काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य करणारे वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल योगगुरू रामदेव बाबा यांच्याविरोधात शनिवारी उत्तर प्रदेशमध्ये ‘एफआयआर’ नोंदविण्यात आला. रामदेव बाबा यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले असून दलितविरोधी वक्तव्य केल्याबद्दल बाबांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी दलितांच्या घरात मधुचंद्र आणि सहलीसाठी जातात, त्यांनी दलित मुलीशी विवाह केला आहे का, तसे असल्यास त्यांचे नशीब उजळेल आणि ते देशाचे पंतप्रधान होतील, असे वक्तव्य रामदेव बाबांनी शुक्रवारी केले. रामदेव बाबांच्या या वक्तव्याची व्हिडीओ फीत पाहिल्यानंतर त्यांच्याविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदविण्यात आला आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा देणारे रामदेव बाबा यांचे वक्तव्य दलितविरोधी असल्याने त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांनी केली आहे. मोदी आणि भाजपने रामदेव बाबांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यावी, असेही दिग्विजयसिंग म्हणाले.
रामदेव बाबांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात बसपाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जोरदार निदर्शने केली. राहुल गांधी यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी आणि रामदेव बाबा सक्तीने फकीर झालेले नाहीत. राहुल गांधी हेही दुर्दैवी आहेत, असे रामदेव बाबा म्हणाले. परदेशी मुलीशी विवाह केल्यास पंतप्रधान होता येणार नाही, असे सोनिया गांधी राहुल यांना सांगतात आणि राहुल यांना भारतीय मुलीशी विवाह करावयाचा नाही, त्यामुळे प्रथम राहुल यांनी पंतप्रधान व्हावे आणि त्यानंतर परदेशी मुलीशी विवाह करावा, अशी सोनिया यांची इच्छा आहे, असे रामदेव बाबा म्हणाले.

माकपची कारवाईची मागणी
दलित महिलांबद्दल अशोभनीय वक्तव्य केल्याने योगगुरू रामदेव बाबा यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी माकपने केली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगानेही स्वत:हून दखल घेऊन बाबांविरुद्ध कारवाई करावी, असेही माकपने म्हटले आहे. राहुल गांधी दलितांच्या घरात मधुचंद्र आणि सहलीसाठी जातात, असे वक्तव्य रामदेव बाबांनी केले ते असंस्कृतपणाचे आहे, असे माकपच्या पॉलिटब्युरो सदस्य वृंदा करात यांनी म्हटले आहे.दरम्यान, रामदेव बाबांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांना कारागृहात डांबावे, अशी मागणी जद(यू)ने केली आहे.
या वक्तव्यामुळे देशभर तीव्र पडसाद उमटल्याचे कळताच रामदेव बाबा यांनी घूमजाव करण्याचा प्रयत्न केला. आपण नकारात्मक विचारांनी सदर वक्तव्य केलेले नाही. तरीही दलितांच्या भावना दुखावल्या असतील तर वादग्रस्त विधान मागे घेण्याची आपली तयारी आहे, असे रामदेव बाबा म्हणाले.