मागील लोकसभा निवडणुकीत धुळे मतदार संघातून उमेदवारी केलेले धर्मनिरपेक्ष जनता दलाचे ज्येष्ठ नेते निहाल अहमद यांनी या वेळच्या निवडणुकीत आपण उमेदवारी करणार नसल्याचे स्पष्ट केले. रविवारी येथे पत्रकार परिषदेत त्यांनी तसे जाहीर करतानाच निधर्मी उमेदवार निवडून आणण्यासाठी आपला प्रयत्न राहील, अशी भूमिका मांडली.
मागील निवडणुकीत निहाल अहमद यांनी जवळपास पाऊण लाख मते घेतल्याने काँग्रेसला पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे या निवडणुकीत निहालभाई काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष होते. तिसऱ्या आघाडीच्या भूमिकेकडे आपले लक्ष असून काँग्रेस पक्ष पूर्णपणे निधर्मी आहे, असे म्हणता येत नाही, असा टोलाही त्यांनी मारला. ‘आप’च्या लोकांनी जनता दलाशी संपर्क साधल्याचे मान्य करीत धुळे मतदार संघात धर्मनिरपेक्ष जनता दल आणि आम आदमी पक्षाची युती होऊ शकते अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.