अमरावती : विजयादशमीच्‍या पर्वावर श्री अंबादेवी, श्री एकवीरा देवी पालखीत बसून, शिलंगण मार्गावरून सायंकाळी ५.३० वाजता सीमोलंघनास निघतील. ही जुनी परंपरा असून, अजूनही तशीच सुरू आहे. दसरा मैदानापासून नंतर दोन्ही देवींच्या मूर्ती मंदिरात परत येतात. यावेळी हजारो भाविक रस्त्याच्या दोन्ही बाजुला देवीचा आशीर्वाद घेण्यासोबत त्यांना सोने (आपट्याची पाने) अर्पण करण्यासाठी उभे असतात. यावेळी मंदिर संस्थानांद्वारे भाविकांना प्रसाद तसेच देवीला अर्पण केलेली आपट्याची पाने देतात. देवीचा आशीर्वाद म्हणून ही पाने भाविक जवळ बाळगतात.

हेही वाचा : यवतमाळात होणार ‘अहंकार’ प्रतिमेचे दहन, दुर्गोत्सव सामाजिक बांधिलकीचा उत्सव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्री अंबादेवी, श्री एकवीरा देवी मंदिरापासून ते रवीनगर पर्यंतचा शिलांगण रोड स्वच्छ करून तो सुवासिनी सडा व रांगोळ्यांनी सजवतात. रस्त्यावर झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या पसरवल्या जातात. तसेच रस्त्यात ठराविक अंतराने मोठया कमानी उभारण्यात आल्या असून त्या झुंबर, तोरणांनी सजवण्यात आल्या आहेत. या कमानींच्या वरून दोन्ही देवींच्या पालखी फुलांचा वर्षाव केला जातो. सुवासिनी व भाविक आरती ओवाळतील. पालखीच्या पुढे मशाली, दिवट्या पथक, भालदार, चोपदार असा लवाजमाही राहणार आहे. फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशे पथकही यावेळी पुढे असेल. देवींच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतरच सर्वजण मंदिरात सोने अर्पण करण्यासाठी जातात. त्यानंतर थोरा-मोठ्यांना सोने देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे.