लोकसभा निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पहिला निकाल दुपारी एक वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता असून, सायंकाळी साडेचापर्यंत सारे चित्र स्पष्ट होईल, असा निवडणूक आयोगाचा अंदाज आहे. पहिला निकाल हा दक्षिण मुंबई मतदारसंघातील जाहीर होऊ शकतो.
राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये ८९७ उमेदवार रिंगणात असून, सर्वात जास्त ३९ उमेदवार बीड मतदारसंघात तर सर्वात कमी सात उमेदवार बारामती मतदारसंघात आहेत. सर्वात कमी १५४६ मतदान यंत्रे ही दक्षिण मुंबई मतदारसंघात आहेत. यामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघातील निकाल सर्वात पहिला जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त यंत्रे ही सातारा मतदारसंघात आहेत. ठाणे मतदारसंघाची मतमोजणी वागेळ इस्टेट भागातील आय.टी.आय. मध्ये होईल.
केंद्रावर तीन स्तरीय सुरक्षा कवच
५ अतिरिक्त पोलीस आयुक्त, २२ पोलीस उपायुक्त, १४ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि ६७ पोलीस निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल तसेच राज्य राखीव दलाच्या तुकडय़ांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतमोजणीकेंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत. यंदा त्रिस्तरीय सुरक्षा कवच असून आचारसंहिता लागू असल्याने केंद्राच्या १०० मीटर परिसरात वाहने आणण्यास मनाई करण्यात आली आहे. निकालानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमक उडू नये यासाठी केंद्राच्या बाहेर सर्वत्र बॅरिकेडस लावण्यात आल्या आहेत. परवानगी घेऊन राजकीय पक्षांना मिरवणुका काढता येतील. परंतु परिस्थिती पाहूनच परवानगी देण्यात येतील, असे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) धनंजय कमलाकर यांनी सांगितले.
मतमोजणीची ठिकाणे
*मुंबई एक्झिबिशन सेंटर, हॉल क्र. ७ उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई
*हॉल क्र. ३  – वायव्य मुंबई
*उदयांचल प्रायमरी शाळा, विक्रोळी – ईशान्य मुंबई
*रुपारेल महाविद्यालय – दक्षिण मध्य मुंबई
*एलफिस्टन महाविद्यालय – दक्षिण मुंबई