१६ व्या लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी अनोखा विक्रम केल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. आठ महिन्यांच्या आपल्या झंझावाती प्रचारात मोदींनी तब्बल तीन लाख किलोमीटर इतका प्रवास केला तसेच या काळात ५८२७ सभांच्या माध्यमातून ‘लोकसंवाद’ साधला. प्रचाराच्या या धडाक्यासाठी मोदींनी कधी परंपरागत प्रचार पद्धतींचा तर कधी ‘हाय टेक’ पद्धतींचा खुबीने वापर केला.
‘भारतीय निवडणुकांच्या इतिहासातील सर्वाधिक प्रभावी आणि सर्वात व्यापक प्रचार’ अशा शब्दांत भाजपने मोदींच्या प्रचाराचे कौतुक केले आहे. गेल्या वर्षी १५ सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मोदींनी देशातील २५ राज्यांमध्ये तब्बल ४३७ प्रचारसभा घेतल्या. १३५० रॅलींमध्ये ते सहभागी झाले होते. तसेच ज्या वाराणसी आणि वडोदरा मतदारसंघातून ते उभे आहेत, त्या मतदारसंघात त्यांनी भव्य ‘रोड शो’मध्येही सहभाग घेतला होता.
हायटेक माध्यमांतून ४००० वेळा ‘लोकसंवाद’
देशभरातील विविध शहरांमधील जनतेशी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून ‘चाय पे चर्चा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून मोदींनी तब्बल ४००० वेळा लोकसंवाद साधला. या कार्यक्रमांत भारतातील नागरिकांसह १५ विविध देशांमधील सुमारे १० लाख लोक सहभागी झाले होते.
५ ते १० कोटी लोकांशी संपर्क?
हरयाणातील रेवारी येथे निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीपासून मोदींनी निवडणूक प्रचारास प्रारंभ केला आणि १० मे रोजी उत्तर प्रदेशातील बलिया येथे आपली शेवटची प्रचारसभा घेतली. या कालावधीत मोदींनी देशभरातील किमान ५ ते १० कोटी जनतेशी ‘संपर्क’ साधल्याचा दावा भाजपने केला आहे.
प्रथमच ‘व्यापक संरक्षण व्यवस्था’
देशभरात झंझावाती प्रचारदौरे करणाऱ्या नरेंद्र मोदींच्या संरक्षणाचे आव्हान पेलण्यासाठी या काळात संरक्षण दलांना कसरत करावी लागली. त्यांच्याभोवती सतत ‘विशेष सुरक्षेचे कडे’ तैनात ठेवण्यात आले होते. या दोन महिन्यांच्या निवडणूक प्रचारांदरम्यान, त्यांच्याभोवती नॅशनल सिक्युरिटी ग्रुप (एनएसजी)चे ब्लॅक कॅट कमांडो तसेच ‘प्रगत सुरक्षा संपर्क अधिकारी’ तैनात करण्यात आले होते. हा चमू मोदी यांच्या प्रचारसभेच्या तसेच त्यांच्या संभाव्य भेटींच्या स्थळांविषयी आपला अहवाल देत असे. संरक्षणाच्या ताणाचा परिणाम होऊ नये यासाठी या चमूमध्ये तब्बल १०० ‘कमांडो’ सज्ज ठेवण्यात आले होते. देशात यापेक्षा अधिक संरक्षण केवळ पंतप्रधान व त्यांच्या कुटुंबीयांनाच देण्यात येते.