळत ‘इथे पडेल ते काम करावं लागेल,’ असं सांगितल्याचं खुद्द वसंतरावांनीच एका मुलाखतीत सांगितलंय. शास्त्रीय संगीताचं शिक्षण उस्ताद आलमखाँ, इनायतखाँ यांच्यासारख्या गुरूंकडून घेता घेता धृपद धमार गायकीची संथा त्यांना साक्षात् डागर बंधूंकडून मिळाली.. हे सगळं संचित त्यांच्या चालींच्या विशिष्ट स्वरलगावात, नेटक्या बांधणीत प्रतििबबित होताना दिसतंच. ‘अयोध्या का राजा’ (१९३२) मध्ये ‘सकल जगत में छत्रपती’ हे गाणंही वसंतराव गायले. काही चित्रपटांतून अभिनयही केला. या काळात प्रभातच्या अनेक चित्रपटांत गाणी संगीतबद्ध करूनही कंपनीशी करार असल्यामुळे त्यांच्या नावावर ते चित्रपट लागले नाहीत.
खऱ्या अर्थानं वाडिया ब्रदर्सच्या ‘शोभा’ (१९४२) मध्ये त्यांनी स्वतंत्रपणे संगीत दिलं. पण एक गोष्ट नक्की, की चित्रपटासंदर्भात ‘पडेल ते काम’ करण्याचा गुरूमंत्र शांतारामबापूंकडून मिळाल्यामुळे केवळ संगीतच नव्हे, तर चित्रपटनिर्मितीच्या प्रत्येक तांत्रिक अंगाशी त्यांचा परिचय झाला. गोिवदराव टेंबे, केशवराव भोळे, मा. कृष्णराव यांच्यासारख्या शास्त्रीय संगीताकडून चित्रपट संगीताकडे आलेल्या दिग्गजांचे संस्कार वसंतरावांच्या संगीतशैलीवर होतेच; पण जेव्हा शास्त्रीय संगीताच्या आणि नाटय़संगीताच्या अपरिहार्य पगडय़ातून चित्रपटगीत एक स्वतंत्र फॉर्म म्हणून स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडत होतं (कर्तृत्ववान आई-वडिलांच्या प्रभावातून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मुलानं धडपडावं, तद्वत-) अशा संक्रमणकाळात वसंतरावांनी चित्रपटांना संगीत दिलं आणि हा फॉर्म लोकप्रियतेकडे नेण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.
शांतारामबापूंबरोबर वसंतरावांनी ‘शकुंतला’, ‘जीवनयात्रा’, ‘डॉ. कोटणीस की अमर कहानी’, ‘मतवाला शायर राम जोशी’, ‘अंधों की दुनिया’, ‘मौसी’, ‘दहेज’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘तूफान और दिया’, ‘दो आँखे बारह हाथ’ असे अनेक चित्रपट केले. पण त्यांच्याशिवाय केलेल्या ‘गूँज उठी शहनाई’, ‘स्कूलमास्टर’, ‘अर्धागिनी’, ‘प्यार की प्यास’, ‘संपूर्ण रामायण’, ‘रामराज्य’, ‘आशीर्वाद’, ‘गुड्डी’, ‘रानी और लाल परी’ याही चित्रपटांतलं त्यांचं संगीत गाजलं. त्यापैकी काही निवडक गाण्यांचा आस्वाद घेऊ..
‘तेरे सूर और मेरे गीत’ (भरत व्यास- ‘गूँज उठी शहनाई’)
या गाण्याची मोहिनी मनावरून जाता जात नाही. अत्यंत गोड, सुरुवातीच्या गुणगुणण्यापासूनच मनाचा ठाव घेणारं हे गाणं म्हणजे मेलडीचा उत्तुंग आविष्कारच. ‘दोनो मिलकर बनेगी प्रीत’ म्हणताना ‘दोनो’ शब्दांवर केलेली गंमत पाहा. ‘गमपनी धनीसाधप’ या ‘Phrase’मुळे ‘दोनो’ हा शब्द नकळत अधोरेखित झालाय. एकमेकांचे शब्द-सूर जुळल्यावर त्या चिरंतन प्रीतीचा मोहरून टाकणारा अनुभव कसा असेल? ही उत्कंठा त्या एका जागेमुळे उमाळ्याने समोर येते. दादऱ्याच्या सुंदर ठेक्यात मधाळ स्वर-शब्दांची गुंफण. एकही शब्द कानाला टोचत नाही. या गाण्याच्या दुसऱ्या अंतऱ्यात एक छोटासा आलाप आहे. हा आलाप पहिल्या अंतऱ्यात नाही. याचं कारण असं असावं, की दुसऱ्या अंतऱ्यात ती स्वत:च्या प्रेमाची ताकदच पणाला लावतेय आणि सांगतेय-
‘मुझ को अगर भूल जाओगे तुम
मुझसे अगर दूर जाओगे तुम
मेरी मुहब्बत मे ‘तासीर’ है.. (आलाप)
तो िखच के मेरे पास आओगे तुम..’
ही तासीर, शक्ती, प्रेमाची प्रचंड परिणामकारकता या आलापामुळे लक्षवेधी ठरते.. आणि ‘िखच के’ शब्दाला ज्या पद्धतीने ‘खेचलंय’ ते ऐकण्यासारखंच. मग आता हा ‘बिहाग’ कुठे उरला? कानावरून मोरपीस फिरवत नितांतसुंदर रोमँटिक गाण्यांमध्ये हे गाणं अलगद जाऊन बसलं..
‘दिल का खिलौना हाय टूट गया’ (भरत व्यास- ‘गूँज उठी शहनाई’)
दु:खी गाण्याची लय धीमी असावी, या कल्पनेला छेद देणारं.. किंचित जलद लयीत बांधलेलं, तरीही आर्त असं हे गाणं. प्रत्येक वेळी ‘टूट’, ‘छूट’, ‘लूट’ हे शब्द इतके सुंदर लांबवलेत, की ती व्यथा क्षणार्धात भिडावी.. ही ‘कविता’-
‘दिल का खिलौना हाय टूट गया,
कोई लुटेरा आ के लूट गया..’
अशीच असावी आणि त्या ओळींमध्ये काही ठिकाणी पेरलेला ‘हाय’ हे संगीतकाराचं सृजन असावं असा कयास आहे. कारण पहिल्या दोन ओळींमधल्या ‘हाय’मध्येसुद्धा फरक आहे. पहिल्या ‘कोई लुटेरा’च्या वेळी तो वरच्या स्वरावर, तर दुसऱ्या वेळी सुस्कारा टाकल्यागत खाली सोडून दिलेला हताश असा ‘हाय’! टपकन् अश्रू ओघळावा तसा. अंतऱ्यातही-
‘तेरा एतबार करके ‘हाय’ इंतजार करके
खुशियों के बदले गम की दुनियाँ बसायी..’
असा खूप नसíगकपणे येतो. आधी उल्लेख केल्याप्रमाणे, भरवीच्या सुरांना शब्दाप्रमाणे वळवण्याची जादू ‘उल्फत का तार तोडा’ म्हणताना ‘तार’ला दिलेला तो हेलकावा ऐकताना लक्षात येते.
‘हुआ क्या कुसूर ऐसा संया हमारा,
जाते हुऐ तो तूने हमे ना पुकारा..’
‘कुसूर’ शब्द वरच्या षड्जावर ठेवून हीच जादू वसंतरावांनी साधली आहे. असा माझा काय गुन्हा- की जाताना मला साधी हाकही मारली नाहीस. खेळलास या हृदयाशी.. आणि तोडून टाकलंस की खेळता खेळता!
‘जीवन में पिया तेरा साथ रहे’ (भरत व्यास- ‘गूँज उठी शहनाई’)
िहदी चित्रपटांमध्ये जी अप्रतिम द्वंद्वगीतं झाली, त्यात फार वरचा क्रमांक आहे या गाण्याचा. क्वचित आढळणारी इतकी जलद लय.. गाण्याच्या सुरुवातीच्या ‘रोक सके ना राह हमारी दुनिया की दीवार..’ या ओळी- या गाण्याला खूप वेगळं बनवतात. किंचित विरामानंतर लता-रफीच्या आलाप- तानांची जी जुगलबंदी सुरू होते.. वा! दोघांच्या गळ्यातून गेलेल्या ताना एकमेकांना साद-प्रतिसाद देत शब्दांपलीकडे जातात. तारसप्तकाचा थेट आकारातला षड्ज रफीच्या आवाजात ऐकणं हा एक श्रेष्ठ आनंद. संपूर्ण गाणं म्हणजे एक सुंदर संवाद आहे. खरंच, मनातल्या मनात आनंदानं नाचावं असं काही या गाण्यात आहे. दोन अंतऱ्यांच्या चालींमध्ये साम्य असलं तरी ‘रहे तब तक प्रीत अमर अपनी’ ही ओळ वेगळी बांधून, ‘तब तक’ हे शब्द कोमल निषादावर ठेवून त्या ओळीला वसंतराव ‘काळापलीकडे’ नेतात. चालीत केलेला छोटासा बदल काय किमया करू शकतो! ‘सरगम की सदा बरसात रहे’नंतर एक छोटासा Pause आहे, आणि तबल्याची मस्त थाप घेऊन पुढची ओळ निघते. दोन कडव्यांमधल्या म्युझिकसाठी बोंगो.. आणि अंतऱ्याच्या वेळी जबरदस्त उठावण घेऊन पुन्हा तबला आणि ढोलक असा हा मस्त प्रकार आहे. शब्द नाचरे होतात.. स्वरात लय गुंफली जाते.. शुभ्र फेसाळ, वेगवान धबधब्यासारखं असणारं हे गाणं श्वास रोखून ऐकायचं.
वसंतरावांच्या आणखी काही अभिजात रचनांचा आस्वाद घेऊ पुढच्या भागात.. (क्रमश:)
संग्रहित लेख, दिनांक 14th Sep 2014 रोजी प्रकाशित
‘तेरे सूर और मेरे गीत..’
हाताला बांधलेला टवटवीत मोगऱ्याचा गजरा.. तसाच मस्त स्वभाव.. अभिजातता आणि माधुर्य, कारागिरी आणि सहजता असा विलक्षण मिलाफ असलेलं सांगीतिक सृजन म्हणजे स्वर-वसंत.. वसंत देसाई!

First published on: 14-09-2014 at 02:39 IST
मराठीतील सर्व रहे ना रहे हम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Your music my songs