नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार हीना गावित यांचा उमेदवारी अर्ज अखेर ग्राह्य़ धरण्यात आला. ‘सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया या निर्णयानंतर हीना यांनी व्यक्त केली. तर उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल करावी किंवा नाही, याविषयी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे काँग्रेसने ठरविले आहे.
हीना या वैद्यकीय शास्त्राच्या विद्यार्थिनी असल्याने त्यांची निवासी वैद्यकीय सेवा आणि त्यांना मिळणारे विद्यावेतन हे शासन लाभाअंतर्गत येत असल्याचे कारण पुढे करत, त्यांच्या उमेदवारीवर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून हरकत घेण्यात आली होती. या सर्व मुद्दय़ांवर दोन्ही बाजूंकडून मांडण्यात आलेल्या युक्तिवादानंतर जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी हीना यांच्या बाजूने निकाल दिला.
छाननी प्रक्रियेत काँग्रेसचे भरत गावित आणि आपचे उमेदवार वीरेंद्र वळवी यांनी हीना यांच्या उमेदवारीवर हरकत घेतली होती. हीना यांना वैद्यकीय शास्त्राचे शिक्षण घेताना निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करावे लागते. त्या बदल्यात त्यांना शासनाकडून विद्यावेतन दिले जात आहे. ही बाब शासकीय लाभांतर्गत येत असल्याने, हीना यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा, अशी हरकत घेण्यात आली होती.
या हरकतीवर बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी झाली. यावेळी हीना यांच्यासोबत हरकतदार आणि त्यांचे वकीलही उपस्थित होते. हीना यांना शिक्षणावेळी शासनाकडून वैद्यकीय सेवा अनिवार्य करण्यात आली. ही सेवा म्हणजे शासकीय कर्मचारी नसल्याचा युक्तिवाद हीना यांचे वकील उदय मालते यांनी केला. हरकतदारांच्या वकिलांनी ही सेवा शासन लाभांतर्गत येत असल्याचे नमूद केले. उभय पक्षांच्या युक्तिवादानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी हीना यांचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून अर्ज वैध ठरवला.