श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांच्या औट घटकेच्या पक्षप्रवेश नाटय़ामुळे सुरू झालेले रामायण संपलेले नसतानाच साबीर अलींच्या भाजपप्रवेशावरून ‘महाभारत’ सुरू झाले आहे.  पक्षप्रवेशास २४ तास उलटण्यापूर्वीच भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांना उपरती झाल्याने त्यांनी अलींचे सदस्यत्व रद्द ठरविले. भाजपचे उपाध्यक्ष मुक्तार अब्बास नक्वी यांनी साबीर अली यांच्या पक्षप्रवेशावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ‘दहशतवादी भटकळचे मित्र (साबीर अली) भाजपमध्ये आले आहेत, आता दाऊद इब्राहिमही येईल’, अशी ट्विपण्णी करून नक्वी यांनी साबीर अलींच्या पक्षप्रवेश सोहळ्यात विरजण घातले होते. संघाचे नेते राम माधव यांनीदेखील ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे नक्वींचा बोलाविता धनी संघच असल्याची चर्चाही दिल्लीत सुरू झाली आहे. नक्वी यांच्या ट्विपण्णीमुळे भाजपमध्ये एकवाक्यता नसल्याचे समोर आले आहे.
‘बदनामीचा खटला भरणार ’
प्रवेश रद्द केल्याने संतप्त झालेले जद(यू)चे वादग्रस्त नेते साबीर अली यांनी भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांच्यावर बदनामीचा खटला भरण्याचे ठरविले आहे. इतकेच नव्हे तर नक्वी यांनी केलेल्या आरोपांबाबत जाहीर चर्चा करण्याचे आव्हानही अली यांनी दिले आहे.