नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वडोदरा येथून लोकसभेची निवडणूक लढविणारे काँग्रेसचे उमेदवार आणि राहुल गांधी यांचे निकटवर्ती मधुसूदन मिस्त्री यांना त्यांच्या समर्थकांसह अटक करण्यात आली आह़े  येथील मोदींचे पोस्टर फाडल्याबद्दल त्यांच्याविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आह़े  मिस्त्री यांची नंतर ३३ समर्थकांसह प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आह़े
शहराचे पोलीस आयुक्त सतिश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिस्त्री यांच्यासह २० जणांवर दंगल माजविणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि बेकायदेशीररित्या जमाव केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़  तर इतर १४ जणांवर केवळ बेकायदेशीररित्या जमाव केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
रस्ता दुभाजकाच्या ठिकाणी उंचावर लावलेले मोदींचे पोस्टर काढून तेथे स्वत:चे पोस्टर लावण्यासाठी मिस्त्री स्वत: वीजेच्या खांबावर चढले होत़े  त्याची चित्रफित प्रसिद्ध होताच भाजप कार्यकर्ते संतापले. मिस्त्री किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यासाठी परवानगी घेतली नव्हती, असे वडोदराचे पोलीस उपायुक्त दीपंकर त्रिवेदी यांनी सांगितले. मिस्त्री यांच्यासमवेत वडोदरा महापालिकेतील विरोधी पक्षनेते चंद्रकांत कस्तुर यांनाही ताब्यात घेण्यात आले.