काँग्रेसकडे प्रभावी उमेदवार नसल्यास औरंगाबाद मतदारसंघ राष्ट्रवादीकडे सोपवावा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दुपारी मांडताच सायंकाळी काँग्रेसने या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला. मात्र पक्षाने उमेदवारी दिलेले नितीन पाटील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळाप्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत. 

औरंगाबाद मतदारसंघातून डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी देण्याची पक्षाची योजना होती. पण त्यांनी नकार दिल्यावर शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या नावावर खल झाला. दर्डा यांनीही लोकसभा लढण्यास नकार दिला. तसेच दर्डा यांना उमेदवारी दिल्यास कोळसा खाण घोटाळ्याचा मुद्दा पुढे येईल, असा पक्षात मतप्रवाह होता. काँग्रेसचा औरंगाबादचा घोळ मिटत नसल्याने राष्ट्रवादीने वेगळीच खेळी केली. हातकणंगले काँग्रेसला सोडल्याने २७-२१ असे जागावाटप झाले आहे. २६-२२ जागावाटपाचे सूत्र कायम राहावे म्हणून राष्ट्रवादीने या जागेवर दावा केला. आमदार सतीश चव्हाण हे आमच्याकडे प्रभावी उमेदवार आहेत, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बुधवारी होणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीत आम्ही औरंगाबादचा मुद्दा मांडू, असेही पवार यांनी सांगितले. कमाजी आमदार नितीन पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळाप्रकरणी पाटील हे आरोपी होते व त्यांना अटकही झाली होती. पाटील यांना उमेदवारी दिल्याने गत वेळी पराभूत झालेले उत्तमसिंह पवार हे संतप्त झाले आहेत. औरंगाबाद आणि जालना या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेसने मराठा समाजातील उमेदवार दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रतिक्रिया उमटली आहे.
नांदेडचा घोळ कायम
नांदेड मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत बुधवापर्यंत आहे. मात्र सोमवारी जारी करण्यात आलेल्या यादीत नांदेड मतदारसंघातील उमेदवाराचे नाव जाहीर झाले नव्हते. अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यास पक्षात अनकुलता असली तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध दर्शविल्याचे समजते. अशोक चव्हाण यांनी स्वत:ला उमेदवारी मिळणार नसल्यास पत्नी अमिता यांना उमेदवारी देण्याची मागणी लावून धरली आहे. उद्या अंतिम निर्णय घेतला जाईल.