मुंबईत गुरुवारी होणाऱ्या मतदानाच्या पाश्र्वभूमीवर प्रचार शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून सर्वच उमेदवारांनी आता चौकसभा व घरोघरी संपर्कावर अधिक भर दिला आहे. आमदार होण्यास इच्छुक असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी तंगडतोड करीत घरोघरी संपर्क साधण्याकडे लक्ष पुरविले आहे. काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांनीही चौकसभांकडे आपला मोर्चा वळविला आहे. ‘आप’ने प्रामुख्याने रोडशोचा आधार घेतला आहे.
उत्तर मुंबईतील भाजप-सेनेचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्यासाठी प्रचार फेरीसोबतच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांवर अधिकाधिक मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याची जबाबदारी सोपविली आहे. शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम अभिनेते कलाकारांना लोकांसमोर आणत आहेत, तर विविध संघटनांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा करीत आहेत. उत्तर-पश्चिम मुंबईत गजानन कीर्तिकर यांच्यासाठी सेनेचे नगरसेवक, पदाधिकारी घरोघरी संपर्कावर अधिक भर देत आहेत. काँग्रेसचे गुरुदास कामत, मनसेचे महेश मांजरेकर यांनी प्रामुख्याने चौकसभांवर तर आपचे मयांक गांधी यांच्या वतीने ठिकठिकाणी रोड शो आयोजित करण्यात आले. याच मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राखी सावंत यांनी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले. उत्तर-पूर्व मुंबईत किरीट सोमय्या (भाजप) यांनी प्रत्यक्ष संपर्कावर, तर संजय पाटील (काँग्रेस) यांनी छोटय़ा सभांवर भर दिला आहे. ‘आप’च्या मेधा पाटकर यांच्यासाठी अनेक ठिकाणी चौकसभा आयोजित केल्या जात आहेत. उत्तर-पश्चिम मुंबईत प्रिया दत्त (काँग्रेस) आणि पूनम महाजन (भाजप) यांनी प्रचार फेरी काढून मतदारांशी संपर्क साधला. उत्तर-मध्य मुंबईत युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यासाठी शिवेसेनेचे विविध पदाधिकारी ठिकठिकाणी चौकसभेत तसेच घरोघरी संपर्कात गुंतले होते, तर एकनाथ गायकवाड (काँग्रेस) यांनी पदयात्रेवर भर दिला. मनसेचे आदित्य शिरोडकर यांनीही प्रचार फेरीकडेच लक्ष पुरवून मतदारांना आळविले. दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा यांनी पदयात्रा आणि रॅलीकडे अधिक लक्ष पुरविले. अरविंद सावंत (सेना) आणि बाळा नांदगावकर (मनसे) यांच्या वतीने मात्र मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले होते.

निवडणुकीतील मद्यवाटपावरील नियंत्रणासाठी विशेष पथके!
निवडणुकीत आपल्या बाजूने मतदान करावे, यासाठी उमेदवाराकडून पैसे आणि मद्यवाटप सर्रास केले जाते. हे टाळण्यासाठी अशा मद्यवाटपावर कठोर नियंत्रण ठेवण्याचे आदेश राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले आहेत.  मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगडमध्ये राज्यातील उर्वरित भागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.