या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूळ भारतीय फळभाजी असलेली भेंडी आज संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. भारत, नायजेरिया, पाकिस्तान, घाणा, बेल्जियम अशा विविध देशांत भेंडीचे उत्पादन घेतले जाते. जगभर भेंडीचे सुमारे १०० प्रकार वापरात आहेत. कॅन्सरच्या रोगावर भेंडी अतिशय परिणामकारक आहे. मधुमेही लोकही भेंडीचा वापर करतात. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी भेंडीचा वापर वाढला आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी भेंडी वापरली जाते. भेंडीमध्ये व्हीटॅमिन ‘ए’चे प्रमाण अधिक असल्यामुळे डोळ्याची निगा राखण्यासाठी याचा वापर होतो. कॅल्शियम व आयोडिनचे प्रमाणही भेंडीत अधिक आहे. क जीवनसत्त्व असल्यामुळे भेंडी घरोघरी खाल्ली जाते.

भेंडीचे उत्पादन तिन्ही हंगामांत घेता येते. हलकी, मध्यम व भारी जमिनीत भेंडी घेतली जाते. पाण्याचा निचरा होणारी जमीन यासाठी अधिक उपयोगी आहे. २० ते ४० तापमान भेंडीसाठी लाभदायक असते. कमी पाण्यावर येणारी फळभाजी म्हणून शेतकरी या पिकाला प्राधान्य देतात. पुसा सावजी, सिलेक्शन २-२, फुले उत्कर्ष, परभणी क्रांती, अनामिका या व्हरायटींना शेतकऱ्यांची अधिक पसंती आहे. खरिपाच्या भेंडीसाठी हेक्टरी ८ किलो तर उन्हाळ्यात १० किलो बियाणे लागते. हेक्टरी ५० गाडय़ा शेणखताचा वापर केल्यास तो भेंडीसाठी उपयुक्त ठरतो. खरिपाच्या हंगामात दोन ओळीतील अंतर ६० सें. मी. तर उन्हाळ्यात ४५ सें. मी. अंतर ठेवले जाते. दोन झाडांतील अंतर ३० सें. मी. ठेवणे उत्पादनासाठी उपयुक्त ठरते. भुरी, मावा, तुडतुडे, शेंडी अळी, लाल कोळी या रोगाचा मारा भेंडीला अधिक असतो. काळजीपूर्वक लक्ष देऊन फवारणी केली तर रोग व कीड नियंत्रणात ठेवता येते. साधारणपणे ५५ ते ६० दिवसांनी फळधारणा सुरू होते व दर दोन दिवसाला तोड करावी लागते. सरासरी हेक्टरी १०५ ते ११५ क्विंटल खरीप हंगामात तर उन्हाळी हंगामात ७५ ते ८५ िक्वटल उत्पादन होते. खर्च वजा जाता एकरी ६० ते ७० हजार रुपये निव्वळ नफा एका हंगामात शेतकऱ्याला मिळतो.

निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याणी या गावचे ज्ञानेश्वर दोडतल्ले (वय ३१) या तरुणाने भाजीपाल्याच्या शेतीतून मिळविलेले यश अचंबित करणारे आहे. ज्ञानेश्वरच्या घरी वडिलोपार्जित १० एकर शेतजमीन. वयाच्या बाराव्या वर्षांपासूनच वडिलांच्या सोबत तो शेती करू लागला. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने औसा तालुक्यातील उंबडगा येथे कृषी पदविकेचा अभ्यास पूर्ण केला. २००३ ते २००८ असे पाच वर्षे ६०० रुपयांपासून नोकरीस प्रारंभ करत २५ हजार रुपये महिना पगाराची नोकरी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांत त्याने केली. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्याचे काम तो करत असे. २००८ ते १० अशी दोन वष्रे एका स्वयंसेवी संस्थेत मराठवाडय़ातील पडीक जमिनीचे उपजाऊ जमिनीत रूपांतर करून ती मागासवर्गीय लोकांना हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम होता. त्यात ज्ञानेश्वरने सहभागी होत १ हजार एकर जमीन उपजाऊ करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. २०११ साली त्याला ग्रामसेवकाची नोकरी मिळाली. नाशिक जिल्हय़ातील सिन्नर तालुक्यातील एका गावात तो रुजू झाला व २०११ मध्ये त्याने राजीनामा देऊन शेती व्यवसाय करण्याचे ठरवले.

२०११-१२ या वर्षी त्याने उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू केले. २०१२ साली त्याने ‘आदर्श अ‍ॅग्री क्लिनिक अ‍ॅग्री बिझनेस सेंटर’ नावाने फर्म सुरू केली. शेतकऱ्यांनी उत्पादन निर्यात करावे यासाठी त्याने शेतकऱ्यांना सहकार्य केले. दुबई, बंगलोर येथील निर्यातदारांशी संपर्क साधून टोमॅटो, साधी मिरची, दुधी भोपळा, डाळींब याची ४० मेट्रिक टनाची निर्यात करण्यास त्याने मदत केली. या काळात मध्यस्थांनी दिलेल्या आíथक झटक्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान न होऊ देता ते नुकसान स्वत सोसण्याचे त्याने ठरवले व त्यासाठी आíथक झळ सोसली. २०१४ साली त्याने कंत्राटी पद्धतीने शेती करण्याचा निश्चय केला. लातूर जिल्हय़ातील काही शेतकऱ्यांनी भाजी उत्पादन घेतले तर निश्चित हमीभाव दिला जाईल अर्थात निर्यातक्षम माल तयार करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर सोपवली. २०१४-१५ या पहिल्या वर्षांत सुमारे ५०० मेट्रिक टन मिरची, भेंडी, टोमॅटो व दुधी भोपळ्याची निर्यात केली. शेतकऱ्यांकडून हा माल खरेदी करून त्याने कुवैत, जर्मनी, दुबई या देशांना पाठवला. शेतकऱ्यांना त्याने सुरक्षित हमीभाव दिल्यामुळे एकरी १ लाख ते दीड लाख रुपयांचा नफा शेतकऱ्यांना मिळाला.

लातूर जिल्हय़ातील निलंगा, औसा, लातूर, रेणापूर, शिरुर अनंतपाळ हे पाच तालुके, बीड जिल्हय़ातील अंबाजोगाई, परळी हे दोन तालुके तर उस्मानाबाद जिल्हय़ातील कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांची त्याने निवड केली. २०१५-१६ या वर्षी दुष्काळ होता. अगदी कमी पाण्यावर त्याने मिरची, भेंडी याचे सुमारे २०० टनांचे उत्पादन घेतले. औसा तालुक्यातील लोदगा व परळी शहरातील शेतीत हे उत्पादन घेतले व शंभर मजुरांना ९० दिवस मजुरी उपलब्ध करून दिली.

२०१६ साली ज्ञानेश्वरने नवा उपक्रम हाती घेतला. विविध भागांत सुमारे ५० एकर जमीन त्याने भाडेतत्त्वावर घेतली असून त्या संपूर्ण जमिनीवर ठिबकसिंचनाचा वापर करत, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत त्याने भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचे ठरवले आहे. सुमारे ५५ जणांना वर्षभराचा रोजगार यासाठी देऊ केला आहे. याशिवाय ५० एकर जमिनीच्या शेतकऱ्यांबरोबर कंत्राटी शेती निश्चित केली आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून दररोज ८ टन भाजीपाला निर्यात करण्याचा करार ज्ञानेश्वरने लंडन, युके, कुवैत, बंगलोर येथील मंडळींसोबत केला असून त्यासाठी त्याने संपूर्ण तयारी केली आहे. आपल्या माध्यमातून किमान १० हजार लोकांना शेतीत रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट त्याने ठरवले असून एक हेक्टर बागायती जमिनीत वर्षांला किमान ५ लाख रुपयांचे उत्पादन शेतकऱ्याला मिळाले पाहिजे हे आपले ध्येय असल्याचे तो म्हणाला.

भाजीपाल्याच्या शेतीत पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. एका भेंडीच्या झाडाला दिवसाला फक्त अर्धा लिटर पाणीही पुरते. व्यवसाय करत असताना स्टेट बँक ऑफ इंडियाकडून २०१२ साली ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. ते तातडीने फेडले. त्यानंतर २०१५ जूनमध्ये ४५ लाख रुपयांचे कर्ज व्यवसायाचा अंदाज घेऊन बँकेने दिले. वेळच्या वेळी कर्जाची परतफेड केली. शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान हवे आहे. आíथक अडचणीतून त्याला बाहेर पडायचे आहे. त्यासाठी तो धडपडतो आहे. आपल्यासोबत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी आपण अधूनमधून कार्यशाळा घेतो. त्यांच्या अडचणी सोडवतो असेही त्याने सांगितले.

pradeepnanandkar@gmail.com

मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guaranteed income from okra farming
First published on: 23-06-2016 at 05:19 IST