जवसाच्या तेलाचा वापर तलरंग, वार्निश, साबण, छपाईची शाई, वंगण, मलम, चामडय़ाच्या पॉलिशसाठीही केला जातो. तेल काढून उरलेली पेंड गुरांच्या खाद्यासाठी वापरली जाते. दुभती जनावरे यांच्यासाठी रेचक म्हणूनही जवसाचा वापर केला जातो. जवसाच्या वापराने पित्तभावना, पाठदुखी कमी होते. खोकल्यावर व मूत्रिपडाच्या विकारावर आराम पडण्यासाठीही जवसाचा वापर केला जातो.

रब्बी हंगामात महाराष्ट्रात घेतले जाणारे जवस हे पीक पूर्वापार आहे. गेल्या काही वर्षांत जवसाचा पेरा कमी होतो आहे. नगदी पिकाच्या नादामध्ये या पिकाकडे शेतकऱ्याचे दुर्लक्ष होते आहे. पूर्वी या वाणाची उत्पादकता कमी होती, त्यामुळे कुटुंबाला लागेल इतकेच उत्पादन शेतकरी घेत असत. याचे औषधी उपयोग विदेशातील शास्त्रज्ञांनी सांगितल्यानंतर आपल्याकडील लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून आता जवसाला चांगली मागणी येते आहे. त्यामुळेच जवस पेरा हळूहळू वाढू लागला आहे.

रब्बी हंगामात जवसाचे पीक घेतले जाते. कोरडवाहू पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाडय़ात तर बागायती पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात केली जाते. जवसाची पेरणी तिफणीने करतात. दोन ओळीतील अंतर २५ ते ३० सेंटीमीटर ठेवले जाते. या पिकाला ओलावा टिकवून ठेवणारी मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन लागते. जमिनीचा सामू (पीएच) ६.५ ते ७.५ या दरम्यान असावा लागतो. खरीप हंगामातील कमी कालावधीची पिके निघाल्यानंतर जमीन नांगरून त्यात हेक्टरी दहा गाडय़ा शेणखत घालून व पाळी घालून जवसाची पेरणी केली जाते. एका हेक्टरमध्ये साडेचार ते पाच लाख झाडे येतील या पद्धतीने पेरणी केली जाते. हेक्टरी २५ किलो याला बियाणे लागते. जवसाचे अनेक वाण आता बाजारपेठेत आले आहेत. सर्वसाधारणपणे ११५ ते १२० दिवसांत जवस काढणीला येते. तेलाचे प्रमाण ४० ते ४५ टक्के आहे. किरण या वाणाचे हेक्टरी उत्पादन ५ क्विंटलपासून १२ क्विंटलपर्यंत आहे.

आरएलसी २९ या वाणाचे उत्पादन ६ ते १२ क्विंटल आहे. आर ५५२ या वाणाचे उत्पन्न ६ ते ९ क्विंटल आहे.  एनएल १४२ या वाणाचे उत्पन्न १५ क्विंटलपर्यंत येते. जवसाचे पीक मर, गेरवा, भुरी या रोगास प्रतिकारक असते तसेच वाण सध्या बाजारपेठेत आहे. अनेक शेतकरी केवळ जवस किंवा जवस-हरभरा, जवस-करडई, जवस -मोहरी या पद्धतीने पेरणी करतात. बागायती जवसाला दोन पाणी लागतात. पहिले पाणी पीक फुलोऱ्यात आल्यावर, दुसरे पाणी बोंडे धरण्याच्या वेळेस द्यावे लागते. पहिले ३० दिवस तणविरहित जमीन राहिली तर उत्पादनात चांगली वाढ होते. जवसाच्या तेलात ५८ टक्के ओमेगा ३ आणि अँटीअ‍ॅक्सिडंट आहे. त्यामुळे हृदयरोगाला कारणीभूत असलेले विकार रक्तदाब, कोलेस्टेरॉल, ग्लिसराइड यांचे प्रमाण कमी होते. संधिवातावर जवस अधिक गुणकारी आहे. जेवणानंतर बडीशेपऐवजी भाजलेले जवस थोडे मीठ लावून नियमित खाल्ल्यास सांधेदुखी थांबते. या वर्षी खरीप हंगामाचा चांगला पाऊस झाला असल्यामुळे रब्बी हंगामात जवसाचा पेरा वाढेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.

जवसाचा उगम इजिप्त देशातील असल्याचा दावा पाश्चात्त्य मंडळी करतात, तर चरकसंहितेत जवसाचा उल्लेख असल्यामुळे भारतातील जुन्या काळात जवसाचे उत्पादन असल्याचा दावा आयुर्वेद शास्त्रातील मंडळी करतात. जवसाच्या एका फळात १० टोकदार चपटय़ा बिया असतात. या बियांपासून तेल निघते. विदर्भात खाद्यपदार्थात जवसाचे तेल वापरतात. जवसाच्या बियापासून चविष्ट चटणी केली जाते तर खोडाच्या अंतरसालीपासून धागा तयार केला जातो. जवसाच्या तेलाचा वापर तलरंग, वाíनश, साबण, छपाईची शाई, वंगण, मलम, चामडय़ाच्या पॉलिशसाठीही केला जातो. तेल काढून उरलेली पेंड गुरांच्या खाद्यासाठी वापरली जाते. दुभती जनावरे यांच्यासाठी रेचक म्हणूनही जवसाचा वापर केला जातो. जवसाच्या वापराने पित्तभावना, पाठदुखी कमी होते. खोकल्यावर व मूत्रिपडाच्या विकारावर आराम पडण्यासाठीही जवसाचा वापर केला जातो. जवसाची जाळलेली साल वाहणारे रक्त थांबवते व जखमा भरण्यास उपयोगी पडते. फुले मेंदू आणि हृदयासाठी पौष्टिक मानले जातात. त्वचारोगावर बाहय़ोपचारासाठी जवसाच्या बियाचा वापर केला जातो. कातडी भाजली तर चुन्याच्या निवळीत जवसाचे तेल मिसळून ते वापरले जाते. जवसाची चटणी ही महाराष्ट्रात व भारतीय उपखंडात घरोघरी वापरली जाते. दहय़ासोबत ही चटणी खाल्ली जाते.

जवसाचे लाभ लक्षात आल्यानंतर जवसाचा समावेश असणारे बिस्कीट व ब्रेडही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. रब्बीच्या हंगामात शेतीच्या संरक्षणासाठीही बांधाच्या कडेला जवस पेरले जाते. चाकूर तालुक्यातील घारोळा गावचे अशोक चिंते हे शेतकरी दरवर्षी जवसाचे पीक घेतात.

एकरी ७ क्विंटलपर्यंत उत्पादन झाले व ८० रुपये किलोने जवस विकले. लातूर येथील गळीतधान्य संशोधन केंद्र, तुळजापूर व लातूर येथील कृषी विज्ञान केंद्र, परभणी कृषी विद्यापीठास जवसाचे बियाणे दिले असल्याचे चिंते सांगतात. रब्बीच्या हंगामात जवसाचे उत्पन्न अन्य पिकांसारखेच लाभदायी आहे. एकरी ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पादन चांगले हवामान असल्यास मिळते असा अनुभव असल्याचे चिंते म्हणाले. शहरी भागात जवसाला चटणीसाठीची मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे जवसाला विक्रीमूल्य अधिक आहे. या वर्षीच्या चांगल्या हवामानाचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला तर त्यांना अधिक उत्पन्न मिळेल, असेही चिंते यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

pradeepnanandkar @gmail.com