माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली आहे. सोनियांच्या आशीर्वादामुळेच अशोकरावांना अनुकूल अशी भूमिका गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारी यंत्रणांकडून घेतली गेली होती.
‘आदर्श’ घोटाळ्यात गुन्हा दाखल झालेला असल्याने अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. नांदेडची जागा कायम राखण्याकरिता आपण वा आपल्या पत्नीला उमेदवारी दिली जावी, अशी भूमिका त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे मांडली होती. ‘आदर्श’ घोटाळा उघडकीस येताच पक्षनेतृत्वाने तात्काळ त्यांना पदावरून दूर केले. पक्ष नेतृत्वाच्या मनातून ते उतरले होते. सोनियांची तर त्यांना अनेक महिने भेटही मिळाली नव्हती. पण काँग्रेसमध्ये निष्ठा फळाला येते व त्याचा प्रत्यय अशोकरावांना आला.
गेल्या आठ-दहा महिन्यांपासून अशोक चव्हाण यांना अनुकूल अशी पावले पडत गेली. ‘सीबीआय’ने भूमिका बदलली. आता तर त्यांच्या विरोधात सबळ पुरावा नाही या मताला सीबीआयचे अधिकारी आले आहेत. खटला भरण्यास राज्यपालांनी परवानगी नाकारली. ‘आदर्श’ चौकशी अहवाल फेटाळण्याचे फर्मान नवी दिल्लीतूनच सुटले होते. भ्रष्टाचाराच्या विरोधात राहुल गांधी यांनी भूमिका घेतली होती. लोकपाल विधेयक मंजूर होण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला होता. अशोक चव्हाण यांना झुकते माप देण्यास ते सुरुवातीला अनुकूल नव्हते. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यातील राजकारणाचा विचार करून अशोक चव्हाण यांचे पुनर्वसन झाले पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिल्यास विरोधकांना प्रचार करण्यास आयती संधी मिळेल हे लक्षात घेऊन अशोकरावांना उमेदवारी देण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला होता. पक्षाचे उमेदवार ठरविण्यासाठी सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडली होती.  
महाराष्ट्रात पक्षाला कोण यश मिळवून देऊ शकते ही बाबही दिल्लीच्या नेत्यांकडून विचारात घेतली जाते. पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा स्वच्छ असली तरी ते कितपत यश मिळवून देऊ शकतील याबाबत साशंकता आहे. अशोक चव्हाण यांनी २००९मध्ये पक्षाला चांगले यश मिळवून दिले होते. ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊनच अशोकरावांचे राजकीय पुनर्वसन पक्षाने केले आहे.
सोनियांनीच दिले उत्तर
काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांच्याबद्दलचा प्रश्न सोनिया आणि राहुल या दोघांनाही उद्देशून विचारला होता. मी या प्रश्नाला उत्तर देते, असे सांगत सोनियांनी अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीचे समर्थन केले, पण त्याच वेळी याचे उत्तर राहुल गांधी यांना द्यायला लागू नये, अशी खबरदारी घेतली. अन्यथा राहुल गांधी हे वादग्रस्त नेत्यांना पाठीशी घालतात, असा संदेश गेला असता. हे टाळण्यासाठीच सोनिया यांनीच उत्तर दिले.