लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास काही तासांचाच अवधी शिल्लक असताना भाजपने पाठिंबा देणाऱ्या सर्वाचे स्वागत करण्याची तयारी दर्शविली आह़े  परंतु, द्रमुकने मात्र २००२ सालच्या गुजरात दंग्यांवर बोट ठेवत भाजपप्रणीत एनडीए आघाडीत सहभागी न होण्याचाच निर्णय घेतला आह़े  मात्र त्याच वेळी तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) निवडणुकोत्तर युतीसाठी सर्व द्वारे खुले ठेवली आहेत़
बीजेडी, अण्णाद्रमुक या पक्षांनी नव्या युतीसाठी सिद्धता दर्शविली असताना, नव्याने तयार झालेल्या तेलंगणातील महत्त्वाचा पक्ष असणाऱ्या टीआरएसनेसुद्धा युतीसाठी कवाडे उघडी ठेवली आहेत़  नवे राज्य अस्तित्वात आल्यामुळे आम्हाला केंद्रात अत्यंत साहाय्यकारी शासन हवे आह़े  उद्या काय घडेल ते आपल्याला माहीत नाही़  त्यामुळे जरतरच्या प्रश्नांना मला उत्तरे द्यायची नाहीत, असे टीआरएसचे ज्येष्ठ नेते के. टी़  रामा यांनी यासंदर्भात सांगितल़े  द्रमुकचे प्रवक्ते टी़  क़े एस़  एलांगोवन यांनी मात्र एनडीएशी युतीची शक्यता पूर्णत: फेटाळून लावली आह़े