|| युवराज परदेशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेंद्रिय रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर चार वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सचिन पाटील या तरुणाने नोकरीचा पाठलाग सोडून देत मोत्यांची शेती करण्याचा अभिनव प्रयोग यशस्वीरीत्या प्रत्यक्षात आणला आहे. पारंपरिक गोल मोत्यांसह ‘डिझायनर’ मोत्यांची निर्मिती करून त्यांची १०० रुपयांपासून ते अडीच हजार रुपयांपर्यंत विक्री होत आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या मोत्यांच्या शेतीतून सचिनला वर्षांकाठी लाखभर रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न होत आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याने राज्यात शेतकरी आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरूच आहे. शासकीय नोंदीनुसार उत्तर महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत तब्बल एक हजार ७७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, यात जळगाव जिल्ह्यतील सर्वाधिक ७८७ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. वाढत्या महागाईमुळे शेती परवडत नसल्याने शेतकऱ्यांची मुले पारंपरिक शेतीचा व्यवसाय सोडून नोकरीच्या मागे धावताना दिसत आहेत. मात्र जळगाव जिल्ह्यतील चोपडा तालुक्यात असलेल्या वाळकी या जेमतेम तीन हजार लोकसंख्येच्या गावातील सचिन हिंमतराव

पाटील या तरुणाने तापी नदीकाठी चक्क मोत्याची शेती करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे. सचिन पुण्यात ‘यूपीएससी’ परीक्षेची तयारी करत होता. या वेळी त्याचे वाचन मोठय़ा प्रमाणात होत होते. यात एकदा ‘मोत्यांच्या शेती’विषयी त्याच्या वाचण्यात आले. त्याबद्दल ‘इंटरनेट’वर सविस्तर माहिती घेतल्यानंतर गावात जाऊन स्वत:च्या शेतात हा प्रयोग करण्याचा निर्णय सचिनने घेतला. मात्र आयएएस अधिकारी होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या मुलाने शेती करण्याचा घेतलेला हा निर्णय वडिलांना पसंत पडला नाही. यामुळे वडिलांनी शेततळे बांधण्यासाठी जागा आणि पैसेही दिले नाहीत. पण सचिनने आपला हट्ट सोडला नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी घेतलेला लॅपटॉप विकून भांडवल उभे करत हा व्यवसाय सुरू केला.

घराजवळील मोकळय़ा जागेत १० बाय १० चौरस फुटाचा आणि शिंपल्यांना खाद्य देण्यासाठी आणखी एक लहान आकाराचा हौद त्याने तयार केला. या हौदात आणि एका बादलीमध्ये त्याने शस्त्रक्रिया करून एक हजार शिंपले सोडून मोत्याच्या शेतीचा पर्यायी व्यवसाय सुरू केला. १४ महिन्यांनंतर त्याला यातून जगलेल्या ५०० शिंपल्यांतून ५५ हजाराचे उत्पन्न मिळाले. ते आता लाखाच्या पुढे गेले आहे. या प्रवासाविषयी सचिन सांगतो, की या शेतीसाठी जिवंत शिंपले, शेत तलाव, गोडे पाणी, मोतीबीज आणि जाळी या पाच गोष्टी लागतात. त्यानुसार त्याने अगोदर शिंपल्याचा शोध सुरू केला. सचिनचे गाव तापी नदीच्या काठावर असल्याने त्या ठिकाणी त्याला मुबलक शिंपले मिळाले, पण हे शिंपले शोधताना त्याला सुरुवातीला खूप अडचणी आल्या. तो दररोज सकाळी नदीवर जात असे. त्या वेळी स्थानिकांकडून खिल्ली उडवली जात असे. पण त्याकडे दुर्लक्ष करत त्याने आपले काम सुरू ठेवले. आधी केवळ समुद्रातच मोत्यांची निर्मिती होत असे. मात्र भुवनेश्वर येथील सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फ्रेश वॉटर अ‍ॅक्वा कल्चर (शिफा) या संस्थेने हे तंत्रज्ञान विकसित केले. मोती हे ‘मोलस्क’ नावाच्या शंबुका शिंपल्यामध्ये तयार होतात. हे आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रात शेततळी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत त्याचा वापर फक्त शेतीच्या पाणी सिंचनासाठीच केला जातो. पण या जोडीने जर या शेततळय़ांतील पाण्याचा वापर अन्य व्यवसायासाठी करता येऊ शकतो. मत्स्यपालन आणि मोती उत्पादन हे दोन व्यवसाय तर यामध्ये शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न देणारे आहेत. या शेतीला वादळ, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका नसतो. मोती नाशवंत नसल्यामुळे योग्य दाम मिळेपर्यंत तो आपण साठवूही शकतो. तसेच आयुर्वेदिक औषधे तयार करतानाही मोत्याचे भस्म वापरले जाते. यातूनही उत्पन्न मिळू शकते. आता गोल मोत्यासह विविध आकारांतील मोती तयार करण्याचे तंत्र विकसित झाले आहे. या विविध आकारांतील डिझायनर मोत्यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. जळगाव जिल्हा हा मोत्याच्या शेतीचे हब बनविण्याचे स्वप्न असून, भविष्यात रेशीम शेती करण्याचा मानस असल्याचे सचिन सांगतो.

अशी करता येईल मोती निर्मिती

मोती निर्मिती केवळ नदीच नव्हे, तर शेततळी, हौद किंवा घरातील बादलीमध्येदेखील करता येते. यासाठी मोती बीज व शिंपल्यावरील शस्त्रक्रिया हे दोन घटक महत्त्वाचे असतात. मोती विकसित करण्यासाठी शिंपल्यावर शस्त्रक्रिया करून मोती बीज सोडावे लागते. यात मध्यम वजनाचे मासे सोडावे. जेणेकरून पाणी स्वच्छ राहते. मोती बीज हे मृत शिंपल्यापासून आणि दंतमंजन भुकटीचा (डेंटल पावडर) वापर करून तयार करता येते. ही पावडर म्हणचे दातांची कवळी तयार करताना, दातांच्या हिरडय़ा तयार करण्यासाठी वापरली जाते. त्यास ‘अ‍ॅक्रेलिक पावडर’ असेदेखील म्हणतात. ती दंतचिकित्सा महाविद्यालय, दंत रुग्णालयातील औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध असते. या प्रक्रियेत मृत शिंपल्याला ‘ब्लिचिंग पावडर’मध्ये दोन दिवस ठेवावे. नंतर स्वच्छ धुऊन त्या शिंपल्याची बारीक पावडर तयार करावी. ती विशिष्ट चिकट द्रवात (घरातील ओटा तयार करताना फरशी जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘एरलडाईड’चा इथे वापर करता येईल.) मिश्रित करून साच्यात भरावी. तयार झालेले हे बीज काही मिनिटात सुकते. मोत्यांच्या आकारनिहाय साच्याद्वारे बीज तयार करता येतात. पुढील काम आहे ते म्हणजे शिंपल्याची निवड. ‘लॅमिलेडीन्स मार्जिनालिस’, ‘एल कोरिआनस’, ‘पेरेसिआ कोरुगाटा’ या शिंपल्यांपासून चांगला दर्जाचा मोती तयार होतो. महाराष्ट्रातील नद्यांमध्ये याच प्रकारचे शिंपले आढळतात. ज्या शिंपल्याचा आतील भाग चकचकीत असतो तो शिंपला उत्कृष्ट मानला जातो. यासाठी शक्यतो आठ सेंटिमीटर लांबीचे शिंपले योग्य असतात. तो नदीवरून आणल्यानंतर दोन ते तीन दिवस त्याला गोडय़ा पाण्यात घरी ठेवावा लागतो. त्यामुळे शिंपल्याला जोडून ठेवणारे स्नायू कमकुवत होऊन शस्त्रक्रियेवेळी ते हाताळणे अगदी सोपे होते. गोल मोती बीज हे शिंपल्याची दोन्ही बाजू शस्त्रक्रिया संच वापरून हळूच उघडून शिंपल्याच्या गर्भपेशीत ठेवला जातो. तर कलात्मक मोती बीज हे शिंपल्याची झडप उघडून मेटल कॅव्हेटी (ज्या आकाराचा मोती तयार करायचा आहे, त्याचा ढाचा) खाली ठेवावे. असे दुसऱ्या बाजूनेही करावे लागते. शस्त्रक्रियेनंतर शिंपल्याच्या प्रतिकारशक्तीला हानी पोहोचू नये व मृत शिंपल्याचा जंतुसंसर्ग इतरांना होऊ  नये यासाठी प्रतिजैविक पदार्थ (अ‍ॅन्टिबायोटिक) असणाऱ्या पाण्यात पाच दिवस ठेवावे. पहिले तीन दिवस खाद्य देऊ नये. नंतर शेवाळ हे नैसर्गिक खाद्य देण्यास सुरुवात करावी. या प्रक्रियेत मृत झालेले शिंपले पाचव्या दिवशी बाजूला काढून जिवंत शिंपले जाळीत बांधून हौद किंवा तळय़ात सोडावे. १४ ते २४ महिने या कालावधीत मोती हाती येतील.

(अधिक माहितीसाठी सचिन पाटील (८४५९१४४०५६) यांच्याशी संपर्क साधावा.)

 

मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin patil success story
First published on: 25-09-2018 at 01:30 IST