कर्नाटकात सत्तेच्या सारीपाटावर लिंगायत व वोक्कलिग समाजाचे प्राबल्य आहे. या दोन्ही समाजांत स्पर्धाही असते. लिंगायत समाजाचे असंख्य मठ कर्नाटकात असून तुमकुरच्या सिद्धगंगा मठाचे स्वामी सिद्धेश्वर (१०५) यांना लिंगायत समाज मानत असल्याने त्यांचा आदेश शिरसावंद्य मानला जातो.
दक्षिण भारतात सत्ता असलेले एकमेव राज्य असे अभिमानाने सांगणाऱ्या भाजपने दक्षिण दिग्विजयाचा संकल्प केला होता. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले आणि त्यांच्या रथाची चाके कर्नाटकातच रुतली. आता लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर एकेकाळी भाजपला अनुकूल असलेल्या या राज्यात काँग्रेसनेही आपले बस्तान बसविले आहे. कर्नाटकात निवडणुकीत जातीचे राजकारण मोठय़ा प्रमाणावर चालते. भाजप, काँग्रेस आणि काही प्रमाणात जनता दल (धर्मनिरपेक्ष) अशी तिरंगी लढत कर्नाटकात पाहावयास मिळणार आहे.
बी. एस. येडियुरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर कर्नाटकमध्ये एक ते दीड वर्षांच्या कालावधीत सदानंद गौडा आणि जगदीश शेट्टर असे दोन मुख्यमंत्री झाले. लिंगायत आणि वोक्कलिग समाजातील प्राबल्यामुळे राज्यात नेतृत्वबदल करावा लागला. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सरकार आले. येडियुरप्पांनी केलेल्या पक्षत्यागाचा फटका भाजपला चांगलाच बसला. त्यांनी स्थापन केलेल्या कर्नाटक जनता पक्षाला केवळ १० टक्केच मते मिळाली असली तरी त्यांनी भाजपच्या मतांच्या टक्केवारीला चांगलाच हादरा दिला. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाने मतांच्या टक्केवारीत भाजपला तिसऱ्या क्रमांकावर फेकले. त्यानंतरच्या आठ-दहा महिन्यांच्या कालावधीतील घडोमोडींनंतर येडियुरप्पा स्वगृही परतले. मात्र, कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेसने सत्तेवरच चांगलीच मांड बसवली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपली आणि पक्षाची प्रतिमा सुधारण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे. त्यामुळे देशात नरेंद्र मोदी यांच्या नावाची लाट असली तरी त्याचा विशेष प्रभाव कर्नाटकमध्ये जाणवत नसल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. देशातील निवडणूकपूर्व चाचण्यांमध्ये भाजपला आघाडी मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली तरी त्या तुलनेत कर्नाटकमध्ये पक्षाला हवे तितके अनुकूल वातावरण नसल्याचे स्पष्ट झाले.
या सर्व पाश्र्वभूमीवर आता स्वगृही परतलेले येडियुरप्पा काय करतात त्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत भाजपला १९, काँग्रेसला सहा आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाला केवळ तीनच जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता दलाच्या (धर्मनिरपेक्ष) दोन खासदारांनी राजीनामा देऊन विधानसभेची निवडणूक लढविली. देवगौडा यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी आणि त्यांची पत्नी अनिता विधानसभेवर निवडून गेले. रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली आणि काँग्रेसने दोन्ही जागा पटकावल्या, याकडे भाजपला दुर्लक्ष करून चालणार नाही. भाजपने येडियुरप्पा यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांच्या पुत्राऐवजी उमेदवारी दिली असली तरी त्याचा विशेष लाभ पक्षाला होणार नसल्याचा मतप्रवाह पक्षात आहे. दुसरीकडे बीएसआर काँग्रेसचे नेते बी. श्रीरामलू यांनी आपला पक्ष बिनशर्त भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला असला तरी श्रीरामलू यांचे बेल्लारीतील खाणमाफिया रेड्डीबंधूंशी असलेले संबंध पक्षाला हानिकारक ठरू शकतात.
भाजप एकीकडे या हालचाली करीत असताना काँग्रेसही स्वस्थ बसलेली नाही. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा ‘रोड शो’ आयोजित करण्यात आला होता. देशातील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्याची भाषा करणाऱ्या मोदी यांना येडियुरप्पांचा भ्रष्टाचार दिसत नाही का, असा सवालही त्यांनी केला. त्यामुळेच पक्षाने आता ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांना उमेदवारी दिली आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर भाजपसमोर आपल्या असलेल्या जागा टिकविण्याचे, काँग्रेससमोर जागा वाढविण्याचे आव्हान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लक्षणीय लढती बंगळुरू (दक्षिण) मतदारसंघातून सलग
पाच वेळा लोकसभेवर निवडून गेलेले भाजपचे सरचिटणीस अनंतकुमार आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी. त्याचप्रमाणे शिमोगा लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचे गेल्या अनेक दशकांपासून भिजत घोंगडे पडले आहे, त्यामुळे बेळगांवमधील हालचालींकडेही सर्वाचे लक्ष असते. अलीकडेच बेळगावच्या महापौर आणि उपमहापौरपदी मराठी भाषक निवडून आले. कर्नाटकमध्ये संबंधित खासदार आणि आमदारांना महापौर निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो, त्यामुळे मराठी भाषक विजयी होण्यामागे राज्यातील सत्तारूढ काँग्रेस आणि विरोधी भाजपने आपापल्या सोयीनुसार भूमिका घेतली, अशी चर्चाही आहे.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp faces congress challenge in karnataka
First published on: 14-03-2014 at 02:52 IST