08 March 2021

News Flash

ओपन सोर्स व देवाणघेवाणीचं तर्कशास्त्र

ओपन सोर्स सॉफ्टवेअर ही एक सार्वजनिक मालमत्ता (पब्लिक गुड) आहे.

|| अमृतांशू नेरुरकर

एखाद्याने ओपन सोर्स प्रकल्पात काडीचंही योगदान दिलं नसलं तरी त्याला त्या प्रकल्पात निर्मिलेले ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरण्यापासून व त्याचा सोर्स कोड मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तसेच त्याच्या वापरण्यामुळे त्या सॉफ्टवेअरच्या दुसऱ्यांसाठीच्या उपलब्धतेत जराही फरक पडत नाही.

ओपन सोर्स सॉफ्टवेअर ही एक सार्वजनिक मालमत्ता (पब्लिक गुड) आहे. ओपन सोर्स प्रकल्पात निर्मिलेल्या कोणत्याही गोष्टीपासून (मग तो सॉफ्टवेअरचा सोर्स कोड असो किंवा प्रकल्पासंदर्भातला कोणताही दस्तऐवज असो) कोणालाच कोणत्याही कारणासाठी वगळता येत नाही. तसेच यातले दस्तऐवज मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क वापरकर्त्यांला भरावे लागत नाही. म्हणूनच ओपन सोर्स सॉफ्टवेअरला इतर सार्वजनिक मालमत्तेप्रमाणे ‘नॉन-एक्सक्लूडेबल’ असं संबोधलं जातं.

मात्र डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्याने ओपन सोर्स सॉफ्टवेअर आणि इतर प्रकारच्या सार्वजनिक मालमत्तेत एक मूलभूत फरक आहे. साधारणपणे, सार्वजनिक मालमत्ता जसजशी अधिकाधिक लोकांकडून वापरली किंवा उपभोगली जाते तसा तिची उपलब्धता, मूल्य किंवा दर्जाचा क्षय होत जातो. उदाहरणार्थ, एखादा सार्वजनिक रस्ता वा उद्यानाची जर नीट देखभाल घेतली गेली नाही तर त्यांच्या अधिकाधिक वापराने त्यांचा मूळ दर्जा खालावण्याचीच शक्यता अधिक असते. याउलट ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे कितीही वेळा वितरण केले, तसेच त्याला कितीही वेळा डाउनलोड केले तरीही त्याची उरलेल्या वापरकर्त्यांसाठीची उपलब्धता अथवा दर्जा अजिबात कमी होत नाही. ओपन सोर्स सॉफ्टवेअरला म्हणूनच ‘नॉन-रायव्हल’ असंही संबोधलं जातं.

ओपन सोर्स सॉफ्टवेअरची ही दोन महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ं (नॉन-एक्सक्लूडेबिलिटी आणि नॉन-रायव्हलनेस) देवाणघेवाणीसंदर्भातल्या एका मूलभूत अर्थशास्त्रीय प्रश्नाला जन्म देतात. जरी एखाद्याने ओपन सोर्स प्रकल्पात काडीचंही योगदान दिलं नसलं तरी त्याला त्या प्रकल्पात निर्मिलेले ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरण्यापासून व त्याचा सोर्स कोड मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. तसेच त्याच्या वापरण्यामुळे त्या सॉफ्टवेअरच्या दुसऱ्यांसाठीच्या उपलब्धतेत जराही फरक पडत नाही. आता जर प्रत्येकाने असा स्वत:पुरता स्वार्थी विचार केला (ज्याला अर्थशास्त्रीय भाषेत ‘फ्री-रायडिंग’ असं म्हणतात) तर या प्रकल्पात कोणी योगदानच देणार नाही आणि मुळात तो प्रकल्पच कधी उभा राहू शकणार नाही. प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरची निर्मिती करणाऱ्या कंपन्या याच कारणांसाठी बौद्धिक संपदा हक्कांची गरज विशद करत असतात. मग असं असताना ओपन सोर्स प्रकल्पात भरीव पद्धतीचं योगदान का होत राहतं? तसंच सोर्स कोड व अन्य दस्तऐवजांची मुक्तपणे देवाणघेवाण का होत राहते?

ओपन सोर्स व्यवस्थेचा भाष्यकार एरिक रेमंडने त्याच्या ‘द कॅथ्रेडल अ‍ॅण्ड द बझार’ या जगप्रसिद्ध पुस्तकात याची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्या मताप्रमाणे सॉफ्टवेअर निर्मिती ही एक सर्जनशील प्रक्रिया आहे आणि कोणत्याही सर्जनशील गोष्टीची निर्मिती तिचा रचनाकार स्वानंदासाठी करत असतो. रेमंड इथे मॅस्लाव्हच्या थिअरीचा आधार घेतो. मॅस्लाव्हनं माणसं कोणतंही काम का आणि कशा पद्धतीने करतात हे स्पष्ट करण्यासाठी माणसांच्या मूलभूत गरजांचा अभ्यास केला, त्यांना पाच स्तरांमध्ये विभागलं व या पाच स्तरांचा एक पिरॅमिड तयार केला. या पिरॅमिडमधली सगळ्यात खालच्या स्तरावरची पहिली गरज म्हणजे शारीरिक (अन्न, वस्त्र, निवारा वगैरे) गोष्टींची, दुसरी सुरक्षिततेची, तिसरी प्रेमाची तर चौथी स्वत:चा आदर करून सेल्फ एस्टीम वाढवण्याची! पिरॅमिडमधली सर्वात वरच्या स्तरावरची गरज म्हणजे आपल्या कामातून उच्च कोटीचा आनंद मिळण्याची, ज्याला ‘सेल्फ अ‍ॅक्च्युअलायजेशन’ असंही म्हटलं जातं.

रेमंडच्या मताप्रमाणे ओपन सोर्स प्रकल्पांत योगदान देणारे तंत्रज्ञ, हे काम स्वानंदासाठी करीत असल्यामुळे, सेल्फ अ‍ॅक्च्युअलायजेशनच्या अवस्थेला पोचलेले असतात. त्यामुळे आपण लिहिलेल्या प्रोग्राम्सचं इतर तंत्रज्ञांमध्ये वितरण केल्यामुळे मिळणारा आत्मिक आनंद व प्रकल्प व्यवस्थापनात मिळणारा मान त्यांच्यासाठी ओपन सोर्स प्रकल्पांत योगदान देण्याचं मुख्य कारण असतं. रेमंडने अशा प्रकारे सोर्स कोडच्या खुल्या पद्धतीने आदानप्रदान करण्याच्या व्यवस्थेला ‘गिफ्ट इकॉनॉमी’ असं संबोधलंय. रेमंडच्या तर्कानुसार जिथं संसाधनांची मुबलकता असते तिथं अशा गिफ्ट इकॉनॉमीज फोफावतात.

वरवर पाहता रेमंडचा तर्क बिनतोड वाटत असला तरी त्यात एक महत्त्वाचे गृहीतक आहे. रेमंडने ज्या सर्व साधनांची मुबलकता गृहीत धरली आहे ती खरीच तशी उपलब्ध आहेत का? संगणकाची काम करण्याची व माहिती साठवण्याची क्षमता, तसेच इंटरनेटचा वेग खरोखरच मुबलकपणे उपलब्ध होत होते. पण ओपन सोर्स प्रकल्पांच्या यशासाठी तेवढंच पुरेसं नाही. तंत्रज्ञांचा वेळ, बौद्धिक तसेच शारीरिक ऊर्जा या गोष्टीदेखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ही संसाधनं मुबलकपणे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आपला मौल्यवान वेळ व ऊर्जा देऊन केलेलं काम फुकटात सर्वामध्ये वाटण्यामागे काय कारण असेल?

भारतीय वंशाचा संगणक तंत्रज्ञ व संशोधक रिषभ घोषने या संदर्भात बरंच काम करून ठेवलंय. भारतीय मूळ असल्यामुळे कदाचित पण त्याने ओपन सोर्स सॉफ्टवेअर निर्मितीच्या प्रक्रियेला आदिवासींच्या जेवण बनविण्याच्या प्रक्रियेची उपमा दिलीय. आदिवासी लोक हे समूहात राहतात, सामूहिक जेवण बनवतात आणि समूहामध्येच एकत्र जेवतात. त्यांच्याकडे जेवण बनविण्यासाठी एक मोठं पातेलं असतं जे चुलीवर ठेवलं जातं. मग प्रत्येक जण स्वत:कडचा जिन्नस एक एक करून त्या पातेल्यात घालतात. अशा तऱ्हेने विविध जिन्नस एकजीव होऊन बनलेल्या कालवणाचा सर्व जण एकत्रितपणे आस्वाद घेतात.

ओपन सोर्स सॉफ्टवेअर प्रकल्पातदेखील विविध सहभागी तंत्रज्ञ आपापल्या कौशल्यानुसार स्वत: निवडलेली पण वेगवेगळी कामं करतात. अशा विविध ओपन सोर्स सॉफ्टवेअरची जर रिपॉजिटरी तयार झाली तर प्रत्येकाला त्याच्या प्रकल्पातल्या योगदानाच्या तुलनेत कैक पट मोबदला मिळेल. कारण स्वत: काम केलेल्या सॉफ्टवेअरव्यतिरिक्त इतर अनेक सॉफ्टवेअरदेखील प्रत्येकाला मुक्तपणाने वापरता येतील. मीच निर्माण करीत असलेल्या सॉफ्टवेअरच्या अतिरिक्त प्रती माझ्यासाठी फारशा उपयोगी नसल्या तरीही इतर सॉफ्टवेअरची एखादी प्रतही माझ्यासाठी प्रचंड मौल्यवान असेल. रिषभ घोषच्या मताप्रमाणे एखादा संगणक तंत्रज्ञ स्वत: निर्मिलेल्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड इतरांमध्ये मुक्तपणाने वितरित करण्यास का तयार होतो हे समजण्यासाठी वरील तर्क वापरता येईल.

कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठातल्या प्राध्यापक स्टिव्हन वेबर यांच्या मते रिषभ घोषचा युक्तिवाद पटण्यासारखा असला तरीही तो फ्री रायडिंगच्या प्रश्नाचं ठोस उत्तर देत नाही. वेबर रिषभ घोषच्या तर्काला एक पाऊल पुढे नेऊन ओपन सोर्स सॉफ्टवेअरला ‘अँटी-रायव्हल’ (‘नॉन-रायव्हल’च्या पुढची पायरी) म्हणतात. ज्याप्रमाणे कोणत्याही वापरकर्त्यांसाठी एखाद्या मोबाइल नेटवर्कचं किंवा फेसबुकसारख्या सोशल मीडिया संकेतस्थळाचं मूल्य त्यात अधिकाधिक वापरकर्ते येण्याने वाढतं, त्याचप्रमाणे कोणत्याही लिनक्स वापरकर्त्यांसाठी लिनक्सचं मूल्य ती अधिकाधिक वापरकर्त्यांनी उपयोगात आणल्यावर वाढतं. कारण लिनक्सचं जितकं प्रमाणीकरण होईल तेवढं त्या वापरकर्त्यांला त्याच्या संगणकावरून इतरांबरोबर संभाषण करणं, माहितीची देवाणघेवाण करणं सोपं जाईल.

अशा या ‘फ्री-रायडिंग’ वापरकर्त्यांचा (असे वापरकर्ते जे सॉफ्टवेअरचा केवळ वापर करतात, त्याच्या निर्मितीत जराही योगदान देत नाहीत) ओपन सोर्स सॉफ्टवेअरमधल्या उणिवा काढणं, चुका दर्शवणं, सुधारणा सुचवणं यासाठीसुद्धा पुष्कळ उपयोग होतो. रेमंडने म्हटल्याप्रमाणे “Given enough eyeballs, all bugs are shallow”. जेवढे जास्त वापरकर्ते विभिन्न परिस्थितीत सॉफ्टवेअरचा वापर करतील तेवढे त्यातले दोष, चुका वा उणीव सामोऱ्या येतील व लगेचच दुरुस्त करता येतील. यामुळे ते सॉफ्टवेअर अधिक स्थिर व मजबूत होण्यात मदतच होईल.

थोडक्यात, ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्था अधिक परिपक्व होण्यास फ्री रायडर्सचा हातभारच लागतो. वेबरच्या मताप्रमाणे तर ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये जितके जास्त फ्री रायडर्स असतील तितका तो प्रकल्प लोकप्रिय होण्यात मदत होते. मागील लेखात चर्चिलेल्या ओपन सोर्स प्रकल्पांत योगदान देणाऱ्या तंत्रज्ञांच्या निर्मितीक्षम अंत:प्रेरणांना जेव्हा अशा ‘फ्री-रायडिंग’ वापरकर्त्यांची साथ लाभते, तेव्हा दोघांच्या संयुक्त सहकार्याने एक यशस्वी ओपन सोर्स प्रकल्प उभा राहतो. कोणत्याही ओपन सोर्स प्रकल्पाच्या यशामागे त्यातल्या सहयोगी तंत्रज्ञ व वापरकर्त्यांबरोबरच प्रकल्पाच्या नेतृत्वाचासुद्धा सिंहाचा वाटा असतो.

amrutaunshu@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 1:39 am

Web Title: what is open source software 3
Next Stories
1 ओपन सोर्स-निर्मितीक्षम अंत:प्रेरणा
2 वेब २.० : महाजालाचे सहभागात्मक रूप
3 पीएचपी : महाजालाची भाषा
Just Now!
X