लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीसाठी अमेरिकन पद्धतीनुसार मतदान घेण्याकरिता राज्यातील मतदारसंघांची अदलाबदल करण्यात आल्याने राज्यातील काँग्रेसचे प्रस्थापित नेते हादरले आहेत. या निवडणुकीत ही पद्धत नको, अशी विनंतीच काही नेत्यांनी थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.
राहुल गांधी यांना अभिप्रेत असलेल्या उमेदवार निवडीकरिता देशातील १५ मतदारसंघांची निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात राज्यातील औरंगाबाद आणि धुळे मतदारसंघांचा समावेश होता. पण धुळे वगळून यवतमाळ-वाशिमची निवड करण्यात आली. धुळे मतदारसंघात अमरीश पटेल आणि सत्यजितसिंह गायकवाड यांच्यातच मुख्यत्वे उमेदवारीसाठी लढत आहे. गेल्या वेळी पक्षांतर्गत गटबाजीमुळे हा मतदारसंघ गमवावा लागला होता. यंदा मात्र अमरीश पटेल आणि रोहिदास पाटील यांच्यात समन्वय घडवून आणण्यात आला. अशा परिस्थितीत आणखी वाद नको, असा युक्तिवाद पुढे करण्यात आला. यवतमाळ-वाशिम काँग्रेसवर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा वरचष्मा आहे. मुलगा राहुल यास उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याच्या तक्रारी दिल्लीत गेल्याने यवतमाळ बदलण्यात आला. मुलाला उमेदवारी मिळवून देण्याकरिता माणिकरावांना आपले वजन वापरावे लागेल, अशी चिन्हे आहेत.
यवतमाळ आणि औरंगाबादऐवजी यवतमाळ-वाशिम आणि लातूर मतदारसंघांची निवड करण्यात आली आहे. वर्धा मतदारसंघात विद्यमान खासदार दत्ता मेघे हे आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मात्र वर्धा जिल्हा काँग्रेसमध्ये कै. प्रभा राव यांना मानणारा मोठे गट आहे.
 प्रभाताईंचे भाचे आणि राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी दत्ता मेघे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला जिल्ह्य़ात रोखण्याचा प्रयत्न केला. मेघे यांच्या मनाप्रमाणेच सारे व्हायचे. पण कांबळे यांनी प्रथमच मेघे यांना शह दिला. वर्धा मतदारसंघातील जिल्हा काँग्रेसवर कांबळे यांचे वर्चस्व आहे. मतदान झाल्यास प्रभा राव यांची कन्या चारुलता टोकस या उमेदवारीकरिता बाजी मारू शकतात. हे लक्षात आल्यानेच मेघे यांनी सूर बदलला. सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी या निवडणुकीत मतदान पद्धत ठेवू नये, अशी मागणी केली आहे. उमेदवारीवरून गोंधळ झाल्यास मेघे वेगळ्या पर्यायाचा स्वीकार करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मतदान पद्धतीनुसार उमेदवार ठरविण्याच्या यादीत वर्धा मतदारसंघाचा समावेश झाल्याने राज्यमंत्री कांबळे व मेघेविरोधक खुशीत आहेत.  लातूरमध्ये मात्र विद्यमान खासदार जयवंतराव आवळे यांनी पुन्हा लढण्यास असमर्थता व्यक्त केल्याने दिलीप देशमुख आणि अमित देशमुख हे काका-पुतणे कोणाच्या पारडय़ात वजन टाकतात त्याला उमेदवारी मिळेल.
राहुल गांधी यांना अभिप्रेत असलेल्या उमेदवार निवडीकरिता देशातील १५ मतदारसंघांची निवड करण्यात आली आहे.राज्यातील मतदारसंघांची अदलाबदल करण्यात आल्याने राज्यातील काँग्रेसचे प्रस्थापित नेते हादरले आहेत.