नवरात्रोत्सवानिमित्त अनेकजण ९ दिवस उपवास करतात. या उपवासानिमित्त फळं, दही, साबुदाण्याची खिचडी, भगर, रताळे असे उपवासाचे पदार्थ खातात. पण हे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर कच्च्या केळांचे कबाब नक्की ट्राय करु शकता. अगदी काही मिनिटात तयार होणारी ही रेसिपी अगदी चविष्ट असते. चला तर मग पाहू कच्च्या केळ्यांचे कबाब
कच्च्या केळ्यांचे कबाब बनवण्याचे साहित्य आणि रेसिपी
साहित्य:
१) एक वाटी शेंगदाणे
२) एक मोठा चमचा साजूक तूप
३) जिरे
४) आले – मिरची पेस्ट
५) कच्ची केळी
६) शिंगाड्याचे पीठ
७) चवीनुसार मीठ आणि गूळ
कच्च्या केळ्यांचे कबाब बनविण्याची पद्धत:
सर्वप्रथम कच्च्या केळी हाताला तेल लावून चांगले सोलून घ्या. साल काढल्यानंतर केळीचे ३-४ काप करुन घ्या. एका भांड्यात पाणी उकळत ठेवत त्यात कच्च्या केळ्याचे काप टाका, शिजल्यानंतर केळी बाहेर काढा. त्यात हिरव्या मिरच्या, एक वाटी शिंगाड्याचं पीठ, मीठ, बारीक केलेले शेंगदाणे हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करुन घ्या.
हे मिश्रण पीठासारखे चांगले मळून घ्या. यानंतर त्यावर झाकण ठेऊन थोडावेळ बाजूला ठेवा. कढईत तेल अथवा तूप टाकून गरम करा. यानंतर पीठाचे चांगले गोलाकार देऊन छोटे चपटे गोळे तयार करा.
तेल गरम झाल्यानंतर त्यात हे चपटे गोळे चांगले सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे कच्च्या केळ्याचे कबाब रेडी झाले आहेत.
हे कबाब खाल्ल्याने तुम्हाला जास्त भूकही लागणार नाही आणि त्यातून पौष्टीक घटकही मिळतील, कच्च्या केळयाचे कबाब तुम्ही हिरवी चटणी किंवा चिंचगूळाच्या चटणीबरोबर खाऊ शकतात.