राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या नेत्यांना केला असतानाच शिवसेनेचे खासदार मात्र सत्ताधाऱ्यांच्या गोटात जाऊ लागले आहेत. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी थेट काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात जाऊन मुख्यमंत्र्यांसमावेत अन्य नेत्यांशी चर्चा केली. वाघचौरे यांच्या काँग्रेस प्रवेशासाठी सोमवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ११ खासदार निवडून आले होते. यापैकी कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांनी फेब्रुवारी २०१२ मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती. खासदारकी वाचविण्याकरिता परांजपे तांत्रिकदृष्टय़ा शिवसेनेबरोबर तर मनाने राष्ट्रवादीबरोबर गेले दोन वर्षे आहेत. ते राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरही जातात. आता तर कल्याणमधून राष्ट्रवादीच्या वतीने त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. परभणीचा शिवसेनेचा निवडून आलेला खासदार पक्षाबरोबर राहात नाही, असा इतिहास आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या वतीने निवडून आलेले खासदार पुढील निवडणुकीत शिवसेनेबरोबर राहिलेले नाहीत. गेल्या वेळी शिवसेनेच्या वतीने निवडून आलेले काँग्रेसचे माजी राज्यमंत्री गणेश दुधगावकर हे तांत्रिकदृष्टय़ा शिवसेनेनेबरोबर असले तरी मनाने इतरत्र आहेत. पक्षाच्या बैठकांनाही ते फिरकत नाहीत. खासदार दुधगावकर कोठे आहेत हे माहित नाही, अशी टिप्पणी मध्यंतरी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी परभणी दौऱ्यातच केली होती. शिवसेना तेथे दुसरा उमेदवार रिंगणात उतरविणार आहे.
शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे यांनाही काँग्रेस प्रवेशाचे अनेक दिवस वेध लागले होते. अलीकडेच नवी दिल्लीत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना ते भेटून आले. मंत्रालयासमोरील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात सायंकाळी बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे-पाटील या दोन मंत्र्यांसमावेत ते दाखल झाले. तेथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. वाघचौरे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी शिर्डीतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. पक्षांतरबंदी कायद्याचा फटका बसू नये म्हणून सावधगिरी बाळगण्यात आली. सोमवारी श्रीरामपूरमध्ये बाळासाहेब विखे-पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे आणि गुलाम नबी आझाद यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित केला आहे. याच मेळाव्यात वाघचौरे यांच्या प्रवेशाची औपचारिकता पार पाडली जाईल.
सोमवारी श्रीरामपूरमध्ये होणाऱ्या मेळाव्यात शिर्डी मतदारसंघाबाबत भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट होईल. या मेळाव्याला शिवसेनेचे खासदार वाघचौरे हे उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी आवर्जुन सांगितले. संसदेचे अधिवेशन शुक्रवारी संपत आहे. यामुळे सोमवापर्यंत प्रवेश लांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.