श्रीरामपूर तालुक्यातील भरवनाथनगर येथे गाडे परिवाराची पाच एकर शेती आहे. प्रणय यांचे वडील बापूसाहेब गाडे यांचा शेती क्षेत्रातील मोठा अभ्यास होता. १५ वर्षांपूर्वी रासायनिक खतांचा वापर न करता नसíगक शेती तज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाने शेती करण्याचा निर्णय बापूसाहेबांनी घेतला. बापूसाहेबांनी स्वतसोबतच इतर शेतकऱ्यांनाही किफायतशीर शेतीबाबत मार्गदर्शन केले. बापूसाहेबांचा हाच निर्णय बी. कॉम.पर्यंत शिक्षण झालेला त्यांचा मुलगा प्रणय व पत्नी सविता बापूसाहेब गाडे यांनी पुढे कायम ठेवला. घरच्या घरी कोणतेही खत न वापरता उसाचे उत्पादन घेतले.
उत्पादित उसाचा घरीच गूळ तयार करावा या संकल्पनेतून त्यांनी गुऱ्हाळ उद्योग सुरू केला. २५ बाय ४० आकाराचे शेड उभे करून त्यांनी गुऱ्हाळ सुरू केले. स्वत:च्या शेतीतील उसापासून गूळ आणि मागणीनुसार काकवीचे उत्पादन गाडे यांनी सुरू केले. नसíगक गूळ आणि काकवीने त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. घरच्या घरी आणि शुद्ध गूळ व काकवी यामुळे ग्राहकांचा खरेदीचा कल वाढत गेला. काकवीची मागणी वाढतेच आहे. यात कॅल्शिअम, काबरेहायड्रेड्स, प्रोटीन मिळत असल्याने शहरासह ग्राहकांची मागणी वाढली आहे. या उद्योगासाठी आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मीनाक्षी बडे, अभिषेक मानकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
गूळमिर्मिती प्रक्रिया उद्योगाचे टप्पे
भांडवल
स्व-भांडवलावर उद्योग सुरू करताना बांधकामासाठी ७० ते ८० हजार रुपये, पाक तयार करण्यासाठी कढई, इंजिन, क्रेशर, पॅकिंग मशीन व साचे यासाठी तीन लाख रुपये, असे एकूण तीन लाख ८० हजार रुपये तर शेड बांधकामासाठी एक लाख रुपये अशा चार लाख ८० हजार रुपयांची भांडवली गुंतवणूक केली.
गूळनिर्मिती
गूळनिर्मितीत ठरावीक कालावधीच्या विविध टप्प्यांत क्रेशरमधून रस काढणे, स्थिरीकरणासाठी रस टाकीमध्ये ठेवण्यात येतो, प्रक्रियेसाठी रस कढईत घेत त्यात भेंडीचे पाणी व निवळी टाकून मळी काढण्यात येते. दोन ते अडीच तास रस उकळून घेतला जातो, त्यानंतर काकवी तयार होते. गूळ तयार झाल्यानंतर घोटणी करून साच्यामध्ये वजनाप्रमाणे तात्काळ आकर्षक पॅकिंग केली जाते व मार्केटमध्ये पाठविली जाते अशा विविध कृती कराव्या लागतात. गूळनिर्मिती करताना शंभर टक्के स्वच्छतेवर भर असतो.
प्रक्रिया कालावधी – दरवर्षी नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत गूळनिर्मिती उद्योग सुरू असतो. दररोज सुमारे दोनशे किलो गूळ तयार केला जातो.
काकवीची विक्री
काकवी बनविताना प्रक्रिया केलेला पाक थंड करून स्टीलच्या भांड्यात साठवला जातो, बाजारपेठेतील मागणीनुसार २५० मिली किंवा ५०० मिलीच्या बाटलीत पॅकिंग करून विक्री केले जाते. २५ मिलीला ३५ रुपये व ५०० मिलीची ७० रुपये दराने विक्री केली जाते. महिन्याला २०० लीटपर्यंत काकवीची विक्री होते, यातून २८ हजार रुपये मिळतात.
गूळनिर्मिती उद्योगातून रोजगार
प्रणय गाडे यांना आई सविता, भाऊ अजय यांचे सहकार्य आहे. गूळनिर्मिती प्रक्रियेच्या सहा महिन्यांच्या काळात सात लोकांच्या हातांना काम मिळाले आहे. यात महिलांचाही सहभाग आहे. शेती व उद्योगनिर्मितीत पाच लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे.
गूळ किरकोळ वितरकाला दिल्यास पसे कमी मिळायचे. प्रणय यांनी या पद्धतीत बदल करताना गुळाचे थेट मार्केटिंग केले. गुणवत्ता चांगली जोपासल्याने गुळाला चांगली मागणी आहे. ५५०० व १००० ग्रॅम पॅकिंगमधून गुळाला बाजारपेठेत चांगला उठाव मिळतो. पुणे, मुंबई, नाशिक व औरंगाबाद शहरात गूळ थेट विक्रीला दिला जातो. महिन्याला पाच टन उत्पादन केले व सुमारे ५० दुकानांमधून गूळ विक्री केली. त्याची किंमत (एमआरपी) १०० रुपये असली तरी वितरकांना ती ७५ रुपयांना विकायची. म्हणजे प्रत्येक दुकानदाराला किलोमागे २५ रुपये फायदा होऊ शकतो व तो अधिक गूळ विकू शकतो. ही विक्री पद्धती फायदेशीर ठरल्याचे प्रणय सांगतात.
गाडे यांच्या उद्योगाचे अर्थकारण
- एक हजार किलो गूळनिर्मिती खर्च – ऊस – ३० हजार, मजूर – ६ हजार, पॅकिंग – ५ हजार, मशिनरीचा घसारा चार हजार, इतर एक हजार असा मिळून ४६ हजार रुपये
- ७५ रुपये प्रति किलोप्रमाणे एक हजार किलो विक्रीतून ७५ हजार रुपये मिळतात.
- या वर्षी वीस हजार किलो गूळविक्रीतून १५ लाख रुपयांची उलाढाल झाली.
- सध्या आपल्याच शेतातील ऊस वापरला जातो; मात्र गरजेनुसार तो बाहेरूनही घ्यावा लागतो.
गणेश फुंदे
shirdisio@gmail.com
(लेखक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,उपमाहिती कार्यालय, शिर्डी येथे कार्यरत आहेत)