निवडणुकीचा बिगूल वाजला तसं पुढाऱ्यांचं वेळापत्रक चोवीस तासांत बसेनासं झालं. बैठका, फोनाफोनी, प्रचारदौरे, भेटीगाठी, भरगच्च कार्यक्रम. पुढाऱ्यांइतकेच वार्ताहर बिझी झाले. बाईट मिळवणं खूप महत्त्वाचं असल्यानं पुढाऱ्यांना कुठे गाठता येईल (खिंडीतसुद्धा) याची जुळवाजुळव सुरू झाली. पी. ए. भाव खाऊ लागले. ट्विटरवर नेत्यांची प्रतिक्रिया बघा. जाहीर सभेत नेते काय बोलतायत ते ऐका. त्यावरून बातमी तयार करा, असा पी.ए.नी उपदेश दिला. आता नेते उपलब्ध नाहीत, म्हटल्यावर नेत्याबरोबर चोवीस तास (ब्रेकफास्ट, लंच, डिनर, दोन फ्लाइट्स, तीन साइट सिइंग इन्क्लूडेड) या सहलीचा आमचा चान्स हुकला. मग आम्ही ठरवलं, एखाद्या पार्टीच्या मुख्य कार्यालयात जाऊन कानोसा घ्यावा आणि २४ तास घालवावेत.
मग ठरवलं की भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्याचा वसा घेतलेल्या आणि नववधूची हळद अजूनही ओली असलेल्या आपच्या कचेरीत जावं. आपची कचेरी कुठे आहे विचारल्यावर एका सायकलच्या स्पेअर पार्टच्या दुकानात आम्हाला नेण्यात आलं. ही आपची कचेरी. दुकान ग्राऊंड फ्लोअरला होतं. (कार्यकर्त्यांनं कायम जमिनीवर राहावं म्हणून) दुकानात ४०चा बल्ब लावला होता. गेल्या गेल्या डाव्या भिंतीवर दुकानाच्या मालकाशी झालेला दोन महिन्यांचा भाडेकरार लावला होता. हे दुकान निवडणुकीपुरते ताब्यात होते. इलेक्शननंतर ‘दुकान बंद’. त्या बाजूला पार्टीच्या संस्थापकांचा फोटो होता. शेजारी एक पोस्टर फाडलेलं भिंतीवर तसंच होतं. ते कुणाचं होतं हे दुरून कळत नव्हतं. पण निरखून पाहिल्यावर कळलं की आंदोलनातल्या कुणाचं तरी होतं. पार्टी तयार झाल्यावर त्याचा उपयोग नव्हता. आम्हाला कार्यकर्त्यांनी बसायला सांगितलं. मस्त सतरंजीवर बैठक मारली. आम्ही येण्याचा हेतू सांगितला. तेवढय़ात चहा आला. चपलांच्या स्टँडच्या बाजूला एक मोकळं कपाट होतं. त्याला पाच कप्पे होते. प्रत्येक कप्प्याला बेईमान, भ्रष्टाचारी, देशद्रोही, प्रामाणिक, स्वच्छ अशी नावं होती. त्या कप्प्यात संस्थापकांनी सहय़ा करून ठेवलेली सर्टिफिकेटं होती.
त्याच्या शेजारच्या भिंतीवर चार बाय चारच्या फ्रेममध्ये ४९ हा आकडा लिहिला होता. मी चौकशी केली. ४९ हा ‘आप’चा लकी नंबर आहे कळलं. सरकार ४९ दिवस चाललं आणि हीट झालं. लोकसभेला नुसत्या यूपीत ४९ जागा मिळणार असल्याचं पार्टीच्या स्वत:च्या ओपिनियन पोलवरून लक्षात येतंय.
पार्टीला १५ आयआयटीअन्स, २० बँकर्स, १३ निवृत्त अधिकारी आणि अमर्त्य सेन असा ४९ लोकांचा घवघवीत पाठिंबा मिळाला आहे, हे प्रसादचिन्ह नाही तर काय?
मी म्हटलं, की ४ आणि ९ ची बेरीज १३ येते आणि १३ अन लकी नंबर आहे, तर मला बसायचं असेल तर बसा नाहीतर भ्रष्टाचारी पक्षांच्या कार्यालयात जाऊन बसा, असं सांगण्यात आले. एका टेबल-खुर्चीवर एक तरुण चुणचुणीत मुलगा काहीतरी लिहित बसला होता. मी जवळ जाऊन पाहिलं तर मोठमोठय़ा पुस्तकांतून नोट्स काढणं चाललं होतं. नेत्यांची प्रकरणं, नेते आणि कारखानदार संबंध, नेत्यांच्या प्रॉपर्टीचे आकडे या पुस्तकांतून टिपणं काढणं चालू होतं. ही टिपणं दिल्लीत पार्टीच्या मुख्य कार्यालयात पाठवण्यात येणार होती. काश्मीर समस्या, आर्थिकनीती, संरक्षणनीती वगैरे पुस्तकांची ऑर्डर दिली होती. मे अखेपर्यंत ती येणार असल्याचं कळलं. तेवढय़ात जेवण आलं. चपाती, सब्जी, आचार असं फूड पॅकेट होतं. त्यातून आचार निवडून निवडून काढून टाकण्यात आलं. कारण आच्याराला भ्रष्टाचाराचा नाद आणि गंध असल्याचं कळलं.
पाच कार्यकर्ते एकत्र बसून जेवण सुरू झालं. आज कोणत्या चॅनेलवर कोण कितीवेळ झळकलं, याच्या गप्पा झाल्या. सर्व पक्षांचे कसे धाबे दणाणले आहेत, याची चर्चा झाली. एका कार्यकर्त्यांनं झाडूचे खराटा, केरसुणी, मॉपर, वायपर, स्वीपर असे पाच प्रकार सांगितले. एकेक प्रकारानं एकेक भ्रष्ट नेता साफ होणार. दुसऱ्यानं रस्त्यावर बसूनसुद्धा मळणार नाही असा बम्र्यूडा पँटचा नमुना आणला होता. तिसऱ्यानं फूल पँट श्रीमंतीचं लक्षण असल्यानं बम्र्युडाच्या कल्पनेचं कौतुक केलं. चौथ्यानं मफलरचे पाच नमुने आणले होते. पाचव्यानं मफलर आऊटडेटेड झाल्यानं ती पुसायला घ्या, असं सांगितलं. तेवढय़ात एक गृहस्थ आले. पार्टीची कचेरी हीच का? हो. बसा थोडा वेळ. जेवण चाललं आहे. जेवण झाल्यावर कार्यकर्ते सतरंजीवर आडवे झाले. मी आणि ते गृहस्थ टी.व्ही. बघत बसलो. अध्र्या-एक तासानं कार्यकर्ते जागे झाले. पुन्हा एक चहाचा राऊंड झाल्यावर कार्यकर्त्यांचं लक्ष त्या गृहस्थांकडे गेलं. काय काम आहे आपलं, कुणाला भेटायचं आहे? गृहस्थ म्हणाले, मी या मतदारसंघाचा आपचा उमेदवार आहे. तेवढय़ात माझा मोबाइल वाजला. मी निघालो. ”आप’ल्या बरोबर चार तास’ असं मनातल्या मनात लेखाचं नाव बदलून…
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)