महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढविणार आणि मनसेची ताकदही दाखवून देणार असे सांगतानाच मनसेचे खासदार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देतील, असे टाळ्यांच्या गजरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घोषणा केली. षण्मुखानांद सभागृहात आयोजित मनसेच्या वर्धापन दिनी लोकसभा निवडणुकीसाठी सात उमेदवारांची पहिली यादी राज यांनी जाहीर केली.
मनसे लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देईल, असे भाकित लोकसत्ताने आधीच वर्तविले होते. ते रविवारी प्रत्यक्षात आले आहे.
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी मनसेने लोकसभा निवडणूक लढवू नये, अशा केलेल्या विनंतीच्या पाश्र्वभूमीवर राज कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. राज यांनी या वेळी केलेल्या छोटय़ाशा भाषणात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा जाहीर करून सेना-भाजपची विकेट काढली. भाजप नेत्यांच्या भेटीगाठी आणि शिवसेनेच्या टिकेसंदर्भात राज म्हणाले, आधी सर्वाना बोलू द्यायचे आणि योग्य वेळी मुसंडी मारायची असते. आतापर्यंत कशा परिस्थितीतून मी वाट काढली ते माझे मलाच माहिती. आता वाट लावायचे काम करायचे आहे, असे राज यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक मनसे लढणारच आणि माझे उमेदवारही विजयी होतील असे सांगून राज म्हणाले, मनसेचे खासदार पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच पाठिंबा देतील. मोदी हे पंतप्रधान झालेच पाहिजे, अशी माझी भूमिका असून देशाच्या भवितव्यासाठी मनसे त्यांना संपूर्ण सहकार्य करेल. मोदी यांना पाठिंबा देण्याची घोषणा करताच सभागृहात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोश केला.
आचारसंहिता मध्ये न आणता सरकारने गारपीटग्रस्त भागात तात्काळ मदत करावी, अशी भूमिका राज यांनी मांडली. त्याचप्रमाणे आपण लवकरच गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गारपिटीमुळे लोकांचे व शेतकऱ्यांचे भयानक नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या सर्व मागण्यांना माझा पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे गाजावाजा न करता त्या भागात निवडणूक लढवा, असेही राज यांनी सांगितले.
मनसेच्या सात उमेदवारांची पहिली यादी राज यांनी जाहीर केली असून त्यातील सहा जागा या शिवसेनेच्या विरोधातील आहे तर पुण्यात मनसे भाजपविरोधात लढणार आहे. मोदी यांची भेट व त्यांनी केलेली विनंती याचा विचार करता मनसे भाजपविरोधात लढणार नाही, हा मुद्दाही पहिल्या यादीमुळे निकाली निघाला आहे. राज यांच्या भाषणाचा रोख पाहता निवडक जागा लढवून जास्तीत जास्त जागा निवडणून आणण्यावरच त्यांचा भर राहिला आहे. चित्रपट अभिनेता व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या उमेदवारीने उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात चुरस निर्माण होणार असून येत्या दोन-तीन दिवसांत पुढील यादी जाहीर करू, असे राज यांनी सांगितले.  वर्धापन दिनानिमित्त मनसेच्या ‘अ‍ॅप’चे उद्घाटन राज यांच्या आईच्या हस्ते करण्यात आले. या ‘अ‍ॅप’मुळे मनसे सर्वानाच आणखी ‘आप’लीशी वाटेल, अशी प्रतिक्रिया आमदार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली.
मनसेचे उमेदवार खालीलप्रमाणे
दक्षिण मुंबई                 बाळा नांदगावकर
दक्षिणमध्य मुंबई        आदित्य शिरोडकर
उत्तर पश्चिम              महेश मांजरेकर
कल्याण-डोंबिवली        राजू पाटील
शिरूर                           अशोक खांडेभराड
नाशिक                        डॉ. प्रदीप पवार
पुणे                              दीपक पायगुडे