आघाडी कायम ठेवण्याची घोषणा होऊन आठवडा उलटण्यापूर्वीच विधानसभेसाठी जास्त जागा देण्यास नकार देणाऱ्या काँग्रेसला विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीने चांगलाच दणका दिला आहे. काँग्रेसचा दावा असणाऱ्या जागेवर राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे सत्ताधारी आघाडीत जुंपली असतानाच विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने त्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. विनायक राऊत यांची लोकसभेवर निवड झाल्याने रिक्त झालेल्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांनी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे ८० आणि १७ अपक्षांचा पाठिंबा लक्षात घेता प्रत्यक्ष मतदान झाल्यास काँग्रेसचे जोशी विजयी होऊ शकतात. पण राष्ट्रवादीने तटकरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला रिंगणात उतरविण्यापूर्वी मतांची नक्कीच बेगमी केली असणार. राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाढती जवळीक याची किनार असल्याचेही बोलले जाते. अर्थात, तटकरे यांनी त्याचा इन्कार केला.

राहुल बजाज पॅटर्नची पुनरावृत्ती ?
राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत २००६ मध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसच्या विरोधात उद्योगपती राहुल बजाज यांना रिंगणात उतरवून भाजप-शिवसेनेच्या मदतीने त्यांना निवडून आणले होते. या वेळीही प्रत्यक्ष मतदान झाल्यास विरोधकांची काही मते वळविण्याची राष्ट्रवादीची योजना असू शकते. आघाडी कायम ठेवण्यावर सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातील चर्चेत शिक्कामोर्तब करण्यात आले. निम्म्या जागांची मागणी मान्य करता येणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. गत वेळच्या तुलनेत १० ते १२ जास्त जागा देण्याची काँग्रेसची तयारी आहे. अशा वेळी जास्त जागा नाकारणाऱ्या काँग्रेसला शरद पवार यांनी दणका दिला आहे.

चर्चेतून मार्ग काढू
तटकरे यांच्या अर्जाने काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेवर निवड बिनविरोध होण्यात काँग्रेसने मदत केली. धनंजय मुंडे, किरण पावसकर यांच्या पोटनिवडणुकीच्या वेळी आघाडीचा धर्म पाळला. मात्र काँग्रेसचा दावा असताना राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवापर्यंत आहे. तोपर्यंत काहीतरी तोडगा काढू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

माघार कुणाची ?
आपण अजिबात माघार घेणार नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने माघार घ्यावी, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे. आघाडीच्या दोन मित्र पक्षांमध्ये विधानसभेच्या तोंडावर लढत झाल्यास त्याचा वेगळा संदेश बाहेर जाईल. पवार यांच्यापुढे काँग्रेसचे नेतृत्व नेहमीच पडते घेते, असा अनुभव आहे. यामुळे काँग्रेसवर राष्ट्रवादीचा दबाव राहिल. उद्या मतदान झालेच तर अपक्ष, छोटे पक्ष आणि काँग्रेसमधील असंतुष्टांच्या मदतीने राष्ट्रवादी विजय मिळवेल, अशी शक्यता आहे.