लोकशाहीमध्ये मतदान हे आध्यात्मिक किंवा धार्मिक भाषेत सांगायचे झाले तर पवित्र कर्मकांड/कर्तव्य आहे. मतदानाच्या माध्यमातून मतदार आपली सेवा करण्याकरिता राज्यकर्त्यांची म्हणजेच नोकर/सेवकांची निवड करत असतात. जे लोक लोकशाहीच्या नावाने दिंडोरा पिटत असतात, लोकशाही सर्वश्रेष्ठ राज्य पद्धती आहे, अशा गप्पा मारतात तेच लोक मतदान करण्यासाठी उतरत नाहीत, हे अत्यंत चुकीचे आहे. असे लोक लोकशाहीचे केवळ बोलघेवडे समर्थक आहेत. वास्तविक पाहता त्यांना कोणाचे सरकार येणार किंवा नाही हे फक्त बोलायला आवडते. आपल्या मनासारखे सरकार निवडण्यासाठी प्रत्यक्ष मतदान करायला पाहिजे, ही गोष्ट ते करत नाहीत हे दुर्दैव आहे.
वास्तविक पाहता भारतीय नागरिकांना आपल्या देशाच्या राज्य घटनेची स्थापना झाल्यानंतर वैश्विक मतदानाचा हक्क मिळाला. ज्या देशात लोकशाही आपल्या अगोदर रुजली त्या अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आदी देशांतील सर्व नागरिकांनाही मतदानाचा हक्क इतक्या सहजासहजी मिळालेला नाही. महिला, गुलाम यांना अगोदर मतदानाचा हक्क नव्हता तो त्यांना काही वर्षांनंतर मिळाला. आपल्या देशात मात्र रस्त्यावरच्या भिकाऱ्यापासून ते उच्चपदस्थांपर्यंत सर्व स्तरांतील नागरिकांना मतदानाचा हक्क आपल्या राज्य घटनेने पहिल्यापासून दिला आहे आणि असे असूनही मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय मंडळी मतदानाचे कर्तव्य पार पाडत नसतील, मतदानासाठी उदासीन असतील तर ही बाब लोकशाहीसाठी लांच्छनास्पद आहे.
आपल्या येथे गरीब आणि सर्वसामान्य मतदारांना खऱ्या अर्थाने लोकशाही समजली आहे. कारण ही मंडळी प्रचंड संख्येने मतदान करतात, परंतु आपले सत्तापिपासू नेते, राजकीय पक्ष यांनी त्यांच्या मतांचे मूलभूत मूल्यांकन आपल्या चातुर्याने आणि लबाड मार्ग वापरून कमी करून टाकले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक विद्वानांनी व राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी आपल्या देशात लोकशाही फार काळ टिकणार नाही, असे भाकीत व्यक्त केले होते त्यांचा आपल्या मतदारांनी भ्रमनिरास केला आहे. गेली अनेक वर्षे मतदार दर पाच वर्षांनी राज्यकर्ते निवडून देत असून देशात अद्यापही लोकशाही टिकून आहे, ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2014 रोजी प्रकाशित
मतदान पवित्र कर्तव्य
लोकशाहीमध्ये मतदान हे आध्यात्मिक किंवा धार्मिक भाषेत सांगायचे झाले तर पवित्र कर्मकांड/कर्तव्य आहे. मतदानाच्या माध्यमातून मतदार आपली सेवा करण्याकरिता राज्यकर्त्यांची म्हणजेच नोकर
First published on: 07-04-2014 at 02:32 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voting a sacred task