कोल्हापूर :  दक्षिण काशी कोल्हापुरात आजपासून नवरात्रौत्सवानिमित्त मांगल्य पर्व सुरू होत आहे. करवीरनिवासिनी महालक्ष्मीची दररोज नवनवीन रूपे भाविकांना अनुभवता येणार आहेत. मंदिरामध्ये मुखदर्शनासाठी तात्पुरता पूल उभा करण्यात आला आहे. घरोघरी विधिवत घटस्थापना केली जाणार आहे. सार्वजनिक मंडळांचे मंडप उभारले असून, तयारी पूर्ण झाली आहे. मंदिरात गेले दहा दिवस तयारी सुरू आहे. त्याची पाहणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अधीक्षक महेंद्र पंडित यांनी करून काही सूचनाही केल्या.

मंदिराकडे दर्शनाकरिता येणाऱ्या पुरुष व महिला भाविकांसाठी एकत्रितरीत्या मुख्य दर्शन रांग ही भवानी मंडप येथून सुरू होणार आहे. पुढे ती शेतकरी संघाच्या इमारतीमधून जुना राजवाडा पोलीस स्टेशनसमोरील मंडपामधील रांगेतून पूर्व दरवाजातून मंदिरात जाईल. दर्शनानंतर भाविक उर्वरित तीन दरवाजांतून बाहेर पडतील.

हेही वाचा >>>जनता दलाचे नेते, माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांचे निधन

 मंदिर परिसरामध्ये गणपती चौक येथून व महाद्वार दरवाजासमोरील तात्पुरत्या जिन्यातून मुखदर्शनाची व्यवस्था केली आहे. थेट दर्शनासाठी मंदिर परिसरात १२ बाय १० फुटांच्या कायमस्वरूपी चार स्क्रीन, तसेच शहरात दहा ठिकाणी तात्पुरत्या एलईडी स्क्रीनची सोय केली आहे. मंदिरात दुपारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

महालक्ष्मीची पूजारूपे

उद्या रविवारी प्रतिपदेला पारंपरिक बैठी पूजा होणार आहे. सोमवारपासून पुढे अनुक्रमे श्री महागौरी, श्री कामाक्षी देवी, श्री कुशमांडा देवी, पारंपरिक गजारूढ, श्री मोहिनी अवतार, श्री नारायणी नमोस्तुते, पारंपरिक महिषासुरमर्दिनी, श्री दक्षिणामूर्तीरूपिणी आणि शेवटी दसऱ्याच्या दिवशी २४ नोव्हेंबरला पारंपरिक रथारूढ अशा रूपात महालक्ष्मीची पूजा बांधली जाणार आहे.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभुमीवर करवीर निवासीनी महालक्ष्मी देवीची शनिवारी बांधण्यात आलेली खडी सालंकृत पुजा.शारदीय नवरात्रौत्सवास रविवारपासून सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील महालक्ष्मीचे मंदिर शनिवारी संध्याकाळी रोषणाईत उजळून निघाले होते.

 ( छाया – दीपक जाधव )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.