|| अमृतांशू नेरुरकर

थॉम्पसन, रिची, बिल जॉय वगरे तंत्रज्ञांनी ओपन सोर्सची पायाभरणी केली असली तरीही ओपन सोर्सला एक तात्त्विक बठक देण्याचे काम औपचारिकपणे पहिल्यांदा रिचर्ड स्टॉलमनने केले..

कोणत्याही ओपन सोर्स प्रकल्पाच्या यशासाठी त्यात आपला सहयोग देणारे तंत्रज्ञ व प्रोग्रामर्स तसेच सॉफ्टवेअरचा उपयोग करून त्यात सुधारणा सुचवणारे वापरकत्रे यांचं योगदान जेवढं महत्त्वपूर्ण आहे तेवढंच, किंबहुना अंमळ अधिकच महत्त्व प्रकल्पाच्या नेतृत्वाला व त्यात आचरल्या गेलेल्या नेतृत्वाच्या पद्धतीला आहे. याचं कारण म्हणजे कोणत्याही इतर क्षेत्रातला प्रकल्प आणि ओपन सोर्स प्रकल्प यात काही मूलभूत फरक आहेत. व्यावसायिक क्षेत्रामधल्या एखाद्या प्रकल्पाला तडीस नेण्यासाठी एक मोठी व्यवस्थापन यंत्रणा काम करत असते. प्रकल्प सुरू होण्याआधी त्याचं वस्तुनिष्ठ नियोजन करणं, आíथक, तांत्रिक तसेच अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून व्यवहार्यता तपासणं, त्यासाठी लागणाऱ्या संसाधनांची जमवाजमव करणं आणि प्रकल्प व्यवस्थापनाचा एक आराखडा तयार करणं अशी अनेक कामं प्रकल्प व्यवस्थापन समिती करत असते.

उबुंटूसारख्या प्रकल्पांचा अपवाद सोडला तर ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये बऱ्याचदा एवढं काटेकोरपणे नियोजन होत नाही. किंबहुना बरेचसे ओपन सोर्स प्रकल्प हे एक किंवा फार तर दोन-तीन तंत्रज्ञांनी एकत्र येऊन चालू केलेले आहेत. एखाद्या विशिष्ट कामासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअरची अनुपलब्धता, प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यामध्ये येत असलेल्या तांत्रिक मर्यादा किंवा त्यांची आवाक्याबाहेरची किंमत, उपलब्ध ओपन सोर्स सॉफ्टवेअरमध्ये कार्यक्षमतेच्या दृष्टीने असलेल्या मर्यादा किंवा ओपन सोर्स प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय समितीशी झालेले तांत्रिक मतभेद अशा कारणांसाठी मुख्यत: नवे ओपन सोर्स प्रकल्प चालू होतात.

त्यामुळे एखादा ओपन सोर्स प्रकल्प चालू करण्यामागचा उद्देश, प्रकल्पाचं ढोबळ स्वरूप, पुढील काळातील दिशा वगरेसारख्या गोष्टी ठरवण्यापासून, प्रकल्पात निर्माण होणाऱ्या सॉफ्टवेअरचं आरेखन व सुरुवातीचं प्रोग्रामिंग करण्यापर्यंत सर्व कामं प्रकल्पाच्या नेतृत्वालाच करावी लागतात. त्याचबरोबर नेतृत्वाला स्वतच्या प्रकल्पामध्ये अधिकाधिक सहकार्य मिळवण्यासाठी जगभरात भौगोलिकदृष्टय़ा विखुरलेल्या तंत्रज्ञांच्या समुदायाला सहयोगाचं आवाहन करावं लागतं. एवढंच नाही, तर हे योगदान सतत चालू राहील याची काळजी घ्यावी लागते. ओपन सोर्स प्रकल्पात कोणाही सहयोगी तंत्रज्ञाला आपल्या मर्जीनुसार काम करण्याची अथवा न करण्याची मुभा असते. सोर्स कोड खुला असल्याने, नेतृत्वाशी मतभेद झाल्यास, त्याच सोर्स कोडचा वापर करून एक नवा प्रकल्प (‘फोर्क’) सुरू करण्याचीदेखील सोय असते. या कारणांमुळे प्रकल्प नेतृत्वाची जबाबदारी अधिकच वाढते.

प्रकल्पाच्या नेतृत्वाकडून सहयोगी तंत्रज्ञानमधले मतभेद कसे हाताळले जातात, नेतृत्वाचा संगणक तंत्रज्ञानात असलेला नावलौकिक, प्रकल्पात सहयोगी मंडळींना आपले योगदान सतत सुरू ठेवण्यासाठी प्रकल्पाच्या नेतृत्वाकडून मिळणाऱ्या प्रेरणा हे मुद्दे ओपन सोर्स प्रकल्पाच्या यशात मोलाचा वाटा उचलतात. अशा जटिल व्यवस्थापनामुळे ओपन सोर्स प्रकल्पात व्यक्तीच्या नेतृत्वगुणांचा कस लागतो. म्हणूनच ओपन सोर्स व्यवस्थेतील काही नामवंत नेत्यांचं आणि त्यांच्या प्रातिनिधिक नेतृत्वशैलींचं विश्लेषण करणं इथे अप्रस्तुत ठरणार नाही.

सर्वात पहिलं, ओपन सोर्स व्यवस्थेतला आद्यपुरुष असं ज्याचं यथार्थपणे वर्णन करता येईल अशा रिचर्ड स्टॉलमनपासून सुरुवात करणं क्रमप्राप्त आहे. स्टॉलमनच्या आधी थॉम्पसन, रिची, बिल जॉय वगरे तंत्रज्ञांनी ओपन सोर्सची पायाभरणी केली असली तरीही ओपन सोर्सला एक तात्त्विक बठक देण्याचं काम औपचारिकपणे पहिल्यांदा स्टॉलमनने केलं.

ओपन सोर्स सॉफ्टवेअर व त्यासोबत काम करणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही सॉफ्टवेअरचा सोर्स कोड सदासर्वकाळ खुला असणं बंधनकारक आहे या तत्त्वावर त्याची नितांत श्रद्धा होती. पण आपल्या तत्त्वांशी जराही तडजोड न करण्याच्या वृत्तीमुळे त्याला जसे कट्टर समर्थक लाभले तसेच पराकोटीचे विरोधकही लाभले. आपल्या तत्त्वांसाठी विरोधकांबरोबर लढण्यात त्याची बरीच ऊर्जा व वेळ खर्च झाला, ज्यामुळे त्याचे कर्तृत्व व तो नेतृत्व करत असलेली फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशन ही संस्था फारशी उंची गाठू शकली नाही. तरीही जीएनयू प्रकल्प व जीपीएल लायसिन्सग पद्धती यासाठी तो सदैव ओळखला जाईल. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी, मूल्याधिष्ठित, नतिक आचरणाची कास धरणारी, पण बऱ्याचदा त्याचा अतिरेक झाल्यामुळे कर्मठ व कट्टरतावादाकडे झुकणारी अशी त्याची नेतृत्वशैली आहे.

स्टॉलमननंतर आलेल्या पण त्याच्यापेक्षा पुष्कळ जास्त प्रभावशाली ठरलेल्या लिनस टॉरवल्ड्सची नेतृत्वशैली भिन्न आहे. ओपन सोर्स जगतातील सर्वाधिक करिश्मा असलेला नेता असं त्याला यथार्थपणे ओळखलं जातं. लिनक्सची निर्मिती करून त्याचं प्रदीर्घ काळ नेतृत्व करणारा, पण त्याची कसलीही बडेजावकी न माजवणारा, स्वतला लिनक्समध्ये योगदान देणाऱ्या इतर तंत्रज्ञांबरोबरचंच स्थान देणारा पण वेळ पडल्यास स्वत प्रकल्पामध्ये घेतलेल्या एखाद्या निर्णयाच्या समर्थनार्थ दिग्गजांशीही (टॅनेनबॉम, थॉम्पसन वगरे) दोन हात करायला न कचरणारा असा हा अवलिया नेता आहे. ओपन सोर्स तत्त्वांशी त्याने नेहमीच बांधिलकी ठेवली पण स्टॉलमनप्रमाणे त्यांचं अवडंबर माजवू दिलं नाही. लिनक्ससारख्या अवाढव्य आकार व व्याप्ती असणाऱ्या प्रकल्पाला एकसंध ठेवण्याची तारेवरची कसरत करण्यामध्ये तो बऱ्याच अंशी यशस्वी झाला. त्याचं ‘कॅरिस्मॅटिक’ व्यक्तिमत्त्व, तांत्रिक कौशल्य व बेधडक कार्यपद्धतीमुळे त्याला प्रचंड अनुयायी लाभले ज्यांनी लिनक्सच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं.

स्टॉलमन व टॉरवल्ड्सच्या नेतृत्वशैलीत फरक असला तरीही दोघांच्याही ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमेमुळे त्यांचे प्रकल्प आजही त्यांच्या वैयक्तिक नावावरच ओळखले जातात. ब्रायन बेलेनडॉर्फने मात्र आपल्या व्यक्तिमत्त्वातील शक्तिस्थळं व मर्यादा ओळखून अपॅची वेब सव्‍‌र्हरच्या व्यवस्थापनासाठी एक वेगळा पर्याय स्वीकारला. तो हे जाणून होता की टॉरवल्ड्स किंवा स्टॉलमनसारखा करिश्मा त्याच्याकडे नसला तरी तो एक अत्यंत कुशल संघटक आहे. म्हणूनच त्याने ओपन सोर्सच्या इतिहासात प्रथमच प्रकल्प व्यवस्थापनासाठी प्रकल्पातल्या प्रमुख तंत्रज्ञांची एक मध्यवर्ती समिती गठित करून निर्णयप्रक्रियेचं विकेंद्रीकरण केलं. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यासाठी एकाच व्यक्तीवर अवलंबून राहण्याची गरज उरली नाही. निर्णयप्रक्रियेत प्रत्येकाचं मत विचारात घेऊन लोकशाही मूल्यांची जपणूक करणारी सर्वसमावेशक नेतृत्वाची ही नवी पद्धत बेलेनडॉर्फने ओपन सोर्स व्यवस्थेत रूढ केली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे यश हे त्याचा लोकांनी व्यावसायिक अथवा बिगरव्यावसायिक कामासाठी अधिकाधिक वापर करण्यावर अवलंबून आहे अशा ठाम मताच्या ब्रूस पेरेन्सची नेतृत्वशैली काहीशी हुकूमशाही प्रवृत्तीची भासली तरीही धोरणी, तसेच व्यावहारिक दृष्टिकोन असलेली होती. म्हणूनच डेबियनसारख्या प्रचंड व्याप्ती असणाऱ्या प्रकल्पाचं नेतृत्व करताना प्रकल्पाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रकल्पाची संस्थात्मक बांधणी व आíथक बाजू मजबूत असण्याची गरज त्याने सर्वप्रथम ओळखली. प्रकल्प हा एकखांबी तंबू होऊ नये म्हणून बेलेनडॉर्फप्रमाणेच पेरेन्सने प्रकल्प व्यवस्थापनात काही धोरणात्मक बदल केले. व्यक्तीपेक्षा संस्थेवर अधिक विश्वास असणारी, ओपन सोर्सला व्यावसायिकदृष्टय़ा अधिक परिपक्व बनवणारी अशी ही पेरेन्सची नेतृत्वशैली होती.

ओपन सोर्स प्रकल्पांत व्यावसायिक शिस्त आणण्याचं श्रेय मात्र मार्क शटलवर्थकडे जातं. गेले जवळपास १४ र्वष दर सहा महिन्यांनी उबुंटूची नवी आवृत्ती प्रसिद्ध करून त्याने ओपन सोर्स व्यवस्थेतील समुदायांच्या ताकदीला व्यावसायिक शिस्तीची जोड कशी देता येते याचा एक वस्तुपाठ घालून दिलाय. केवळ सोर्स कोडच्या अनुपलब्धतेमुळेच नव्हे तर इतर कोणत्याही कारणासाठी (वापरकर्त्यांची भाषा अथवा मानसिक क्षमता) जगातली कुठलीही व्यक्ती सॉफ्टवेअर वापरण्यापासून वंचित राहता काम नये या विचारांवर त्याचा दृढ विश्वास होता. त्यामुळेच व्यावसायिक शिस्तीसोबत मानवतावादी दृष्टिकोनाची सांगड घातलेली अशी शटलवर्थची नेतृत्वशैली होती.

जगभरातल्या ओपन सोर्स नेत्यांमधून अशी चार-पाच जणांची निवड करणं अत्यंत अवघड आणि अन्यायकारक असलं तरीही ओपन सोर्सच्या इतिहासात सर्वाधिक काळ आपला प्रभाव टिकवलेले, विभिन्न पण प्रातिनिधिक नेतृत्वशैली असलेले असे हे नेते आहेत. बऱ्याचशा यशस्वी ओपन सोर्स प्रकल्पांमध्ये वर उल्लेखलेल्या नेतृत्वशैलीचंच मिश्रण बघायला मिळतं. ओपन सोर्स प्रकल्पामधल्या गुंतागुंतीचे व्यवस्थापन हे केवळ प्रकल्पाचं नेतृत्व करू शकत नाही तर अनेक तांत्रिक, व्यवस्थापकीय बाबींचा त्यासाठी आधार घेतला जातो ज्याचा ऊहापोह आपण पुढील लेखात करू.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.

amrutaunshu@gmail.com