छत्रपती संभाजीनगर: तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा मध्यरात्री संपून पहाटेच्या सुमारास तुळजाभवानी देवीची मूळ अष्टभुजा मूर्ती सिंहासनावर स्थापित करण्यात आली. त्यानंतर आरती करण्यात आली. रविवारी दुपारी घटस्थापनेने तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ होणार आहे. पहाटे पलंगावरून तुळजाभवानी देवीची मूर्ती सिंहासनावर नेण्यात आली. तुळजाभवानी मंदिरातील जगदंबेची मूर्ती ही देशातील एकमेव चलमूर्ती आहे.

हेही वाचा >>>‘केसर’ला ऑक्टोबरमध्येच मोहोर! आंबा अभ्यासकांमध्ये आश्चर्य, हापूससोबतच बाजारात येण्याची शक्यता

शारदीय नवरात्र महोत्सवास आजपासून मोठय़ा भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सर्वप्रथम मध्यरात्री एक वाजता जगन्माता तुळजाभवानी देवी मंचकी निद्रा  संपवून मूर्ती गाभाऱ्यात नेण्यात आली. तुळजाभवानीच्या मूर्तीला पंचामृताचा विधिवत महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर पहाटे चार वाजता तुळजाभवानी देवीची मंदिर समितीचे पदाधिकारी व मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. नऊ दिवसाच्या घोर निद्रेनंतर आई तुळजाभवानीचे दर्शन झाल्याने भाविकांनीही लोटांगण घालून भक्तिभावाने दर्शन घेतले. कर्नाटक, आंध्र प्रदेशातून भाविक येत असल्याने तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. गावोगावी घटस्थापना करण्यासाठी तुळजापूर येथून भवनी ज्योत आणण्याची प्रथा आहे. शनिवारी ज्योत नेणाऱ्या तरुणांची मंदिरात मोठी गर्दी होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.